घरफिचर्सराहुलबाबा, अध्यक्षपद नको रे बाबा !

राहुलबाबा, अध्यक्षपद नको रे बाबा !

Subscribe

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर हादरलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा ते काही केल्या मागे घ्यायला तयार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकारणाचा अनुभव लक्षात घेता राहुल गांधींना अजून बरेच शिकावे लागेल. राहुल यांच्याकडून अल्पावधीत खूपच मोठ्या अपेक्षा ठेवल्या जात आहेत. त्याचाच उबग राहुल गांधींना आला असावा, त्यामुळेच त्यांना काँग्रेस अध्यक्षपद नकोसे झाले असावे.

लोकसभा निवडणुकांमध्ये लागोपाठ दुसर्‍यांना काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवाचा जबर धसका घेऊन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा थेट राजीनामा दिला. काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, खासदारांनी राहुल गांधींनी अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्यासाठी सातत्याने मनधरणी चालवली आहे. पण राहुल गांधी कुठल्याही परिस्थितीत आपण अध्यक्षपद पुन्हा स्वीकारणार नाही, यावर ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेससारख्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या राष्ट्रीय पक्षासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. गांधी घराण्यातील काँग्रेस पक्षाध्यक्षाने स्वत:हून अध्यक्षपदाचा राजीनामा देणे ही स्वतंत्र भारतातीत बहुधा पहिलीच वेळ असावी. कारण गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे गांधी असेच समीकरण गेली अनेक होऊन बसलेले आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचे धनुष्य स्वत:हून टाकून दिले आहे. आता ते उचलायचे कुणी असा प्रश्न निर्माण झाला आहे. ते उचलावयास स्वत:हून कुठलाही काँग्रेसजन कधीही तयार होणार नाही. राहुल नाही म्हणतात तर मी ही जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे म्हणण्याचे धाडस कुठलाही काँग्रेसजन कदापिही करणार नाही. कारण तसे कुणी केले तर त्याला ते गांधी घराण्याला दिलेले आव्हान मानले जाईल आणि त्याला पुढील काळात लक्ष्य केले जाईल, अशी भीती आहे. असे बरेच वेळा घडलेले आहे, त्यामुळे सगळेच काँग्रेसजन ‘राहुल आप आगे बढो हम आपके साथ हैं’, हाच जयघोष करत राहुल यांचे मन वळवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत आहेत. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांना न पटणारी मते मांडणार्‍या अनुक्रमे यशवंतराव चव्हाण, प्रणव मुखर्जी, शरद पवार यांना खप्पामर्जी ओढवून घ्यावी लागली होती. हे सगळ्या काँग्रेसजनांना माहीत आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली गेली दहा बारा वर्षे काँग्रेसने विविध राज्यांमधील विधानसभेच्या आणि दोन लोकसभा निवडणुका लढवल्या, पण राहुल गांधी यांचा फारसा प्रभाव पडताना दिसलेला नाही. त्या पराभवामुळे राहुल गांधी हे मनाने खचत गेले. त्याचसोबत बरेच काँग्रेस कार्यकर्ते ‘प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ’, अशी मागणी करत असतात. निवडणूक प्रचारामध्ये बरेच वेळा प्रियांका गांधी राहुल यांच्यासोबत उतरलेल्या दिसल्या. त्यामुळे आपल्या बहिणीला काँग्रेसजनांची पसंती आहे, पण आपल्याला नाही, याचे दु:खही राहुल यांना सतावत असावे. सोनिया गांधी यांना राहुल गांधी यांनीच राजकारणात पुढे येऊन देशाचे पंतप्रधान व्हावे, असे वाटत आहे. त्यामुळे त्यांना प्रथम काँग्रेसचे उपाध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या डोक्यावर काँग्रेस अध्यक्षपदाचा मुकुट चढवण्यात आला. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधी पक्षाची जागा मिळण्याइतकेही संख्याबळ मिळवता आले नाही. असे दोन वेळा झाले. त्यामुळे राहुल गांधी यांची स्वत:ची आणि काँग्रेसजनांची राहुल गांधी यांच्याविषयी प्रचंड निराशा झालेली आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांच्याकडून त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी आणि काँग्रेसजन अवास्तव अपेक्षा करत आहेत, हे आज कुणीही लक्षात घ्यायला तयार नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा काँग्रेस आणि मित्र पक्षांची सत्ता येणार आणि राहुल गांधी पंतप्रधान होणार असेच काँग्रेसजनांना वाटत होते. कारण त्यावेळी नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात येतील आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होतील, याची फारशी कुणाला कल्पना नव्हती. त्यावेळी राष्ट्रीय पातळीवर भाजपकडे पंतप्रधानपदासाठी दमदार उमेदवार नव्हता, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि भाजपच्या राज्य पातळीवरील राजनाथ सिंह आणि मनोहर पर्रिकर अशा काही नेत्यांकडून मोदींचे नाव पुढे करण्यात येऊ लागले. गुजरातचे तीन वेळा मुुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींनाही राष्ट्रीय पातळीवर जाण्याचे वेध लागले होते. मोदींना भाजपच्याच राष्ट्रीय पातळीवरील लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, सुषमा स्वराज अशा नेत्यांचा विरोध होत होता. तरीही भाजप कार्यकर्त्यांचे समर्थन आणि आपल्या महत्त्वाकांक्षेच्या बळावर मोदी केंद्रात गेले.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर मोदींनी ‘काँग्रेसमुक्त भारता’ची घोषणा दिली. खरे तर ती गांधीमुक्त भारताची घोषणा होती. कारण काँग्रेस हा पक्ष गांधींशिवाय उभा राहू शकत नाही याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गांधी घराण्यावर आणि त्यांच्या राजकारणातील घराणेशाहीवर सातत्याने घणाघात केला. त्याची परिणती काँग्रेसच्या पराभवात झाली. काँग्रेसच्या पराभवाची मीमांसा करताना एक गोष्ट कुणी लक्षात घ्यायला तयार नाही, ती म्हणजे राहुल गांधींना ज्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे, त्या नरेंद्र मोदी आणि राहुल यांची बरोबर होऊ शकत नाही. कारण मोदी राहुल यांच्यापेक्षा राजकीय अनुभवाने आणि वयाने मोठे आहेत. मोदी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी देशाचा कानाकोपरा धुंडाळलेला आहे. त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. त्याचबरोबर त्यांच्यामागे संघाचे मोठे पाठबळ आहे. लोकांच्या मनात केंद्रातील काँग्रेस आघाडीच्या भ्रष्ट कारभाराविषयी राग आहे. त्यामुळे लोकांना बदल हवा आहे. अशा स्थितीत मोदींसारखा नेता राष्ट्रीय पातळीवर आलेला आहे. त्यामुळेच लोकांना पर्याय मिळालेला होता. म्हणूनच मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपला केंद्रात बहुमत मिळवता आले.

- Advertisement -

राजकारणात जय पराजय होत असतो. राहुल गांधी यांना अजून बरेच शिकायचे आहे. त्यात पुन्हा मोदींची जादू सदासर्वकाळ चालेल अशातला भाग नाही. आजच्या तारखेला भाजपमधून मोदींना थोडा वेळ बाजूला ठेवले तर भाजपची सगळी हवा निघून जाईल, कारण भाजपकडे मोदी सोडून कुणीही तसा प्रभावी नेता नाही. पण काँग्रेसचे तसे नाही. गांधी घराण्यातील कुणीही व्यक्ती असेल तरी काँग्रेसमधून त्याला कुणी आव्हान देणार नाही. कारण काँग्रेसला कुणी तरी गांधी हवा असतो, त्यावर काँग्रेस आणि त्यांंचे मित्रपक्ष सत्ता चालवतात. पण सध्या मोदींसारख्या अनुभवी नेत्यासमोर राहुल गांधींचे काही चालेनासे झाले आहे, पण त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल, तो काँग्रेसजन राहुल गांधी यांना द्यायला तयार नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांची सगळ्या बाजूंनी कोंडी झाली असावी.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -