घरफिचर्ससोबतीची खात्री!

सोबतीची खात्री!

Subscribe

बायकांनी शांततेचं ओझं मुकाटपणे वाहत राहायचं असं शिकवत असलेल्या भवतालात काही विचार करणार्‍या बायका मात्र हे ओझं वाहायचं नाकारतात आणि लेखणीतून आपले व्यवस्थेबद्दलचे अनुभव स्त्रवू लागतात तेव्हा व्यवस्था हे सहज स्वीकारत नाही, स्वीकारणार तरी कशी? तेव्हा आपल्याविरुद्ध उठलेल्या वादळात आपल्यासारख्याच विचार करणार्‍या लोकांची खात्रीची सोबत आवश्यक असते. काहीही घडलं तरी या सोबतीची मात्र हमखास खात्री हवी असते. पोकळ सहानुभूतीच्या पलीकडे जाऊन अशी सोबत करणार्‍यांची वेगळ्या रस्त्यावर चालताना खूप गरज असते.

एका महिलांच्या राष्ट्रीय परिषदेत बसून हा लेख लिहितेय. स्त्रीवादी नजरेतून जगाकडे पाहणार्‍या आणि माणूस म्हणून स्वतःच्या हक्कांसाठी लढणार्‍या लढवय्या बायका इथे देशभरातून आल्या आहेत. आपलं काम, बाई म्हणून आपला अनुभव, आपल्या चष्म्यातून पाहताना दिसलेलं जग आणि त्या जगाच्या वळणावरचे खाचखळगे एकमेकींना सांगताय, हसताय, मजा करताय आणि एकत्र शिकून पुढच्या कामाची दिशा ठरवताय. 50-60 वर्षांपासून स्त्रीवादी चळवळ पुढे हाकणार्‍या आजीबाई जेव्हा चळवळीचे आपले अनुभव अशा ठिकाणी मांडतात तेव्हा माझ्यासारख्या नुकतीच ही वाट निवडून चाचपडत धडपडणार्‍या मुलीला दिशा आणि पुढ्यात येऊन ठाकलेल्या संघर्षाची जाणीव होते. फक्त संघर्षाची जाणीवच नाही तर या प्रवासात आपण सारे सोबत आहोत ही बळ वाढवणारी खात्रीसुद्धा मिळते.

पूर्वी किंवा अजूनही वटपौर्णिमा, हरतालिका, हळदी कुंकू किंवा एकत्र येऊन झोका खेळण्यासाठीची नागपंचमी हे सण तसं पाहिलं तर बायकांना भेटण्यासाठीची सांस्कृतिक निमित्तंच होती. म्हणजे असा विचार करूनच हे सगळं ठरलं असणार असं म्हणून या गोष्टींवर पांघरून घालणं मूर्खपणाचं ठरेल, पण या निमित्तांचा उपयोग मात्र चूल आणि मुलाच्या पलीकडे न जाऊ शकणार्‍या बायकांनी एकमेकींना भेटण्यासाठी, मनातल्या गोष्टी बोलण्यासाठी, मनासारखं सजण्यासाठी केला. हळदी कुंकू असू देत किंवा अशा परिषदा (दोघांची उद्दिष्ठ्ये खूपच टोकाची आहेत हे गृहीत धरून!) समविचारी बायकांना भेटण्यासाठी महत्वाच्या ठरल्या आहेत. मागच्या लेखात आपण स्वतःच्या मालकीचे घर, स्वतःच्या नावावर असलेली मालमत्ता बायकांच्या आयुष्याला कशी स्थैर्य देणारी असते याविषयी बोललो, पण त्याचबरोबर एकमेकींना भेटण्यासाठी सामूहिक जागा ही एक बाई म्हणून पितृसत्ताक व्यवस्थेने दिलेल्या जखमांचा इलाज म्हणून काम करते. आणि म्हणून अशा जागाही तितक्याच महत्वाच्या आणि बाईच्या सामूहिक आयुष्यालासुद्धा स्थैर्य देणार्‍या असतात.

- Advertisement -

स्त्रीवादी किंवा समतावादी विचार निवडून आपण एका दमन करणार्‍या मोठ्या जगाला न पटणारा रस्ता निवडतो. आपल्याला वाटणारी मूल्ये, तत्व आणि समतेची संकल्पना बाहेरच्या वास्तवापुढे मांडताना बर्‍याचदा वास्तवापासून तुटलेपणाची भावना येते. आपली गोष्ट समजू शकेल आणि त्याकडे तितक्याच संवेदनशीलतेने पाहू शकेल अशी तुरळक माणसं शोधणं मग अवघड होतं. बाई असण्याच्या सुद्धा आधी माणूस म्हणून असणारी समूहाची गरज कुठेतरी स्वतःला जोडून त्यात मिसळून देण्याची गरज अपूर्ण राहते. जन्मापासूनच्या अनुभवांमधून तयार झालेला व्यवस्थेविषयीचा आक्रोश मनात भरून राहतो आणि मग पुढे एकटेपणात किंवा राग आणि द्वेषाच्या स्वरूपात भाषांतरित होऊन बाहेर पडतो. मोठ्या समूहांमध्ये असूनसुद्धा कितीतरी वेळा एकटेपणा जाणवतो आणि आपण नक्की कुठल्या समूहाशी जोडलेलो आहोत, कुठल्या समूहाचा भाग आहोत असे मूलभूत प्रश्न पडतात. अशावेळी आपल्यासारखाच अवघड रस्ता निवडलेल्या आणि आपण स्वप्न पाहत असलेल्या जगाकडे जाण्यासाठी फार पूर्वीच प्रवास सुरु केलेल्या माणसाचं भेटणं हे आधाराचा, आपल्याला हव्या असलेल्या मायेचा पाठीवरून फिरणारा हात आणि भक्कम उभं राहण्यासाठी पावलाला हक्काची जमीन देणारं असतं.

मी एका सामाजिक संस्थेत ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्याविषयी संशोधनाचे काम करते. एकदा असंच मुलींशी गप्पा मारताना त्यांना विचारलं की, तुमचा कट्टा कोणता? भेटण्याची जागा कोणती? तर उत्तर मिळालं की, खालच्या आळीतली विहीर किंवा मजुरीला जातो ते शेत-कंपनी, बंधार्‍यावर धुणं धुतांना भेटतो आणि कधीतरी शाळेत कॉलेजात जाताना रस्यात! ही उत्तरं सहजतेने देणार्‍या मुली आपल्या एकमेकींना भेटून समूह तयार करण्याच्या गरजेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील की, या गरजेची त्यांना अजून स्पष्ट जाणीवच झालेली नसेल असा प्रश्न पडला. परिणाम म्हणून मुलींनी आणि बायकांनी एकत्र येण्याची गरजच काय असं म्हणणार्‍या व्यवस्थेत या अडनिड्या वयातल्या मुली खरंच एकेकट्याच राहिल्या. नंतर गावात खास मुलींसाठी वाचनालय सुरु केले.

- Advertisement -

वाचनालय आणि पुस्तकं फक्त निमित्त पण ही जागा मात्र मुलींनी एकमेकींना भेटण्यासाठीच होती, आपल्या गोष्टी, जगण्यात आलेले बरेवाईट अनुभव आणि मनातलं खरं खरं बोलण्यासाठीची जागा होती. या वाचनालयाच्या ठिकाणी मुली भरभरून येऊ लागल्या, आपल्या मैत्रिणींना, बहिणींनाही घेऊन येऊ लागल्या आणि या आळीतली शकू, मंदिराजवळची सोनी, पाड्यावरची भागी असं करत करत मुलींचा घोळकाचा घोळका हररोज या जागी येऊन एकमेकींना भेटतो. वरवर पाहिलं तर हे फक्त एक वाचनालय आहे, पण मुलींसाठी आणि विशेष म्हणजे काही वेगळा विचार करू पाहणार्‍या मुलींसाठी ही एक व्यक्त होण्याची जागा आहे. माझ्या आयुष्यात मला आलेले अनुभव हे फक्त माझेच नाहीत तर हे माझ्यासारख्या आणखीही कितीतरी मुलींचे अनुभव आहेत आणि याविरुद्ध झगडण्यासाठी मी एकटी नाही तर माझ्यासोबत आणखीही मुली आहेत हा विचार आणि हे बळ ही जागा मुलींना देते.

ग्रामीण भागातल्या आणि संधी आणि साधनांची अनुपलब्धता असलेल्या भागात मुलींसाठी जशी वाचनालय ही एकत्र येण्याची जागा ठरली तशाच आता काही जागा बायका आभासी जगात म्हणजे सोशल मीडियाच्या प्रतलातही तयार करत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप्सवर बायकांचे ग्रुप्स आणि त्यात होणार्‍या चर्चाही अशीच एकत्रितपणाची भावना सगळ्यांना देणार्‍या असतात. फक्त मेकअप, जेवणाच्या रेसिपीज आणि घरगुती भांडणांचे फुटकळ विनोद आता या ग्रुप्सवर असत नाही तर पितृसत्तेविरुद्धच्या लढाईत बाई म्हणून आपलं अस्तित्व गडद करतानाचे अनुभव असतात, राजकीय-आर्थिक विषयांवरच्या चर्चा असतात, एकमेकींना उभारी देण्यासाठी केलेले प्रयत्न असतात. काही दिवसांपूर्वी स्त्रीवादी लेखिकांना टार्गेट करत फेसबुकवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी पसरवत चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उगारणारे आणि अश्लील-अर्वाच्च शिव्या देत लिहित्या बायकांना गप्प करण्याचे प्रयत्न फेसबुकवर सुरु होते.

तेव्हा कविता महाजन यांनी सुरु केलेली सोबतीची खात्री ही मोहीम सर्वांच्या लक्षात असेलच. बायकांनी शांततेचं ओझं मुकाटपणे वाहत राहायचं असं शिकवत असलेल्या भवतालात काही विचार करणार्‍या बायका मात्र हे ओझं वाहायचं नाकारतात आणि लेखणीतून आपले व्यवस्थेबद्दलचे अनुभव स्त्रवू लागतात तेव्हा व्यवस्था हे सहज स्वीकारत नाही, स्वीकारणार तरी कशी? तेव्हा आपल्याविरुद्ध उठलेल्या वादळात आपल्यासारख्याच विचार करणार्‍या लोकांची सोबत असेल आणि काहीही घडलं तरी या सोबतीची मात्र हमखास खात्री असेल हा विचारच लिहू पाहणार्‍या, धाडस करणार्‍या बायकांना किती आश्वासक ठरला. अशी घटना माझ्यासोबत घडली नाही, घडणार नसेलही कदाचित पण पोकळ सहानुभूतीच्या पलीकडे जाऊन त्याकडे दयाबुद्धीने पाहू शकणार्‍या आणि ती गोष्ट शब्दश: सोबत अनुभवणार्‍या सोबतीची वेगळ्या रस्त्यावर चालताना खूप गरज असते. अशी सोबत बायका आता एकमेकींना देतायत आणि आपल्यासोबतच आपल्या मैत्रिणीची पावलं जमिनीत भक्कम रोवत आभाळाचं स्वप्न पाहायला बळ देतायत.

अशा सोबतीची खात्री देणार्‍या आणखी जागा आपण मैत्रिणींनी तयार करायला हव्यात. असलेल्या जागांमध्ये आपली सोबत पक्की आणि शाश्वत करायला हवी. आपल्या या जागांमध्ये कुठल्याशा कोपर्‍यात असणार्‍या पण समतेचं स्वप्न पाहणार्‍या मैत्रिणींना सामील करायला हवं. या सगळ्यात मित्रांनीही आलं तर हरकत काय! सगळ्यांनीच येऊन एकमेकांच्या हातात हात घालून अशी जागा तयार करूया जिथे प्रत्येकाच्या आतल्या कोलाहलाला व्यक्त व्हायला जागं असेल आणि आपण सारेच आपल्या प्रतिसादांमधून किंवा नुसतं असण्यातूनच एकमेकांना या खडतर प्रवासातल्या सोबतीची हमी देऊ.

-काजल बोरस्ते

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -