घरफिचर्सडेरी अभियान अन् आमदारकीचं स्वप्न!

डेरी अभियान अन् आमदारकीचं स्वप्न!

Subscribe

आमदारकीची निवडणूक जवळ आली होती. निदान यंदा तरी आपण आमदार व्हायचंच असं अण्णा पाटलाची इच्छा होती. अशातच एक सरकारी जीआर बेरडवाडीत धडकला आणि अण्णाच्या स्वप्नाला आणखी चालना मिळाली? होणार का अण्णा आमदार? दुपार उलटत चालली, तशी अण्णा पाटलांची घालमेल वाढायला लागली. एरवी जेवणानंतर ओसरीवरच्या झोपाळ्यावर डुलत डुलत मस्तपैकी ताणून द्यायची ही अण्णाची सवय. त्यात आज तर पशुखात्याचा तालुक्याचा साहेब आल्यामुळे मस्तपैकी तांबड्या रश्शाचा बेत होता. साहेबांबरोबरच अण्णांनीही जेवणावर उभा आडवा हात मारला होता. अण्णाची पद्धत अशी होती की, असं खारं जेवण झालं की थेट माडीवरच्या खोलीत जायचं अन् दिवाणावर मस्तपैकी ताणून द्यायची; पण जेवणानंतर पशुअधिकार्‍यानं जे सांगितलं, त्यामुळं अण्णाचा चेहरा जास्तच चिंताग्रस्त झाला. साहेब तर निघून गेला; पण अण्णा पाटलाच्या जीवाला घोर लागला. तेव्हा त्यानं मास्तरला सांगावा धाडायला गड्याला पाठवलं.

मास्तर अण्णा पाटलांच्या वाड्यावर पोहोचलं तेव्हा अण्णा ओसरीवर भराभर येरझारा मारत होता. काही बिनसलेलं असलं की, तो असाच येरझारा मारायचा. मास्तरला पाहून त्यानं चालणं थांबवलं आणि आपल्या घोगर्‍या आवाजात, ‘‘या मास्तऽर, बरं झालं तुम्ही आला. एक जरा गुंता झालाय, तो सोडवाया तुमची मदत पायजेलाय’ असं म्हणत थेट मुद्यालाच हात घातला. मग दोघंबी ओसरीवरच्या बैठकीवर बसले. दोन-तीन मिनिटं निवांत गेल्यावर अण्णानं गार्‍हाणं गायला सुरवात केली.

- Advertisement -

‘‘काय सांगू मास्तर, लई प्राब्लेम झालाय. सकाळच्याला तालुक्याचा साहेब आला होता पशू विभागाचा. तालुक्यातील डेरींसाठी नवा नियम येणार म्हनला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोनच दिवसांपूर्वी डेरींमधून भेसळमुक्त दूध अभियान राबविण्याचा निर्णय झालाय. राजहंस अभियान असं त्याचं नाव आहे. राज्यातील प्रत्येक डेअरीतील दूध तपासायचं आणि त्यातील शुद्ध दूध तेवढंच घ्यायचं असा सरकारचा आदेश हाय…’ अण्णा पाटील तावातावानं आणि काळजीनं सांगत होता, तसं मास्तरचं डोळं चमकत होते.

कुठलंही सरकारी काम, जीआर वगैरे आला की, त्याचा अर्थ समजून घ्यायला अण्णा या मास्तरचीच मदत घ्यायचा. मास्तरचं इंग्रजीही तसं बरं होतं; पण या मास्तरला एक खोड होती, ती म्हणजे एखादी गोष्ट अर्धवट ऐकायची आणि कामाला लागायची. अण्णा पाटलानं ‘दूध शुद्धीसाठी राजहंस अभियान’ असं म्हटल्याबरोबर मास्तरला राजहंस पक्षी आठवला. कारण बर्‍याच दिवसांच्या आरामानंतर आज सकाळीच त्यांनं वर्गातल्या पोरांना ‘तो राजहंस एक…’ नावाची कविता शिकवली होती. दुपारच्या झोपेमुळं कवितेची चाल अजूनही मास्तरच्या डोक्यात घोळत होती. त्यात पाटलानं ‘राजहंस अभियान’ म्हटल्याबरोबरच त्याला मास्तरनी हातानी खूण करून थांबवलं.

