घरफिचर्सहॉलिवूडचा केशभूषाकार : सिडनी गुइलरॉफ!

हॉलिवूडचा केशभूषाकार : सिडनी गुइलरॉफ!

Subscribe

सार्‍या जगाचं आकर्षण बनून राहिलेलं हॉलीवूड म्हणजे खर्‍या अर्थानं अगदी वेगळीच दुनिया भासते. तेथील तारे-तारका यांच्याबाबतच्या असंख्य कहाण्या, आठवणी जणू अद्भूत कथाच. त्यांचे किस्से त्याहीपेक्षा थक्क करणारे आहेत. पण त्यांच्याबाबत लिहिणारे अनेक असले आणि त्यांच्यात सर्व प्रकारच्या लेखकांचा, टिकाकारांचा, समीक्षकांचा आणि टिंगल टवाळ्या करणार्‍यांचाही समावेश असला तरी त्यांच्या त्या लेखनाला मोठ्या संख्येने वाचक असतात. असं असूनही काही वेळा मात्र एखादं पुस्तक हातात येतं आणि ते वाचायला सुरुवात केली की एकदम आश्चर्य वाटतं. अन् मग त्यामागचं रहस्यही कळतं. कारण तो लेखक असतो तब्बल साठ वर्षे हॉलीवूडच्या तार्‍यांच्या दुनियेत त्यांच्या जवळपासच असणारा ‘केशभूषाकार’ सिडनी गुइलरॉफ.

प्रचंड कौशल्य ही त्याची जमेची बाजू, त्यामुळे अनेक प्रख्यात तारकांना त्यांच्या केशभूषेसाठी तोच हवा असे. तसा तो सर्वकाळ ‘मेट्रो गोल्डकिन मेयर’ अर्थात ‘एमजीएम’चा कारागीर होता. पण त्याच्या गुणवत्तेमुळं स्टुडिओत त्याला इतर ठिकाणी काम करायलाही काही अटींवरही परवानगी होती. ती हॉलीवूडची सुरुवातीच्या काळातील रीतच होती आणि अनेक तारकांना त्या कोणाकडेही चित्रपट करत असल्या तरी सिडनी गुइलरॉफ हाच केशभूषाकार म्हणून हवा असायचा. अशा या कलावंतानं मोकळेपणानं लिहिलेल्या त्याच्या आठवणी ‘दि क्राउनिंग ग्लोरी’ या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्याचं नाक हे ‘स्टॅनली गुइलरॉफ’ आहे. त्याची खासियत असलेल्या केशभूषा या कलेच्या अनुषंगानं साजेसं नाकच त्यानं पुस्तकाला दिलं आहे. अनेक तारकांचा तो विश्वासू स्नेही होता आणि ग्रेटा गार्बोचा तर प्रियकर. त्यानं सर्वांचा विश्वास सार्थच ठरवला आणि कुणालाही कधीच दगा दिला नाही. उलट निर्माता, दिग्दर्शक, केशभूषाकार असे इतर क्षेत्रांतले अनेकजण त्याचा सल्ला विचारत आणि तोही मनमोकळेपणानं सल्ला देत.

एलिझाबेथ टेलर संबंधी त्यानं दीर्घ प्रकरण लिहिलंय. सिडनीनं प्रथम तिला पाहिलं त्यावेळी ती फक्त नऊ वर्षांची होती आणि एमजीएम स्टुडिओतील कुणाहीपेक्षा ती सर्वात आकर्षक होती. तिच्याकडं ज्याचं लक्ष जाईल त्याची नजर तिच्यावरच खिळून राहात असे. त्या स्टुडिओनं अशी सुंदर व्यक्ती पूर्वी कधी पाहिलीच नव्हती. त्याची आणि तिची ओळख मात्र ती बारा वर्षांची असताना झाली. तेव्हापासूनच त्यांच्यात घट्ट बंध निर्माण झाले. दिग्दर्शक क्लेरेन्स ब्राउन यांना चित्रपटाच्या अखेरच्या अश्व शर्यतीच्या प्रसंगात ती टॉमबॉयसारखी दिसायला हवी होती. ती तशी दिसावी म्हणून त्यांनी तिला तिचे केस बारीक करायला सांगितलं होतं. त्यामुळं ती खूपच अस्वस्थ झाली होती. एलिझाबेथ-लिझ-ला तिचे काळेभोर लांब केस खूपच आवडत आणि तेच कापायचे म्हटल्यामुळं ती प्रचंड अस्वस्थ झाली होती.

- Advertisement -

सिडनीनं तिला सांगितलं की त्याला एक कल्पना सुचलीय आहे, तो म्हणाला लिझ तू काहीच काळजी करू नको. त्यानंतर त्यानं आठवडाभर दिवस-रात्र सतत काम करून अंदाजानंच तिच्या डोक्यावर बरोबर बसेल असा, तिच्याच केसांच्या रंगाचा टोप (विग) तयार केला आणि त्यावर जॉकी कापतात तशी टोपी, जॉकी कॅप ठेवली. सेटवर पोहोचताच तो क्लेरेन्स्कडं गेला आणि एलिझाबेथकडं बोट दाखवून त्यानं विचारलं, हे चालेल ना? काय उत्तर येतं त्याची ते तिघंही श्वास रोखून वाट बघत होते. क्लेरेन्स लिझजवळ गेला आणि त्यानं तिच्या त्या काळ्याभोर केसातून हात फिरवला आणि म्हणाला, अरे ऽ, हे तर फारच छान झालंय. पण लक्षात ठेव, यापेक्षा तिचे केस जराही, एखादा इंचभरही जास्त कापू नको.
एलिझाबेथ हे ऐकताच धावत आली आणि तिनं सिडनीला मिठी मारली आणि पुटपुटली : थँक यू सिडनी!


-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -