घरफिचर्समुंबईची आरोग्य व्यवस्था मृत्यूशय्येवर

मुंबईची आरोग्य व्यवस्था मृत्यूशय्येवर

Subscribe

कोविडचा प्रसार सुरु झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या दिवाणखान्यात बसून लाईव्ह करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे दिवाणखान्यातील लाईव्ह सुरुवातीला खूपच गोड वाटलं. असा मधाळ बोलणारा काळजीवाहू मुख्यमंत्री भेटल्याबद्दल जनतेमध्ये आनंदाचे वातावरण होते. लॉकडाऊनही नवा नवा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लोकांनी गाण्याच्या भेंड्या खेळणे, छंद जोपासणे वगैरे मध्यमवर्गीय कल्पना जोपासल्या. मात्र लॉकडाऊन आणि रुग्णांची आकडेवारी जसजशी वाढत चाललीये. तसे मुख्यमंत्री, त्यांचे दिवाणखान्यातील लाईव्ह आणि आरोग्य व्यवस्था दोन्ही किती कुचकामी आहे, हे लक्षात येत आहे. करोना पॉझिटिव्ह झालेले रुग्ण, त्यांच्या परिवारातील आणि ज्या शेजारच्या लोकांना क्वारंटाईन केलेले आहे, अशा लोकांनी या कुचकामी आरोग्य व्यवस्थेचा अनुभव घेतलेला आहे. लॉकडाऊनमुळे माध्यमांवर काही बंधने आहेत, तसेच साथीचे रोग नियंत्रण कायद्याचा धाक दाखवून सरकारी व्यवस्थेतील अनास्था लपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. यामुळे अनेक बाबी बाहेर आलेल्या नाहीत.

कोविडचा प्रसार सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या दिवाणखान्यात बसून लाईव्ह करत आहेत. मुख्यमंत्र्यांचं दिवाणखान्यातील लाईव्ह सुरुवातीला खूपच गोड वाटलं. असा मधाळ बोलणारा काळजीवाहू मुख्यमंत्री भेटल्याबद्दल जनतेमध्ये आनंदाचे वातावरण होते. लॉकडाऊनही नवा नवा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लोकांनी गाण्याच्या भेंड्या खेळणे, छंद जोपासणे वगैरे मध्यमवर्गीय कल्पना जोपासल्या. मात्र लॉकडाऊन आणि रुग्णांची आकडेवारी जसजशी वाढत चाललीय, तसे मुख्यमंत्री, त्यांचे दिवाणखान्यातील लाईव्ह आणि आरोग्य व्यवस्था दोन्ही किती कुचकामी आहे, हे लक्षात येत आहे. करोना पॉझिटिव्ह झालेले रुग्ण, त्यांच्या परिवारातील आणि ज्या शेजारच्या लोकांना क्वारंटाईन केलेले आहे, अशा लोकांनी या कुचकामी आरोग्य व्यवस्थेचा अनुभव घेतलेला आहे. लॉकडाऊनमुळे माध्यमांवर काही बंधने आहेत, तसेच साथीचे रोग नियंत्रण कायद्याचा धाक दाखवून सरकारी व्यवस्थेतील अनास्था लपविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय. यामुळे अनेक बाबी बाहेर आलेल्या नाहीत.

करोना व्हायरसने जगातील सर्वच देशातील सत्ता आणि शासकीय यंत्रणांना नागडं केलंय. अमेरिका, इटली सारख्या देशांनाही अक्षरशः गुडघे टेकायला लावलेल्या करोनानं मुंबईतही आपला प्रताप दाखवला. भारताबाहेर करोनाने हाहा:कार उडविण्याची कारणे वेगळी आहेत. भारत आणि विशेषतः मुंबईतील उष्ण-दमट वातावरण करोनाच्या फैलावास अनुकूल नव्हते. तरीही मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे मुंबईत करोना स्थिरावला, वाढला आणि वेगाने पसरला. प्रशासकीय व्यवस्था ही गेंड्याच्या कातडीची असते, असं म्हणतात. सरकार कुणाचंही येवो, ही बाबुशाही आपलं कातडं काही मऊ करत नाही. याचाच प्रत्यय महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही दिसतोय. नुकतीच मुंबई हायकोर्टात एका याचिकेवर सुनावणी झाली. मुंबईतील महानगरपालिकेच्या रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही, अशी तक्रार याचिकेत करण्यात आली होती. याचिकेच्या सुनावणीत महानगरपालिकेने हा दावा फेटाळून लावताना आकडेवारीची जंत्री दिली. आकडेवारीची कितीही जोड दिली असली तरी वास्तवात रुग्णांना रुग्णालयांऐवजी थेट स्मशानातच जागा मिळत आहे, हे जळजळीत वास्तव आहे.

- Advertisement -

माझ्या स्वतःसोबत झालेला प्रसंग येथे उद्धृत करतो. मी राहतो तो काजूपाडा (बोरीवली पूर्व) विभाग सध्या कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. नावाला कंटेन्मेंट झोन असून इथे दुपारी १२ वाजता दुकाने बंद करण्याखेरीज कोणतेही दुसरे काम शासकीय यंत्रणांकडून केले जात नाही. घरोघरी जाऊन प्राथमिक आरोग्य तपासणी असेल किंवा महानगरपालिकेच्या प्रथमोपचार केंद्रात काही उपचार देणे असो… महानगरपालिका इथे औषधाला नाही. मी राहतो त्याच्या बाजुच्याच घरातील एक ४५ वर्षीय उत्तर भारतीय महिला पायाच्या आजाराने त्रस्त होती. स्थानिक खासगी डॉक्टराकडे दोनदा उपचार घेतल्यानंतर त्यांनी तिला बीएमसीच्या शताब्दी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्या गेल्या. शताब्दी रुग्णालयाने कोणतेही उपचार न करता कोविड वॉर्डमध्ये त्यांना दाखल करून घेतले. चार दिवस कोणतेही उपचार तर केलेच नाही आणि त्यांची कोविड टेस्टही केली नाही. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दबाव टाकल्यानंतर त्या महिलेची टेस्ट घेण्यात आली. टेस्टचा रिपोर्ट येण्याआधीच त्या महिलेचा मृत्यू झाला. शेवटच्या दोन दिवसांत श्वास घ्यायला त्रास होतोय, असे सांगून देखील त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेटिंलेटर दिले गेले नाही.

मृत्यूनंतर दुसर्‍या दिवशी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या महिलेचे कुटुंब आणि आमच्या कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आले. माझ्या घरात शौचालय बांधले असल्यामुळे आम्हाला घरीच क्वारंटाईन करण्यात आले. तर त्यांच्या परिवाराला संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. १४ दिवस आम्ही कसेबसे काढले. बीएमसी एकदा क्वारंटाईन केल्यानंतर पुन्हा ढुंकूनही पाहत नाही, असा अनुभव या दिवसांत आम्हाला आला. तुम्हाला लक्षणे दिसली तर तुमची तुम्हीच काळजी करायची? बीएमसीवाले त्याला जबाबदार नाहीत. तुम्ही जर वॉर्डातील डॉक्टर किंवा मेडिकल ऑफिसरला फोन केलात, तर ते म्हणतात ‘आम्ही कुणा कुणाकडे लक्ष देणार?’पालिकेकडून ना डॉक्टर भेट देतात ना ते चौकशी करतात. अशीच गत क्वारंटाईन सेंटरमधली आहे. लोकांना एकदा क्वारंटाईन केले की बस्स. इथे स्वच्छतेचे तीन-तेरा वाजलेले आहेत. संशयित रुग्णांना हलक्या दर्जाचे अन्न दिले जाते. डॉक्टर तर एकदाही या क्वारंटाईन सेंटरमध्ये भेट देत नाही. क्वारंटाईन म्हणजे नावाला विलगीकरण आहे. कारण त्या सेंटरमध्ये ठेवलेले लोक पत्त्याचा डाव टाकत, टाईमपास करत गुण्यागोविंदाने १४ दिवस घालवतात. मग क्वारंटाईन सेंटरवर कोट्यवधीचा खर्च कुणासाठी केला जातोय?

- Advertisement -

महत्त्वाचे म्हणजे पालिकेच्या रुग्णालयात गेल्यानंतर नसलेला करोना व्हायरस आपल्याला होतो, अशी एक समज मुंबईत झालीय. त्यामुळे आजारी पडल्यावर स्थानिक डॉक्टरकडूनच इलाज करण्यावर भर दिला जातोय. माझ्यासोबत दुसरा प्रसंग घडला, ज्यात माझ्या काकांचे निधन झाले. त्यांना ताप येत होता. म्हणून त्यांनी खासगी डॉक्टरकडून औषध घेतले, पालिकेच्या रुग्णालयात गेलो तर आपण वाचणार नाही, अशी त्यांची ठाम समजूत. ताप राहिला नाही, म्हणून त्यांनी डॉक्टर बदलला. यात आठवड्याभराचा वेळ गेला. दरम्यान काकांची तब्येत जास्तच बिघडल्यामुळे आम्ही त्यांना बोरीवली पश्चिम येथील पालिकेच्या भगवती रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला. मात्र रुग्णालयात जागा नसल्याचे कारण देत ट्रामा केअर किंवा कुपर रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. तिथे तुमची कोविडची टेस्ट केली जाईल असे सांगण्यात आले. इतर रुग्णालयात हलविण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला कॉल करण्याचा प्रयत्न केला. फोन लागलाच नाही. ट्रामा आणि कुपरला फोन केला तर तिथे बेड नसल्याचे सांगितले. खासगी रुग्णवाहिका बुक केली तर तो म्हणाला की, मुंबईभर फिरलात तरी बेड नाही मिळणार. माझे पैसे वाढत जातील. त्यानंतर मात्र काकांचा धीर सुटला आणि त्यांनी मला घरीच घेऊन चला असा धोशा लावला. आमच्या विभागात ‘भगवती म्हणजे पणवती आणि कुपर म्हणजे उपर’ असा समज लोकांमध्ये प्रचलित आहे. त्याला कारण म्हणजे या रुग्णालयांची अफाट कामचुकार कार्यक्षमता.

काकांना घरी घेऊन आल्यानंतर रात्री जेवणानंतर त्यांची तब्येत अचानक खराब झाली. रुग्णालयात नेण्यासाठी पुन्हा १०८ रुग्णवाहिकेला फोन लावला. फोन बंद. पालिकेच्या १९१६ या हेल्पलाईनवर पुन्हा फोन करून बेडची, रुग्णवाहिकेची चौकशी केली; पण समोरून उत्तर मिळाले नाही. वाट बघा, आमच्याकडून फोन येईल. एवढे एकच उत्तर देण्यात आले. शेवटी रिक्षात टाकून काकांना हॉस्पिटलमध्ये न्यायचे ठरले. तीन खासगी रुग्णालयाचे दरवाजे ठोठावले. कुणीच त्यांना घेतले नाही. शेवटी नाईलाजाने पुन्हा भगवती रुग्णालय गाठले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी आधी आमचीच खरडपट्टी काढली. नंतर काकांना तपासले आणि त्यांचे निधन झाले असल्याचे सांगितले. आम्हाला तर धक्काच बसला. एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं. मृत्यूनंतर कागदपत्रांचे सोपस्कार केल्यानंतर मृत्यू दाखल्यावर कोविड संशयित लिहिण्यात आले. आता स्वॅब टेस्ट केल्यास दोन दिवस जातील. आमच्याकडे मृतदेह ठेवायला जागा नसल्याचे रुग्णालयाने सांगितले. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने त्याच रात्री अंत्यसंस्कार करावे लागले. रात्री ३ वाजता पोलिसांची एनओसी मिळाल्यानंतर रुग्णालय ते स्मशानभूमी असे एक किमीच्या अंतरासाठी सकाळी ७.३० वाजता रुग्णवाहिका मिळाली. पीपीई किट घातलेल्या महापालिका कर्मचार्‍यांनीच दहन संस्कार केले. आम्ही प्रेक्षकांप्रमाणे हजेरी लावली.

या दोन प्रसंगातून एक गोष्ट कळली. मुख्यमंत्री म्हणतात रुग्ण जर आमच्याकडे वेळेत आले तर आम्ही त्यांना वाचवू शकतो. पण वास्तवात मात्र परिस्थिती उलट आहे. रुग्ण वेळेत येणार कसे? पालिकेच्या रुग्णालयात जागा नाही. तीव्र लक्षणे असलेल्यांचीच कोविड टेस्ट केली जाते. सौम्य लक्षणे असलेल्यांनी पालिकेच्या डॉक्टरांना फोन केल्यास, ते खासगी प्रयोगशाळेतून टेस्ट करा, मग आम्ही बघतो, असे उर्मट उत्तर देतात. हे झालं करोना रुग्णांचे. पण ज्यांना करोना नाही, अशा रुग्णांचे हाल तर कुणीच विचारत नाही. खासगी आणि पालिकेचे रुग्णालय अतिसंवेदनशील नॉन कोविड रुग्णांना दाखल करून घेत नाहीयेत. यामुळे अनेक मधुमेह, हृदयरोग असणार्‍या रुग्णांचा मृत्यू झाला. पण करोनाकाळात अशा मृत्यूंची गणतीच झालेली नाही. माझ्या काकांचाही मृत्यू करोना संशयित असल्यामुळे आमच्या घरातील लोकांना क्वारंटाईन केलेले नाही किंवा तपासणी केलेली नाही. लक्षणे दिसली तर मोदींनी दिलेल्या मंत्रानुसार आम्ही आत्मनिर्भर व्हायचं. अशीच गत मुंबईतील हजारो नागरिकांची झालेली आहे. कारण मुंबईची आरोग्य व्यवस्था ही आयसीयूमधून आता मृत्यूशय्येवर पोहोचली आहे.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -