घरफिचर्सकरोना आणि सामाजिक बहिष्कार!

करोना आणि सामाजिक बहिष्कार!

Subscribe

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या परिचारिका व डॉक्टर्स यांच्या परिवारास संसर्ग नको म्हणून त्यांची सोय हॉटेलमध्ये केली गेली आहे. पुणे येथील ससून रुग्णालयातील अशा योद्धांसाठी मात्र हॉटेल मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कारण अनेक हॉटेलवाल्यांनी नकार दिला, तर परिसरातील रहिवाशांनी विरोध दर्शवला. सध्याच्या परिस्थितीत असा दूषित दृष्टीकोन सोडून देणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधी भूमिका घेतली आहे. खरे तर मोठी जोखीम पत्करुन हे कर्मचारी सेवेत कसूर न ठेवता रुग्णांच्या आरोग्यासाठी धावपळ करत असतात. परंतु, त्यांना अशा विरोधाचा सामना करावा लागतो.

जात पंचायत विरोधी लढा लढून सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा तयार झाला. त्याचा वापर वाळीत टाकलेल्या पीडितांसाठी वरदान ठरला. आज करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत याच कायद्याचा उपयोग केला जात आहे. करोना या रोगाचा प्रादुर्भाव जगभर असल्याचे दिसून येत आहे. भारतात या रोगाबद्दल कळल्यानंतर अनेक परदेशी प्रवास करून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईटन करण्यात आले. पण अनेकांनी आपली वैयक्तिक माहिती लपवली. ते दोषीच आहेत. क्वारंटाईटन केलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्का मारला गेला. परंतु काही उघडपणे समाजात वावरत होते. ते लोकसुद्धा दोषी आहेत.

परदेशातून आलेल्या व्यक्तींना कार्यालयातसुद्धा संशयातून पाहिले गेले. अशा लोकांनी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक होतेच. काहींनी स्वतः होऊन ती केली तर काहींनी माहिती लपवली. पुण्या-मुंबईहून गावाकडे आलेल्या व्यक्तींना संशयातून पाहिले गेले. त्यांच्याशी व्यवहार बंद केले गेले. गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या. पण तपासणी नकारात्मक आल्यावर त्या व्यक्तीस सन्मानाचे जीवन जगता आले पाहिजे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डॉक्टर्स, परिचारिका व इतर आरोग्यसेवक जे आपल्या प्राणाची बाजी लावून लढत आहेत, त्यांची मानहानी झाली आहे.

- Advertisement -

करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या परिचारिका व डॉक्टर्स यांच्या परिवारास संसर्ग नको म्हणून त्यांची सोय हॉटेलमध्ये केली गेली आहे. पुणे येथील ससून रुग्णालयातील अशा योद्धांसाठी मात्र हॉटेल मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कारण अनेक हॉटेलवाल्यांनी नकार दिला तर परिसरातील रहिवाशांनी विरोध दर्शवला. सध्याच्या परिस्थितीत असा दूषित दृष्टीकोन सोडून देणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधी भूमिका घेतली आहे. खरे तर मोठी जोखीम पत्करुन हे कर्मचारी सेवेत कसूर न ठेवता रुग्णांच्या आरोग्यासाठी धावपळ करत असतात. परंतु त्यांना अशा विरोधाचा सामना करावा लागतो. पुणे येथील नायडू रुग्णालयातील काही रुग्णांच्या नातेवाईकांना सामाजिक बहिष्कार सहन करावा लागत असल्याची तक्रार विभागीय आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना समाजाकडून वाईट वागणूक मिळत आहे, त्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास, पाणी भरण्यास मज्जाव करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. करोनामुळे विलगीकरण केलेल्या एका व्यक्तीच्या परिवारास गावकर्‍यांकडून बहिष्कृत करण्याची घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आली. घाटकोपर येथेही एका विलगीकरण केलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना सोसायटीने वाळीत टाकले आहे. नाशिक येथे एका महिलेला खूप दिवसांनी गावाहून आल्यामुळे शेजारच्या लोकांनी करोनाच्या संशयातून बघितले. तिला भाड्याचे राहते घर सोडून निवारागृहात राहावे लागले.

शहादा येथे करोना काळात काही समाजकंटकांनी एक हॉस्पिटल चालू ठेवण्यास विरोध केला. डॉक्टरांना दमदाटी करण्यात आली. त्या हॉस्पिटल समोरचा रस्ता खोदण्यात आला. परिचारिकांना किराणा दुकानातून किराणा देण्यात टाळाटाळ करण्यात आली. ही माहिती मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी लगेेेच पोलिसांत संंपर्क केला. पोलिसांनी घटनेचे गांंभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही केली. खोदलेला रस्ता बुजवण्यात आला. किराणा दुकानातून किराणाही मिळाला. जळगाव येथे काही परिचारिकांना सोसायटीमध्ये राहण्यास विरोध करण्यात आला. पोलिसांनी कृतीशील हस्तक्षेप केल्याने त्यांच्यावरचा सामाजिक बहिष्कार उठवला गेला. सांगली येथे एका परिचारिकेला शेजारच्या लोकांनी वाळीत टाकले होते. सदर महिलेने जिल्ह्याधिकार्‍यांच्या नजरेस ही बाब आणून दिली. अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या, परंतु त्या समाजासमोर आल्या नाहीत.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाने अशा घटनांची गंभीर दखल घेतली आहे. अशा घटनांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहे. यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने बनविलेला जात पंचायतचा सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा उपयोगात येत आहे. कुणी कुणावर सामाजिक बहिष्कार टाकला तर या कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याचे आदेश राज्य शासनाने पोलीस प्रशासनाला दिले आहे. पोलिसांनीसुद्धा नागरिकांना तशी जाणीव करून दिली आहे. ठाणे शहरात काही आरोग्यसेवकांना वाळीत टाकल्याने १४६३ गृहनिर्माण संस्था व संकुल यांना नोटिसा बजावण्यात आल्या. असे कृत्य केल्यास सोसायटींचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले. मोबाईलवरसुद्धा ‘बिमारी से लढो…बिमार से नही’ अशी रिंगटोन वाजवून सामाजिक बहिष्कार न टाकण्याची विनंती केली जात आहे. शासन या सामाजिक बहिष्काराविरोधात लढत असताना नागरिकांनी संयम बाळगण्याची गरज आहे.

एका बाजूने करोनाशी लढणार्‍या योद्धांचे टाळ्या, ताट वाजवून, पुष्पवृष्टी करत त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. मात्र राहत्या घरी शेजारच्यांकडून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते हे निषेधार्ह आहे. करोनातून बर्‍या झालेल्या व्यक्तींना शासकीय आधिकार्‍यांकडून अभिनंदन करत टाळ्या वाजवत सन्मानाने घरी पोहचवले जाते. परंतु हा आनंद क्षणभंगूर ठरत कामा नये. नातेवाईक, मित्र, शेजार्‍यांकडून माणसासारखी सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. आयुष्यभरासाठी करोनाचा कपाळावर शिक्का बसू नये.

करोनाची लागण झाल्यावर सोशल मीडियात अफवांना उत आला. मुस्लीम समाज मुद्दाम करोना पसरविण्याचे काम करतात अशी अफवा पसरवली गेली. त्यासाठी एका व्हिडिओत एक फळविक्रेता फळांना थुंकी लावत असल्याचे दिसत होते, परंतु तपासाअंती तो व्हिडिओ जुना असल्याचे व तो विक्रता मानसिक रुग्ण असल्याचे निघाले. असे अनेक खोटे व्हिडिओ काहींनी जाणीवपूर्वक पसरविले. त्यामुळे धर्मा-धर्मात दुरावा निर्माण झाला. दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमातील काही लोकांच्या चुकीमुळे सर्व मुस्लीम समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले गेले. त्यांच्या मालावर अघोषित बहिष्कार टाकला गेला. हे अत्यंत वेदनादायी आहे. उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी तर मुस्लिमांवर बहिष्कार टाका असे म्हटले, हे निषेधार्ह आहे. अशातच कल्याण येथे प्रभा कालवार यांचा हृदयरोगाने मृत्यू झाला. तिची मुले परदेशात असल्याने शेजारच्या लोकांनीसुद्धा अंत्यसंस्कारापासून दूर राहणं पसंत केलं. मग मुलाचे मित्र असलेल्या मुस्लीम बांधवांनी त्यांचा अंत्यसंस्कार केला.

करोना संपल्यानंतर आपणावर आणखी मोठी जबाबदारी येणार आहे. असा भेदभाव मोडून टाकण्यासाठी आपणास निकरीचे प्रयत्न करावे लागतील. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सोशल बॉयकॉट नव्हे, हे आपण पटवून दिले पाहिजे. मुळात सोशल डिस्टन्सिंगऐवजी फिजीकल डिस्टन्सिंग हा शब्द योग्य आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा फिजिकल डिस्टन्सिंग हाच शब्द वापरते. कारण भारताचे समाज वास्तव हे जात वास्तव आहे. चातुर्वर्णाच्या आधारावर निर्माण झालेल्या जात वास्तवामुळे भारतीयांच्या मनावर खोलवर प्रभाव जाणवतो. करोणा विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग नव्हे तर फिजीकल डिस्टन्सिंग अपेक्षित आहे. अन्यथा सामाजिक बहिष्काराला उत्तेजन मिळेल. कुणी कुणावर सामाजिक बहिष्कार टाकत असेल तर एका बाजूने व्यापक प्रबोधन व दुसर्‍याच्या बाजूने सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा धाक अशा दुहेरी पातळीवर काम करावे लागेल. करोनातून बर्‍या झालेल्या व्यक्तीचे मानसिक धैर्य उंचविण्याचे, त्याची भयग्रस्तता संपविण्याच्या कामात मानसमित्रांचा मोठा सहभाग असावा लागेल. सोबतच त्यांना इतर नागरिकांकडून मिळणारी वागणूक सन्मानाची नसेल तर प्रभावी हस्तक्षेप करावा लागेल. कारण माणसाला प्रेम मिळाले तर त्याचे मनोबल वाढते. त्यामुळे आपल्यासमोर हे मोठे आव्हान आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -