चतुःरस्त्र व्यक्तिमत्व – प्रिया तेंडूलकर

बँक कर्मचारी, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, सूत्रसंचालिका अशा निरनिराळ्या भूमिका प्रिया तेंडूलकर यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.

Mumbai
death anniversary of actress Priya Tendulkar

बँक कर्मचारी, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, सूत्रसंचालिका अशा निरनिराळ्या भूमिका प्रिया तेंडूलकर यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. आज त्यांचा स्मृतिदिन. १९ ऑक्टोबर १९५४ रोजी प्रख्यात साहित्यिक व नाटककार विजय तेंडूलकर यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. वडील विजय तेंडूलकर हे प्रियांचे आदर्श होते. वडील-मुलीच्या नात्यापलिकडेही दोघांमध्ये मैत्रीचे नाते होते. लहानपणी प्रिया दुबळ्या लाजाळू आणि रडूबाई होत्या. प्रिया तेंडूलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. त्यानंतर प्रिया तेंडूलकर यांनी बँक कर्मचारी ते मॉडेल, हवाई सुंदरी, अभिनेत्री, साहित्यिका, पत्रकार, सूत्रसंचालिका अशा विविध क्षेत्रांत त्यांनी यशस्वी करिअर केले. वडिलांबरोबर त्यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण केले. पण त्यानंतर स्वतःच्या अभिनय कौशल्याने त्यांनी अल्पावधीतच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
‘तो एक राजहंस’ या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी ‘बेबी’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘कन्यादान’, ‘सखाराम बाईंडर’, ‘कमला’, ‘फुलराणी’, ‘गिधाडे’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी त्यांनी शिरिष पै यांच्या ‘कळी एक फुलत होती’ या नाटकात काम केले. पण या सर्वांत दूरदर्शन वरील ‘रजनी’ या कार्यक्रमाने प्रिया तेंडूलकर यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. मालिकेतील ‘रजनी’ने त्यांना घरोघरी पोहोचवले. बासू चॅटर्जींनी ‘रजनी’ या रोजच्या जीवनातील अन्यायाविरुद्ध लढणार्‍या सामान्य गृहिणीच्या मालिकेत प्रिया तेंडूलकर यांना काम करण्यास सांगितले. भारतीय मालिका विश्वातील त्या पहिल्या स्टार झाल्या. त्यानंतर प्रियांनी ‘अडोस-पडोस’, ‘खानदान’, ‘जिंदगी’, ‘बॅ. विनोद’, ‘हम पाँच’, ‘दामिनी’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाच्या आधारे आपल्यातील विविध पैलूंचे दर्शन घडवले. टेलिव्हिजनवरील मालिकांप्रमाणेच त्यांचा ‘प्रिया तेंडूलकर टॉक शो’ सुद्धा खूप प्रसिद्ध झाला. राजकीय व सामाजिक विषयांवर आधारित हा टॉक शो होता.
नाटकं, टेलिव्हिजनवरील अभिनयाबरोबरच प्रिया यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात देखील उत्कृष्ट कार्य केले. १९७४ साली ‘अंकुर’ चित्रपट बनवताना श्याम बेनेगल यांनी प्रिया तेंडूलकर यांना हिंदी चित्रपटात अभिनयाची संधी दिली. या चित्रपटातील अनंत नागच्या पत्नीच्या भूमिकेसाठी प्रिया यांची निवड करण्यात आली. अशाप्रकारे प्रिया यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. मराठी चित्रपटांतही प्रिया यांनी आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली. त्यामुळेच ‘गोंधळात गोंधळ’, ‘माळावरचं फूल’, ‘मायबाप’, ‘देवता’, ‘माझं सौभाग्य’, ‘राणीने डाव जिंकला’, ‘माहेरची माणसं’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘हे गीत जीवनाचे’ हे त्यांचे चित्रपट आजही चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहतात. मराठी, हिंदी प्रमाणेच प्रिया यांनी गुजराती चित्रपटांमध्येही दमदार भूमिका केल्या. त्यांच्या अभिनय कौशल्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
अभिनय कलेबरोबरच प्रिया या उत्तम चित्रकार आणि लेखिकासुद्धा होत्या. बी. ए. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रिया तेंडूलकर यांनी जे.जे. मधून चित्रकला विषयात दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले. पण केवळ चित्रकला विषयाचे शिक्षक एवढेच करिअर करायचे नसल्याने प्रिया या अभिनयाकडे वळल्या. वडील विजय तेंडूलकर यांच्या लेखन कलेचा वारसाही त्यांनी पुढे चालवला. ‘जन्मलेल्या प्रत्येकाला’ या त्यांच्या कथासंग्रहाला दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे ‘जगले जशी’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘जावे तिच्या वंशा’ या त्यांच्या पुस्तकांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला. अशा या चतुःरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या प्रिया तेंडूलकर यांचा वयाच्या ४८व्या वर्षी प्रभादेवी येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूया.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here