स्त्रीदास्य मुक्तीचे मारेकरी

भारतीय स्त्री ही कुणी वेगळीच आहे असा काहीसा पवित्रा मागास-संस्कृतीरक्षक लोकांचा असतो. हे लोक तसे अनेक घराघरांत कुटुंबांत विखरून असतात. नवे ज्ञान, नवे तंत्रज्ञान, नवे आकाश स्त्रीलिंगी माणसांना गवसूच नये, गवसलेच तर त्यांना ते फार काळ उपभोगता येऊ नये, म्हणून हे असले लोक हंशाटाळ्या मिळवत अगदी थिल्लर प्रकारे मनोरंजन करत स्त्रीदास्यमुक्तीवर टीका करीत असतात.

Mumbai

स्त्री म्हणजे काहीतरी वेगळी माणूस आहे हे सांगण्याचं प्रथम बंद झालं पाहिजे. स्त्री आणि पुरुष यांची उत्क्रांतीतील नैसर्गिक निवडीच्या तत्वातून बनलेली वेगळी शरीरे, त्यांच्या काही इंद्रियांची-जननेंद्रियांची कार्ये ही जरी वेगवेगळी असली तरीही त्यांचे रक्त, हाडे, हृदय, यकृत, फुफ्फुसे, श्वसनसंस्था, पचनसंस्था, कातडी, दात, नखे, स्नायू, हातपाय, ज्ञानेंद्रिये, मज्जासंस्था म्हणजेच मेंदूही सारख्याच प्रकारे कार्यरत असतात. स्त्री आणि पुरुष दोघांनाही होणारे कर्करोग, हृदयविकार, मधुमेह, सिर्‍हॉसिस वगैरे सारखेच असतात. स्त्रीचा शेंबूड वा इतर उत्सर्जिते सुगंधी वा दुर्गंधी असतात आणि पुरुषाची नसतात असे काही आजवर तरी कुणाला आढळलेले नाही.

मग स्त्रीपुरुषांत जननेंद्रिये, त्यानुसार असलेले स्तन,कंबर यांचे लहानमोठे आकार आणि गर्भधारणाशक्ती यातील फरक सोडला तर फरक कुठला आहे? स्त्रीची भावनाप्रधानता वा संवेदनशीलता आणि पुरुषाचा कणखरपणा, कठोरपणा या सार्‍या अतीचर्चित, अतीफुल्लित गोष्टींना अद्यापही फारसा आधार नाही. या ना त्या प्रकारचे भय आणि दहशत या खाली वावरणार्‍या व्यक्ती नेहमीच अधिक झटकन रडवेल्या होतात, थरकापतात. आणि मुळापासूनच फारसे भय वाट्याला न आलेल्या व्यक्ती कणखर होतात. लहानपणापासून संस्कार होतात ते असेच. अमकं करू नको, तमकं करायचं नाही, असं वागू नये, तसं बोलू नये, अमुक केलं तर झोडपून काढलं जाण्याचं भय-शारीरिक वा शाब्दिक हिंसेचे भय ज्यांच्या वाट्याला येते त्यांच्या संवेदना उत्क्रांतीच्या नियमांनुसारच अधिक जपून वागायला शिकवतात. आणि कदाचित हे भय स्त्रियांच्या जनुकांतही रेखले गेले असते, पण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत असे बदल होण्यासाठी लक्षावधी वर्षे जावी लागतात. आणि जगातील पुरुषप्रधान संस्कृतींमध्ये स्त्रीलिंगी माणसांचे दमन फार नाही काही हजार वर्षांपासूनच सुरू झाले आहे. त्यामुळे जे भयाकुल होणे, भावनाकुल होणे वगैरे होते ते जनुकजन्य अनुवंशातून नव्हे तर परिस्थितीवशात होते असे स्पष्ट म्हणता येते.

खरे म्हणजे आपण स्त्रीलिंगी माणसांनी-हा वाक्प्रयोग मी अगदी स्पष्ट हेतूने करते आहे-स्त्रीलिंगी माणसे. आम्ही स्त्रिया आणि आम्ही पुरुष या कथनात आम्ही माणसे या भावनेचा बर्‍याच अंशी लोप होतो. आपण सारेच एकाच मानववंशातील आहोत याचा विसर पडण्यासाठी ही भेदगामी शब्दरचना अधिकाधिक परिणामकारक होत रहाते आहे. परवाच आंतरराष्ट्रीय स्त्री दिन पार पडला. त्यात आपण स्त्री असल्याचा अभिमान स्त्रियांकडून व्यक्त केला जाण्याचे प्रमाण फार मोठे होते. पुरुषही स्त्रियांना स्त्री म्हणून विशेष मान देत होते. एका विशिष्ट परिस्थितीत हे योग्यही आहे. स्त्रीदास्याच्या कल्पना मेंदूत घर देऊन वागवणार्‍या लोकांच्या मनावर परिणाम करण्यासाठी, त्यांच्या जाणिवा थोड्या समृद्ध करण्यासाठी हे आवश्यक होते, असेल.
पण यापलिकडे जाऊन आपल्याला आपला एक माणूस म्हणूनच विचार करणे भाग आहे. स्त्रीलिंगी माणूस आणि पुल्लिंगी माणूस, भिन्नलिंगी माणूस असे काहीही भेद असोत-मुख्य ओळख ही माणूस हीच असायला हवी.

घरीदारी, कुटुंबात, कामाच्या ठिकाणी स्वतःचा विचार केवळ स्त्री म्हणून न करता एक माणूस म्हणून करणे, स्वतःचा विचार केवळ एक पुरुष म्हणून न करता एक माणूस म्हणून करणे किंवा आपण भिन्न लिंगी म्हणून न करता आपण माणूस म्हणूनच करणे हे आपल्या विवेकी जगण्याच्या वाटचालीतले पहिले पाऊल आहे.

आता याची प्रतिबिंबे कितीतरी ठिकाणी पडू शकतात. त्या व्यवहारातील जागा पाहू. जन्म देणे, बाळाला अंगावर दूध पाजणे हे ज्यामुळे शक्य होते त्या स्त्रीशरीरात आपली प्रज्ञा आपले मन वास करते ते शरीर एक सहजोत्पन्न घटित आहे. जसे शुक्रजंतू उत्पन्न होणारे शरीर पुल्लिंगी माणसांत आहे, किंवा यापैकी काहीच न होणारे शरीर भिन्नलिंगी माणसांत आहे हेदेखील सहजोत्पन्न घटित आहे. या सहजोत्पन्नतेमुळे स्त्री वा पुरुषांवर वा भिन्नलिंगींवर इतर कोणत्याही जबाबदार्‍या आपतः किंवा सहजोत्पन्न येऊन पडत नाहीत. त्या जबाबदार्‍या या धर्म-राजकारण-समाजसत्ता या त्रयीने गेली चारपाच हजार वर्षे वेगवेगळे नियमन करून लादलेल्या आहेत. त्या कसकशा विकसित झाल्या, किंवा दास्याचे, शोषणाचे रोख फायदे पाहून कसकशा घट्ट होत गेल्या हा विषय फार मोठा आहे, आणि त्याचे वाचन करावे हे मी निश्चित सुचवेन, सर्व माणसांना. पण त्या निसर्गदत्त नक्कीच नाहीत. समाजसत्तेची शोषणशक्ती म्हणजेच जतन करावी अशी उदात्त संस्कृती असते हा एक फार मोठा गैरसमज आपल्या मनात रुजलेला असतो. जो सर्व लिंगी माणसांच्या मनांत धर्म-देव-रूढी-परंपरा यांच्या उदात्तीकरणाद्वारे किंवा ढोल बडवण्यातून, खुल्या जखमेवर जळू चिकटवल्यासारखा जडवला जातो. ही जळू खस्सकन ओढून ठेचायला हवी. काही क्षण नक्कीच रक्तस्राव होतो. पण नंतर रक्तशोष थांबतोच.

आम्ही अनेक विचारी बायामाणसे या जळवा फेकून देऊन रक्तशोष थांबवण्यात यशस्वी झालो आहोत. पण त्याची किंमत चुकवणे नेहमीच सोपे असते असे नाही. विशेषतः तुमचे प्रिय असलेले वा नसलेलेही सवयीचे आप्तजन तुमचे रक्त काढू शकतात हे खरेच आहे.

दोघांना झालेल्या अपत्याला जन्म देऊन झाल्यावर, त्याला अंगावर दूध पाजत असतानाही अनेक बायामाणसांना वाटते बापईमाणसाला त्याचे हगमूत काढायला कसे सांगावे, डायपर बदलायला कसे सांगावे. बाळाच्या शीचा रबडा, वास फक्त आईनेच काढावा असा काहीही निसर्गदत्त नियम घडलेला नाही. बाळासाठी अन्न शिजवणे, त्याला आंघोळ घालणे ही कामे बाईमाणसांप्रमाणेच बापईमाणसेही करू शकतात. स्वयंपाक करू शकतात, कपडे धुवू शकतात, झाडलोट, आवराआवरी, साफसफाई, सारी कामे कोणत्याही लिंगाची माणसे करू शकतात. लिंग अमुक म्हणून कोणतेही ज्यादा काम करायला लावणे हा नंतरच्या नियमांचाच बडिवार होता. त्यातून एक दास्यव्यवस्था आपसूकच घट्ट होत गेली. याच दास्यव्यवस्थेला टिकवणे म्हणजेच तथाकथित संसार टिकवण्याचा मूलमंत्र समजावा अशी शिकवण हेतूपुरस्सर दिली जाऊ लागली.

जगभर जसजसे विवेकी समाज उदयाला येऊ लागले तसतशी ही दास्यव्यवस्था धुडकावली गेली. स्त्रीपुरुष अशा दोन्ही लिंगांच्या माणसांनी समाजस्थित्यंतराच्या काळात जे काही नियम तेव्हाच्या काळाला साजेसे होते ते आता कालबाह्य झाले हे समजून घेऊन भिरकावून दिले. प्रजनन हेच मानवजातीचे प्रमुख कार्य राहिले नाही, कुटुंब टिकवणे हेच एकमेव सुरक्षेचे साधन राहिले नाही, तेव्हा स्वतःच्या बुद्धीप्रतिभेचा विकास हा प्राधान्यक्रम झाला. आणि नरे चि केला हीन किती नर प्रकारातल्या चौकटी मोडल्या गेल्या. भारतातल्या शहरात या चौकटी मोडल्या गेल्या आहेत. गावाखेड्यात त्या मोडल्या जाऊ नयेत, आणि समाजसत्ता, जुन्या शोषण व्यवस्था कायम रहाव्यात म्हणून बर्‍याच संघटना, मागास विचारांच्या संघटना आणि व्यक्ती फुगवून फुगवून संस्कृतीचा उदोउदो करीत असतात.

इंदुरीकर नावाचा पोंगा कीर्तनकार, रामतीर्थकर नावाची पोंगा प्रवचनकार आणि असले अनेक लोक महाराष्ट्रभर मागास विचार थापून मिरवत असतात. त्यांना आमंत्रणे देऊन आपल्या बुद्धीवर आपल्या हाताने कुर्‍हाड मारून घेणारे समूह इथे आहेत हेच मुळात लांच्छन आहे.

भारतीय स्त्री ही कुणी वेगळीच आहे असा काहीसा पवित्रा या मागास-संस्कृतीरक्षक लोकांचा असतो. हे लोक तसे अनेक घराघरांत कुटुंबांत विखरून असतात. नवे ज्ञान, नवे तंत्रज्ञान, नवे आकाश स्त्रीलिंगी माणसांना गवसूच नये, गवसलेच तर त्यांना ते फार काळ उपभोगता येऊ नये, म्हणून हे असले लोक हंशाटाळ्या मिळवत अगदी थिल्लर प्रकारे मनोरंजन करत स्त्रीदास्यमुक्तीवर टीका करीत असतात.

दुर्दैव म्हणजे देशावर ज्याची काळी सावली आहे त्या सत्ताधारी पक्षाच्या धार्मिक समजेला साजेसे जे जे बोलले जाते, लिहिले जाते त्याला सहजच राजाश्रय मिळतो आहे. अनेक ठिकाणांहून विज्ञानविरोधी, आधुनिकता विरोधी, उदारमतवाद विरोधी अशा प्रतिगामी बोलघेवड्या पोकळ लोकांना व्यासपीठ मिळते आहे. घणाघाती, जोरदार वक्तृत्व म्हणजे ज्ञान नव्हे, कामही नव्हे हे अजून किती प्रकारे सिद्ध व्हावे लागेल… कोण जाणे. पण काहीच वाचन नाही, ज्ञानाची साधनेच नाहीत अशा कप्प्यांमधल्या स्त्रीपुरुषांनी याच शृंखलांत बंदिस्त रहावे म्हणून आपली जीभ झिजवणार्‍या या वक्त्यांना शक्य होईल तिथेतिथे आव्हान दिले पाहिजे.

भारतातील स्त्रीवादी आंदोलनापुढे हे एक महत्त्वाचे आव्हान आहे. आपण सर्वांनी मिळून भूतकाळाच्या गोजिर्‍या नरकात परत लोटू पाहाणार्‍या या लोकांना पराभूत केले पाहिजे. तरुण सुशिक्षित, विवेकी मुलामुलींनी या जुन्या खोडांचा वक्तृत्वाने आणि लेखनाने पराभव केला पाहिजे असे मी आवाहन करेन.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here