घरफिचर्ससाहसी बच्छेंद्री पाल

साहसी बच्छेंद्री पाल

Subscribe

भारताचे पहिले गिर्यारोहक आणि एव्हरेस्ट शिखर सर करणारे शेरपा तेनजिंग यांच्या पावलावर पाऊल ठेवत ३१ वर्षांनंतर देशाचं नाव गिर्यारोहनात तेजोमय करणारी देशाची पहिली महिला गिर्यारोहक बच्छेंद्री पाल यांनी गिर्यारोहनाचा इतिहास रचला तो आजचा दिवस. एव्हरेस्ट सर केल्याच्या २३ मे १९८४ या दिवशी सारा देश तेव्हा आनंदोत्सव साजरा करत होता. केवळ देशगौरव दिन म्हणून नव्हे तर तमाम महिला वर्गासाठी हा सन्मान दिवस होता. उत्तराखंडमधल्या उत्तर काशीतील नाकुरी गावात बच्छेंद्रींचा जन्म. लहानपणापासूनच त्यांना डोंगर चढण्याचा आणि शिखर पार करण्याचा शौक होता.

एम.ए.चे शिक्षण घेत असताना त्यांना एव्हरेस्ट सर करण्याची ओढ लागली. एव्हरेस्ट सर पार करण्यासाठी त्यांनी नेहरू पर्वतारोहण संस्थेत स्वत:ला दाखल करून घेतलं. या संस्थेत कठोर परिश्रम घेत त्यांनी एव्हरेस्ट चढाईचे प्रशिक्षण घेतले. याच प्रशिक्षणाच्या आधारे त्या शिखर पार करतील, यावर कोणाचाच भरोसा नव्हता. कारण बच्छेंद्रींच्या आधी अनेक महिलांनी शिखर पार करण्याचा प्रयत्न करून पाहिला; पण एकीलाही ते साहस यशस्वीरित्या पूर्ण करता आलं नाही. यातल्या अनेक महिला नावाजलेल्या गिर्यारोहक म्हणून यशस्वी ठरल्या होत्या. यामुळेच बच्छेंद्रींच्या हाती यश लागेल, याकडे कोणच विश्वासाने पाहत नव्हतं. पण निश्चय केला तर तो पूर्ण करायचा ध्यास घेणार्‍या महिला काहीही करू शकतात, याचा कित्ता बच्छेंद्रींनी गिरवला आणि भारताचे नाव गिर्यारोहनात शिखरावर पोहोचवले.

- Advertisement -

बच्छेंद्रींच्या आधी एव्हरेस्ट चढाईचा कार्यक्रम १६ मे १९८४ मध्ये आखला गेला. दिल्लीतील रेखा शर्मा यांनी एव्हरेस्ट चढाई करण्याचा निर्णय घेतला. बच्छेंद्रींच्या दलातील रेखा या हुरहुन्नरी आणि पाल यांच्या एक पाऊल पुढे असलेल्या महिला गिर्यारोहक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाई. पण एव्हरेस्टवरील बर्फाच्या वादळामुळे त्यांना ही मोहीम मध्येच सोडावी लागली. अखेर २३ मे हा तो दिवस उजाडला आणि बच्छेंद्रींनी आपल्या मोहिमेचा मुहूर्त काढला. पुरुषांच्या जोडीने महिला कदापि मागे नाहीत, हे बच्छेंद्रींच्या प्रयत्नांनी सार्‍या जगाला दाखवून दिलं. महिलांनी ठरवलं तर त्या काहीही साध्य करू शकतात, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिलं. ही मोहीम राबवताना बच्छेंद्रींना असंख्य अडचणी आल्या.

सारी मोहीमच जोखमीची होती. शेवटच्या टप्प्यात साडेसहा तासांची सलग चढाई करण्याचं आव्हान त्यांना पेलावं लागलं. यातच सहकारी गिर्यारोहकाच्या पायाला जखम झाल्याने ही चढाई अगदीच अडचणीची बनली होती. यातही त्यांनी चढाईत जराही कुचराई केली नाही. २३ मेच्या दुपारी १ वाजून सात मिनिटात एव्हरेस्ट सर करण्याचा बहुमान बच्छेंद्रींच्या मुकुटात विराजमान झाला. ‘माझे स्वप्न साकार झाले’, असं त्यांनी हर्षोल्हासात सांगून टाकलं.

- Advertisement -

हे शिखर चढण्याचा ध्यास घेतलेल्या बच्छेंद्री या मुळात पेशाने शिक्षिका. त्यांच्या नावावर शिखर सर केल्याचा किताब मिळाल्यावर त्यांना एका आयर्न अ‍ॅण्ड स्टिल कंपनीत क्रीडा सहाय्यक या पदावर रूजू करून घेण्यात आलं. एव्हरेस्ट सारखी शिखरं पार करण्यासाठी देशवासीयांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याच्या शब्दाखातर त्यांनी ही नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आज त्या टाटा स्टील अ‍ॅडव्हेन्चर फाऊंडेशन या संस्थेत गिर्यारोहण प्रशिक्षण देण्याचं काम करतात. बच्छेंद्रींच्या या सहासाला पाहून हरयाणातील इंडोतिबेटियन पोलीस दलातील सुश्री यादव यांनी १९९२ आणि १९९३ या दोन वर्षात सलग एव्हरेस्ट गाठण्याचा पराक्रम केला. अशा पर्वतरोही बच्छेंद्रींच्या नावावर असंख्य पुरस्कार नोंदले गेले आहेत.

भारतीय पर्वतारोन फाऊंडेशनचे सुवर्णपदक, १९८४चा पद्मश्री, १९८५चे उत्तर प्रदेश सरकारचा सुवर्णपदक, १९८६चा अर्जून पुरस्कार, कोलकाताचा लेडीज ग्रूप आवार्ड, १९९० गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, १९९४ केंद्राचा अ‍ॅडव्हेंचर आवार्ड, उत्तर प्रदेशचा यशभारती सन्मान, गडवाल विद्यापीठाची मानद पीएचडी या आणि अशा असंख्य पुरस्कारांचा गोतावळा बच्छेंद्रींच्या नावावर जमा आहे. बच्छेंदींच्या या साहसाला मानाचा सलाम…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -