प्रितम आन मिलो!

आपली वाट आपणच चालायची आहे, आपल्याला कुणीही गॉडफादर नाही हे ओ.पी.नय्यर यांना ठाऊक होतं, साहजिकच, गाणं करताना कुणा कवी-गीतकाराच्या शब्दाची प्राप्ती आपल्याला झाली नाही तर आपणच आपलं कवी बनावं असं त्यांनी ठरवून टाकलं. ‘प्रितम आन मिलो’ हे गाणं करताना त्यांनी आपल्याच गाण्यासाठी आपणच आपले शब्द लिहिले. ओ.पी. कधी कधी गाणं करताना जे स्वत:चे डमी शब्द लिहायचे त्याला ते स्वत:च्या मालकीचे शब्द म्हणायचे. ‘प्रितम आन मिलो’ हे असेच त्यांच्या स्वत:च्या मालकीचे शब्द होते आणि ते डमी राहिले नव्हते. त्याच शब्दात तसंच्या तसं ते गाणं रेकॉर्ड झालं होतं. ते गाणं त्या एका काळात गाजलं होतं. सर्वदूर पोहोचलं होतं.

संगीतकार ओ.पी.नय्यरना रागदारी संगीत वगैरेची फारशी जाणकारी नव्हती, पण ते पियानो किंवा हार्मोनियमवर बसले की त्यांना झरझर चाली सुचत. त्यात त्यांना ‘अकेली हूँ मैं, पिया आ’ ह्यासारख्या गाण्याची जी चाल सुचायची त्यातून आपसुक रागदारी संगीत झळकायचं. तसे ओ.पी. त्यांच्या शिकण्यासवरण्याच्या वयात त्यांच्या भावाच्या सांगण्यावरून एका मास्टरजींकडे संगीत शिकायला गेले होते. तिथे त्या मास्टरजींकडून त्यांनी कामोद, आसावरी-जौनपुरी, बिहाग, मालकंस अशा इनमिन चार रागांची विद्या प्राप्त केली. पण मास्टरजी आणि ओ.पी., दोघांचीही कुंडली जुळली नाही. कारण दोघंही भडक माथ्याचे. गाणं शिकता शिकता एकदा ओ.पींच्याकडून काहीतरी चूक झाली म्हणून मास्टरजींनी ओ.पींवर सरळ हात उगारला. ओ.पींनी थेट त्यांचा हात धरला आणि सरळ मास्टरजींना ते म्हणाले, ‘मी तुमच्याकडे गाणं शिकायला आलो आहे, मार खायला आलो नाही.’ मास्टरजींना आपल्या ह्या शिष्याकडून हे असं ताडफाड उत्तर अपेक्षित नव्हतं. मास्टरजी त्यांच्या ह्या उत्तरावर रागाने एकटक बघत बसले. शिष्यानेही आपली नजर ढळू दिली नाही. त्याचा परिणाम असा झाला की, मास्टरजींनी त्यांची शिकवणी आपण बंद करत आहोत असं तिथल्या तिथे जाहीर केलं. ओ.पींनीही तो निर्णय राजीखुशीने स्वीकारला आणि आपलं संगीताच्या शिक्षणाला टाळं लावून टाकलं.

अर्थात, ओ.पी. नंतर संगीताच्या शिक्षणाच्या वाटेला गेले नसले तरी आपल्या संगीतातल्या उपजत ज्ञानावर त्यांनी हिंदी सिनेमामध्ये मनोहारी संगीताचा मनोरा उभा केला. ओ.पी. म्हणायचे, ‘मी संगीताचं शिक्षण घेतलेलं नसेल, पण संगीताचं ज्ञान मी वरून घेऊन आलो आहे. मी पोटात असताना माझ्या आईकडे जे गाण्याचं ज्ञान होतं ते माझ्यात उतरलं आणि मी गाण्यांना चाली लावू लागलो.’ तसं ओ.पींच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की ओ.पींची आई त्यांच्या वेळी गरोदर होती तेव्हा तिला हार्मोनियम घेऊन गाणं गायचे डोहाळे लागले होते. तिचे हे डोहाळे तेव्हा म्हणे संगीताचा एक शिक्षक घरी आणून पूर्णही केले गेले होते.

असो, आय अ‍ॅम बॉर्न विथ म्युझिक, असं जे ओ.पी. म्हणायचे त्यात त्यामुळेच तथ्य होतं असं म्हणावं लागेल. ओ.पींना लहानपणापासूनच संगीताचं वेड होतं. त्यांनी संगीताचं हे वेड अधेमधे कुठेही तुटू न देता आपल्यासोबत नीट जोपासलं.
पण ओ.पी. नय्यर हे नाव संगीतकार म्हणून जे पुढे आलं ते एका वेगळ्याच गाण्याने. ते गाणं होतं – प्रितम आन मिलो!

ओ.पी. तेव्हा संगीताच्या क्षेत्रात नुकतेच शिरकाव करत होते, झगडत होते. कुणाकुणा कवींच्या कविता मिळवून त्यांना हौसेने चाली लावत होते. नवे संगीतकार असल्यामुळे त्यांच्या मागे तसं कुणीच नव्हतं. ना एखादा गीतकार, ना एखादा गायक, ना कुणी निर्माता-दिग्दर्शक. आपली वाट आपणच चालायची आहे, आपल्याला कुणीही गॉडफादर नाही हे त्यांना ठाऊक होतं, साहजिकच, गाणं करताना कुणा कवी-गीतकाराच्या शब्दाची प्राप्ती आपल्याला झाली नाही तर आपणच आपलं कवी बनावं असं त्यांनी ठरवून टाकलं. ‘प्रितम आन मिलो’ हे गाणं करताना त्यांनी आपल्याच गाण्यासाठी आपणच आपले शब्द लिहिले. ओ.पी. कधी कधी गाणं करताना जे स्वत:चे डमी शब्द लिहायचे त्याला ते स्वत:च्या मालकीचे शब्द म्हणायचे. ‘प्रितम आन मिलो’ हे असेच त्यांच्या स्वत:च्या मालकीचे शब्द होते आणि ते डमी राहिले नव्हते. त्याच शब्दात तसंच्या तसं ते गाणं रेकॉर्ड झालं होतं. ते गाणं त्या एका काळात गाजलं होतं. सर्वदूर पोहोचलं होतं. पण गंमत अशी की ते सी.एच. आत्मा म्हणजे चंद्रू आत्मांनी गायलं हे सगळ्यांना माहीत होतं, पण ते ओ.पींनी आपल्याच चालीसाठी लिहिलं होतं हे फार कमी लोकांना माहीत होतं.

ह्या गाण्याची गंमत अशी की, गाण्याची रेकॉर्ड बाजारात आणली गेली ती रिगल कंपनीच्या नावाने, पण त्या रेकॉर्डची निर्मिती केली होती एचएमव्हीने. कारण काय तर एका नवोदित संगीतकाराची ही रेकॉर्ड बाजारात लोक स्वीकारतील ह्याची एचएमव्हीला खात्री नव्हती आणि तशी ती स्वीकारली गेली नाही तर कंपनीला आपल्या नावाला बट्टा लावून घ्यायचा नव्हता. ओ.पींनाही हे माहीत होतं, पण आपण नवोदित आहोत, आपल्याला कुठेतरी चंचुप्रवेश मिळतो आहे तो साधून घ्यावा ह्या हेतूने ओपींनीही त्याकडे कानाडोळा केला होता.

आपलं हे गाणं लोक मोठ्या संख्येने स्वीकारतील की नाही, ह्याबद्दल ओपींच्या मनातही धाकधुक होती. त्यामुळेच की काय कंपनीने जेव्हा त्यांना गाण्याची रॉयल्टी विचारली तेव्हा आपल्या मनातली रक्कम सांगण्याचा आत्मविश्वासही ओ. पींकडे नव्हता. त्यामुळेच त्यांनी ती रक्कम किती सांगिंतली तर चाळीस रूपये!

पण रेकॉर्ड कंपनीच्या आणि ओ.पींच्या त्या गाण्याबाबतच्या अंदाजाला गुंगारा देत ते गाणं चांगलंच गाजलं. त्याच सुमारास एकदा ते मुंबईत फिरताना त्यांना ब्रेबॉर्न स्टेडियमकडल्या टॉक ऑफ द टाउन नावाच्या रेस्टॉरंटजवळ एक रांग दिसली. रांग जरा मोठी होती म्हणून ओ.पी. तिथेच उभे राहिले. रांगेतल्या शेवटच्या माणसाला त्यांनी उत्सुकतेपोटी प्रश्न विचारला,

‘ही कसली रांग आहे? ही रांग लावून ह्या लोकांना तिकडे काय देताहेत?’
रांगेतला माणूस म्हणाला की, एका गाण्याची रेकॉर्ड विकत घेण्यासाठी ही रांग आहे.
ओ.पींनी विचारलं, ‘कोणतं गाणं?’
तो माणूस म्हणाला, ‘प्रितम आन मिलो!’
ओ.पींचे डोळे चमकले. त्यांनी त्या रांगेकडे कृतार्थ भावनेने पाहिलं.
ह्याच गाण्याने ओ.पींना नाव दिलं आणि हिंदी सिनेमाला एक ताज्या दमाचा संगीतकारही.