घरफिचर्सस्फुल्लिंग धैर्याचे !

स्फुल्लिंग धैर्याचे !

Subscribe

महिलांना न्यायासाठी धैर्य गोळा करण्याचे बळ देणारी एखादी गुलाबी गँगही तयार होते. आज स्त्रियांना बळ देणारी ‘गुलाबी गँग’ ही एक संघटना उत्तर प्रदेशमध्ये आहे. गडद गुलाबी साडी आणि हातात लाठी असा गणवेष असलेली ही संघटना संपत देवी पाल या स्त्रीने बुंदेलखंडात सुरू केली. आज या संघटनेच्या चार लाख स्त्रिया सदस्य आहेत. आणि आपापल्या परिसरातील अत्याचार सोसणार्‍या स्त्रियांच्या मदतीला धावून जात आहेत.

धैर्य उमलून यायला एखाद्या क्रौर्याची परिसीमा व्हावी लागते. मागच्या स्तंभात आपण सुहैला अब्दुल अली यांच्या धैर्याला सलाम केला. त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या आहेत. श्रीमंत घराण्यातून आलेल्या सर्वच स्त्रियांना असे धैर्य दाखवता येते असे नाही. पण स्थैर्य, शहरात रहाणे, विदेशात शिकणे या गोष्टी नक्कीच धैर्याला पोषक असतात.

पण आर्थिक-सामाजिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही अत्याचाराचा विरोध करण्याचे धैर्य दाखवणार्‍या स्त्रियांचे कौतुक वेगळ्या रीतीने करायला हवे.

- Advertisement -

देशात अलिकडेच म्हणजे या वर्षाच्या जून महिन्यात घडलेली तबरेझ अन्सारीच्या लिंचिंगची घटना…

याच वर्षी 17 एप्रिलला शाहीदा आणि तबरेझचा विवाह झाला होता. पुण्यात काम करणारा हा केवळ चोवीस वर्षांचा तरूण कदमदिया या त्याच्या गावी गेला आणि त्याने लग्न केले. काही दिवस गावी राहून दोघे पुण्यात येणार होते. पण तत्पूर्वीच धातकिडिहा गावात चोरीच्या संशयावरून जमावाने त्याला मारहाण केली. तो मुस्लीम आहे हे कळताच त्याला जय श्रीराम जय हनुमान वगैरे जप करायला लावणे आलेच. जखमी तबरेझला ना पोलिसांचे साहाय्य वेळेवर मिळाले, ना वैद्यकीय सेवा. 22 जूनला तबरेझचे प्राण गेले. मारहाणीनंतर तो हृदय बंद पडून मेला म्हणून पोलीस आधी मारणार्‍यांवर खुनाचा आरोप ठेवायला राजी नव्हते.

- Advertisement -

आणि तेव्हाच आपल्यासमोर आले एक वेगळे धैर्य-नवविवाहित शाहीदा परवेझचे. शाहीदाने पोलिसांकडे शवविच्छेदनाच्या अहवालाची मागणी केली आहे. त्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांची, सुरुवातीस तबरेझला ज्यांच्या ताब्यात दिले गेले त्या डॉक्टरांची नावे मागितली आहेत. सरकेलियाच्या सर्वात उच्च अधिकार्‍यांची भेट घेऊन न्याय मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. तिच्या प्रयत्नांमुळे जमावातील व्यक्तींवर 304 ऐवजी आता 302 चे कलम लागू करण्यात आले आहे.

या पूर्वी पहलू खानची हत्या जमावाने केली त्या प्रकरणातही पहलू खानची पत्नी ताठ उभी आहे. तिची दोन मुलं जे काही कमवत आहेत ते सारे हा खटला लढवण्यात खर्च करीत आहेत. आणि त्यांची आई राजस्थानच्या बदललेल्या राज्यकर्त्यांकडून न्याय मिळेल अशी आशा करतानाच हायकोर्टापर्यंत लढायची तयारीही दाखवते आहे.

जुनैद खान या कोवळ्या किशोराला गाडीत जमावाने मारले, त्या प्रकरणात अद्यापही गुन्हेगारांना सजा झालेली नाही. आरोपीच्या घरच्यांनी जुनैदच्या कुटुंबियांना मिटवामिटवीसाठी पैसे देण्याची तयारी दाखवली आणि मग जुनैदचे कुटुंबीय पैसे मागत आहेत अशा बातम्या पेरल्या. तरीही ते ताठपणे अजूनही झगडत आहेत. जुनैदची आई सायरा हिचा आक्रोश तुम्ही कदाचित् बातम्यांमध्ये पाहिला असेल. पण आता सायरा ताठपणे नवर्‍याच्या सोबतीने हे आव्हान पेलते आहे. मुलगा गेला, पण त्याला न्याय मिळवून देण्याची आकांक्षा जपते आहे.

हे झाले सामाजिक दुहीतून झालेले अत्याचार आणि त्यांचा न्याय करण्यासाठी लोकांनी विशेषतः स्त्रियांनी दाखवलेले धैर्य. पण स्त्रियांना स्वतःवर झालेल्या अत्याचाराची दाद मागण्यासाठी वेगळेच धैर्य दाखवावे लागते.

भाजपचा खासदार असलेला, योगीचा मित्र असलेला, अटलबिहारींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेला उत्तर प्रदेशचा चिन्मयानंद हा तर सध्याच्या सत्ताधार्‍यांमधला एक महत्त्वाचा मोहरा. त्याने केलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल तक्रार दाखल करणे सोपे नव्हते. पण कायदा शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने धैर्य दाखवले आणि त्याच्याविरुद्ध तक्रार केली. भाजपचे लोक हे प्रकरण मिटवण्याच्या मागे आहेत असे कळताच तिने आक्रमक पवित्रा घेतला. त्याला अटक झाली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. सत्तेतील मदांधांशी टक्कर घेताना प्राणांची बाजी लावावी लागते हे लोकशाहीत तरी अश्लाघ्य आहे. पण या तरुणीने ती बाजी लावायची तयारी दाखवली आहे.

या पूर्वी घडलेल्या, जुन्या झालेल्या घटनांतूनही असे धैर्य समोर आले आहे.

आसाराम बापू बलात्कारी आहे हे सांगणे सोपे नव्हते… सोळा वर्षांच्या एका मुलीने-तिचे सारे घरदार आसाराम भक्त असताना आसारामने आपल्यासोबत काय गैरकृत्य केले ते सांगण्याचे धैर्य दाखवले आणि पोलिसांत तक्रार करण्याचे धैर्य तिच्या कुटुंबाने दाखवले. या कुटुंबाला, या मुलीला साथ देणार्‍या तिघा साक्षीदारांची आसारामच्या भाडोत्री भक्तगुंडांनी हत्या केली. त्या मुलीची शिक्षिका, शाळेच्या प्राचार्या, त्यांची साथ देणारा पोलीस अधिकारी, तिचे वडील या सर्वांना सतत धमक्या येत राहिल्या. या प्रकरणाचा वृत्तपत्रातून पाठपुरावा करणारा पत्रकार नरेंद्र यादव याला चाकूने भोसकण्यात आले. तो वाचला, पण दहशत कायम झाली. वडिलांवर खोट्या केसेस टाकण्याचे कामही भक्तांनी केले.अखेर आसारामला तुरुंगात टाकण्यात आले. पण ही मुलगी आणि तिचे कुटुंब लढण्याची किंमत अजूनही मोजत आहेत.

डेरासच्चावाल्या रामरहीमच्या गलिच्छ अपराधांविरुद्ध तोंड उघडणार्‍या दोन मुलींमुळे डेरा फुटला. या दोघींना तर केवढ्या प्रचंड दबावाला सामोरे जावे लागले. त्यांची नावे अजूनही सार्वजनिक नाहीत. निनावी पत्र लिहिल्यानंतर चार वर्षांनंतर त्या दोघी न्यायालयासमोर जाऊन साक्ष देण्यास राजी झाल्या. जिवाच्या भीतीवर मात करून त्यांनी हे धैर्य दाखवले आणली एक प्रचंड साम्राज्य उलथून पडले.

पण एकंदरीत धैर्याची कमतरता आहेच. संपन्नता असूनही अत्याचारित न्यायाधीशाच्या कुटुंबियांनी माना टाकल्याचेही उदाहरण ढळढळीत समोर आहेच आपल्या…
गप्प बसून रोजच अत्याचार सहन करणार्‍या स्त्रिया, पुरुष असतातच…

पण आपला जीव केवढा, आपली ताकद किती, आपण ठेचून टाकले जाऊ की काय असल्या भेकड प्रश्नांच्या बेडीत न अडकता स्वत्व जपणारे काहीजणच मानवी मेंदूच्या उत्क्रांतीची साक्ष देतात.

