घरफिचर्सगोंधळलेले राहुल आणि अधांतरी काँग्रेस!

गोंधळलेले राहुल आणि अधांतरी काँग्रेस!

Subscribe

विरोधी पक्षनेत्याची गोंधळलेली, पराभूत मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आहे त्यापेक्षा अधिक ताकदवान बनवत आहे

घराणेशाहीच्या भोवती पिंगा घालून राहुल गांधी यांना वास्तवाचे भान आणून न देणार्‍या गांधीभक्त गटाने पुन्हा एकदा उचल खात नेता निवडीचा निर्णय लांबणीवर टाकण्यास भाग पाडले. हे करून ते काँग्रेसलाच तळाला नेत आहेत. यासाठी फक्त गांधीभक्त काँग्रेसी नेत्यांना दोष देऊन चालणार नाही. तर यासाठी राहुल गांधी स्वतः जबाबदार आहेत. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे विरोधी पक्षनेत्याची ही गोंधळलेली, पराभूत मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आहे त्यापेक्षा अधिक ताकदवान बनवत आहे. याचा थेट परिणाम मग निवडणुकांमध्ये दिसून येतोय.

- Advertisement -

नेता खंबीर असला की पक्ष चालू लागतो. पण, 2014 पासून सत्ता हातून गेल्यानंतर काँग्रेस अजून चाचपडत आहे आणि याला राहुल गांधी यांचे गोंधळलेपण कारणीभूत आहे. हे पुन्हा एकदा दिसले ते काँग्रसेच्या अध्यक्षपदाचा निर्णय पुढे ढकलण्यावरून. आता हा निर्णय जून महिन्यात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर घेतला जाईल. काँग्रेसच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या बैठकीत दोन गटांमध्ये खडाजंगी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला हे सर्वात वाईट आहे. जबाबदारी हाती घेऊन पक्षाला दिशा देण्याचा निर्णय अजूनही राहुल घेत नसतील तर उध्वस्त धर्मशाळा होऊन युगांत लोटल्यासारखे मग्न तळ्याकाठी बसण्यासारखा हा प्रकार आहे. पण, यामुळे पक्ष अधांतरी जाऊन काँग्रेसचे मोठे नुकसान होते आहे, याची त्यांना कल्पना राहुल यांना आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे.

हा प्रश्न याआधी काँग्रेसच्या एका गटाने विचारला होता आणि त्यांनी शुक्रवारी 22 जानेवारीच्या बैठकीत पुन्हा विचारला. पण, घराणेशाहीच्या भोवती पिंगा घालून राहुल गांधी यांना वास्तवाचे भान आणून न देणार्‍या गांधीभक्त गटाने पुन्हा एकदा उचल खात नेता निवडीचा निर्णय लांबणीवर टाकण्यास भाग पाडले. हे करून ते काँग्रेसलाच तळाला नेत आहेत. यासाठी फक्त गांधीभक्त काँग्रेसी नेत्यांना दोष देऊन चालणार नाही. तर यासाठी राहुल गांधी स्वतः जबाबदार आहेत. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे विरोधी पक्षनेत्याची ही गोंधळलेली, पराभूत मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आहे त्यापेक्षा अधिक ताकदवान बनवत आहे. याचा थेट परिणाम मग निवडणुकांमध्ये दिसून येतोय. लोक विचार करतात : ‘आम्ही पराभूत मानसिकता असलेल्या नेत्याच्या पक्षाला का निवडून द्यावे’. भाजपला निम्म्यापेक्षा जास्त ताकद काँग्रेस ही अशी आपणहून देत आहे. मोदी आणि भाजपच्या सध्याच्या अघोषित हुकूमशाहीबाबत लाख बोलता येईल, पण मग समोर पर्याय कोण? असा जेव्हा विचार येतो तेव्हा समोर सध्या तरी कोण दिसत नाही. शरद पवार सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेऊन एक मोठा पर्याय देतील, असे चित्र अधेमध्ये दाखवले असले तरी पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना, अकाली दल, राष्ट्रीय जनता दल, देवेगौडांचा जनता दल आणि दक्षिणेकडील प्रादेशिक पक्ष एकत्र मिळून 2024 ला सक्षम म्हणून पुढे येतील, हा म्हणजे खयाली पुलाव झाला…
काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा एकदा वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि पी. चिदंबरम यांनी तात्काळ संस्थात्मक मतदान केले जावे, अशी मागणी केली. निवडणुकांमधील पराभवानंतर याच नेत्यांनी पक्षनेतृत्व आणि व्यवस्थापनासंबंधी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावरुन गदारोळ निर्माण झाला होता. मात्र दुसरीकडे गांधींचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे अशोक गेहलोत, अमरिंदर सिंग, ए. के. अँटनी, तारिक अन्वर यांनी बंगाल आणि तामिळनाडू यांच्यासहित पाच राज्यांमधील निवडणुका झाल्यानंतर अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जावा अशी भूमिका मांडली. यावेळी गांधीभक्त एका नेत्याने आपण नेमक्या कोणाच्या अजेंड्यासाठी काम करत आहोत? भाजपा आपल्याप्रमाणे अंतर्गत राजकारणावर चर्चा करत नाही? त्यांची प्राथमिकता आधी राज्यांच्या निवडणुका आणि नंतर संस्थात्मक निवडणुका असतात, अशी भूमिका मांडली. यावरून दोन्ही गटात खडाजंगी झाली. गांधीभक्त एक गोष्ट लक्षात घेत नाही की, गेले अनेक महिने पक्षाचे प्रमुखपद न स्वीकारून राहुल गांधी कशापासून पळ काढत आहेत. प्रमुख नेता म्हटला की, त्याला जबाबदारी आली. यश, अपयशाला उत्तर देण्यास तो बांधील ठरतो. आणि आज हेच राहुल यांना नको आहे, असे दिसते. गोव्यात हातात आलेली सत्ता गेली, मध्य प्रदेशात लोकांनी भाजपला कौल दिला नव्हता, तेच वातावरण बिहारमध्ये होते. जागा 70 मागून तुम्हाला राजकारणात काल परवा आलेल्या युवा नेता तेजस्वी यादवप्रमाणे जीवाचे रान करायचे नाही आणि प्रचारात काँग्रेसला वार्‍यावर सोडून परदेशात निघून जायचे, हा प्रकार गोंधळलेल्या मानसिकतेचे प्रतीक आहे.

- Advertisement -

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवनंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावरुन माघार घेतली आणि नंतर 2019 मध्ये सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा सूत्रे सोपवण्यात आली होती. आता सोनिया गांधी आपल्याला अध्यक्षपदाच्या शर्यतीत रस नसल्याचे म्हणत असताना आणि राहुल गांधी अध्यक्षपद न स्वीकारण्याच्या निर्णयावर ठाम असताना गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे ही जबाबदारी द्यावी, यासाठी काँग्रेसला आणखी कशाची वाट पाहायची आहे, हे माहीत नाही. लहरी राजा, अधांतरी प्रजा असा हा प्रकार झाला! निवडणुका येतील, जातील, पण पक्षच भक्कम नसेल तर निवडणुकांमध्ये पानिपत होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण, काँग्रेसला ते कळत नसेल तर त्यांना कोणी बाहेरून येऊन वाचवणार नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात किंवा नेहरूंच्या नंतरच्या काळात केडर नावाचा प्रकार काँग्रेसमध्ये खूप झपाट्याने कमी होत गेला. काहीतरी निश्चित अशी पक्की बांधलेली विचारप्रणाली नसल्यामुळे काँग्रेसमध्ये केडरला मर्यादा येतेच. मग राहतं काय? तर हितसंबंधांचं, नात्यागोत्यांचं, घराणेशाहीचं राजकारण आणि संस्थात्मक जाळं. त्यातही गंमत अशी की, स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तबगारीच्या बळावर सर्वत्र व दीर्घकाळ काँग्रेसला सत्ता मिळत गेली. म्हणजे स्वातंत्र्योत्तर तीस वर्षं काँग्रेसला शह द्यायला प्रबळ म्हणावे असे पक्ष नव्हते. त्यामुळे काँग्रेसचे सर्व रथी महारथी आणि धुरीण आपल्याला अशाप्रकारे केडर बांधायची गरज आहे, हेच मानायला तयार नव्हते. नवी पिढी घडवली पाहिजे असेही ते मानत नव्हते. सत्तेच्या माध्यमातून हे सगळे आपोआप घडत जाईल, असे त्यांचे म्हणणे होते आणि हे बराच काळ चालले. म्हणून तर जवळपास 90 च्या दशकापर्यंत एक मोठा काळ असा होता की, लोकांना काँग्रेसचा वीट आलेला होता. नको तितका तिरस्कार वाटत होता, राग येत होता आणि तरीही लोक काँग्रेसला पुन्हा पुन्हा निवडून देत होते.