- Advertisement -

म्हणाला, ‘अण्णा, सगळी गोष्ट माझ्या ध्यानात आली. या अभियानासाठी लवकरच प्लान बनवू आणि आपल्या तालुक्यातील दूध डेअर्‍यांमध्ये ते यशस्वी करून दाखवू. सगळ्या जिल्ह्याला आपल्या कामातून तोंडात बोटं घालायला लावू. तसं झालं तर तुमचं सगळीकडे नाव होतंय बघा. मग यंदाच्या निवडणुकीत तुमची आमदारकी पक्की…’’

मास्तर तावातावात बोलत होतं. आमदारकीचा विषय तसा अण्णाच्या जिव्हाळ्याचा होता. अनेक उपद्व्याप करणार्‍या अण्णाला आमदारकीचं तिकीट काही मिळालं नव्हतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आमदारकी मिळण्याचा विषय यायचा तेव्हा येवढा डेंजर अण्णा; पण लोण्यागत एकदम मऊ व्हायचा. त्याला आतल्याआत गुदगुल्या व्हायच्या… ही गोष्ट इरसाल मास्तरला चांगलीच ठाऊक होती. त्यामुळे अधूनमधून आपलं म्हणनं रेटण्यासाठी मास्तर आमदारकीची गोष्ट काढायचं आणि अण्णा त्या स्वप्नात वाहून जायचा. मास्तरच्या हो मध्ये होकार मिसळायचा. आताही त्यानं मास्तरच्या सांगण्याला मान हलवत संमती दर्शवली आणि ‘वाऽऽ! मास्तर, भले शाब्बास, तुमच्यासारखी जंटलमन मंडळी आमच्या जोडीला आहे, म्हणून तर आमचं नाव वाढलंय.. सांगा कशी राबवायची योजना, तुम्ही म्हणाल तसंच होईल.’

अण्णानं असं अभय दिल्यावर मास्तरची गाडी एकदम जोरात सुटली. ‘अण्णा, अभियानाचं काम झालंच समजा. आजच संध्याकाळी ग्रामपंचायतीसमोर गावातल्या दूध उत्पादकांची बैठक बोलवा… आणि हां! रामा, दामू आणि भिवाला पन बोलवा. बैठकीत प्लान करून पुढच्याच आठवड्यात उडवून देऊ ‘अभियानाचा राजहंस!’ मास्तरच्या बोलण्यामुळं अण्णा पाटलाच्या मनाची घालमेल कमी झाली. त्यानं गड्याला संध्याकाळच्या बैठकीत गावातील जनावरांच्या मालकांना बोलवण्याचं काम सोपवलं आणि त्यानंतर तो निवांत मनानं माडीवर झोपण्यासाठी निघून गेला.

उन्हं उतरली तशी बेरडवाडीच्या ग्रामपंचायतीसमोर माणसांची वर्दळ वाढायला लागली. त्यात जनावरांच्या मालकांचा भरणा होताच. अण्णा पाटलानं बोलवलेली मिटिंग आणि त्यात मास्तर काहीतरी सांगणार म्हटल्यावर काहीजणांनी आपल्या गाई-म्हशीही सोबत आणल्या होत्या. हो! उगाचच बैठक लांबली, तर संध्याकाळची दूध काढणी खोळंबायला नको, हा त्यांचा उद्देश होता. अगदी काही वेळातच ग्रामपंचायतीसमोर जिकडंतिकडं माणसं आणि जनावरं दिसू लागल्याने त्या परिसराला जनावरांच्या बाजाराची शोभा आली.

ठिक साडेसहा वाजता अण्णा पाटील आणि मास्तर बैठकीच्या ठिकाणी उगवले. त्यांच्या पाठोपाठ मधल्या आळीतला रामा शिंपी, दामू सोनार आणि वरच्या आळीत राहणारा भिवा पांगरे हे त्रिकूटही गोळा झाले. पंचायतीसमोरच चार लाकडी खुर्च्या टाकून बैठकीला सुरवात झाली. समोर पन्नास-साठ डोकी जमली होती. नेहमीप्रमाणे मास्तरचे लांबलचक भाषण होऊन तासभर वाया गेला. ते ऐकून माणसंच काय; पण त्यांच्याबरोबर आलेल्या गाई-म्हशीही कंटाळल्या. भाषणांचा कार्यक्रम संपून ‘राजहंस’ अभियानाबद्दल बैठक सुरू झाली, तेव्हा तिथे कुणीच पशुपालक उरले नाहीत. एक-एक करून मंडळी केव्हाच पसार झाली होती. शेवटी केवळ पाच टाळकी उरली. दस्तुरखुद्द अण्णा पाटील, मास्तर, भिवा, दामू आणि रामा बस्स! आलोच आहोत, तर आपल्यातच बैठक उरकून घेऊ असा प्रस्ताव अण्णानं मांडल्यानं नाईलाज झाल्यासारखा मास्तरनं बोलायला सुरवात केली.‘हे पाहा मंडळी, आपल्या डेरींमधल्या दुधात भेसळ होता कामा नये, असा सरकारचा आदेश येणार हाय. त्यासाठी ‘राजहंस अभियान’ सुरू होणार हे आपल्याला ठाऊकच आहे. आता आपल्या तालुका दूध संघाच्या ५० गावांमध्ये डेर्‍या आहेत. तेथे रोज दहा हजार लोक दूध घालतात. पण..’

मास्तरला मध्येच तोडत अण्णाने तोंड खुपसले, ‘…पन् मंडळी आपल्या काही विरोधकांना दूध संघाची ही परगती सहन होईना गेली. अण्णा पाटील शेतकर्‍यांना लुटतो,… अशा वावड्या या लोकांनी उठवून आपल्यामागं या ‘राजहंस अभियाना’चा ससेमिरा लावलाय… अण्णाचं भाषण आणखी लांबलं असतं; पण मास्तरनं पुन्हा पुढाकार घेतला आणि बोलायला सुरवात केली.

‘…तर मंडळी, या सगळ्यावर उपाय म्हणून ‘राजहंसा’ची कल्पना मी मांडणार आहे. राजहंस पक्ष्याला जर दूध आणि पाणी असं मिश्रण दिलं तर तो फक्त दूधच तेवढं पितो आणि पाणी तसंच शिल्लक राहतं, असं आमच्या दुसरीच्या मराठीच्या एका धड्यात लिहलंय. तेव्हा आपण जर प्रत्येक डेरीत एक राजहंस ठेवला, तर दुधातील भेसळ ओळखणं सोपं जाईल आणि भेसळमुक्त दुधाचे ‘राजहंस अभियान’ आपण खर्‍या अर्थानं यशस्वी करू…’

खरं तर मास्तरच्या बोलण्यावर एरवी भिवा, रामा आणि दामू हे नेहमी ‘क्रॉस’ करायचे; पण आज त्यांनीही हा विषय शिरियसली घेतला आणि ‘आ वासून’ विचार करायला सुरवात केली. हे पाहिल्यावर मग अण्णा पाटलालाही मास्तरचा मुद्दा पटल्यासारखा वाटला आणि डेरीचा चेअरमन या नात्याने त्याने तिथल्या तिथे ५० राजहंस पक्ष्यांच्या खरेदीसाठी मान्यता दिली आणि बैठक निकालात काढली. खरेदीचं काम मास्तरनं रामा, भिवा आणि दामू या तिघांवर ढकललं. ते काय काय करामती करतात ते वाचूया ! पुढल्या भागात. (क्रमश:)

आमदारकीचा विषय तसा अण्णाच्या जिव्हाळ्याचा होता. अनेक उपद्व्याप करणार्‍या अण्णाला आमदारकीचं तिकीट काही मिळालं नव्हतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आमदारकी मिळण्याचा विषय यायचा तेव्हा येवढा डेंजर अण्णा; पण लोण्यागत एकदम मऊ व्हायचा. त्याला आतल्याआत गुदगुल्या व्हायच्या… ही गोष्ट इरसाल मास्तरला चांगलीच ठाऊक होती. त्यामुळे अधूनमधून आपलं म्हणनं रेटण्यासाठी मास्तर आमदारकीची गोष्ट काढायचं आणि अण्णा त्या स्वप्नात वाहून जायचा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -