घरफिचर्सस्पर्धा परीक्षा...प्रवास खडतर खरा!

स्पर्धा परीक्षा…प्रवास खडतर खरा!

Subscribe

आधीच्या दोन प्रयत्नांमध्ये मला अपयश आले. पहिल्या प्रयत्नात राज्य सेवा मुख्य परीक्षेत अपयश, तर दुसर्‍या प्रयत्नात केवळ 3 गुणांनी लिस्टच्या बाहेर राहावे लागले. त्यातून पूर्वाश्रमीच्या आयुष्यात कायम टॉपर असण्याची सवय होती. त्यामुळे हळूहळू एक एक शिखर चढत असताना अचानक खोल दरीत कोसळावं अशी ती दोन वर्षं होती. मात्र, त्यातून बाहेर पडण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि आई-वडील तसेच मार्गदर्शक गणेश शेट्टी सर यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि मला खंबीर पाठिंबा दिला.

आपण समाजाचं काही तरी देणं लागतो आणि त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून माझ्या प्रशासकीय सेवा या ध्येयाची वाटचाल सुरू झाली. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारी ही ‘सेवा’ आपल्यावर सोपवते. तर अशा या प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय मनाशी बाळगून वाटचाल सुरू केली. परंतु ही वाट बर्‍याचदा खूप मोठी, खडतर आणि प्रत्येकासाठी संघर्षमय असते. असे म्हणतात When your why is clear, then any how is easy !

ध्येयाप्रतीची निष्ठा ही आपल्याला आपल्या ध्येयापासून भरकटू देत नाही. माझ्याही या तीन ते चार वर्षांच्या प्रवासात अनेक वेळा यश-अपयश आलं. अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, ध्येयावरच्या निष्ठेमुळे हा मार्ग सातत्यपूर्णपणे चालत राहाणं मला जमू शकलं.

- Advertisement -

माझ्यासाठी सगळ्यात पहिलं चॅलेंज होतं ते म्हणजे घरी राहून अभ्यास करणे. मी स्वत:हूनच घरी म्हणजे नवी मुंबईत राहून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई-नवी मुंबईसारख्या शहरात स्पर्धा परीक्षांचं तितकंसं वातावरण नाही. त्यामुळे घरी राहून अभ्यास करणार्‍या उमेदवारांना आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेत अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. त्यादृष्टीनं मी ठाणे येथील द युनिक अकॅडेमीमधून मार्गदर्शन घेतलं. त्यामुळे माझा वेळ तर वाचलाच, पण कोणत्याही वेळी अभ्यासामध्ये काहीही शंका आलीच, तर ताबडतोब निरसन व्हायला मदत झाली.

याशिवाय स्पर्धा परीक्षा ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे. परीक्षेचं एक वर्तुळ पूर्ण होण्यासाठी जवळपास एका वर्षाहून जास्त काळ जातो. त्यामुळे प्रचंड संयम असावा लागतो. तसेच, सातत्यही टिकवून ठेवावे लागते. त्यात यश-अपयशाचा थेट सामनाही ओघाने आलाच.

- Advertisement -

आधीच्या दोन प्रयत्नांमध्ये मला अपयश आले. पहिल्या प्रयत्नात राज्य सेवा मुख्य परीक्षेत अपयश, तर दुसर्‍या प्रयत्नात केवळ 3 गुणांनी लिस्टच्या बाहेर राहावे लागले. त्यातून पूर्वाश्रमीच्या आयुष्यात कायम टॉपर असण्याची सवय होती. त्यामुळे हळूहळू एक एक शिखर चढत असताना अचानक खोल दरीत कोसळावं अशी ती दोन वर्षं होती. मात्र, त्यातून बाहेर पडण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास आणि आई-वडील तसेच मार्गदर्शक गणेश शेट्टी सर यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि मला खंबीर पाठिंबा दिला.

सलग 2 ते 3 वर्षं अभ्यास करत राहाणं हीदेखील एक कठीण बाब आहे. त्यातून मुंबईसारख्या शहरात राहत असताना आपले इतर मित्र-मैत्रिणी इतर नोकर्‍या घेऊन किंवा पुढील शिक्षण घेऊन रुढार्थाने ‘सेटल’ होत असताना आपण केवळ परीक्षाच देत आहोत हा एक मानसिक संघर्ष करावा लागला. त्यावर मात करण्यासाठी डिव्होशन म्हणजे झोकून देऊन सातत्यपूर्ण तयारी करत राहाणं हा एकमेव मार्ग मला सापडला. काही माणसं जशी दररोज न चुकता देवपूजा करतात किंवा उठल्यावर आपण जसे रोज दात घासतोच, त्याप्रमाणे काहीही झालं तरी रोज डिव्होशनने अभ्यास हा केलाच पाहिजे. त्यासाठी स्वत:ला सतत अभ्यासाच्या झोनमध्ये ठेवणे गरजेचे आहे. केवळ वाचन, लेखन म्हणजेच अभ्यास असे नाही. तर वाचलेल्या गोष्टींचे चिंतन, मननही तितकेच महत्त्वाचे आहे. मग ते कुटुंबीयांशी किंवा मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारताना स्वत:हून आपण केलेल्या अभ्यासाची जाणीवपूर्वक चर्चा करणे असे उपाय केले.

याशिवाय आधी सांगितल्याप्रमाणे सातत्याने दोनदा अपयश पचवावे लागले. त्यामुळे त्यांनाच प्रेरणास्त्रोत करण्याचे ठरवले. आधीच्या मुख्य परीक्षेतील गुण एका कागदावर लिहून काढले आणि कोणत्या विषयात किती गुण वाढवले पाहिजेत, ते समोर लिहिले आणि या कागदाचा फोटो काढून तो मोबाईलवर वॉलपेपर म्हणून लावून टाकला! त्यामुळे ध्येय सतत डोळ्यांसमोर राहिले आणि दुसरे म्हणजे कधी मोबाईलवर टाईमपास करावा वाटला तरी ते ध्येय बघून पुन्हा अभ्यासाकडे आपोआप मन वळत असे.

त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा देणार्‍या प्रत्येक उमेदवारालाच अनिश्चितता आणि असुरक्षितता कधीतरी वाट्याला येतेच. तरी त्यासाठी संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे, असाध्य ते साध्य । करिता सायास । कारण अभ्यास । तुका म्हणे॥ सातत्यपूर्ण अभ्यास आणि संयम ठेवणं गरजेचं आहे.

आपण केलेला अभ्यासच आपल्याला परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास देतो. त्यामुळे प्रयत्नपूर्वक स्वत:ला फोकस्ड ठेवा. ही एक प्रक्रिया आहे आणि तयारीच्या काळातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. कोणतीही इमारत जशी एका एका विटेवर उभी राहत जाते, तसाच हा तयारीचा प्रत्येक दिवस हा मैलाचा दगड ठरतो. so give your best and the best will come to you!

-श्रुतिषा पाताडे
-एमपीएससी एसईबीसी महिला फर्स्ट रँक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -