घरफिचर्सभिलवाड्याचा वास्तुपाठ

भिलवाड्याचा वास्तुपाठ

Subscribe

करोना विषाणूच्या नोव्हेल कोविड १९ या नवख्या विषाणूनेे संपूर्ण मानव जातीचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. मानवी इतिहासात आतापर्यंत अशा अनेक रोगांनी मानव जातीवर मोठे संकट ओढवले असले तरी त्या एका ठराविक भागापुरते मर्यादित होते. मात्र, जागतिक उदारीकरण आणि ग्लोबलायझेशनमुळे जग हे एक खेडे झाले असून या खेड्यात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी विषाणूचा प्रवास सहज आणि सोपा होत असतो. अलिकडच्या काळातील जगभर पसरलेला हा काही पहिलाच विषाणू नाही, बर्ड फ्लू, सार्स आणि स्वाईन फ्लू सारख्या विषाणूंनीही जगभर पसरण्यासाठी मानवाचाच आधार घेऊन मानवी जमातीवर हल्ले केले आहेत. मात्र, डिसेंबरमध्ये २०१९ मध्ये चीनमध्ये अवतरलेला आणि जानेवारीत जगाशी परिचित झालेला हा कोविड १९ हा विषाणू खर्‍या अर्धाने मानव जमातीवर संकट ठरत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

हा विषाणू कसा पसरतो आणि त्याला अटकाव कसा घालावा याबाबत शास्त्रज्ञांनी, तज्ज्ञ डॉक्टरांनी, जागतिक आरोग्य संघटनेने जगाला ओरडून सांगितले आहे. या विषाणूची लक्षणे आणि त्याची पसरण्याची पद्धती याबाबत माहिती नसलेले कुणी या भूतलावर शिल्लक असतील, असे वाटत नाही, इतकी त्याची दहशत जगभर पसरली आहे. तरीही हा विषाणू युरोप, अमेरिकेसह जगभरातील प्रगत, अप्रगत, प्रगतीशील देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या विषाणूने आतापर्यंत ८० हजारांपेक्षा अधिक जणांचा बळी घेतला असून जवळपास १४ लाख लोकांना याची बाधा झाली आहे. चीन सरकारचे काही दावे वगळता कोठेही या विषाणूचे रुग्ण कमी झाल्याच्या बातम्या येत नाहीत. एखाद्या शहरात, देशात,गावात एकदा हा विषाणू घुसला की तेथे केवळ रुग्णांची आणि बळींची संख्या वाढली एवढेच ऐकायला मिळत असते. त्यामुळे वैद्यकीय तंत्रज्ञान, सुविधा असलेल्या जगभरातील प्रगत देशांनी याच्यापुढे हात टेकल्याचे दिसत असताना राजस्थानमधील भिलवाडा येथून या विषाणूला थांबवल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. केंद्र सरकारचे मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांना करोना विषाणूविरोधात लढण्यासाठी भिलवाडा पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

भिलवाडा हे मार्च अखेरपर्यंत भारतातील करोनाबाधित शहर म्हणून भारतात ओळखले जात होते. भारतातील करोनाबाधितांचा आकडा हजाराच्या आसपास रेंगाळत असताना भिलवाडा येथे २४ बाधित सापडले होते. त्यामुळे एकाच शहरात मोठ्या संख्येने करोनाबाधित असलेल्या शहरांमध्ये त्याचे नाव होते. मात्र, २ एपिलपासून त्या शहरात एकही नवी करोनाबाधित रुग्ण सापडलेला नाही. भिलवाडा शहर व जिल्ह्याने यासाठी कोणत्याही नवीन पद्धतीचा अवलंब केला नाही. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिलेल्या सूचनांचे पालन करताना त्याची काटेकोर अंमलबजावणी करताना तेथील स्थानिक अधिकारी विशेषत: जिल्हाधिकारी राजेंद्र भट यांनी वापरलेली कल्पकता त्याला कारणीभूत असल्याचे दिसत आहे. एप्रिल उजाडल्यापासून भारतातील करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना नेमके तेव्हापासून भिलवाडातील नवीन रुग्ण सापडणे बंद होणे याला तेथील प्रशासन, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, पोलीस आणि होमगार्ड या प्रत्येक घटकाने लॉकडाऊनच्या काळात घेतलेली मेहनत कारणीभूत आहे. पहिल्या टप्प्यात त्यांनी करोनाबाधित रुग्णाच्या घरापासून चहुबाजूने दोन किलोमीटरचा परिसर सीलबंद करणे. त्या परिसरातील प्रत्येक घरात जाऊन तेथील नागरिकांचा नजिकच्या काळातील प्रवासाची माहिती घेणे, बाधित रुग्णाशी कधी संपर्क आला किंवा नाही याची माहिती घेणे.