आणि मग सर्वांना न्यायासाठी धैर्य गोळा करण्याचे बळ देणारी एखादी गुलाबी गँगही तयार होते. आज स्त्रियांना बळ देणारी ‘गुलाबी गँग’ ही एक संघटना उत्तर प्रदेशमध्ये आहे. गडद गुलाबी साडी आणि हातात लाठी असा गणवेष असलेली ही संघटना संपत देवी पाल या स्त्रीने बुंदेलखंडात सुरू केली. आज या संघटनेच्या चार लाख स्त्रिया सदस्य आहेत. आणि आपापल्या परिसरातील अत्याचार सोसणार्‍या स्त्रियांच्या मदतीला धावून जात आहेत.

उत्तर प्रदेशच्या अकरा जिल्ह्यांत सासरचे लोक, नवरा यांच्या अत्याचाराला बळी पडणार्‍या स्त्रियांच्या रक्षणासाठी आता स्त्रियाच उभ्या राहिल्या आहेत.

1980 साली साधी गृहिणी असलेल्या, कधीही शाळेतही न गेलेल्या संपत देवीने शेजारणीला तिचा नवरा बेदम ठोकून काढताना पाहिले आणि तिने लाठी हातात घेतली. नाठाळ नवर्‍यांच्या माथी काठी हाणण्याची ताकद तिने ओळखली. मग मुली होतात म्हणून मार देणार्‍या, मुलीचा गर्भ पाडावा म्हणून छळ मांडणार्‍या, हुंडा आणला नाही म्हणून छळ करणार्‍या, स्वयंपाक मनासारखा केला नाही म्हणून बुकलून काढणार्‍या सर्व नवर्‍यांचे आणि सासरच्यांचे थेर थांबवण्यासाठी ही स्त्रीशक्ती कामाला लागली. बलात्कार करून वर पीडितेलाच तुरुंगात अडकवणार्‍या बलाढ्य राजकारण्यांच्या विरोधात स्त्रीशक्ती कामाला लागली.

बायकांना जाळून मारून मग त्यांनी आत्महत्या केल्याचे बनाव रचणार्‍या सार्‍या नराधमांना दहशत बसवणारी गुलाबी गँग ही या देशातील ग्रामीण स्त्रियांनी साध्य केलेले एक अजब आहे. कायदा हातात घेतात म्हणून त्यांच्यावर काही लोक साळसूद टीका करतात. कारण या देशात गाईसाठी कायदा हातात घेणार्‍या दलालांचा गौरव होतो, बाईसाठी कायदा हातात घेणे म्हणजे संस्कृतीलाच की हो आव्हान!

न्यायव्यवस्थेचा आधार असलेली कायदा आणि सुव्यवस्था राखणारी पोलीस व्यवस्था मुळातच प्रचलित सामाजिक व्यवस्थेची गुलाम असते. संविधानाने दिलेली सुरक्षा स्त्रियांपर्यंतच काय, कुठल्याही दुर्बळ गटापर्यंत पोहोचवण्यात ती स्वऊर्जेने काम करणे कठीणच. अशा या पोकळीत गुलाबी गँगचा हस्तक्षेप हा स्वागतार्ह ठरल्याचे खुद्द पोलीसही कबूल करतात. संवाद, भाषणे, मोर्चे, उपोषणे, धरणे यांच्यासोबतच काठीच्या माराची दहशत या सर्व मार्गांचा वापर या स्त्रिया करतात.

2014 मध्ये गुलाबी गँगवर त्याच नावाचा तद्दन बाजारू चित्रपट निघाला होता. त्या चित्रपटाची संपत देवी पाल यांनी स्पष्ट शब्दात निंदा केली होती. पण मग याच गुलाबी गँगवर अमाना फॉन्टानेला खान या गार्डियनच्या पत्रकार लेखिकेने ‘द पिंक सारी रेव्हल्यूशन’ हे पुस्तक लिहिले, कर्व्ह थिएटरने ब्रिटनमध्ये नाटक केले आणि निशिता जैन यांनी दिग्दर्शित केलेला एक पुरस्कार विजेता माहितीपट (डॉक्युमेन्टरी) ‘पिंक सारीज’ नावाने वितरित झाला.

अखेर संपत देवीने धैर्य दाखवले म्हणून ही सुरुवात झाली. आणि स्त्रियांवरील अत्याचारांची राजधानीच मानावी अशा उत्तर प्रदेशमध्ये धैर्यशील स्त्रियांनी परंपरागत अत्याचार आणि शोषणाविरुद्ध झंझावात सुरू केला.

अखेर धैर्याचे स्फुल्लिंगच मनात जागले तरच अत्याचारांना पराभूत करता येते हे इथेच स्पष्ट होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -