मानसिक तणावाचा कोरोना!

Mumbai
संपादकीय

कोरोनाने सर्व जग ठप्प केले आहे. चीन आपण कोरोनापासून मुक्त होत असल्याच्या कितीही गप्पा मारत असला तरी त्याचे मोठे परिणाम त्यांना सहन करावे लागले आहेत आणि पुढेही त्याचे चटके त्यांना बसतील. आपल्या चिनी कम्युनिस्ट बंदिस्त राजवटीने ही महामारी सुरुवातीला उघड न करणार्‍या चीनने आपल्याबरोबर आज सार्‍या जगाला खड्यात घातले आहे. चिनी बनावटीची स्वस्त उत्पादने विकून जगाच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती घेऊ पाहणार्‍या चिनी सत्ताधीशांनी आज अमेरिका आणि युरोप देशांनाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हादरे दिले आहेत. प्रगत देश या आजाराने हादरले असताना विकसनशील देश तर दहा पावले मागे जाणार आहेत. कोरोनाचा प्रभाव हा फक्त आता शरीरापुरता मर्यादित राहिलेला नाही तो मनापर्यंत जाऊन पोहचला आहे. भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, या भीतीने सारे जग तणावाखाली असून त्यात भारताचा वरचा क्रमांक लागल्याचे समोर आले आहे आणि ही मोठी चिंतेची बाब आहे. भारतीय मानसोपचार कमिटीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात, मानसिक आजाराने पीडित झालेल्यांमध्ये अचानक 20 टक्क्यांंपर्यंत वाढ झालेली दिसून आली आहे. सर्वेक्षणानुसार, प्रत्येक पाचपैकी किमान एक भारतीय मानसिक आजाराने ग्रस्त आहे. कोरोनामुळे लाखो लोकांच्या जीवनशैली आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने भारतीय मोठ्या संख्येने तणावाखाली असल्याचे दिसत आहेत. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मानसिक आजाराच्या रूग्णांमध्ये सरासरी 15 ते 20 टक्क्यांची वाढ फक्त एका आठवड्यात झाली आहे. मानसिक आजाराच्या कारणांमध्ये कोरोनाचा उद्रेक हे सर्वात महत्वाचे कारण आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व कंपन्या बंद झाल्या आहेत. अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. ज्यामुळे लोकांचे व्यवसाय, नोकरी, कमाई, बचत किंवा मूलभूत संसाधने गमावण्याच्या भीतीने लोक जगत आहेत. दरम्यान हा एक वाढता आलेख आहे. काही दिवसात याचे गंभीर परिणाम दिसून येतील, असे फोर्टिस हॉस्पिटलमधील मानसिक आरोग्य व वर्तणूक विज्ञान विभाग प्रमुख डॉ. मनु तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. लॉकडाऊनमुळे लोकांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. ते मर्यादित स्त्रोतांसह घरातच राहत आहेत. आता ते चिंता, पॅनीक हल्ले आणि अल्कोहोल विथड्रॉल सिंड्रोममुळे ग्रस्त आहेत, असे डॉ. मनु तिवारी यांचे म्हणणे आहे. करोना व्हायरसचा धोका लक्षात आल्यानंतर आणि संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर नागरिकांच्या जीवनशैलीवर थेट पण मोठा परिणाम झाला असून त्यांना बंद घरात किंवा सुरक्षित ठिकाणी राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणचे प्रदूषण कमी झाले असले तरी ही ताजी हवा घेण्यासाठी नागरिकांना बाहेर मोकळ्या हवेत फिरताही येणे शक्य नसल्यामुळे तणावात वाढ होण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक जणांना आपल्या नोकरीची चिंताही सतावतेय. अर्थव्यवस्था कोलमडली तर नोकर्‍या टिकून राहणे शक्य तर होणार नाही आणि नवीन रोजगारही मिळणे शक्य होणार नाही, छोटे मोठे व्यवसायही टिकणार नाहीत, अशा परिस्थितीत जगायचे कसे? हा प्रश्न जीवघेणा बनत चालल्यामुळे लोकांच्या मनावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. वाढत जाणारी नकारात्मकता आणि घरात कैद असल्यासारखे जगणे यामुळे कोरोना मनात घुसत चालला आहे. स्थिर विचार करण्याची क्षमता हरवणे, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा पडताळून पाहणं, सतत काहीतरी विचार करत राहणं आणि वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन त्याची चिकित्सा करत राहणे, सतत जुन्या गोष्टी आठवत राहणे आणि प्रत्येक गोष्टीत स्वत:ला दोषी ठरवणे अशी काही प्रमुख कारणे मानसिक आजार बळावत चालल्याचे दाखवणारा आहे. कोरोना येण्याच्या आधी आपण सर्व नेहमीच्या जीवन शैलीने जगात होतो, पण आता त्याच्यात अचानक बदल झाल्याने हा बदल लगेच आत्मसात करणे सहज शक्य होणार नाही. आजारापासून दूर राहण्यासाठी सक्तीने घरी बसावे लागल्यामुळे सुरुवातीचे एक दोन दिवस मजेत गेले, पण हातात त्याचा कंटाळा यायला लागला आहे. मुख्य म्हणजे पुढे जगायचे कसे ही चिंता सतावू लागली आहे. म्हणूनच तुम्ही एकट्याने याची चिंता करून चालणार नाही. जे काही होणार आहे, हे सर्वांचे होणार आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. भारताने १५ एप्रिलपर्यंत लोकांना घरी थांबण्याच्या सूचना केल्या असल्या तरी त्यात वाढ होऊ शकते. केंद्र सरकारच्या मते पुढच्या पंधरा दिवसांत निर्बंध हटवण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. पण, संरकार असे सांगत असली तरी कोरोनाचा प्रसार जास्त आहे कि कमी झाला आहे, यावर अवलंबून असेल. यासाठी प्रत्येक नागरिकाने शिस्त ही बाळगलीच पाहिजे. प्रत्येकाला आपला देव-धर्म प्रिय असला तरी तो आपल्या घरच्या चौकटीत राहील, याची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय अशा निर्णायक क्षणी घरी असताना नियोजन करायला हवे. मुख्य म्हणजे आधी बाहेर असताना तुम्हाला स्वतःशी संवाद करण्याची गरज भासत नव्हती. मात्र आता तसे नाही. हा संवाद ध्यान, योग या माध्यमातून होऊ शकतो. याशिवाय व्यायाम, वाचन, संगीतात आपले मन रामवत येईल. विशेष म्हणजे सतत धावपळीच्या जगण्यातून आपल्या कुटुंबाशी तुटत चाललेला संवाद यानिमित्ताने वाढवता येईल. मुलांबरोबर काही बैठे खेळ खेळताना त्याच्याशी मनसोक्त गप्पा मारता येऊ शकतात. यातून छोट्या तसेच तरुण मुलांच्या भावविश्वात शिरण्याची मोठी संधी मिळाली आहे. सतत कोरोनाच्या बातम्या ऐकणे टाळून आणि व्हाट्सअप विद्यापीठाचे विद्यार्थी होऊन निराशेच्या खोल डोहात जाण्यापेक्षा मन सक्षम करण्याचे वरील उपाय आपण सर्वांनी आचरणात आणायला हवे. मन सक्षम झाले की शरीर आपोपाप साथ द्यायला सुरुवात करेल. डॉक्टरांच्या मते कोरोनाचा संसर्ग झालेले ९७ टक्के रुग्ण बरे होऊ शकतात. ३ टक्के रुग्णच यात दगावण्याची शक्यता असते आणि ते सुद्धा ज्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे, असेच रुग्ण दगावू शकतात. म्हणूनच शरीराचा कोरोना बरा होऊ शकतो, मनाचा कोरोना बरा करण्याची आता खरी गरज आहे. बाकी पुढे काय होणार याची आता चिंता करून वर्तमानकाळ बिघडवण्यात काही अर्थ नाही.