तसेच सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे. एकीकडे भिलवाडा शहरातील सीलबंद भागात या उपाययोजना केल्या जात असताना इतर भागातील जवळपास सर्वच नागरिकाचे स्क्रिनिंग करून त्यांना करोना सदृश कुठलाही आजार नाही ना याची खातरजमा करण्यात आली. ते करताना पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व नागरिकांची स्क्रिनिंग पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍यांदाही तितक्याच गांभीर्याने त्याची चाचणी करण्यात आली. सीलबंद केलेल्या परिसरातील कुठलेही जीवनावश्यक वस्तूचे दुकान वा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात आले. नागरिकांना औषधे वा इतर कुठल्याही जीवनावश्यक वस्तूची गरज भासल्यास त्यांनी प्रशासनाला कळवण्यासाठी प्रत्येक परिसरानुसार मोबाइल क्रमांक देण्यात आले. त्यामुळे या काळात कुणीही नागरिक घराबाहेर पडला नाही. भिलवाडा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही या मोहिमेशी संबंधित सर्वच कर्मचारी, अधिकारी यांनी घरोघरी जाऊन तपासणी करणे, त्यांच्या प्रवासाची माहिती मिळवणे व सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे दिसत असल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करणे आदींवर भर दिला. त्यांनी ग्रामीण भागातील २२ लाख कुटुंबे व शहरातील १० लाख नागरिकांची आरोग्य तपासणी केली. तेथेही या तपासणीच्या दोन फेर्‍या झाल्या. त्याचवेळी दाखल रुग्णांवर उपचारासाठी तज्ज्ञांची टीम लक्ष ठेवून होती. त्यामुळे दाखल रुग्णही बरे होऊन बाहेर पडू लागले. शिवाय दोन एप्रिलपासून भिलवाडा शहर व जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण सापडला नाही.

- Advertisement -

एप्रिल उजाडल्यापासून भारतातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वच राज्य सरकारांची धावपळ उडाली आहे. जो तो दुसर्‍यावर खापर फोडण्याच्या तयारीत आहेत. प्रत्येक राज्यात याबाबत राजकारण साधण्याचा प्रयत्न सुरू असताना भिलवाडामधील प्रशासनाने योग्य दिशेने अंमलबजावणी करून नवा वास्तुपाठ घालून दिला आहे. अलिकडच्या काळात प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांना प्रसिद्धीचा मोह टाळता येत नाही. ठराविक वेळेला मीडियासमोर जाऊन जनतेने काय करावे, याबाबत सूचना द्यायच्या असा काही अधिकार्‍यांचा दिनक्रम झाला आहे. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी काय केले यापेक्षा आज रुग्णांची संख्या कितीने वाढली एवढीच माहिती देण्यासाठी आपली नेमणूक असल्यासारखे त्यांचे वर्तन आहे. अशा काळात भिलवाडा येथील जिल्हाधिकारी राजेंद्र भट यांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे तंतोतत पालन करताना कल्पकतेचा केलेला वापर खरोखर वाखाणण्याजोगा आहे.

भारतात कुठलीही नवीन गोष्ट करताना तिचा परदेशातील अनुभव कसा आहे, असे बघण्याचा आपला प्रघात आहे. करोनाबाबत आपल्याला दुसर्‍या देशांमधील यशाचे उदाहरण नाही. चीनसारखे उपाय राबवायला आपण हुकूमशाही देश नाही. यामुळे या असाध्य आणि ज्याच्यासाठी अद्याप औषधोपचार निघालेले नाही, अशा करोनोविरोधात लढण्यासाठी स्वत:च्या कृतीतून जगासमोर लॉकडाऊन, सामाजिक अंतर आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणारे कार्यक्षम प्रशासन या त्रिसूत्रीचा अवलंब करून जिल्हाधिकारी राजेंद्र भट यांनी जगासमोर अद्वितीय उदाहरण दाखवून दिले आहे. केंद्र सरकारने या भिलवाडा पॅटर्ननुसार उपाययोजना करण्यास सांगितले आहे. आता इतर राज्य सरकारांनी व विशेषत: महाराष्ट्राने तसे करून या महामारीपासून नागरिकांचे संरक्षण करण्यास प्राथमिकता देण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -