घरफिचर्सलिक्विडीटी जपा आणि खर्चाची तजवीज करा !

लिक्विडीटी जपा आणि खर्चाची तजवीज करा !

Subscribe

पूर्वीच्याकाळी लोक घरात पैसे बाजूला गाडग्या मडक्यात राखून ठेवायचे, बायका डब्यांमध्ये पैसे ठेवायच्या म्हणजे अचानक काही खर्च करावा लागला, तर कोणाकढे हात पसरायला नको. आज तशी वेळ आली तर डेबिट व एटीएम कार्ड्स हाताशी असतात, ऐनवेळी रोकड असली तर कार्डद्वारे पैसे काढण्यात वेळ जात नाही. केवळ एका प्रसंगापुरते नव्हे, तर एकूणच तुमच्या व्यक्तिगत जीवनात उत्पन्न व खर्च यांची सांगड घालताना आवश्यक तितकी लिक्विडीटी कशी राहील याचा विचार करून, त्यानुसार गुंतवणूक केली पाहिजे.

रोकड सुलभता हा शब्द जरा जास्तच हायर लेव्हल मराठी वाटतो नाही ? त्या मानाने कॅश किंवा लिक्विडीटी शब्द सोपे आणि चटदिशी अर्थ कळणारे वाटतात. हल्ली इंग्रजी माध्यमातील वाचकवर्गाची संख्या वाढलेली आहे तरीही मराठी वाचतात! हे किती छान आहे!! अधून-मधून इंग्रजी वर्ड्स युझ केले की, मराठी रीड करायला इझी जाते. जुन्या लोकांना पूर्वीच्या काळी शिंपी, वाणी, लाँड्री यांच्या भिंतीवर असलेली एक पाटी आठवत असेल. आज रोख, उद्या उधार !! थोडक्यात काय तर आपल्याकडे रोखीला अगदी पूर्वापार महत्व. उधारी ठेवणे जे जणू अनेक पापांपैकी एक पाप समजले जायचे. गरीबी व दारिद्य्रामुळे उधारी ठेवण्याची परिस्थिती यायची. पुढे जमानाच बदलला, कार्ड संस्कृती जन्माला आली तेच उधारीचे वरदान घेऊन.

आज खरेदी करा आणि उद्या -परवा पेमेंट करा !! अशा नव्या युगाच्या मंत्राने तरुण पिढी रोखीची पर्वा करेनाशी झाली. खिशात दोन-चार कार्ड घेऊन फिरणार्‍यांना रोख हवी कशाला असे वाटू शकते. पण तरीदेखील आजच्या युगात तुमच्याकडे थोडीफार कॅश असणे जरुरीचे आहे. रोखीने व्यवहार करणे संपूर्णतः टाळता येणार नाही. कॅशलेस व डिजिटल व्यवहार करा, असे सांगितले जात असले तरी मुळात तुमच्याकडे लिक्विडीटी असली पाहिजे, तरच कॅश काढता येईल, पाहूया लिक्विडिटीचे महत्व.

- Advertisement -

पार्श्वभूमी – आपण बचत करतो आणि जमेल तशी गुंतवणूकही करतो, त्याकरिता वेगवेगळी साधने निवडतो. अल्प मुदतीची तसेच दीर्घकालीन मुदतीची गुंतवणूक करून आपण भवितव्याची व्यवस्था करू पाहतो. अशा नियोजनबद्ध गुंतवणुकीत अगदी मोजकी रक्कम हाताशी ठेवतो आणि काही पैसे बँकेच्या खात्यात ठेवतो, मग भले कमी टक्के व्याज मिळाले तरी चालेल. घरात इमर्जन्सीसाठी रोख पैसे असलेला बरा. असा विचार करणारी अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे असतात. कोणी मुलांच्या ‘पिगी बँके’त थोडे पैसे ठेवतात, कधी गॅसवाला आला किंवा आकस्मिक खर्च निघाला की, असे बाजूला ठेवलेले असले की, चटकन काढून देता येतात. हल्ली बहुतेक प्रत्येकापाशी एटीएम आणि डेबिट कार्ड असल्याने, शिवाय घरात जास्त पैसे ठेवणे धोक्याचे असल्याने, थोडीच रोकड हाताशी ठेवली जाते. कधी घरातले वृद्ध आजारी पडले आणि हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करायची वेळ आली की, मग थोडी कॅश, उरलेली कार्डने भरण्याची धावपळ सुरू होते.

काही ठिकाणी रोखच द्यावी लागते, मग पंचाईत होते. अनेक बाबतीत आपल्याला अचानकपणे पैसे लागतात, तेव्हा त्याचवेळी किंवा एका दिवसात पैसे उभे करणे सोपे नसते. आपलेच पैसे कुठे-कुठे गुंतवलेले असल्याने, पटकन काढता येत नाहीत. किंवा काढले तर पेनल्टी किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही-आम्ही आपण एकतर लिक्विड असेट्समध्ये काही रक्कम गुंतवली पाहिजे, अन्यथा काही गुंतवणुकीतील पैसे कसे लवकरात लवकर काढता येतील असा विचार केला पाहिजे. एखाद्या गुंतवणूक साधनांची रोकड-सुलभता असणे हादेखील एक महत्वाचा निकष मानला जातो.

- Advertisement -

लिक्विडीटीचे महत्व –
1) हंगामी अस्थिरतेवर उपाय – एखादी बँक डबघाईला येते किंवा त्यावर आर्थिक निर्बंध लादले जातात, त्याच ठिकाणी आपले सर्व पैसे गोठले गेले तर? आपली अनिश्चित काळासाठी कोंडी होऊ शकते. म्हणून कधीही एकाच बँकेत आपले सर्व पैसे ठेवण्याची महाचूक करू नये. याबाबत घरात काही रक्कम हाताशी असणे जरुरीचे आहे. ही रक्कम किती असावी? हे साधारणपणे ज्याच्या त्याच्या मासिक खर्चावर अवलंबून असते. साधारण दोन-तीन महिने आपले घर चालवता येईल इतके पैसे जवळ ठेवायला हवेत, शिवाय आजारपण व इतर आकस्मिक खर्च आल्यास तोंड देण्यासाठी रोकडच कामी येते.

2) आर्थिक मंदी /नियमित उत्पन्न बंद होणे – असे काही संकट गुदरल्यास तजवीज म्हणून रोकड असावी किंवा आपण निर्माण केलेली काही संपत्ती चटकन विकून रोख उभे करतात का? असे प्रयत्न करावे लागतात. म्हणून संपत्ती निर्माण करताना त्यात वैविध्य असावे व पटकन पैशात रूपांतर करता येतील अशा ठिकाणी गुंतवावे.

3) खर्च वाढणे -अचानकपणे व्यक्तिगत किंवा कौटुंबिक कारणांनी एखाद्या महिन्यात खर्च वाढला तर आपल्याला नेहमीचे उत्पन्न काही पुरेसे नसणार, अशावेळी अतिरिक्त पैसे कोठून उभे करणार? उधार -उसनवार की वैयक्तिक कर्ज काढून? म्हणूनच आपल्याकडील गुंतवणूक अशारितीने केलेली असावी की काही असेट्स हे कधीही हाताशी उपयोगी पडतील आणि रोख पैसे उभे करता येतील.

4) पत आणि प्रतिष्ठा – तुमचे घराणे असो किंवा कंपनी तुमची प्रतिष्ठा ही अमूल्य अशी असते, तिला धक्का लागू नये म्हणून आर्थिक तजवीज असणे व अडचणीच्यावेळी काही पैसे तात्काळ उभे करता आले पाहिजेत.

5) नित्य व्यवहारात – केवळ अडचणीच्यावेळीच असे नाही, तर तुमच्या-आमच्या नेहमीच्या जीवनात काही प्रमाणात आकस्मिक निधी व लिक्विड असेट उपलब्ध असणे अत्यावशक असते.

रोकड सुलभता महत्व काय?
1) आकस्मिक खर्चाला तोंड देणे-कौटुंबिक अडचणी किंवा आरोग्यविषयक इमर्जन्सी झाल्यावर पैसे उभे करणे.
2) गुंतवणूक साधने असून फायदा नाही, कारण खर्च व व्यवहारांच्या पूर्ततेसाठी रोख पैसाच लागतो. कागदी दस्तावेज काही उपयोगी पडू शकत नाहीत.
3) सर्व व्यवहार कार्ड किंवा ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येत नाहीत, अशावेळी रोख पैसे देणे हे गरजेचे असते.
4) छोटे व्यवहार रोखीने करावे लागतात.
5) किरकोळ खर्चासाठी हाती पैसे असणे जरुरीचे असते.

गुंतवणुकीचे नियोजन करताना आपण उत्पन्न, जोखीम, सुरक्षितता, बाजारमूल्य, दीर्घकालीन उपयुक्तता अशा अनेक घटकांचा तौलनिक विचार करतो. ऐनवेळी आपलेच पैसे आपल्याला मिळणे हा एक अतिशय सोयीचा निकष काहीवेळा अधिक लाभ किंवा इतर सुविधांवर अधिक लक्ष दिल्याने तसा दुर्लक्षित होतो. मग कधी तरी बाका प्रसंग ओढवला की, कोणी निर्णय घेतला? कोणाचे चुकले? अशी दोषबाजी होते. ते होऊ नये आणि अडचणीच्यावेळी पैसे हाताशी असावेत म्हणून आधीच जागरूकतेने तजवीज करणे गरजेचे असते.

म्हणूनच आपण गुंतवणूक साधने निवडताना एकाच प्रकारात आपली सर्व कमाई गुंतवण्याची चूक करू नये कितीही लाभदायक-अधिक लाभांश किंवा व्याज देणारी योजना असली तरीही मोहात पडू नये. सोन्याची कोंबडी मिळाली म्हणून कापून खाऊ नये, हे दाखले लक्षात व आचरणात आणले पाहिजे. म्हणूनच ‘निवड’ करताना जागरूकता व चोखंदळपणा दाखवणे जरुरीचे आहे. अशी काही साधने आहेत, की जी आपल्याला काही प्रमाणात लिक्विडीटी देणारी साधने कोणती आहेत, त्यांची माहिती देतात.

1) बँकेतील बचत खाती व ठेवीतील पैसे – मुळात आपण जेव्हा एखाद्या बँकेकडे आपले पैसे ठेवतो, तेव्हा बँकेकडे ‘टाइम व डिमांड लायबिलिटी’ म्हणून नोंद केली जाते. म्हणजे बँकेला त्यांच्या खाते पुस्तकात देय रक्कम म्हणून कधी परत करायचे- किमान पंधरा दिवस की पाच ते सात दहा वर्षे असे वर्गीकरण करावे लागते. कारण कुठलाही खातेदार साध्या बचत खात्यात ठेवलेले पैसे कधीही परत द्या ! म्हणून मागणी करू शकतो. म्हणून बँकेला तशी तजवीज करावी लागते. खातेदार-ठेवीदारांनी गुंतवलेले सर्व पैसे कधी परत द्यायचे असे कोष्टक व वेळापत्रक बनवावे लागते. त्यानुसार त्यांनी मागणी केल्यावर लागलीच देण्याची व्यवस्था करावी लागते. आमच्या तिजोरीत पैसे नाहीत, आम्ही दुसरीकडे गुंतवले आहेत अशा काही सबबी देता येत नाहीत. बँक ग्राहकाने मागितले की, दिले पाहिजेत असे कायदा व वस्तुस्थिती सांगते. म्हणूनच बँकेकडे ठेवलेले पैसे लगेच मिळू शकतात, याच कारणाने बँकेकडे ठेवलेले पैसे हे रोकड-सुलभ मानले जातात. व्यवहारातदेखील आपण बँकेकडे गेलो तर आपल्या खात्यातील पैसे लगेच काढता येतात, खाते बंद करून सर्व बॅलन्स काढता येतो. ठेवींच्याबाबतीत मुदत-पूर्व विथड्रॉवल शक्य असते, फारफार तर अमुक टक्के पेनल्टी आकारली जाते. पण तुमचे पैसे तुम्हाला बँकेच्या कामकाजाच्या दिवशी लागलीच मिळू शकतात.

2) एटीएम व डेबिट -क्रेडिट कार्ड – अशी कार्ड्स असणे हा बँकेत खाते असल्याचा एक प्रकारचा फायदाच आहे. कारण जरी बँक बंद असली तरी कार्डाच्याद्वारे एटीएम बूथवर जाऊन आपण विनासायास पैसे काढू शकतो. दिवसा-रात्री कधीही पैसे काढण्याची मुभा आहे. इंद्रायणी पकडण्याआधी किंवा कोकण रेल्वे गाठण्याआधी पैसे काढण्याची सवय लागते. मात्र कधी कधी ऐनवेळी असे पैसे नाही मिळाले तर? काही तांत्रिक बिघाड असू शकतो, तर कधी नोटाच नसतील, अमुक नोटाच नसतील तर पंचाईत होणारच ना भौ ! म्हणजे तत्वतः सोय आहे, पण कधीमधी गैरसोय होऊ शकते.

3) म्युच्युअल फंड- लिक्विड योजना – ज्यांना थेट शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे नसतात, धास्ती वाटत असते, त्यांना म्युच्युअल फंड हा सोयीचा मध्यम मार्ग वाटतो. त्यातील अनेक स्कीम्सपैकी लिक्विड योजना ही अगदी बँक खाते-ठेवींप्रमाणे रोकड उपलब्ध करून देणारी असते. एखाद्या बँक ठेवींप्रमाणेच यातील पैसे आपल्याला लागलीच मिळू शकतात.

4) शेअर्स विक्री – पूर्वी कागदी शेअर्स असल्याने शेअर्स विकणे आणि हाती पैसे येणे हे थोडे वेळखाऊ असायचे, पण अलीकडे डिमॅट पद्धती असल्याने विक्री-व्यवहार झटपट होऊ शकतात. म्हणजे एकदम इमर्जन्सी असेल तर वर उल्लेख केलेले मार्ग सर्वात आधी अवलंबावे, तरीही अधिक पैसे लागणार असतील, तर आपल्याकडील शेअर्स-पोर्टफोलिओ पहावा व आवश्यक तितकेच शेअर्स काढावेत. संपूर्ण फोलिओ रिकामा करण्याची घाई करू नये.

5) सोने तारण-कर्ज – हाही एक पैसे मिळवण्याचा मार्ग आहे. आपल्याकडे असलेले सोने-दागिने गहाण ठेवून त्याबदल्यात आपल्याला रोख रक्कम मिळू शकते. मात्र असे करताना फुटकळ सावकार किंवा बनावट कंपनी-योजना यांच्या आहारी जाऊ नये. कारण तुमचे तारण हडप करण्याची किंवा त्यात भेसळ करून परत करण्याची शक्यता असू शकते. अधिक कर्ज मिळेल किंवा कमी व्याज लावतात म्हणून अशा ठिकाणी जाण्याचा मोह कृपया टाळावा.

6) रोखे -बॉण्ड- आपल्याकडे असलेल्या संपत्तीपैकी जर का रोख्यात पैसे गुंतवलेले असतील, तर ते विकण्याचा पर्याय असतो. त्यातून तुम्हाला आवश्यक निधी उभा करता येतो.

कंपनी-संस्था-फर्म यांच्यासाठी लिक्विडीटीचे महत्व – जसा आपल्याला व्यक्ती वा कुटुंब म्हणून आकस्मिक खर्चासाठी पैसा लागतो, तसेच एखादी संस्था-कंपनी यांना आर्थिक उलाढाल करताना अचानक रोखीची गरज निर्माण झाली तर? त्यांनाही आपल्याकडील आर्थिक परिस्थितीचा सतत अंदाज घ्यावा लागतो. अनेक अधिकारी व अर्थ-अकाऊंट्स तज्ज्ञ पदरी असतात. तिमाही व सहामाही इतकेच नव्हे तर प्रतिमाही अंदाजपत्रक करत असतात. नजीकच्या काळात, येत्या एक-दोन वर्षात आणि पंचवार्षिक कालावधीसाठी अंदाजे जमा-खर्च, निधी-पत्रक तयार केले जाते. तरीही आकस्मिक कारणांनी कंपनी /संस्थेच्या तिजोरीवर ताण येऊ शकतो,

काही नेहमीची कारणे खालीलप्रमाणे –

1) अचानक कर दायित्व वाढणे किंवा कर बदल झाल्याने ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम लवकरात लवकर भरण्याची वेळ आली तर
2) उत्पादन करणार्‍या कंपनीला बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी किंवा नुकसान कमी करण्यासाठी आकस्मिक खरेदी करावी लागते
3) निर्यात कंपनीला आकस्मिक अशी निर्यात ऑर्डर आल्यावर
4) कर्मचार्‍यांना पगार किंवा भत्ता देण्यासाठी
5) वर्किंग कॅपिटल अपुरे पडल्यास
6) कंपनीच्या सहयोगी कंपनीला अचानक गरज पडल्यास
7) कंपनीला ‘येणे ’ असलेले पैसे वेळेवर न आल्यास
8) बँकेकडून मिळणारी ओव्हर-ड्राफ्ट मंजूर न झाल्यास

बिझनेसमध्ये लिक्विडीटी राहावी म्हणून काय कराल –
1) आपल्याला ‘येणे’ असेल त्या पार्टीजना वेळेवर बिले पाठवा. तुमचेच पैसे तुम्हाला वेळेवर मिळतील, कर्जाची गरज लागणार नाही.
2) अनावश्यक असेट्स काढून टाका
3) तुम्हाला जी पेमेंट्स करावी लागतात, त्याकरिता दीर्घकालीन कालावधीत-क्रेडिट कसे मिळेल हे पहा.
4) तुमचे अवांतर खर्च कमी करा, बिझनेस खर्चावर नियंत्रण ठेवा, असे केल्याने तुमचे पैसे विनाकारण गुंतणार नाहीत.
5) तुमच्या कर्जाचे स्वरूप बदला. आपत्कालीनवरून दीर्घकालीन कर्जावर धोरण शिफ्ट करा. म्हणजे नजीकच्या काळात कर्जफेड न करता, ती भविष्यात करावी लागेल.
व्यक्तिगत व्यवहारात लिक्विडीटी कशी राखाल –
1) खर्चावर नियंत्रण, अनावश्यक खर्च टाळा.
2) तुमच्या गुंतवणुकीकडे सातत्याने लक्ष पुरवा, अनावश्यक व अनुत्पादित असेट्स भावनिक न होता काढून टाका.
3) डिजिटल पेमेंट माध्यमाचा वापर करा.
4) उत्पन्नाचे व खर्चाचे वेळापत्रक जमवा, म्हणजे त्या-त्या खर्चाला मॅचिंग असे उत्पन्न उभे करता येईल. कर्ज काढावे लागणार नाही.
5) अतिरिक्त उत्पन्न मिळवा म्हणजे बचत व गुंतवणूक यांचा समतोल राखता येईल.

थोडक्यात काय तर पूर्वीच्याकाळी लोक घरात पैसे बाजूला गाडग्या मडक्यात राखून ठेवायचे. बायका डब्यांमध्ये पैसे ठेवायच्या म्हणजे अचानक काही खर्च करावा लागला, तर कोणाकडे हात पसरायला नको. आज तशी वेळ आली तर डेबिट व एटीएम कार्ड्स हाताशी असतात, ऐनवेळी रोकड असली तर कार्डद्वारे पैसे काढण्यात वेळ जात नाही. केवळ एका प्रसंगापुरते नव्हे, तर एकूणच तुमच्या व्यक्तिगत जीवनात उत्पन्न व खर्च यांची सांगड घालताना आवश्यक तितकी लिक्विडीटी कशी राहिले याचा विचार करून, त्यानुसार गुंतवणूक केली पाहिजे. निव्वळ मालमत्ता आहे, सोने-नाणे आहे यावर अवलंबून न राहता आकस्मिक खर्चासाठी तजवीज केलेली असणे हे केव्हाही चांगले. आपली लिक्विडीटीच आपल्याला संकटकाळात आधार देईल.

-राजीव जोशी -बँकिंग व अर्थ अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -