आईबापाची लाडाची लेक !

आई-बाबा आणि मुलगी यांचे नाते कसे असते, या नात्याचे कंगोर कसे असतात. हे नाते कसे विकसित होत जाते, हे जाणून घेण्यासोबतच ते शब्दबद्ध करण्यासाठी अक्षरनामा डायमंड पब्लिकेशनच्या राम जगताप आणि भाग्यश्री भागवत यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आईबाबांकडून आपल्या लेकीच्या जन्मापासून ते तिला वाढवताना काय अनुभव आले आणि येत आहेत, याविषयीचे लेख असलेले ‘मायलेकी बापलेकी’, हे पुस्तक संपादित केले आहे. या पुस्तकात प्रामुख्याने लेखन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आईबाबांचा समावेश आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलींच्या जन्माची तयारी करण्यापासून त्यांचा जन्म होऊन त्यांच्या वाढण्याची प्रक्रिया यांचे उत्तम शब्दचित्र उभे केले आहे, त्यांचे अनुभव वाचताना असाच नवनिर्मितीचा अनुभव घेतलेल्या आईबाबांना हे तर आपलेच अनुभव आहेत, असे वाटल्यावाचून राहत नाही.

विवाहित स्त्री-पुरुषांच्या जीवनाला मूल झाल्यानंतर वेगळी कलाटणी मिळत असते, त्यांच्या स्वत:कडे आणि एकूणच जीवनाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलत असतो. काहीजणांचा प्रेमविवाह होतो तर काहींचा पारंपरिक पद्धतीने विवाह होतो, सुरुवातीचा काही काळ एकमेकांना समजून घेण्यात गेल्यानंतर पुढे सुरू होतो, नव्या जीवाला जन्म देण्याचा विचार. अलीकडच्या काळात आईवडील दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असल्यामुळे मूल होण्यापूर्वी नियोजन करावे लागते. कारण गर्भारपणा हे स्त्री-पुुरुषांसाठी आनंदाची घटना असली तरी त्यालाच लागून पुढील आव्हाने येत असतात. नव्या जीवाची चाहुल ही आनंद देत असते. जिच्या पोटात ते बाळ वाढत असते, तिला त्या मुलाच्या वाढीचा प्रत्यक्ष अनुभव येत असतो, तर तिच्या नवर्‍याला त्या गर्भार स्त्रीच्या सोबत राहून तिच्या नव्या अवस्थेत तिला समजून घेऊन तिच्या आनंदात सहभागी होताना तिचे मनोबल वाढवावे लागते. कारण मूल होणार ही सुंदर कल्पना असली तरी ते कसं होईल, सगळं व्यवस्थित पार पडेल ना, त्याला कुठलं व्यंग नसेल ना, सिझेरियन झालं तर खर्चाची तोंड मिळवणी कशी करत येईल, याची चिंता सतावत राहते.

विविध चिंतांचा समाना करत शेवटी बाईची आई होते, त्यानंतरचा प्रवास हा आईबाबांसाठी आनंदाचा आणि कुतुहलाने भरलेला असतो. जन्माला येणार्‍या नव्या बालकाच्या अनेक लीलांमध्ये आईवडील दंग होेऊन जातात. त्याचसोबत त्यांना अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागतात. यापूर्वी आपण जसे वागत होतो, त्यात बदल करावा लागतो. अधिक संवेदनशील आणि सौम्य व्हावे लागते. आपल्या समाजात मुलगी होण्याचे स्वागत करण्याची मानसिकता अलीकडे विकसित होत आहे, हा अत्यंत महत्वाचा सामाजिक बदल आहे. त्यामुळे आई आणि मुलगी यांचे नाते कसे असते, त्याचबरोबर बाबा आणि मुलगी यांचे नाते कसे असते, या नात्याचे कंगोर कसे असतात. हे नाते कसे विकसित होत जाते, हे जाणून घेण्यासोबतच ते शब्दबद्ध करण्यासाठी अक्षरनामा डायमंड पब्लिकेशनच्या राम जगताप आणि भाग्यश्री भागवत यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आईबाबांकडून आपल्या लेकींच्या जन्मापासून ते तिला वाढवताना काय अनुभव आले आणि येत आहेत, याविषयीचे लेख असलेले ‘मायलेकी बापलेकी’, हे पुस्तक संपादित केले आहे. या पुस्तकात प्रामुख्याने लेखन क्षेत्रात कार्यरत असलेल्या आईबाबांचा समावेश आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलींच्या जन्माची तयारी करण्यापासून त्यांचा जन्म होऊन त्यांच्या वाढण्याची प्रक्रिया यांचे उत्तम शब्दचित्रण केले आहे. त्यांचे अनुभव वाचताना असाच नवनिर्मितीचा अनुभव घेतलेल्या आईबाबांना हे तर आपलेच अनुभव आहेत, असे वाटल्यावाचून राहणार नाही, हे पुस्तक वाचताना आपण आईबाबा म्हणून आपल्याकडे नव्या दृष्टीकोनातून पाहू लागतो, मुलांचे संगोपन करणे हे जसे एक आव्हान असते तसाच त्यात किती तरी आनंद भरलेला आहे, हेही आपल्या लक्षात येेते.

राम जगताप यांनी या पुस्तकासाठी लेखकांचा बराच पाठपुरावा करून त्यांचे लेख चांगले दर्जेदार असे बनवून घेतले आहेत. या पुस्तकात मायलेकी आणि बापलेकी असे दोन विभाग आहेत. पहिल्या विभागात आई आणि मुलीचे संबंध कसे विकसित होत जातात याविषयी लेख आहेत, त्यात सोनाली कुलकर्णी, भक्ती चपळगावकर, ममता क्षेमकल्याणी, कीर्ती परचुरे, अमिता दरेकर, प्रिया सुशील, सीमा शेख-देसाई, नयना जाधव, अश्विनी काळे यांच्या लेखांचा समावेश आहे, तर दुसर्‍या भागात बाप आणि लेकीचे संबंध कसे असतात याविषयी लेख असून त्यात हृषीकेश गुप्ते, दासू वैद्य, किशोर रक्ताटे, राम जगताप, किरण केंद्रे, योगेश गायकवाड, सरफराज अहमद, आसिफ बागवान यांच्या लेखांचा समावेश आहे. या सगळ्यांनी आपल्या मुलींसोबतचा प्रवास अनेक बारकाव्यांसह टिपला आहे. त्यांनी अनुभवांचे शाब्दिक शूटिंग केले आहे, असे म्हणावयास हरकत नाही.

राम जगताप यांनी या पुस्तकाच्या संपादकीय मनोगतात या पुस्तकामागच्या निर्मितीची काय प्रेरणा आहे हेे सांगताना विद्या विद्वांस यांनी संपादित केलल्या ‘बापलेकी’ या पुस्तकाने आपण कसे भारावून गेलो, त्यानंतर या विषयाने आपल्या मनावर किती खोलवर आपली जागा निर्माण केली यांची माहिती दिली आहे. ही पुस्तक वाचून झाल्यानंतर बाप आणि लेक यांचे नाते कसे आणि किती हळुवार, अलवार, संवेदनशील असतं, याचा पहिल्यांदाच साक्षात्कार झाला, लेक हे प्रकरण बापासाठी किती जीवघेणं असतं हे जाणवलं, बापलेकीची ही दुनियाच तोवर माझ्यासाठी जवळपास पूर्णपणे अनोळखी होती, असे म्हटले आहे. हेच सूत्र या पुस्तकातील विविध लेखांमध्ये अधिक विस्ताराने आणि विविध कंगोर्‍यांसह साकार झाले आहे.

संपादकीय अनुषंगात गायक, संगीतकार आणि दंतवैद्य असलेले डॉ. आशुतोष जावडेकर म्हणतात, मुळात पालकत्व हे जाणीवपूर्वक करायचे काम आहे, हेच अनेकांच्या ध्यानात येत नाही. प्रेम केलं की मूल होतं, ते वाढतं आणि मग त्या मुलाला शाळेत घातल्यावर परीक्षेआधी त्याचा अभ्यास घेणं आणि त्याच्या प्रकल्पांना मदत करणं, म्हणजे पालकत्व असतं, असं अनेकांना नकळत वाटत असतं. ते काही चुकीचं नाही, पण अगदी अपुरं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपली मुलगी कावेरीविषयी म्हणतात, कावेरी गुणी आहे, गोड आहे, पण म्हणून तिला रागवायला लागत नाही, असं नाही. मी तिला खूपदा रागवते. फक्त मी ती सवय लावून घेतलेली नाही. खरं तर आईवडील म्हणून आपण नवखे असतो, तेव्हा आपल्याला मुलांचा अंदाज नसतो. बर्‍याच गोष्टी आपल्याला नव्याने समजून घ्याव्या लागतात.

लेखक, कवी, प्राध्यापक असलेले दासू वैद्य आपली मुलगी अन्वयीबद्दल सांगतात, आपण चारचाकी गाडी चालवायला लागलो की, दाही दिशांचा विचार करावा लागतो, मग गाडी चालवताना हळूवारपणा, संयतपणा, समजूतदारपणा असं सगळं अंगी यायला लागतं. तसं मुलगी झाली की, बापाच्या सगळ्या संवेदना जागृत होतात. हुरहुर, रुखरुख, हळवेपणा असं सगळं उगवून येतं. मुख्य म्हणजे, बापाला घर लहान वाटतं आणि मुलीला अंगण कमी पडतं. अक्षरनामाचे संपादक राम जगताप आपली मुलगी मुद्रा हिची काळजी आपण दोघं नवरा बायको कशी घेतो याबद्दल लिहिताना म्हणतात, लेकीला अंघोळ घालणं, सू-शी काढणं, जेवू घालणं ही काम आम्ही दोघंही करतो. आपल्या लेकीने सगळ्या भाज्या खाव्यात, अशी आपल्या पत्नीची इच्छा होती. मुद्रा त्याप्रमाणे खात असे. पत्रकार आसिफ बागवान आपल्या लेखात म्हणतात, बाप होणं ही केवळ एका नात्याची सुरुवात नसते, तर आपल्या जीवाचा एक अंश जन्माला आल्यानंतर होणारा तो नवनिर्मितीचा साक्षात्कार असतो. असे विविध अनुभव आपापल्या मुलींबद्दल आई आणि बाबांनी सांगितले आहेत, त्यामुळे हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

=संंपादक – राम जगताप, भाग्यश्री भागवत
=प्रकाशन – अक्षरनामा डायमंड पब्लिकेशन