घरफिचर्सकोरोना काळातील क्रिएटिव्हिटी !

कोरोना काळातील क्रिएटिव्हिटी !

Subscribe

कोरोनामुळे प्रत्यक्ष रंगमंचावर जरी अशी कुंठितावस्था दिसली, तरी त्यातून मार्ग काढत बर्‍याच रंगकर्मींनी आपल्यातील धुगधुगी कायम राखण्याचा हरतर्‍हेने प्रयत्न केला. ठाण्यातल्या ‘ठाणे आर्ट गिल्ड’ या संस्थेने सुरूवातीला ‘एकवीस दुणे बेचाळीस’ हा ऑनलाईन अभिवाचनाचा उपक्रम राबवला. रंगकर्मी हृषिकेश जोशींनी तर आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत नाटक या शब्दाच्या धर्तीवर, इंटरनेटवर ऑनलाईन खेळलं जाणारं नाटक म्हणजे ‘नेटक’ असं समर्पक नामाभिधान असलेला उपक्रम सुरू करत ‘मोगरा’ या तेजस रानडे लिखित संहितेचे सादरीकरण केले. हे सगळे स्तुत्य उपक्रम एकामागोमाग एक होत राहिले. यापुढेही जोपर्यंत ही आणीबाणीसदृश परिस्थिती कायम राहील, तोपर्यंत कुणी ना कुणी उपक्रमशील रंगकर्मी त्यातून आपापला मार्ग शोधत व्यक्त होत राहतील, याबद्दल शंका नाही.

कोरोनाच्या निमित्ताने सुरू असलेला लॉकडाऊनचा अवधी अजून किती वाढणार आहे, याबद्दल काहीच कल्पना नाही. आज संपेल, उद्या संपेल, फार फार तर महिन्याभरात संपेल असं म्हणता म्हणता तब्बल साडे चार महिने उलटून गेलेत. जगाचे सगळे व्यवहार काही पूर्णत: सामान्य होताना दिसत नाहीयत. जिथे अर्थचक्रच मंदावलेले असताना मनोरंजनाचे क्षेत्र प्राधान्याने पुन्हा ‘जैसे थे’ च्या अवस्थेत यायला आणखी किती काळ जाईल ? आता तरी त्याबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही. मनोरंजनाचे क्षेत्र हे जरी अवाढव्य अर्थचक्राचा एक भाग असले, तरी त्यावर असलेले आपल्या सगळ्यांचे अवलंबित्व हे ‘अत्यावश्यक’ या श्रेणीत मोडत नसल्यामुळे हा उशीर होतोय, अशी एक समजूत करून घेत शांत बसून राहण्यापलीकडे आपल्याला काही करता येत नाहीय. दरम्यान, प्रत्यक्ष रंगमंचावर खेळल्या जाणार्‍या नाटकाच्या संदर्भाने कुठेच काही घडताना दिसत नसल्याने आता इथून पुढे नाट्यकलेचे दिवस कसे असतील, अशी चिंता व्यक्त करणारेही बरेच लोक भेटले. पण त्याविषयी चिंता करण्याचे काही विशेष कारण मला दिसत नाही. शेवटी हा सगळे व्यवहार सुरळीत होईपर्यंतचा मामला आहे. एकदा का ते तसे झाले की मग नाट्यकलेचे भविष्य वगैरे सारखे प्रश्न आपल्याला पडणार नाहीत. फार फार तर नाटक व्यवहाराला कोरोनाच्या निमित्ताने आलेली ही एक कुंठितावस्था आहे, असं आपण म्हणू शकतो. एरवी व्यवहार सुरळीत असले की आपल्याला कुठल्या भवितव्याबद्दल किती प्रश्न पडतात ? सहसा पडत नाहीत. तेव्हा प्रत्यक्ष रंगमंचावरचे प्रयोग सुरू होण्याची वाट पाहणे एवढेच तूर्तास आपल्या हाती उरते.

प्रत्यक्ष रंगमंचावर जरी अशी कुंठितावस्था दिसली, तरी त्यातून मार्ग काढत बर्‍याच रंगकर्मींनी आपल्यातील धुगधुगी कायम राखण्याचा हरतर्‍हेने प्रयत्न केला. ठाण्यातल्या ‘ठाणे आर्ट गिल्ड’ या संस्थेने सुरूवातीला ‘एकवीस दुणे बेचाळीस’ हा ऑनलाईन अभिवाचनाचा उपक्रम राबवला. रंगकर्मी हृषिकेश जोशींनी तर आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत नाटक या शब्दाच्या धर्तीवर, इंटरनेटवर ऑनलाईन खेळलं जाणारं नाटक म्हणजे ‘नेटक’ असं समर्पक नामाभिधान असलेला उपक्रम सुरू करत ‘मोगरा’ या तेजस रानडे लिखित संहितेचे सादरीकरण केले. हे सगळे स्तुत्य उपक्रम एकामागोमाग एक होत राहिले. यापुढेही जोपर्यंत ही आणीबाणीसदृश परिस्थिती कायम राहील, तोपर्यंत कुणी ना कुणी उपक्रमशील रंगकर्मी त्यातून आपापला मार्ग शोधत व्यक्त होत राहतील, याबद्दल शंका नाही.

- Advertisement -

मध्यंतरी कल्याणचे रंगकर्मी मित्र अभिजित झुंजाररावने ‘कोरोना दस्तावेज 2020’ या नावाने मराठी रंगभूमीच्या नोंदींमधून-कोरोनोत्तर रंगभूमीचे स्वरूप, तिच्या गरजा, तिच्यातील शक्यता, आव्हाने आणि कोरोनाची इष्टापत्ती या सगळ्यांची, महाराष्ट्रातील विविध प्रांतांमध्ये रंगभूमीवर कार्यरत असणार्‍या रंगकर्मींच्या मतांचा आणि सूचनांचा ऊहापोह करणारी एक डॉक्युमेंटरीसुद्धा केली. मराठी नाट्यविश्व कोरोनाच्या या अस्वस्थ काळातही मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या शक्यता आजमावू पाहत आहे, याची साक्ष देणार्‍याच या सार्‍या घटना आहेत. या प्रयत्नांचे, या चर्चांचे, या घुसळणीचे फलित हाती यायला आपल्याला दीर्घ काळ वाट पाहावी लागेल. असे असले तरी जे हाती येईल त्याचे परिणाम आणि फायदे म्हणा वा तोटे- दूरगामी असतील, यात शंका नाही. मी असे म्हणतो कारण एव्हाना आपल्या सगळ्यांना कोरोनाचे हे संकट तात्कालिक नसून पुढचा प्रदीर्घ काळ आपल्याला वेढून असणार आहे, याची जाणीव मनोमन झाली आहेच. त्या जाणिवेतूनच नाटक करण्यात येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी शोधल्या जातील त्या शक्यता आणि उपायांची उपयुक्तता सिद्ध होत जाणार आहे.

वर नमूद केलेल्या घडामोडी या सामूहिक पातळीवर केल्या जाणार्‍या प्रयत्नांची काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. असे असले तरी व्यक्तीश: मला या अस्वस्थतेतून मार्ग काढण्यासाठी होणारे वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्न जास्त खूणावतात. काय आणि कसे आहेत हे वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्न? तर नाटकाला पूरक असलेल्या साहित्यप्रकारांना हाताळण्याचे प्रयत्न नाट्यक्षेत्रातील कलाकारांकडून एकट्या दुकट्याच्या पातळीवर केले जात आहेत. हे एकट्या दुकट्याच्या पातळीवर केले गेलेले प्रयत्न जरी त्या त्या कलाकाराच्या ‘कलावंत’ म्हणून असलेल्या विस्तारीत प्रतिभेचा भाग असले तरी, नाटकाशी पूरक असलेल्या साहित्यप्रकारांचा त्यामुळे परिपोषच होताना दिसतो आहे. नाटककार अभिराम भडकमकर, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक आणि कवी म्हणूनही ज्यांची स्वतंत्र प्रतिभा आहे असे रवींद्र दामोदर लाखे आणि प्रसिद्ध नाटककार चंद्रकांत प्रभाकर देशपांडे ही काही निवडक पण या प्रयत्नांना मूर्तरूप देणारी अतिशय महत्वाची उदाहरणे होत.

- Advertisement -

अभिराम भडकमकर यांची आगामी कादंबरी ‘इन्शाअल्लाह’, लाखेंचा आगामी कवितासंग्रह ‘जीवेलागणीच्या कविता’ तसेच चंप्रंच्या ‘नकविता’ या कवितेतल्या एका जॉनरला धरून लिहिलेल्या कवितांचा एक मोठा संग्रह-अर्थात ही सगळी मंडळी कोरोनाच्या अस्वस्थ काळावर उतारा म्हणून आपले कादंबरी अथवा काव्यलेखन करत आहेत, असे अजिबातच नाहीय. भडकमकरांचे कादंबरी लेखन, रवींद्र लाखेंचे काव्यलेखन आणि चंप्रंचे नाटक, कविता, चित्रकला आणि एकूणच चौफेर वैचारिक लेखन हे त्यांच्या रंगकर्मासोबत आधीपासूनच समांतरपणे अव्याहत सुरूच आहे. पण त्याची नोंद आज स्वतंत्रपणे घ्यावीशी वाटते त्याचे प्रमुख कारण हे की, कोरोनाच्या या वांझोट्या दिवसांत प्रत्यक्ष मैदानात काहीच घडताना दिसत नसताना ही उदाहरणे मला काहीएक सघन घडत असल्याची खात्री देतात. अशी सघन कामे जी कोरोनाच्या काळासोबत वाहून किंवा सरून जाणारी नाहीयत, तर येणार्‍या काळातही रसिकांकडून ज्यांचा रसास्वाद घेतला जाईल. ज्यावर साधक बाधक चर्चा होतील. समीक्षा लिहिली जाईल आणि पर्यायाने रसिकांच्या अभिरूचीचे आपोआप भरण-पोषण होत राहील.

प्रत्यक्ष नाटक होत नसलं तरी नाटकाच्या अंगाअंगाने घडत राहणार्‍या या गोष्टी, कलावंत आणि प्रेक्षक या दोघांसाठी असलेल्या या अनिश्चिततेच्या काळात निश्चितच महत्वाच्या आहेत. त्याचीच एक साक्ष म्हणून रवींद्र लाखेंची एक समर्पक कविता देऊन या लेखाचा शेवट करतो आहे-

प्रयोग

नटांना संहिता चढली
नि ते बरळू लागले संवाद
स्वत: घुसडलेले

ते ऐकून कथानकाला आली घेरी
तोल जाऊन ते पडलं प्रेक्षकांत
कथानकाला सावरायला
लेखक दिग्दर्शक निर्माता आणि
पात्र प्रेक्षकांत उतरली
प्रेक्षकांना वाटलं
आयतं सापडलं कथानक
पात्र नि प्रेक्षक ह्यांच्या खेचाखेचीत
कथानकाचे धिंडवडे निघाले
तश्याही अवस्थेत
कथानक थिएटर बाहेर पडलं

आज रिकामा रंगमंच
सादर करतोय
एक रिकामं कथानक
रिकाम्या प्रेक्षागृहात

-समीर दळवी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -