घरफिचर्सकरोनातल्या संधीचं करा सोनं

करोनातल्या संधीचं करा सोनं

Subscribe

जगभरात हाहा:कार उडवणार्‍या करोना व्हायरसचा नायनाट होता होत नाहीये. या व्हायरसने अनेकांच्या घरातली माणसं हिरावून तर नेलीच; पण काहीजणांच्या घरातल्या चुलीही बंद पाडल्या. गेलेल्या माणसाला परत आणणे शक्य नाही; पण बंद पडलेल्या चुली मात्र पेटवाव्याच लागणार असल्याने अनेकांनी या करोना काळाचा संधी म्हणून उपयोग करण्यास सुरुवात केली आहे. यात महिलांचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे. विशेष म्हणजे यात सेलिब्रिटीजपासून ते सामान्य वर्गातील सर्व महिलांचाही समावेश आहे. करोनाकाळात मिळालेल्या या मंदीतील संधीच सोनं करा असंच यातील प्रत्येक महिला सांगत आहे.

चीनमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आलेला करोना व्हायरसने मार्चमध्ये भारतात प्रवेश केला. तोपर्यंत सगळं आलबेल चाललेल्या भारतात फक्त चीनमध्ये करोनाने काय काय केलं यावर चर्चा सुरू होत्या. पण जेव्हा करोनाने भारताचा उंबरठा ओलांडत देशात प्रवेश केला त्यानंतर प्रत्येकाचं आयुष्यच बदललं. संसर्गाच्या भीतीने लॉकडाऊन करण्यात आला. यावेळी झालेल्या नुकसानामुळे अनेक कंपन्यांना टाळे ठोकले गेले. ज्या कंपन्या कमी माणसांवर चालायच्या त्यांनी कामगारांना सगळ सुरळीत होईपर्यंत गावाला जाऊन राहा सांगत महिन्याचा आगाऊ पगार देत त्यांची बोळवण केली. तर प्रादुर्भावाच्या भीतीने सोसायट्यांनी घरकाम करणार्‍या बायकांना इमारतीत प्रवेश नाकारला. दुकाने बंद झाली. यामुळे दुकानात काम करणाऱेही बेकार झाले. असाच काहीसा प्रकार थोड्या फार फरकाने सगळ्याच क्षेत्रात झाला.

यात बड्या उद्योगांपासून छोट्या उद्योगांनी गाशा गुंडाळला. पण त्यातही हिंमत धरली काहीजणींनी. काम बंद झालं तरी कल्पकता वापरत आपला ब्रँड अजूनही तग धरून आहे हे दाखवण्यासाठी फॅशन डिझायनर ‘मसाबा’ने करोना परिस्थिती ओळखून फॅशनेबल मास्क तयार केले. यातील काही मास्क तिने डोनेशन म्हणून गरजूंना दिले. तर काही काळाची गरज म्हणून तिच्या हायफाय कस्टमरसाठी तयार केलेत. पुढचा काळ हा करोनाबरोबरच जगावा लागणार असल्याने डिझायनर ड्रेससवर डिझायनर मास्कही तिने तयार केले. ज्याला तिच्या वर्तुळात मागणी आहे. मसाबाने वापरलेला हा फंडा कौतुकास्पद तर नक्कीच आहे. पण बुडणाऱा व्यवसाय नव्याने कसा रचता येईल याचे उत्तम उदाहरण आहे. मसाबाच्याच पावलावर पाऊल टाकत आता अनेक फॅशन डिझायनर असे प्रयोग करू लागल्या आहेत. सध्या लग्न सराईलाही ५० माणसांची उपस्थिती असणार आहे. यामुळे साहजिकच लग्न म्हटलं की नवीन कपडे आलेच आणि त्यावर मॅचिंग मास्क तर आता हवाच. याच ट्रेंडला संधीच रुपांतर देत मसाबासारख्या अनेक महिलांनी मास्क मेकींग व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे आज मसाबाच्या शोरुमपासून गल्ली बोळातील दुकानात मास्क दिसू लागले आहेत.