दुसरा सक्षम, प्रबळ पर्याय जनतेसमोर दिसतच नव्हता. आणि जेव्हा तो पर्याय टप्प्याटप्प्याने आकार घेऊ लागला तेव्हा काँग्रेसबद्दलचा लोकांचा राग काँग्रेसविरोधी मतांमध्ये रुपांतरीत होऊ लागला. त्याची आणखीही अनेक कारणं सांगता येतील. पण मध्यवर्ती मुद्दा हाच राहिला की, प्रबळ पर्याय लोकांना आधी राज्य स्तरावर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर मिळत गेले म्हणून लोक काँग्रेसपासून दूर गेले. आता जनतेच्या मनात काँग्रेसबद्दलचा राग हा केवळ मनमोहन सिंग राजवटीपुरता नाही किंवा गेल्या पाच-सहा वर्षांच्या काळात काँग्रेस अकार्यक्षम राहिली एवढ्यापुरताही नाही; तो राग वर्षानुवर्षांचा आहे. आज हयात असलेल्या दोन-तीन पिढ्यांनी स्वतःच्या लहानपणापासून काँग्रेसचं वर्तन पाहिलेलं आहे आणि त्यांच्या मनात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वापेक्षासुद्धा स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाबद्दलचा राग खूप जास्त आहे.

राहुल गांधींना स्वतःला पंतप्रधानपदाची किंवा इतर कोणत्याही पदाची आकांक्षा, अपेक्षा असावी असे कधीच दिसले नाही. ते खासदार झाले तेव्हाची त्यांची लोकसभेतली काही भाषणे आणि उपाध्यक्ष झाले तेव्हाचे भाषण ऐकून या माणसाला पंतप्रधान होण्याची आकांक्षा आहे की नाही, असे वाटले होते. सोनिया गांधींनाही त्या प्रकारची आकांक्षा नाही. प्रियांका गांधीही आता वयाच्या पन्नाशीच्या टप्प्यावर आलेल्या आहेत आणि तरीही त्या खासदारकीच्या निवडणुकीला आतापर्यंत एकदाही उभ्या राहिलेल्या नाहीत. हे सर्व पाहिलं तर या तिघांनाही आपण पंतप्रधान व्हावं असं तीव्रतेने वाटतं आहे, असे दिसत नाही. यात राहुल गांधी जास्त गोंधळलेले आहेत. सोनिया गांधींनी काळाचा खूप मोठा पट पाहिलेला आहे. नवर्‍याची, सासूची कारकीर्द पहिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अनुभवातून आलेली, प्रत्यक्ष पाहण्यातून आलेली समजूत होती. राहुल यांच्याबाबत तसे दिसत नाही. काँग्रेसवाल्यांची एकूण संचरनाच अशी बनली आहे की, त्यांना नेहरू गांधी घराण्याची गरज जास्त आहे. आणि आताच्या या गांधी नेहरू घराण्याच्या पिढीला काँग्रेस पुढे जावा, असे दिसत नाही. अर्थात हे सगळे खूप गुंतागुंतीचे आहे, पण तरीही काँग्रेस व भाजप यांच्या बाबतीत असे वाटते की (किंबहुना हा मुद्दा यापूर्वीही अनेकांनी मांडलेला आहे) नेहरू, गांधी घराण्याच्या तावडीतून काँग्रेसची आणि संघ परिवाराच्या तावडीतून भाजपची सुटका जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या देशातील लोकशाही खर्‍या अर्थाने प्रगल्भ होणार नाही!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -