आनंदसरी !

Mumbai
418 deaths and 18,522 newCOVID19 cases in the last 24 hours
देशात २४ तासांत १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

गेले दोन अडीच महिने करोना आणि करोनाशिवाय दुसरे या जगात काहीच घडत नव्हते. बाहेरचा विषाणू करोना आणि घरातला भीतीचा करोना याने जीवन जणू ठप्प झाले होते. जग थांबल्याने माणूसही आता काही नवीन होईल की नाही, या शंकेने घाबरून गेला असताना जगातील विकसनशील देश असलेल्या भारतासाठी ‘ती’ आनंदाची बातमी आल्याने मन थुईथुई होऊन नाचायला लागले आहे. तो आलाय… आनंदाचा वर्षाव करत. तन मन भिजवून टाकायला. त्या तप्त मातीला लागलेली आस भागवायला तो धरतीवर उतरणार आहे. होय, पाऊस आलाय. आनंदसरी घेऊन… विशेष म्हणजे यंदा पाऊस सरासरीइतका होणार असल्याने मन आनंदघन होऊन गेलंय! बळीराजा सुखावलाय. देशातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक जनता ही शेतीवर निर्भर असल्याने हीच मातीमाय आता गोरगरीबाला पावसाला सोबत घेऊन जगवणार आहे.

त्याला कोणतेही फेकाफेकीचे आत्मनिर्भर पॅकेज घेऊन जगायची काही गरज नाही. तोंडावर फेकलेले कोटींचे आकडे बघून डोळे विस्फारण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. सर्वसामान्यांच्या खात्यावर पाठवलेल्या १५ लाखांचे काय झाले? याचे उत्तर मिळालेले नसताना, नोटाबंदीने नक्की गरीब माणसाला काय मिळाले याचे उत्तर मोदी सरकारने दिलेले नसताना, काळा पैसा आणि काळी कामे करणार्‍यांना फरफटत भारतात आणण्याच्या घोषणा हवेत फिरत असताना आता आत्मनिर्भरही त्याच मार्गाने छूमंतर होणार असल्याने भारतीय माणसाला आपल्या माती आणि पावसावर विश्वास आहे. तेच त्याला जगवणार आहेत… हे ऋतुचक्र पुन्हा एकदा कोणतेही फोकनाड आश्वासन न देता देवदत्त होऊन पाऊस होऊन बरसेल तेव्हा मन गाभुळे होऊन जाईल…म्हणूनच निसर्गकवी-शेतकरी ना.धो. महानोर या माती पावसाचे ऋण आपल्या कवितेतून फेडताना म्हणतात…

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे
गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे

मोसमी पाऊस सुरू होण्याआधी हवामान खात्याकडून दरवर्षी दोन अंदाज व्यक्त केले जातात. पाऊस कधी दाखल होणार आणि तो सरासरीच्या किती टक्के असेल. पहिल्या अंदाजानुसार तो ठरलेल्या वेळेत म्हणजे १ जूनला आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे केरळच्या किनारपट्टीवर आगमन झाले असून तळ कोकणातून महाराष्ट्रासह उर्वरित भारतात मान्सून वेळेवर मार्गक्रमण करणार आहे. अंदमानच्या समुद्रात मोसमी वार्‍यांची चाहूल लागली होती. १७ मे रोजी त्यांनी अंदमान समुद्राचा काही भाग आणि निकोबार बेटांवर प्रवेश करून भारतीयांना आधीच आनंदाची बातमी दिली होती. नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच ते या भागात पोहचले होते. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ उत्तेरच्या दिशेने रवाना झाल्यावर या वार्‍यांनी पूर्ण दहा दिवसांची विश्रांती घेतली होती. बाष्पाचा पुरवठा आणि पोषक वातावरणाची स्थिती नसल्याने ते तिथे रेंगाळले होते. मात्र २७ मे नंतर समुद्रात पुन्हा घडामोडी झाल्यावर बंगालच्या उपसागरातून चालना मिळण्याबरोबर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले.

परिणामी वार्‍यांच्या प्रवासाला वेग मिळाला आणि चार दिवसात अंदमानचा समुद्र आणि अरबी समुद्राचा बहुतांश भाग ओलांडत ते १ जूनला केरळमध्ये दाखल झाले. केरळमध्ये पाऊस दाखल होताच या वर्षाच्या पावसाळ्याचा दुसरा अंदाज हवामान खात्याने मांडला असून जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत १०२ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. या अंदाजामध्ये चार टक्केे कमी अधिक फरकाची शक्यता गृहीत धरलेली असते. एप्रिलमधील पहिल्या अंदाजामध्ये मोसमी पाऊस सरासरीएवढा १०० टक्केे पडण्याचा अंदाज मांडलेला असतो. दुसर्‍या अंदाजात दोन टक्केे अधिक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाऊस वेळेवर आला असल्याने आता तो १५ जुलैपर्यंत देशव्यापी होणार असून विशेष म्हणजे यंदा त्याचा प्रवास विनाअडथळा असणार असून पावसाळ्याचे चारही महिने नियमित पाऊस पडेल. जुलै आणि ऑगस्टमधील चांगला पाऊस ही खरिपाच्या हंगामासाठी शेतकर्‍यांसाठी दिलासा देणारी बाब ठरेल…

विठ्ठल वाघ यांच्या गीतातला हा कास्तकारही मग पाऊस अंगावर घेत काळ्या आईचे गुण गात घामाचे मोती करेल…

काळ्या मातीत मातीत तिफन चालते
तिफन चालते, तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो…

सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाकतो मैना वाटुली पाहते
काळ्या मातीत मातीत…

सर्जा रं माझ्या, ढवळ्या रं माझ्या, पवळ्या रं माझ्या आ हा

झोळी झाडाला टांगून राबराबते माऊली
तिथं झोळीतल्या जिवा व्हते पारखी साऊली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हा जोंधळ्यात तवा सोनं चांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते
काळ्या मातीत मातीत…

चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काटा पायांत रुततो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं
काळ्या मातीत मातीत…

हे सपान फुलवण्यासाठी आता सखा पाऊस मदतीला धावून आला आहे. करोनाने जग उलटे पालटे केले असून अर्थचक्राचे गाडे नीट रुळावर येण्यासाठी वर्षभराचा काळ जावा लागणार आहे. अशावेळी शेती हीच शाश्वत राहणार आहे आणि या शेतीमधून माणूस किमान दोन वेळचे पोटभर जेवला तरी तो जगू शकेल…आणि इतरांनाही तो जगवेल. जगायला फार काही लागत नाही, हे या कष्टकर्‍यांनी आधीच दाखवून दिले आहे. आता करोनाच्या काळात सर्व भौतिक सुखाचा पडदा टराटरा फाडला जात असताना माणूस आता तरी त्याच्या मागे सुसाट धावणार नाही, एवढी अपेक्षा धरायला काय हरकत आहे.