- Advertisement -

तर लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद झाल्याने माटुंग्यात अक्ष फॅशन हे कपड्यांचे दुकान चालवणार्‍या रुपालीने व्यवसाय वृद्धीसाठी नवीन तंत्र वापरले आहे. तिने चक्क व्हिडिओ शॉपिंग सुरू केली आहे. यासाठी तिने काही प्रोमो व्हिडिओ शूट केले असून ते ती तिच्या गिर्‍हाईकांना व्हॉट्सअ‍ॅप करते. त्यात बघून महिला तिला ड्रेसची ऑर्डर देत आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून ठप्प पडलेला तिचा बिझनेस नव्याने पुन्हा एकदा जोमात सुरू झाला आहे. विशेष म्हणजे कपड्यांची ती होम डिलिव्हरी करत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग तर सांभाळली जातेच शिवाय बिझनेसही हळूहळू रुळावर येत आहे. असे तिने सांगितलंय. तर अपर्णा सॅलिन या सॉफ्ट वेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीचा व तिच्या पतीचा कोरोना व लॉकडाऊनमुळे जॉब गेला आहे. पण त्यामुळे हिरमसून किंवा निराश न होता काहीतरी करायचं अपर्णाने ठरवलं.

सुरुवातीला तिच्या पतीला टेन्शन आलं होतं. पण प्रंचड आशावादी असलेल्या अपर्णाने नवर्‍याची समजूत काढली त्याला हिंमत दिली व दोघांनी आता चक्क ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. ज्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे तिने सांगितलयं. नोकरी ही आश्वासक असते. महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार असल्याने तुम्हीही निश्चिंत असता. तर त्याउलट बिझनेस हा बेभरवशाचा वाटत होता. त्यामुळे स्वता:च काही सुरू करण्याचा कधी विचार केला नव्हता. पण कोरोनामुळे संधी मिळाली. असं अपर्णा मोठ्या आत्मविश्वासाने सांगते.

- Advertisement -

अशा अनेक महिलांनी कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रडगाण न गाता नवीन सुरुवात केली आहे. गीता शिंदे या घरोघरी जाऊन स्वयंपाक करणार्‍या महिलेला इमारतीत प्रवेश नाकारल्याने खजिल वाटले. अनेक काम सुटली. पण नुसतं रडत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. असं म्हणतं तिने घरातच डबा बनवण्याचे काम सुरू केले आहे. ती राहते त्याच्या बाजूलाच कंपन्या आहेत. या कंपन्यातील कामगार तेथे लागणार्‍या गाड्यांवर लंचटाईममध्ये डोसा, वडापाव, वडा सांबार खायचे. पण लॉकडाऊनमुळे सगळेच गाडीवाले गावी निघून गेले. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्याने कंपनी सुरू झाली. त्या कामगारांना डबा देण्याचं काम गीताताईंनी सुरू केलं आहे. करोनामुळेच हे शक्य झाल्याचं ती सांगते.

तर शाळेतील मुलांना घरी पोहचवण्याच काम करणार्‍या सुधाताई शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहात आहेत. पण तोपर्यंत घर चालवायला हवं यातून त्यांनी मास्क शिवायला सुरुवात केली. दररोज पाच ते सहा मास्क लोकं विकत घेतात. त्यामुळे काहीच नाही तर जेवणाचा प्रश्न सुटतोय. त्यातच त्यांना शाळेतील एका शिक्षिकने शंभर मास्क शिवण्याची ऑर्डर दिली आहे. यामुळे शाळा सुरू होईपर्यंत तरी दिलासा मिळाला असं सुधाताई सांगत आहेत. तर करोनामुळे नोकरी गेल्याने हताश न होता यापुढे नोकरी न करण्याचा निर्णय पौर्णिमा नायर या महिलेने घेतला आहे. यापुढे घरात राहूनच काहीतरी करण्याचा निर्णय तिने घेतला असून ती सध्या ऑललाईन शेअर मार्केटचं प्रशिक्षण घेत आहे.

यातील प्रत्येक महिलेने करोना पाहिलेला आहे. करोनाची झळ यातील प्रत्येकीला बसली आहे. पण त्याचा बाऊ न करता ओढवलेल्या परिस्थितीचं रडगाणं न गाता प्रत्येकीने हिंमत दाखवत यातून मार्ग काढला आहे. यासाठी त्यांनी वेगळी वाट धरली आहे. हीच करोनानंतरची खरी परीक्षा असून यात शंभर टक्केे यश मिळवणार याची खात्री नसून शंभर टक्के विश्वास प्रत्येकीला आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -