चीनच्या कुरघोड्या आणि भारतीय जवान

indian troops crossed border twice and attacks on chinese soldiers says china foreign minister
India and China

चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी वर्तमानपत्रामध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संपादकीय लेखात ‘सध्या चालू असलेल्या सीमावादामध्ये भारताला जिंकण्याची कोणतीही संधी नाही. आजच्या घडीला युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. चीन शक्तिशाली असल्याची आठवण आम्ही भारताला करून देत आहोत’, अशी दर्पोक्ती केली. हाच चीनचा गर्व आहे. त्यामुळे आपल्यालाही चीनला हे ठणकावून सांगावे लागेल आणि प्रत्यक्ष कृतीतून दाखवावे लागेल की, हा आता १९६२ मधील भारत राहिलेला नाही. चीनकडे भारताच्या तुलनेत पैसा, सैन्यशक्ती आणि आधुनिक शस्त्रास्त्रे जरी अधिक असली, तरी भारतीय सैनिकांप्रमाणे लढाऊ वृत्ती नाही. याची प्रचिती भारताने चीनला गलवान खोर्‍यात नुकतीच दिली आहे. युद्ध सैन्यशक्तीच्या आधारावर नव्हे, तर मनोबळावर लढले जाते. यासंदर्भात भारतीय सैनिक चीनपेक्षा कित्येक पटींनी सरस आहेत, हे भारताने दाखवून दिले आहे. तैवानसारखा छोटासा देशही संपूर्ण शक्ती एकवटून बलाढ्य चीनच्या डोळ्यांत डोळे घालून बोलतो. चीनचा विस्तारवाद, हेकेखोरपणा, बेभरवशी आणि विश्वासघातकी वृत्ती यामुळे भारत, अमेरिका, थायलंड यांसारख्या अनेक राष्ट्रांनी चीनशी असलेले व्यावसायिक करार रहित केले आहेत. युद्ध हे केवळ भूमीवर आणि शस्त्रांच्या जोरावर लढले जाते, या भ्रमात असलेल्या चीनला आता आर्थिक युद्धाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच त्याचा तिळपापड झाला असून त्यातूनच तो वरीलप्रमाणे धमक्या देत आहे.

गलवान खोर्‍यात मार खाल्ल्यानंतरही चीनने भारतीय सीमेत पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न मागील आठवड्यात केला होता. त्यावेळी चीनच्या सैनिकांनी मोठ्या प्रमाणात सैन्य फौजफाटा घेऊन पँगाँग सरोवराच्या दक्षिण बाजूकडून पश्चिमेकडे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या क्षेत्रावर ताबा मिळवणे, हा चीनचा कट होता. परंतु त्या ठिकाणी पाय रोवून उभ्या असलेल्या भारतीय सैन्याच्या जागरूकतेमुळे चिन्यांचा हा प्रयत्न निष्प्रभ ठरला. इतकेच नव्हे तर घुसखोरी करणार्‍या सैन्यांना भारतीय सैन्याने अक्षरशः पिटाळून लावले. आता काल पुन्हा चिनी जवानांनी घुसखोरी केली, यावेळी मात्र दोन्ही बाजूने हवेत गोळीबार झाला, त्यातही चिनी सैनिक घाबरून पुन्हा धूम ठोकून पळून गेले. भारतीय सैन्यासमोर चिनी सैनिक टिकाव धरू शकत नाहीत, हे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. चीनचा विश्वासघातकी स्वभाव पहाता तेथे आधीपासूनच भारतीय सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय जवान पूर्णतः तयार आहेत. मात्र, चिन्यांची ही कुरघोडी अजून सहन करायची हा खरा प्रश्न आहे.

डोकलाममध्ये चीन अडीच महिने तळ ठोकून होता. भारताचे रणझुंझार सैनिकही चिन्यांच्या डोळ्याला डोळे भिडवून समोरासमोर उभे ठाकले होते. शेवटी अडीच महिन्यांनंतर हा वाद सुटला. त्यानंतर काही सीमा भागांत चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीय सैनिकांनी तेव्हाही तो उधळून लावला. चीनने घुसखोरी करणे आणि भारतीय सैनिकांनी त्यांना पिटाळून लावणे, हे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यापाठोपाठ गलवान खोर्‍यात दोन्ही देशांच्या सैन्यांत झालेल्या झटापटीत चीनचे अनेक सैनिक मारले गेले. तेव्हा चीनला भारतीय सैनिकांच्या ताकदीचा खर्‍या अर्थाने प्रत्यय आला. पण सुधारेल तो चीन कसला? त्याने पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच चीनच्या या घुसखोरीकडे केवळ घुसखोरी म्हणून पहाणे धोक्याचे ठरेल. हे चीनने भारताविरुद्ध सरळसरळ पुकारलेले युद्धच आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी सर्वप्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे आणि त्यानुसार पावले उचलली पाहिजेत. चीनची घुसखोरी उधळून लावणे, हा आपला एकप्रकारे विजय आहेच; पण चीन एकही पाऊल पुढे टाकण्याचे धाडस करणार नाही अशी धडकी भरणारी कारवाई करणे, हा खर्‍या अर्थाने विजय असेल. थोडक्यात आपण चीनला आता देत आहोत, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक कठोर भाषेत उत्तर दिले पाहिजे.

प्रत्येक घुसखोरीनंतर दोन्ही सैन्यांतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी चर्चा करायची, त्यात अनेक गोष्टींवर एकमत असल्याचे सांगायचे आणि तिसर्‍या दिवशी चीनने पुन्हा दुसरीकडे घुसखोरी करायची, हा पोरखेळ आपण एक राष्ट्र म्हणून आणखी किती वर्षे सहन करणार आहोत? चीनने अशा प्रकारे भारतात घुसखोरी करणे, हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे, हे भारताने जागतिक व्यासपीठांवर सांगायला हवे. पाकप्रमाणे आता चीनचीही आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी केली पाहिजे. कुणाला पटो अथवा न पटो; पण जग नेहमी आक्रमकतेलाच घाबरते, हा इतिहास आहे. इस्रायल हे याचे उत्तम उदाहरण आहे. चोहोबाजूंनी कट्टर इस्लामी राष्ट्रांनी वेढलेले असताना गेल्या ७ दशकांहून अधिक काळात छोट्याशा इस्रायलला आजपर्यंत एकही इस्लामी राष्ट्र पराभूत करू शकलेले नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यामागचे कारण म्हणजे इस्रायलची आक्रमकता! तेथे कुठलेही सरकार सत्तेवर आले, तरी आक्रमकता हे त्यांचे राष्ट्रीय पातळीवरील अपरिहार्य धोरण आहे. त्यामुळे चोहोबाजूंनी शत्रूने वेढलेला असून इस्रायलमध्ये कुणी घुसखोरी करू धजावत नाही. हा धाक आणि दहशत आपण चीन आणि पाकिस्तान यांच्याविषयी निर्माण केली पाहिजे. आपल्या देशाचे एक दुर्दैव आहे की, शत्रूने जे बोलायचे असते किंवा जी विधाने करायची असतात, ती विधाने आपल्याकडे विरोधक करताना आढळतात. खरे तर ‘शत्रू समोर उभा ठाकल्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांचा एकसूर निर्माण झाला पाहिजे. त्यातच राष्ट्रहित असते; पण आपल्याकडे तेच तर नको असते. आता याही घुसखोरीवरून सरकारला घेरले जाईल आणि हा राष्ट्रीय विषय राजकारणाचा बनवून टाकला जाईल. अशाने या प्रकरणातील गांभीर्य कमी होऊन मुख्य मुद्दा बाजूला पडेल. शत्रूला हेच तर हवे असते. त्यामुळे शत्रूची भाषा बोलून शत्रूचे काम सोपे करणार्‍यांवरच आधी प्रथम कठोर कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे.

चीनने केलेल्या घुसखोरीच्या काही तास अगोदरच भारताने धूर्त चीनची चाल ओळखून दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केली. विशेष म्हणजे याच समुद्रात अमेरिकेनेही त्याच्या अनेक विमानवाहू युद्धनौका तैनात केल्या आहेत. भारताने राफेल ही अत्याधुनिक लढाऊ विमाने आणून हवाईमार्गे, दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात करून जलमार्गे, तर प्रत्यक्ष सीमेवर पायदळ तैनात करून भूमार्गे चीनला आव्हानच दिले आहे. तथापि चीनला हे पुरेसे नाही आणि त्याला ही भाषा समजतही नाही, हेच त्याची ही घुसखोरी सांगते. गेल्या अनेक दशकांपासून तत्कालीन काँग्रेस सरकारने चीनला कधीही प्रत्युत्तरच न दिल्याने त्याची मानसिकता अरेरावीची बनली आहे. इतकेच नव्हे, तर काँग्रेसने आपल्या देशाचा मोठा भूभाग स्वतःची वडिलोपार्जित मालमत्ता असल्याप्रमाणे चीनच्या घशात घातला आहे. काँग्रेसजणांच्या या अशा वृत्तीमुळेच चीन वरचढ झाला. त्यातूनच त्याची ‘आपण काहीही केले, तरी भारत काहीच करू शकणार नाही’, ही मानसिकता निर्माण झाली. आता विद्यमान सरकारला चीनचा हा भ्रम दूर करावा लागेल. त्यासाठी पाकिस्तानावर केला, तसा धडक सर्जिकल स्ट्राईक करून चीनला ‘हा १९६२ चा भारत नाही’, हे दाखवून द्यावे लागेल. असे केले, तरच चीन वठणीवर येईल. सरकारने हे पाऊल उचलले, तर समस्त राष्ट्रप्रेमी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील.