घरफिचर्ससमकालीन भवतालाची कलात्मक अभिव्यक्ती

समकालीन भवतालाची कलात्मक अभिव्यक्ती

Subscribe

सर्वसामान्य माणसांची होणारी फरपट, मानवी मूल्ये, संस्कृती-पर्यावरण यांचा होणारा र्‍हास यासह माणसाचे वर्तन आणि वर्तमानाच्या विनाशाचे रूदन नि अस्वस्थ भवतालाचे आक्रंदन कवी अभय दाणी यांनी ‘एरवी हा जाळ’ या सत्तावन्न कवितांच्या संग्रहात व्यक्त केले आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटितांच्या परिणामातून समकालात एका नव्या व्यवस्थेला परिमाण लाभले. या व्यवस्थेत सर्वसामान्य माणूस आणि त्याच्या भवतालाची अतोनात पडझड झाली. या जगण्याची विविधरूपे या कवितेतून साकारली आहेत.

गेल्या पावशतकापासून अभय दाणी नियतकालिकांमधून सातत्याने काव्यलेखन करताहेत. मागणी तसा पुरवठा या न्यायाने कविता पाडणार्‍या काळात दाणींचा फक्त एक संग्रह प्रकाशित झाला आहे. कवितेचे स्वत्व आणि सत्व जपत त्यांनी केलेली अभिव्यक्ती दखलपात्र आहे. त्यांचे काव्यभान प्रगल्भ आणि मराठी कवितेत स्वत:चे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. तरीही म्हणावे तसे जाणकारांचे लक्ष या कवितेकडे गेलेले दिसत नाही,असे वाटते. गेल्या पावशतकाने समाजावकाशात निर्मिलेल्या दाहकतेचा अनेक आवाजी स्वर त्यांच्या कवितेतून उजागर होतो. समकाल आणि भवतालात साठलेल्या बहुस्तरीय जगण्याचे संदर्भ या कवितेतून ठळक होतात.

सर्वसामान्य माणसांची होणारी फरपट, मानवी मूल्ये, संस्कृती-पर्यावरण यांचा होणारा र्‍हास यासह माणसाचे वर्तन आणि वर्तमानाच्या विनाशाचे रूदन नि अस्वस्थ भवतालाचे आक्रंदन कवी अभय दाणी यांनी ‘एरवी हा जाळ’ या सत्तावन्न कवितांच्या संग्रहात व्यक्त केले आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय घटितांच्या परिणामातून समकालात एका नव्या व्यवस्थेला परिमाण लाभले. या व्यवस्थेत सर्वसामान्य माणूस आणि त्याच्या भवतालाची अतोनात पडझड झाली. या जगण्याची विविधरूपे या कवितेतून साकारली आहेत.

- Advertisement -

संस्कृतिक्षराचे बहुपेडी संवेदन या कवितेतून चित्रांकित होते. भौतिक-अभौतिक संस्कृतीचा मूल्यविनाशी भवतालाचा आवाज तीमधून प्रकटतो. भूमी आणि देशीपणाचा र्‍हास कवीला अस्वस्थ करतो. वर्तमानिक माणसांचे जगणे विविध कारणांनी हरवलेले-पराभूत नि जीवनाचा संकोच करणारे आहे. या हरवलेल्या जगण्याची उत्तरे संस्कृतीत दडलेली

असल्याचा ठाम विश्वास कवीला आहे. म्हणून तो संस्कृती समजून घेण्याचे आवाहन करतो. सांस्कृतिक वारसा आणि तीमधील जगण्याला ऊर्जा देणार्‍या तत्वांची आठवण करून देतो. नव्या-जुन्या जीवनसंकरातून आजच्या संभ्रमित जीवनाला आकार दिला. हे जगणे संस्कृती भंजन करणारे आहे. त्यामुळेच समाज दिशाहीन बनत चालल्याचे सूचन ही कविता करते. परंतु ही कविता भाबड्या आणि शोषकवादी संस्कृतीची समर्थक नाही. आपल्या परंपरेतील जीवनाला समृद्ध, समर्थ नि सक्षम करणार्‍या गोष्टी तिला महत्वाच्या वाटतात. संस्कृतीतील चांगल्या बाबींची बाजू घेणारी ही कविता सांस्कृतिक आत्मभान आणि आत्मशोधाचे भान देते.

- Advertisement -

पर्यावरणाचा विनाश हे समकालातील सार्वत्रिक घटित आहे. त्या घटिताचे गंभीर परिणाम मानवाला भोगावे लागू शकतात. हा इशाराही ही कविता देते. ‘आपण भूगर्भातलं पाणी शोधतो आहोत/एक संपूर्ण पिढी तहानलेली उभी आहे आपल्या मागे/तिला न्हाऊ कधी घालशील?’ हा कविचा प्रश्न अस्वस्थ नि अंतर्मुख करायला लावणारा जसा आहे; तसाच पर्यावरणाचे र्‍हासशील वास्तव समोर आणणारा आहे. आदिम काळापासून दुष्काळ आणि सुकाळाची अनेकविध रूपे माणूस पाहत आलेला आहे. त्याच्या बर्‍या-वाईट परिणामांना धैर्याने सामोरे जात त्याने जीवनाचा येथपर्यंतचा प्रवास केला. परंतु अलिकडच्या काळातील दुष्काळ अधिक भीषण असल्याचा अस्तित्वजनक आशय ही कविता मुखरित करते. मानवनिर्मित पर्यावरणाच्या असंतुलनातून दाहक बनत गेलेल्या दुष्काळाविषयीचे फारसे गांभीर्य समुहमनात नसल्याचा निर्देश ही कविता करते. दुष्काळाला केंद्रस्थानी ठेवून कोलमडलेल्या पर्यावरणिक जगण्याचे अनेक संदर्भ या कवितेतून प्रतिमांकित होतात. नैसर्गिक भवताल बिघडत जाणे हे कोणत्याही समाजव्यवस्थेच्या आरोग्यासाठी चांगल े नाही याविषयीची तीव्र जाणीव आर्त स्वरूपात कवी व्यक्त करतो.

बदलत्या कोरड्या नि कोडग्या जगण्याची विविध रूपे या कवितेतून साकारतात. या बदलाने मानवी जगण्याचा तळ ढवळून निघालेला आहे. शाश्वत जगण्यातली आश्वासकता हरवून बसल्याने जीवनाला चिकटलेले बेगडी संदर्भ, आलेली कृत्रिमता, वाढलेला बकालपणा, संक्रमित-संभ्रमित जीवनदिशा नि मूळ जीवनस्रोतांचा शोध घेता न येणे या जाणिवेने व्यापलेल्या समकालाला ही कविता सामावून घेते. ‘हे सभोवतालचं एकमेकांशी/गुण्यागोविंदाने नांदणं कधी बिनसलं’ हे न कळाल्यानं जगण्यात निरर्थक साचलेपणाची जाणीव प्रबळ होऊन आयुष्य निरस होत गेले. निरर्थकतेबरोबरच माणसं जीवनावरचा विश्वास गमावून बसली. आजूबाजूच्या वातावरणाने निराश-हतबल झाली. एकटेपणा वाढीस लागला. या निस्तेज-निर्जीव, संकोचलेल्या विसंवादी नि अविश्वासी-आभासी जगाचा स्वर ही कविता टिपताना दिसतो.

माणसा-माणसात वाढत जाणारे विखारीपण हा या काळाचा स्वभाव आहे. याची मुळं पूर्वापार चालत आलेल्या विषम व्यवस्थेत आहेत. ही व्यवस्था माणसाच्या माणूसपणाला मूठमाती देणारी आहे. लोकशाहीच्या स्वीकारानंतरही विषमतेच्या भिंती मजबूत आहेत. म्हणूनच कवी, ‘कोण पिऊन घेतो विष इथलं कोणासाठी/हे ठरूनच गेलेलं असतं’ या वास्तवाचा निर्देश करतो. नात्यातील तुटलेपणाची उत्कट जाणीवही या कवितेतून आविष्कृत होते.’ या नाही त्या कारणाने/घर असं दरवेळी कोसळलेलं उन्मळून’ ही नात्याची विस्कटलेली वीण नि त्यातला फोलपणा कवीला अस्वस्थ करतो. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरील पोखरलेपणातून आलेल्या परात्मतेचे वास्तवही साकारते. ही परिस्थिती बदलावयाची असेल तर ‘हाडामासाची जिवंत माणसं/बाकी कशापेक्षा अधिक मोलाची असतात’ हा विचार समाजमनात रूजला पाहिजे याचे सूचन कवी करतो.

भांडवलसत्ताक व्यवस्थेला विरोध आणि बाजारवादी संस्कृतीचा निषेध करत ही कविता लुटारु वृत्तीचा शोध घेत कष्टकर्‍यांच्या-शोषितांच्या बाजूने उभी राहते. ‘एक परफ्युम तुला नुसता लांबुन दाखवला तरी/एक जाहिरातच बाहेर येते बघ स्क्रीनमधून’ या दिशेने वाटचाल करणार्‍या जागतिकीकरणानंतरच्या वस्तुमय जगाचे स्वरूप विशद करते. ‘नटलेल्या देहाचा खुला व्यापार’ असे रुप प्राप्त झालेल्या या जगाच्या आर्थिक शोषणाच्या षड्यंत्राचा समाचार घेते. बाजारवादाच्या समर्थकांचे मनसुबे समजून घेत त्यांची पोलखोल करते. श्रमिकांचे अस्तित्व नाकारत त्यांच्या होणार्‍या शिकारीचे वास्तव ध्वनित करते. शोषितांबद्दलचा अपार सहानुभाव व्यक्त करणारी ही कविता त्यांच्या मांगल्यासाठी ‘ही जमीनदारी गुलामगिरीची पूर्वापार व्यवस्था/मुळातूनच नाकारावी लागते’ अशी बंडाची संयत विद्रोहीभाषा बोलत शोषणमुक्तीची हाक देते. नव्या व्यवस्थेने आकाराला आलेल्या शोषक नि शोषितांच्या ताण्याबाण्याचा अन्वयार्थ लावते.

काळाच्या परिणामस्वरूपी अनंत प्रश्नांचा ससेमिरा आणि अंगावर येणार्‍या भयचकित घटितांनी जगण्याचा अवकाश असुरक्षित नि भीतीदायक करून टाकला आहे. माणसाच्या अस्तित्वाचा क्षणाचाही भरोसा उरला नसल्याने मृत्यूचा धाक भवतालभर विखुरलेला आहे. समकालात सर्वत्र व्यापलेल्या या जाणिवेचा खोलवर संस्कार अभय दाणी यांच्या व्यक्तिमत्वावर झालेला दिसतो. म्हणूनच त्यांच्या कवितेतून मृत्युसूचक अनेक संदर्भ येतात. ‘दफन झालेल्या माणसांना, मृत्यू दबा धरून बसून राहील, कोणी गेल्याची बातमी, तू निरोपाचे हात हलवतेस तेव्हा’ अशा ओळी नि प्रतिमा या संग्रहातील कवितेत विखुरलेल्या आहेत. दु:खाला आदिम सनातन परंपरा आहे. त्याचा परिघ व्यापक अन् त्याचे आकलनही गुंतागुंतीचे आहे. या दु:खाचे अनेकपदरी संवेदन ही कविता साक्षात करते.

ग्रामीणत्वाचा संस्कार रिचवून आविष्कृत होणारी ही कविता कोणत्याच रूढ संकेतशरण चौकटीत बसणारी नाही. व्यक्तिगत अनुभूतीपासून सुरू झालेली ही कविता सामाजिकतेकडे जात वैश्विकतेकडे प्रवास करते. आंतरिक उलघालीकडून बाह्य वास्तवाकडे जाते. हेच या कवितेचे सामर्थ्य आहे. सांस्कृतिक संचिताचे सजग भान, सामूहिक नेणीवेचे नेमके आकलन आणि बदलत्या जगाच्या आशयाचे प्रभावी आविष्करण हे या कवितेचे महत्वाचे विशेष आहेत. आशयाची अन्वयार्थकता, रचनेतील आंतरिक लयबांधणी, अनुभवाला अर्थान्वित करणारे प्रतिमांकन, परिपक्व भाषिक समज व अनेकार्थसूचकता यामुळेच ही कविता स्वत:ची स्वतंत्र शैली प्रस्थापित करताना दिसते. भावजन्यता, चिंतनशीलता, प्रभावमुक्तता, वक्तृत्वशीलता, विचारशीलता आणि आशय-अभिव्यक्तिच्या नव्या सौष्ठव बंधामुळे मराठी मुक्तछंदी काव्य परंपरेला नवे वळण देण्याची क्षमता या कवितेत आहे.

कवितेने सामाजिकतेचे आविष्करण केले म्हणजे ती श्रेष्ठ ठरतेच असे नाही; तर ती आधी कविता असावी लागते. म्हणजे काव्यात्मक कलात्मकता तीमधे असणे अपरिहार्य असते. कवितेचा रूपबंध आणि घाटाच्या नियमांचे पालन करत अनुभवांची उत्कटता तीमधून प्रतीत व्हावी लागते. आशय, भावना, लय, प्रतिमा, छंद, भाषा आणि शैलीतील सेंद्रीयत्वातून ही कलात्मकता निर्माण होत असते. कलात्मकता आणि सामाजिकता यांच्या एकजीवी आविष्कारातून निर्माण झालेली कविता श्रेष्ठ असते. या दृष्टीने अभय दाणी यांची कविता कलात्मक आहे. जागतिकीकरणोत्तर काळात अशी कविता अपवादानेच वाचायला मिळते. म्हणून ही कविता वेगळी आणि महत्वाची आहे.

-“केदार काळवणे ” ई-मेल आयडी: [email protected]
-(सहायक प्राध्यापक,मराठी विभाग,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि.उस्मानाबाद.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -