घरक्रीडा‘कप इज कमिंग होम’

‘कप इज कमिंग होम’

Subscribe

तब्बल २७ वर्षांनंतर इंग्लंडचा संघ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी न्यूझीलंड संघ लागोपाठ दुसर्‍यांदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून यंदा नवा वर्ल्डकप विजेता रविवारी लॉर्ड्सवर बघायला मिळेल. दीड महिन्याच्या कालावधीत ४७ सामने (४ पावसामुळे रद्द) पार पडले. योगायोगाची बाब म्हणजे यंदा वर्ल्डकपचा ढाचा बदलण्यात आला. गटवार साखळी लढतींऐवजी साखळी लढतींचा अवलंब करण्यात आला तो देखील २७ वर्षानंतर ! १९९२ च्या पाचव्या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने अंतिम फेरी गाठली होती, पण इम्रानच्या पाकिस्तानी संघाने वर्ल्डकप पटकावला.

यंदा मात्र घरच्या प्रेक्षकांसमोर आयरिश कर्णधार इयॉन मॉर्गन आणि त्याचे साथीदार इंग्लंडला वर्ल्डकप जेतेपदाची भेट देतात का ते बघायचे. वातावरणातील बदल, कुकाबुरा चेंडूची जोडी या सार्‍या बाबी गोलंदाजांना अनुकूल असल्याचे उपांत्य फेरीत दिसून आले. इंग्लंडच्या लहरी वातावरणात २५० धावांचा पाठलाग करणे सोपे नाही. जोफ्रा आर्चर, क्रिस वोक्स, मार्क वूड, लियम प्लंकेट, बेन स्टोक्स असे एकमेकांना पूरक गोलंदाज इंग्लंडकडे असून जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रुट, मॉर्गन, जॉस बटलर अशी मजबूत फलंदाजांची फळी यजमान इंग्लंडकडे मौजूद आहे.

- Advertisement -

चार वर्षांपूर्वी मॉर्गनच्या इंग्लंड संघाला वर्ल्डकपमध्ये मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु गेल्या चार वर्षांत मॉर्गन, स्ट्राऊस यांनी इसीबीच्या साथीने इंग्लिश क्रिकेटचा चेहरामोहरा बदलण्याचा चंग बांधला. पाच दिवसांच्या पारंपरिक क्रिकेटला प्राधान्य देण्याच्या प्रवृत्तीत बदल करून वनडे, टी-२०, १०० चेंडूचे क्रिकेट या विविध प्रकारांना प्राधान्य दिले. परिणामी इंग्लंडने गेल्या चार वर्षांत वनडेत त्रिशतकी धावसंख्या उभारण्याचा सपाटा लावला. जुन्या, अनुभवी खेळाडूंना वगळून नवीन खेळाडूंना संधी दिली. परिणामी इंग्लंडने आयसीसी रॅकिंगमध्ये (वनडे) अव्वल क्रमांकावर झेप घेतली. सध्या भारतापाठोपाठ इंग्लंड दुसर्‍या क्रमांकावर असून वर्ल्डकप विजेतेपद पटकावल्यास इंग्लंड अव्वल स्थानावर जाऊ शकेल.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला. साखळीत पाकिस्तान, श्रीलंका, अ‍ॅास्ट्रेलिया यांच्याकडून पराभूत झालेल्या इंग्लंडला भारतावरील विजयामुळे संजीवनी मिळाली. भारताला पराभूत केल्यामुळे त्यांचा बाद फेरीचा मार्ग सुकर झाला. उपांत्य फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला लीलया हरवून इंग्लंडने रुबाबात अंतिम फेरी गाठली तेव्हा ओल्ड ट्रॅफर्डवरील इंग्लिश पाठीराखे खुशीत होते. ‘कप इज कमिंग होम’ चे सूर आळवले जात होते.

- Advertisement -

जोफ्रा आर्चरसारखा अनमोल हिरा इंग्लंडच्या हाती लागला हे त्यांचे सुदैवच. विंडीजचा आर्चर इंग्लंडकडून खेळू लागला. वीस वर्षीय या खेळाडूने वर्ल्डकपमध्ये २२ च्या सरासरीने १९ मोहरे टिपले असून त्याच्या भेदक मार्‍याचा प्रसाद ऑस्ट्रेलियन अ‍ॅलेक्स कॅरीला मिळाला. ओल्ड ट्रॅफर्डवरील उपांत्य झुंजीत आर्चरने ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंचला ‘गोल्डन डक’ची भेट दिल्यावर त्याचा बाऊन्सर कॅरीच्या हेल्मेटवर बसला. चेहर्‍याला पट्टी बांधून कॅरीने किल्ला लढवला खरा, पण फलंदाजांना दहशत बसवण्याची भूमिका आर्चरने पार पाडली. मार्क वूडने १७ बळी टिपून आर्चरला साथ दिली. क्रिस वोक्सचा माराही प्रभावी ठरला, उपांत्य फेरीत सामनावीर पुरस्कार पटकावला वोक्सनेच. ८-०-२०-३ हे त्याचे पृथःकरण बोलके ठरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -