घरफिचर्ससहिष्णुतेची ऐशी तैशी

सहिष्णुतेची ऐशी तैशी

Subscribe

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघातकी हल्ला करून ४५ जवानांना ठार करण्यात आले. कुख्यात दहशवादी मसूद अझहर याने हा हल्ला घडवून आणला. ज्या दशतवाद्याने हा आत्मघातकी हल्ला केला, तो २० वर्षांचा आदिल हा काश्मीरातील राहणारा होता. घरातून पळून जैश-ए-महंमद संघटनेत सामील झाला होता. दहशतवादाच्या मार्गावर गेलेली काश्मिरी मुले नादान आहेत, त्यांना ठार करू नका, पाकिस्तानशी चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवा, काश्मिरी तरुणांमध्ये विश्वास निर्माण करा, अशी सहिष्णुतावादी झुंड कायम दहशवादी हल्ला झाल्यानंतर कायर्र्रत होत असते. गेली ७० वर्षे ही झुंड पोसली, त्यामुळे पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याचे कधी स्वप्न भारताने पाहिले नाही, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राइक केल्यामुळे आता भारतीय नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सरकारनेही सहिष्णुतेची ऐशी तैशी करून आक्रमक पवित्रा घेणे गरजेचे आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये मागील ३० वर्षांपासून पाक पुरस्कृत दहशतवादी युद्ध सुरू आहे. कालपर्यंत या ठिकाणी दहशतवादी हल्ले हे पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेले दहशतवादी करत असत. त्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले जाते, त्यांची जिहादसाठी प्राण देण्याचीही मानसिक तयारी करून घेतली जाते. मग त्यांना भारताच्या सीमेतून घुसखोरीद्वारे पाठवून ज्या ठिकाणी छुपा हल्ला करायचा असेल, तेथील स्थानिकांची त्याकरता मदत घेतली जाते. त्यासाठी त्यांना पैशाचे आमिष दाखवले जाते, तर कधी जिहादच्या आणाभाका दिल्या जातात किंवा ठार मारण्याच्या धमक्या देऊन घुसखोरांना आश्रम मिळवून दिला जातो. तेथून हे घुसखोर त्यांच्या हल्ल्याला ‘अंजाम’ देतात. पाकिस्तानच्या आश्रयाखाली असलेला दहशतवादी मसूद अझहर याने २००१ चा संसदेवरील हल्ला, २००८ मधील मुंबईवरील हल्ला किंवा २०१६मधील पठाणकोटवरील हल्ला हा अशा घुसखोरांच्या सहाय्याने घडवून आणला होता.

- Advertisement -

पुलवामामध्ये केलेला हल्ला मात्र वेगळा होता. यात मसूद अजहर याने एका स्थानिक तरुणाचे डोके भडकावून त्याचे ब्रेनवॉश करून त्याच्या माध्यमातून आत्मघातकी हल्ला घडवून आणला. इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतका भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले, २० हून अधिक जखमी झाले. सीआरपीएफचा एक ताफा जम्मूकडून श्रीनगरकडे स्थलांतरित होत होता. या ताफ्यामध्ये ७५ ट्रक होते, त्यामधून जवळपास सीआरपीएफचे २५०० सैनिक होते. सीआरपीएफ जवानांच्या स्थलांतराची ही प्रक्रिया होती. नियमितपणे हे स्थलांतर होत असते. या स्थलांतराच्या हालचाली तसे पाहता नित्याच्या घडणार्‍या आहेत. ताज्या घटनेमध्ये या ताफ्यातील एका ट्रकवर एका एसयुव्हीने आत्मघातकी हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये आरडीएक्सचा वापर करण्यात आल्याची शक्यता आहे. साधारणतः यासाठी २०० किलोहून अधिक आरडीएक्सचा वापर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र या कारवाईत सुसाईड बॉम्ब होता की रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हा हल्ला झाला हे तपासाअंती स्पष्ट होईल. परंतु हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली ही पद्धत बरेच काही दर्शवणारी आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आरडीएक्सचा वापर करून सैन्यावर हल्ला झाला आहे. यापूर्वीच्या हल्ल्यांचे स्वरुप पाहिल्यास घुसखोरांकडून सैन्यावर गोळीबार केला जायचा. काही वेळा सैन्यतळांना लक्ष्य करून ग्रेनेड फेकले जायचे. तथापि, आरडीएक्सचा वापर झालेला नव्हता. गेल्या १० वर्षांमध्ये आरडीएक्सचा वापर करुन अशा प्रकारचे हल्ले करणे हा प्रकार प्रामुख्याने इराक, सिरिया आणि अफगाणिस्तानमध्ये दिसून येतो. अल् कायदा, आयसिस, तालिबान यांसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांकडून आक्रमणासाठी हिंसाचारासाठी ही पद्धत वापरली जाते. तथापि, काश्मिरी दहशतवाद्यांकडून हा पॅटर्न अवलंबला गेलेला नव्हता. पण आता पुलवामामधील घटनेवरुन एक बाब लक्षात येते आहे की दहशतवाद्यांनी हिंसा घडवून आणण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणलेला आहे.

- Advertisement -

पुलवामात दहशतवादी कारवाई करणारा आदिल अहमद दार (वय २०) हा गेल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत पुलवामा जिल्ह्यातील गावात एका वखारीत काम करत होता. आदिलने १२ वीचे शिक्षण अर्धवट सोडले. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसाचारातही तो सामील होता. गेल्या वर्षी मार्चमध्ये आदिल कुटुंबीयांना काहीच न सांगता घरातून निघून गेला. वर्षभरानंतर याच आदिलने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केला आणि ३९ जवानांचे प्राण घेतले. आदिलचे वडील गुलाम हसन दार यांचे छोटे दुकान आहे. आदिलचा चुलत भाऊ हादेखील दहशतवादी होता. आदिल ‘जैश’मध्ये सामील होण्याच्या ११ दिवस अगोदरच त्याचा चकमकीत मृत्यू झाला होता. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर २०१६ साली जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या आंदोलनात आदिल सहभागी झाला होता. आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात आदिलच्या पायाला गोळी लागली होती. या हल्ल्यामधील सुसाईड बॉम्बर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून तो काश्मिरी तरुण आहे.

तो पाकिस्तानातून आलेला नाही. त्यामुळे या हल्ल्याची तुलना उरी अथवा पठाणकोटशी होऊ शकत नाही. आपल्याच धर्तीवर वाढलेल्या दहशतवादाचा हा प्रकार आहे. म्हणूनच या हल्ल्यातून एक अत्यंत महत्त्वाची बाब पुढे येते आहे ती म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांमध्ये वाढता मूलतत्त्ववाद, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाकडे या तरुणांचे वाढलेले प्रचंड आकर्षण. हे अत्यंत चिंताजनक असून हा याचा मूळ गाभा आहे. या हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले आरडीएक्स पाहता तसेच हल्ल्याचे नियोजन पाहता हा एक खूप मोठा सुनियोजित कट होता हे स्पष्ट होते. सैन्याचा ताफा जम्मूकडून निघणार आहे, तो श्रीनगरकडे जाणार आहे याची माहिती हल्लेखोरांना होती आणि पुलवामानजीक आल्यानंतर ताफ्यावर हल्ला करायचा याचे नियोजनही आधीपासूनच करण्यात आलेले होते. त्यामुळे हा हल्ला तात्काळ करण्यात आलेला नाही किंवा अचानकपणाने सैन्य समोर दिसताक्षणी झालेलाही नाही. असा कोणताही हल्ला स्थानिक समर्थनाशिवाय होऊच शकत नाही.

याची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. मात्र म्हणून संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमधील ४५ लाख जनतेचे या दहशतवादाला समर्थन आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. पाक पुरस्कृत दहशवादी संघटनांनी जर स्थानिक तरुणांमध्ये आझाद काश्मीरच्या नावे भारतद्वेष पसरवला असेल, तर तो काही शेकडा तरुणांमध्ये भिनला असेल, कारण तेथील ४५ लाख जनतेला त्यांचे हित भारतातच असल्याचे पटले आहे. मागील साडेतीन वर्षांत अडीच हजार दहशवाद्यांचा जम्मू आणि काश्मीरात खात्मा केला आहे. मात्र दुर्दैवाने नवनवीन दहशतवादी वाढत आहेत.

जैश-ए-महंमदचा नवा इशारा
१९९९ साली नवाज शरीफ पंतप्रधान असतानाच पाकिस्तानी लष्कराने कारगीलवर हल्ला केला होता. पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष यांना पाकिस्तानात किंमत नाही, तेथील लष्कर आणि आयएसआय भारताबद्दलचे निर्णय घेते. पाकिस्तान जेव्हा शांतता स्थापण्याच्या गोष्टी करते तेव्हा समांतर पातळीवर भारतावर हल्ला करण्याची तयारी करत असते. कारगील, संसदेवरील हल्ला, मुंबईवरचा हल्ला ही ढळढळीत उदाहरणे आहेत. या अनेक घटनांमध्ये जैश-ए-महंमदचा म्होरक्या मसूद अझहरचा सहभाग होता. पठाणकोट हल्ल्याचे नेतृत्व जैश-ए-महंमदच्या मसूद अझहरने केले होते.

भारत सरकारने हे सारे पुरावे पाकिस्तान सरकारपुढे ठेवले. अझर आणि जैश-ए-महंमदच्या पुढार्‍यांच्या आवाजाचे नमुने भारत सरकारने मागवले. पाकिस्तानने ते दिले नाहीत. अझहरला पकडा अशी मागणी भारताने केली. पाकिस्तानने ती मान्य केली नाही. युनायटेड नेशन्सने अझहरला दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी भारताने केली. चीनने ती मागणी तांत्रिक कारणांसाठी धुडकावून लावली. कळस म्हणजे पाकिस्तानी चौकशी समितीने पाकिस्तानात परतल्यावर माध्यमांना सांगितले की, पठाणकोट हल्ला हा भारताने पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी केलेले एक नाटक होते. अशा प्रकारे मसूद अझहरला पाकिस्तान आणि चीनचाही आश्रय आहे. अशा मसूद अझहरच्या जैश-ए-महंमदने भारतासमोर नवे आव्हान उभे केले आहे.

कोण आहे हा मसूद अझहर?
मसूद अझहर वास्तव्य ठिकाण बहावलपूर. त्याचे जिहादी शिक्षण कराचीतील बिनोरी मदरशात झाले. हा मदरसा देवबंदी गटाचा आहे. बिनोरी मदरशाचे मुख्य काम जिहादी तयार करणे हे होते. तयार झालेला अझहर अफगाणिस्तानात रशियाविरोधात लढायला गेला. अफगाणिस्तानातली जिहादींची लढाई आयएसआयने उभारली होती. जिहादींचे खासगी सैन्य उभारून त्यासाठी हर्कतुल मुजाहिद्दीन नावाची संघटना उभारली होती. अझहर त्या संघटनेत सामील झाला. ही गोष्ट १९८५ च्या सुमाराची. १९९० नंतर अफगाणिस्तानातली लढाई संपल्यासारखे झाल्यानंतर जिहादींचे काय करायचे, असा प्रश्न होता. आयएसआयने त्यांना काश्मीरमध्ये कामी लावले. काश्मीरमध्ये घातपात करायचे, काश्मीर भारतातून हिसकून घ्यायचे. या कामी अझहरची नेमणूक करण्यात आली. अझरच्या काश्मिरात फेर्‍या सुरू झाल्या.

याच काळात अझहर ब्रिटनसह अनेक देशांत दौरे करून जिहादसाठी पैसे गोळा करत असे. प्रत्येक दौर्‍यात तो स्पष्टपणे सांगत असे की काश्मीर मुक्ती आणि भारतविरोधी लढा यासाठीच जिहाद असेल, त्यासाठीच पैसे, शस्त्रे आणि जिहादींची आवश्यकता आहे. अझहर काश्मीरमध्ये १९९४ साली पोहचला. परदेशी लोकांचे अपहरण करून पैसे मिळवण्यासाठी त्याने अल फरहान नावाची एक स्वतंत्र संघटना स्थापली. हॅन्स ख्रिश्चन ओस्ट्रोला अल फरहानने ठार मारले. युनायटेड नेशन्सने १९९७ साली हर्कतुल अन्सार संघटना दहशतवादी म्हणून जाहीर केली.

अझहरने जुन्या हर्कतुल मुजाहिद्दीन या नावाने उद्योग सुरू केले. १९९४ साली अझहरला भारतीय पोलिसांनी दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात ठेवले. १९९९ साली अझहरचा धाकटा भाऊ अब्दुल रऊफ असगर यानं योजनापूर्वक इंडियन एअरलाइन्सचे आयसी ८१४ विमान काठमांडूहून पळवले आणि कंदाहारला नेले. अपहरणकर्त्यांची मागणी मान्य करून अझहरला कोट भलवाल तुरुंगातून आयपीएस पोलीस अधिकारी एस.पी. वैद्य यांनी सोडवले. भारत सरकारचे मंत्री जसवंत सिंग अझरला सोबत घेऊन कंदाहारला पोचले. अझहर कंदाहारमधून तडक पाकिस्तानात गेला. पुढे याच अझहरने काश्मीर विधानसभा, लोकसभा यावर हल्ले आयोजित केले. पठाणकोट हल्ल्याचाही तो सूत्रधार होता. असा दहशतवादी अझहर पाकिस्तानात मोकाट असतो. आयएसआयच्या सांगण्यानुसार तो वागत असतो.

काय कारवाई करणार?
दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून सरकारला विविध सूचना केल्या जात आहेत. त्यात थेट युद्ध करा, अशी आग्रही मागणी केली जात आहे. परंतु युद्ध केल्यास थेट भारताच्या भूमीत लढले जाईल, ज्याने भारताचे अपरिमित नुकसान होऊ शकते, मात्र म्हणून भारत मागील ७० वर्षे चर्चेचे गुर्‍हाळ फिरवत राहिला. पंतप्रधान मोदींनी मात्र सर्जिकल स्ट्राईक सारखा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे एक तर सरकार पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करू शकते किंवा आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करू शकते. मात्र आक्रमक कारवाईच करणे अपेक्षित आहे. ज्याला जगभराचा पाठिंबा मिळणार आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -