करोना भाग जा…

सध्या जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी अर्थात अत्र तत्र थोडक्यात सर्वत्र करोनाच करोना आहे. जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळंच करोनामय झालंय. जगातील आणि देशातील सर्व विषय संपले असून सध्या करोनाच्या भोवतीच घड्याळ फिरतंय. करोना नावाच्या या व्हायरसने जगभरात दहशत निर्माण केली आहे. रोज या देशात करोनाचे रुग्ण सापडले त्या देशात दगावले. या बातम्या बघत आणि वाचतच दिवस उजाडू लागल्याने आम्ही भारतीयही धास्तावलो. तेवढ्यात भारतात करोनाचा रुग्ण अशी बातमी झळकली आणि संपूर्ण देशालाच घाम फुटला. पण यावरही काही जणांनी गो करोना करोना गो गायलं आणि कुठेतरी करोनाची दहशत संपली जरी नसली तरी हलकीशी निवळली . त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालं. महिलांनी होळीच्या दिवशी गायिलेले ‘करोना भाग जा भारत मे तारो काही काम रे’ हे गाणं आणि नंतर सुरू झाले करोनावरचे जोक्स आणि मीम्स. त्यामुळे भारतात करोनाला घाबरायचं की हसायचं असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे करोनापासून सावधान राहा असे घसा फोडून सांगणारे तज्ज्ञही शांत झाले आहेत.

त्यात भरीस भर म्हणजे काही तज्ज्ञ डॉक्टरांनी करोना भारतीयांचे काहीही बिघडवू शकत नाही असा दावा केल्याने भारतीय अजूनच रिलॅक्स झालेत. पण जगातील इतर देशात मात्र परिस्थिती वेगळी आहे. करोनाच्या सावटाखालीच त्यांची सकाळ होत आहे आणि दिवसही मावळत आहे. दुबईत नव्यानेच स्थायिक झालेल्या मैत्रिणीने सांगितलेला अनुभवही बोलका आहे. सध्या ती ज्या बिल्डिंगमध्ये राहते व ज्या कंपनीत काम करते तेथे मास्क लावल्याशिवाय तुम्ही प्रवेशही करू शकत नाहीत आणि बाहेरही पडू शकत नाही. आजाराला आमंत्रण देण्यापेक्षा त्याला रोखण्याकडे येथील जनतेचा कल अधिक आहे. खासगी कंपनीत नोकरी करणार्‍या कर्मचार्‍यांना साधी शिंक जरी आली तरी तुम्हाला तुम्ही फीट आहात हे दाखवण्यासाठी डॉक्टरांचे सर्टिफिकेट दाखवावे लागत आहे. त्यानंतरच तुम्हाला ऑफिसमध्ये प्रवेश दिला जात आहे.

दुबईचे शेजारचे राष्ट्र असलेल्या कतारमध्येही सरकारी कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश येथील राजाने दिले आहेत. चीननंतर ईराण व इटलीत करोनाचे सर्वाधिक बळी जात आहेत. अमेरिकेत २ हजार लोकांना करोनाची लागण झाली असून ४७ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. यामुळे जगातील महासत्ता असलेल्या राष्ट्राने तर करोनाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी जाहीर केली आहे. यातूनच या आजाराचे गांभीर्य समजण्यासारखे आहे. सध्या करोनाने इतर देशातही हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने प्राथमिक स्तरावरील बातम्या रोज येत आहेत. अनेकजण बरेही होत आहेत तर काही जणांना प्राण गमवावे लागत आहेत. यात रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने प्रामुख्याने वयस्क व्यक्तीची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

चीन व इटलीमध्ये तरुणांच्या तुलनेत वयस्क व्यक्तींची संख्या अधिक आहे. येथे पासष्टहून अधिक वयोमान असलेल्या व्यक्ती मोठ्या संख्येने असून अनेकजण विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. यामुळेच या देशात करोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांचा आकडाही वाढत आहे. परिणामी या देशांमध्ये करोनावर विनोद करणे वा मीम्स करणे नागरिकांना योग्य वाटत नाहीये. पण यात आपल्या भारतीयांची मानसिकता मात्र वेगळी ठरत आहे. नैसर्गिक संकट असो वा मानव निर्मित संकट ते निवळू लागताच किंवा ते निवळण्याची चिन्हे दिसताच आपण त्यावर विनोद करून मन मोकळं करत असतो. यावरूनच मग ‘गो करोना गो आणि करोना भाग जा’ अशी गाणी व विविध मीम्स ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवत सोशल मीडिया ब्रेक करतात.

सध्या भारतातील ‘करोना भाग जा’ हे गाणंही सातासमुद्रापार पोहचलं आहे. करोना व्हायरसला जा सांगणार्‍या महिला-पुरुष व वाराणशीत देवाला करोनाची लागण होऊ नये म्हणून त्याला मास्क घालणारे पुजारी यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत आहे. करोनासारख्या व्हायरसची गंभीर दखल घेण्याऐवजी नागरिक अंधश्रद्धा पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची टीका जगभरातील यूजर्स करत आहे. भारतीयांच्या या अनोख्या शकलांमागे जरी विविध भावना असल्या तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर या व्हिडिओ आणि मीम्सने करोनाबद्दल भारतीय किती बेफिकीर आहेत हेच दाखवलं आहे. यामुळे ज्यावेळी जगभरात करोनाची दहशत पसरलेली असताना आपण सोशल मीडियावर नक्की काय पोस्ट करायला हवे याचे भान बाळगणे सध्या तरी गरजेचे आहे.

दरम्यान, काही जणांनी तर करोना व्हायरसवर गाणी तयार करून यू ट्यूबवर आपली दुकानंही सुरू केली आहेत. यात आजाराच्या गांभीर्यापेक्षा मजा मस्तीसाठी करोना या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. भोजपुरी, पंजाबी गाणी तर खास करोनासाठी तयार करण्यात आली आहे. हिंदी भाषेत करो ना म्हणत त्याची तुलना एका गाण्यात करोना व्हायरसबरोबर करून त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी ज्या सॅनिटायजर, मास्कचा वापर करण्यास सांगत आहेत. त्यावरही गाण्यातून थट्टा करण्यात आली आहे. तर एका गाण्यामध्ये चिनी लोक घाण खात असल्यानेच त्यांना करोना बाधला असं संबोधून त्यांच्या खाद्य संस्कृतीची टर उडवण्यात आली आहे.

या व्हिडिओमध्ये चीनमधील करोना रुग्णही दाखवण्यात आले आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ही गाणी हीट झाली आहेत. होळीच्या दिवशी तर करोना गाण्यावर अनेकांनी ठेका धरून बेफाम नाचही केल्याचा व्हिडिओ यू् टयूबवर दिसत आहे. ज्यावर जगभरात निंदा केली जात आहे. ‘किसीकी परेशानी किसीके लिए मजाक बन जाती है’ या कुठल्याशा चित्रपटातील हा संवाद भारतातील करोना परिस्थितीवर तंतोतंत जुळताना दिसत आहे. जे माणूस म्हणून स्विकारणे कठीण आहे. पण ज्या आजाराने हजारो लोकांचा बळी घेतला त्याला इतकं लाईटली घेणं भारतीयांना कसं जमतंय अशी चर्चा तरी आंतरराष्ट्रीय मीडियावर रंगताना दिसत आहे.