घरफिचर्सकरोना, लॉकडाऊन आणि ती!

करोना, लॉकडाऊन आणि ती!

Subscribe

जगातील इतर देशांबरोबरच भारतात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि देश लॉकडाऊन झाला. तेव्हापासून सगळेजण घऱात अडकलेत. काहीजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर काहींना काहीच काम नाहीये. त्यातही वर्क फ्रॉम होम महिलाही करत असल्याने त्यांना कामाच्या ताणाबरोबरच कुटुंबीयांचे खानपान व आरोग्याचीही काळजी घेण्याची कसरत करावी लागत आहे. यात काही समंजस पुरुष घरात तिला कामात मदत करताना दिसतात तर काहीजण याही परिस्थितीत पुरुषी अहंकार जपत तिलाच राबवत आहेत. ती मात्र कसलीही कुरकुर न करता कुटुंबाबरोबरच करियरचीही लढाई लढत आहे.

डिसेंबर महिन्यात चीनमधील वुहान शहरात उद्भवलेल्या करोना व्हायरसच्या मुक्कामाला सहा महिने उलटले आहेत. या सहा महिन्याच्या कालावधीत करोनाने माणसाला बरंच काही शिकवलं आहे. यात जगण्याचं महत्त्व आणि मृत्यूचं भय काय असतं यापासून शिस्तीत कसं जगायचं हेदेखील करोनाने प्रत्येकाला दाखवलं आहे, पण त्याचबरोबर अख्ख्या कुटुंबाच्या आरोग्याची धुरा वाहणार्‍या कुटुंबाला शिस्त लावणार्‍या पण तरीही कालानुरूप नेहमीच गृहीत धरल्या जाणार्‍या घरातील स्त्रीचं महत्वही पुन्हा एकदा अधोरेखीत केलं आहे. ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. कारण या कठीण काळात आतापर्यंत चूल आणि मूलाबरोबरच नोकरी करणार्‍या माझ्या, तुमच्यासारख्या स्त्रिया घराघरात कुटुंबाचे संरक्षणच नाही तर करोनाबरोबर लढण्यासाठी आपल्या माणसांना शारीरिक व मानसिकरित्या तयार करत आहेत. म्हणूनच असेल कदाचित करोनाही पुरुषांच्या तुलनेत महिलांनाच जास्त वचकून आहे. यामागे अनेक वैज्ञानिक कारणे असली तरी स्त्रियांमध्ये असलेली उपजतच दुर्दम्य शक्तीही यास कारणीभूत असावी असे म्हणणे अतिशयोक्ती नसावी. याच पार्श्वभूमीवर करोनामुळे आज प्रत्येक स्त्री आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. जिथे तिला कुटुंब की, करियर यातील एकाची निवड करावी लागत आहे.

जगातील इतर देशांबरोबरच भारतात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि देश लॉकडाऊन झाला. तेव्हापासून सगळेजण घऱात अडकलेत. काहीजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर काहींना काहीच काम नाहीये. त्यातही वर्क फ्रॉम होम महिलाही करत असल्याने त्यांना कामाच्या ताणाबरोबरच कुटुंबीयांचे खानपान व आरोग्याचीही काळजी घेण्याची कसरत करावी लागत आहे. यात काही समंजस पुरुष घरात तिला कामात मदत करताना दिसतात तर काहीजण याही परिस्थितीत पुरुषी अहंकार जपत तिलाच राबवत आहेत. ती मात्र कसलीही कुरकुर न करता कुटुंबाबरोबरच करियरचीही लढाई लढत आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातील प्रत्येकाची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते ती करताना दिसत आहे. पण सुरुवातीला एक दोन महिन्यांपुरती ही लढाई असावी असा व्यक्त करण्यात आलेला तज्ज्ञांचा हा अंदाज आता चुकताना दिसतोय. कारण करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तो इतक्यात जाईल असे सध्या तरी दिसत नाहीये. यामुळे लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू होण्याचीच शक्यता बळावली असून करोनाबरोबरच जगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे पुढचा येणारा काळ हा प्रत्येक व्यक्तीबरोबरच प्रत्येक स्त्रीसाठी नवीन आव्हाने घेऊन येणारा असणार हे निश्चित आहे. ही आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य जरी प्रत्येक स्त्रीमध्ये असले तरी तसे जगताना काहीजणींना कुटुबीयांना प्राधान्य देत कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्याची मानसिक तयारी काहीजणींनी केली असून अनेकजणी मात्र अजून तिथपर्यंत पोहचलेल्या नाहीयेत.

- Advertisement -

करोना व्हायरसचा संसर्ग माणसांपासून माणसांना होणारा आहे. यामुळे उद्या जरी ही परिस्थिती निवळली तरी साहजिकच माणसं आता एकमेकांपासून दोन हात लांबच राहणार आहेत. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत कसे पाठवावे यापासून त्यांचा ताबा आयांना, घरातील मोलकरणींना कसा द्यावा असे अनेक प्रश्न नोकरदार महिलांना सतावू लागले आहेत. घरातील कामासाठी मोलकरणीला, स्वयंपाकीणबाईला बोलवणे किती सुरक्षित असेल याचाही त्या विचार करत आहेत. त्यातच अशी काम करणारे बरेचसे विश्वासू गडी आपआपल्या गावी निघून गेल्याने कोणाच्या भरवशावर मुलं व घरं सोडावं असा प्रश्नही आता नोकरी करणार्‍या महिलांना सतावू लागला आहे. तसेच जून महिनाही सुरू होत आहे. पावसाळ्याच्या या दिवसात साथीचे इतर आजारही डोके वर काढतात. यामुळे करोनाच्या धोक्याबरोबरच इतर आजारांचाही धोका वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वत:बरोबरच कुटुंबाचे आरोग्यही सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी महिलांवर येऊन पडली आहे. करोनाने स्वत:ची काळजी घेण्याचे जरी प्रत्येकाला शिकवले असले तरी लहानगे व ज्येष्ठ नागरिक आरोग्याविषयी घरातील स्त्रीवरच अवलंबून असतात. यामुळे करोनाच्या या संकटात करियरच्या मागे धावण्यावर अनेक महिलांना पुनर्विचार करावा लागत आहे. त्यातच करोनामुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला नव्याने उभारणी देण्यासाठी बराच अवधी लागणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याुळे कंपन्यांनी पगारकपातीबरोबरच कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी कर्मचार्‍यांना सद्य:स्थितीत कंपनी पगार देण्यास असमर्थ असल्याचे सांगत स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे पर्याय दिले जात आहे. यामुळे नोकरीच्या या संकटाबरोबरच करोनाचे संकट व कुटुंबाचे आरोग्य यात कॉर्पोरेट क्षेत्रातील काही मैत्रिणी कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य देत नोकरीला रामराम करण्याचा निर्णय घेताना दिसत आहे. घर चालवण्यासाठी पैशांची गरज आहे हे जरी प्रत्येकीला मान्य असले तरी मुलांना, कुटुंबाला धोक्यात टाकून नोकरी करण्यास अनेकजणी तयार नाहीत, असेच चित्र जगभरात दिसत आहे. त्यातच पुरुषाच्या तुलनेत घरातल्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी स्त्रीवरच येते. कारण किचनमध्ये तिचाच वावर अधिक असतो. जिथून माणसाच्या आरोग्याची जडण घडण होते त्या विभागाची महिलाचं प्रमुख असल्याने करोनाने हे नवीन प्रश्नचिन्ह महिलांसमोर उभं केलं आहे. तसेच ज्या स्त्रिया अत्यावश्यक सेवेत काम करत आहेत त्यांना पर्याय नसला तरी ज्या स्त्रियांना पर्याय आहे त्या मात्र विचारांच्या दुफळीत अडकल्या आहेत.

ज्यांची मुलं लहान आहेत किंवा घरात वयस्क सासू-सासरे अथवा आई-वडील आहेत, त्यांनी करोनाचे संकट टळेपर्यंत वर्क फ्रॉम होम असायला हवे असे कंपन्याना सांगितले आहे. यावर काही कंपन्यांनी यास संमतीही दर्शवली आहे. पण त्यासाठी कामाचा दर्जा व वेळ ऑफिसमधील कामापेक्षा अधिक प्रभाव टाकणारे असावे असेही या महिला कर्मचार्‍यांना सूचित केले आहे. तर दुसरीकडे जगभरातील कंपन्यांमध्ये पुरुषाच्या तुलनेत महिलांना कमी पगार दिला जात आहे. त्यातच करोनामुळे कंपन्याना फटका बसल्याने त्यांनी पगार कपातीस सुरुवात केली आहे. याचा थेट परिणाम महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरच झाला आहे. आधीच कमी पगार त्यातच पगार कपात झाल्याने ‘आमदनी अठ्ठण्णी और खर्चा रुपया’ अशा परिस्थितीत महिला सापडल्या आहेत. यामुळे करोनाच्या संकटाचा धोका स्वीकारत कामावर जा व घरातील मुलाबाळांची देखभाल करणार्‍या आयाला मोलकरणीला तोच पगार द्या, असे न करता घरी बसून घरातील कामांबरोबरच ऑनलाईन कामांचा पर्याय अनेकजणींना उपयुक्त वाटत आहे. जेणेकरुन घर, मूलही सांभाळता येतील व अर्थाजनही करता येईल.

- Advertisement -

दरम्यान, एकंदर जेव्हा जेव्हा कुटुंबावर कुठलंही संकट येतं तेव्हा त्या घरातील स्त्रीच असते जी खर्‍या अर्थाने खंबीरपणे त्याला तोंड देत असते. मग हे संकट आर्थिक असो, आरोग्यविषयी असो वा कुठलही असो. अशाच कठीण समयी अचूक निर्णय घेऊन ती प्रश्न तडीस लावते. म्हणूनच ज्या ठिकाणी पुरुष निर्णय घेताना मागेपुढे बघत असतो त्याचवेळी ती मोठा व अवघड वाटणारा धाडसी निर्णय घेऊन मोकळी होते. आजही करोनाचे संकट तशीच परिस्थिती घेऊन आलं आहे. जिथे आहे ते जपण्याची व त्यातून भविष्याची तरतूद करण्याची पुरुष धडपड करत आहेत. तर महासंकटरुपी करोनापासून त्याला व त्याच्या पिल्लांबरोबरच घरटं सुरक्षित ठेवण्यासाठी तीही एक पाऊल मागे जाण्यासाठी सरसावली आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -