घरफिचर्सचारुलता : ‘ती’चं भावविश्व

चारुलता : ‘ती’चं भावविश्व

Subscribe

चारुलताच्या निमित्ताने रे केवळ एक क्लिष्ट आणि प्रगल्भ स्त्री पात्रच निर्माण करीत नाहीत, तर त्याला तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर आणतात. चारुलता आणि अमलमधील नात्यामध्ये कुठेही लैंगिक भावना वा जाणिवा दिसून न येताही त्याची तरलता आणि तीव्र संवेदना अबाधित राखली जाते. पुढे येऊन ठाकलेल्या नैतिक दुविधेकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यांना एक व्यक्ती म्हणून अधिक संवेदनशील आणि प्रगल्भ बनवतो.

सत्यजित रेंच्या ‘चारुलता’मध्ये चित्रपट या माध्यमाची सर्व अंगं एकमेकांना नको तितक्या अचूक आणि पूरक रीतीने सहाय्य करत एका नितांतसुंदर सिनेमाची निर्मिती केली जाते. त्यातील सुरुवातीच्या दृश्याकडे पाहिलं तरी ते कसं साध्य होतं याची कल्पना येऊ शकते. चारुलता (माधबी मुखर्जी) रुमालावर ‘बी’ हे इंग्रजीतील अक्षर विणत असलेल्या दृश्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची श्रेयनामावली येते. कॅमेरा तिच्या विश्वाशी, त्याहून अधिक स्पष्टपणे सांगायचं झाल्यास तिच्या मानसिकतेशी एकरूप होतो. तिच्या मनातील भावनांना अनुसरून ती वेगवेगळ्या गतीने ज्या काही हालचाली करत असते अगदी त्याच तर्‍हेने ही दृश्यं प्रेक्षकाला दिसतील, त्याला चारुलताच्या भावना समजून घेता येतील याची दक्षता रे घेतात. तिने नेहमीच्या कंटाळवाण्या कृतीपेक्षा निराळं काही करायची किंचितही उत्सुकता दाखवली तरी कॅमेरा आणि समोरील दृश्यांचं संकलनदेखील आधीपेक्षा अधिक जलदगतीचा भास निर्माण करतं. घराबाहेरील मदार्‍याला ऑपेरा ग्लासेसमधून न्याहाळत असताना तिच्या हालचाली टिपणारा कॅमेरा इतरवेळी ती घरातील फर्निचरवर बोटं फिरवत असताना तिच्याइतकाच रेंगाळू लागतो, आणि सत्यजित रेंचं पार्श्वसंगीतही अगदी मोजक्या जागांवर ऐकू येतं. परिणामी इतरवेळी चारुलताला भासणारी घर खायला उठणारी भावना निर्माण करणारी शांतता समोरील दृश्यांत जाणवत राहते.

- Advertisement -

ती ज्याच्यासाठी हा रुमाल विणत असते तो भूपती (शैलेन मुखर्जी) म्हणजे तिचा पती. तो ‘द सेन्टिनेन्ट’ नामक एका वृत्तपत्राचा सर्वेसर्वा आणि संपादक आहे. तो आपली बंगाली पार्श्वभूमी आणि उच्चवर्गीय संवेदनांच्या अनुषंगाने येणारी बुद्धिमत्ता आणि सजग राजकीय विचारसरणी असणार्‍या गटाचे प्रतिनिधित्व करतो. १८८० चं दशक असल्याने ब्रिटिश सरकारच्या भल्या-बुर्‍या सर्व गोष्टींची चिकित्सा करतो, आणि वेळोवेळी त्यावर टीका करतो. मात्र स्वतंत्र विचारसरणीचा पुरस्कर्ता असलेल्या भूपतीला चारुलताच्या मनात कंटाळवाण्या दैनंदिन जीवनातून निर्माण होणार्‍या अस्वस्थता आणि काहीशी बंदिस्त अवस्था लक्षात येत नाही. पुस्तक वाचण्यात आणि स्वतःच्याच विचारांत मग्न असलेला भूपती आपल्यापासून काहीच फूट अंतरावर असलेल्या चारुलताचं अस्तित्त्वही विसरून जातो अशी अवस्था आहे. त्याचं तिच्यावर नितांत प्रेम असलं तरी तिच्यासाठी वेळ न काढता येण्याची आपली सवय त्याला सहजासहजी लक्षात येते असं नाही. अखेरीस त्याला हे जाणवतं तेव्हा तो चारुलताचा भाऊ उमपदा आणि त्याची पत्नी मंदाला आपल्या घरी बोलावतो. जेणेकरून उमपदा त्याला त्याच्या कामात मदत करेल आणि चारुलताला मंदाची सोबत मिळेल. मात्र मूलतःच चारुलताच्या अगदी विरुद्ध स्वभावविशेष असलेली मंदा काही तिच्यासाठी उत्तम सोबत म्हणून उल्लेखनीय ठरत नाही.

अशातच भूपतीचा भाऊ अमल (सौमित्र चटर्जी) काहीशा अनपेक्षितपणेच त्यांच्या घरी येऊन धडकतो. आपल्या लेखनातील कारकिर्दीच्या शक्यता आजमावत असलेल्या अमलच्या अनायासे घडलेल्या आगमनामुळे भूपतीला एक कल्पना सुचते. चारुलताची बुद्धिमत्ता, तिचं वाचन आणि तिच्या संभाव्य कलात्मक अंगांची जाण असलेला भूपती तिला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी अमलवर सोपवतो. चारुलताच्या आयुष्यात रस घेत, तिच्या कलात्मक जाणिवांना प्रोत्साहन देणार्‍या अमलच्या निमित्ताने तिला एक निराळं अवकाश गवसतं. त्याच्या निमित्ताने तिचं लेखनकौशल्य बहरत जातं, पण त्यासोबतच ती त्याच्याकडे आकर्षित होते. हे घडायला नको याची जाणीव मनात असली तरी दोघांमधील तरल नात्याच्या अस्तित्त्वाचा स्वीकार, आणि नैतिक बंधनांमुळे त्यापासून दूर जाण्याचे प्रयत्न अशा क्लिष्ट बाबी हाताळल्या जातात.

- Advertisement -

रवींद्रनाथ टागोरांच्या ‘नष्ट्नीड’ नावाच्या एका कथेवर आधारित असलेल्या सदर चित्रपटाच्या, त्यातही पुन्हा चारुलताच्या निमित्ताने रे केवळ एक क्लिष्ट आणि प्रगल्भ स्त्री पात्रच निर्माण करीत नाहीत, तर त्याला तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर आणतात. चारुलता आणि अमलमधील नात्यामध्ये कुठेही लैंगिक भावना वा जाणिवा दिसून न येताही त्याची तरलता आणि तीव्र संवेदना अबाधित राखली जाते. पुढे येऊन ठाकलेल्या नैतिक दुविधेकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यांना एक व्यक्ती म्हणून अधिक संवेदनशील आणि प्रगल्भ बनवतो. माधबी मुखर्जीने साकारलेली चारुलता सौंदर्य, बुद्धिमत्ता तसेच भावनिक व मानसिक परिपक्वता यांचे सुरम्य आणि यथार्थ दर्शन घडवते. तर सौमित्र आणि शैलेन मानसिकतेच्या पातळीवर जवळपास टोकाच्या भूमिकांमध्ये नैसर्गिकपणे वावरतात. रेंच्या दिग्दर्शनाखाली काम करणारे हे लोक अभिनयाबाबत एकही चुकीची तार छेडताना दिसत नाहीत.

एका मुलाखतीत सत्यजित रेंना त्यांना त्यांच्या आवडत्या स्वतःच्या चित्रपटाबाबत विचारलं असता त्यांनी ‘चारुलता’चं नाव घेतलं होतं. कारण त्यांच्या मते आजही त्यांचा चित्रपट आधी बनवला तसाच बनवायचा झाल्यास ‘चारुलता’ पुन्हा आहे तसाच बनवावा इतपत निर्दोष वाटतो. जे खरंही आहे. कारण तांत्रिक बाबींसोबत एकूणच मांडणीच्या पातळीवर शोधूनही उणीव सापडणार नाही इतका सरस आहे. शिवाय रे चित्रपटाला मूळ कथेतील कालखंडापेक्षा दोनेक दशकं मागे घेऊन जातात तेव्हाही त्यातील राजकीय संदर्भ बोथट होत नाहीत, की चित्रपटाची विश्वनिर्मिती कुठे अपरिपूर्ण वा अपरिपक्व भासत नाही. उलट क्वचितच घराच्या आवारातून बाहेर घडणार्‍या सदर चित्रपटाचं बन्सी चंद्रगुप्ताने केलेलं कला दिग्दर्शन ऐंशीचं दशक आणि परिणामी सदर पात्रांचा भोवताल अगदी अस्सलरित्या उभं करतं.

‘चारुलता’मधील पात्रांचं भावविश्व लहानसहान गोष्टी आणि निरीक्षणातून टिपलं जातं. भूपती आणि चारुलताच्या स्वभावातील फरक जितक्या ठळकपणे स्पष्ट केला जातो. भूपतीचं चारुवरील प्रेमही चित्रपटातील संवादांच्या किंवा दृश्यांच्या माध्यमातून तितक्याच उत्कटतेने दिसून येतं. तर चारुलता आणि अमलमधील नातंही अगदी तरल सूचकतेच्या माध्यमातून उलगडलं जातं. कारण मुळातच कथेला किंवा दिग्दर्शकाला कुठलीही गोष्ट उघड उघड दिसेल इतपत बाळबोध दृष्टीकोनातून दाखवण्यात रस नाही. इथे नात्यातील हळवेपणा आणि सहजता, सूक्ष्म निरीक्षणं अधिक महत्त्व बाळगतात. अगदी जेव्हा चित्रपटाचा शेवटही टागोरांच्या मूळ कथेहून काहीशा वेगळ्या आणि अधिक सूक्ष्म पद्धतीने होतो, तेव्हाही तो कथेतील अर्क दृश्यरूपात गुंफत आपल्या विश्वाला एक परिपूर्णता बहाल करतो.

तसं पाहायला गेल्यास सत्यजित रेंच्या चित्रपटकर्ता म्हणून असलेल्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या कौशल्याचा संदर्भ द्यायचा झाल्यास त्यांच्या कुठल्याही चित्रपटाचा संदर्भ देणं उचित ठरत असलं तरी ‘चारुलता’ त्या यादीत जरा अधिक वर राहील, एवढं मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -