घरफिचर्सअतुलनीय साहसी लष्करप्रमुख

अतुलनीय साहसी लष्करप्रमुख

Subscribe

सैन्यातील अतुलनीय कामगिरीमुळे जनरल अरुणकुमार वैद्य यांना २ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक या सन्मानाने गौरविण्यात आले. सैन्यातील बहुमानाची पदके मिळविणारे जनरल अरुणकुमार वैद्य एकमेव मराठी लष्करी अधिकारी ठरले.

जनरल अरुणकुमार वैद्य. ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणार्‍या जनरल अरुणकुमार वैद्य यांचा आज स्मृतिदिन. भारतीय लष्करातील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना विविध पदकं, पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. २७ जानेवारी १९२७ रोजी अलिबागमध्ये अरुणकुमार वैद्य यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अलिबागचे जिल्हाधिकारी होते. त्यामुळे अरुणकुमार वैद्य यांचे सुरूवातीचं शिक्षण आणि बालपण अलिबागमध्ये गेलं. इंडस्ट्रीज हायस्कूल अलिबाग येथे त्यांचं प्राथमिक शिक्षण पार पडलं. पुढील शिक्षणासाठी त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश मिळवला. पुण्यातील रमणबागेतही चार वर्षे त्यांनी शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच अरुणकुमार यांना सैन्यात काम करण्याची ओढ निर्माण झाली. त्यासाठी प्रयत्न करत असतानाच १९४४ साली त्यांना इमर्जन्सी कमिशन मिळालं. त्यानंतर ३० जानेवारी १९४५ रोजी ते रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये कायम रुजू झाले. १९६५ चा खेमकरणचा पाकिस्तानबरोबरचा लढा मोठा अविस्मरणीय झाला. या लढ्यात अरुणकुमार वैद्य यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. त्या युद्धात पाकिस्तानची पहिली सशस्त्र तुकडी आत घुसली होती. या घुसखोरांचा सामना करत तिचा पराभव करण्यासाठी विशिष्ट व्यूहरचना आखण्यात आली होती. त्या व्यूहरचनेत अरुणकुमार वैद्य हे महत्वाचा दुवा ठरले. पाकिस्तानच्या या घुसखोरांना शह देण्यासाठी घोड्याच्या नालच्या आकाराची व्यूहरचना आखण्यात आली. तब्बल ३६ तास खेमकरणवर या व्यूहरचनेनुसार लढा देत भारताने अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले एम ४७ व एम ४८ हे प्रचंड रणगाडे त्यांनी खिळखिळे करुन टाकले. यावेळी डेक्कन हॉर्स जवळील जुन्या शेरमन रणगाड्याच्या सहाय्याने, खेमकरण विभागात पाकिस्तानचे ३६ रणगाडे उडवण्यात आले. त्यावेळी अरुणकुमार वैद्य हे रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. खेमकरणच्या लढ्यातील अतुलनीय शौर्याबद्दल अरुणकुमार वैद्य यांना ६ सप्टेंबर १९६५ रोजी महावीरचक्र (व्हिक्टोरिया क्रॉस सदृश) पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्रिपुरा, आसाममधील नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ईस्टर्न कमांडवर सोपविण्यात आली. या ईस्टर्न कमांडमध्ये अरुणकुमार वैद्य यांची बदली करण्यात आली होती. नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारीसुद्धा अरुणकुमार वैद्य यांनी पार पाडली. मोठ्या चातुर्याने योजनाबद्धरित्या नागांचा तथाकथित जनरल मोबू अंगामी व त्याच्या इतर सशस्त्र नागा साथीदारांना पकडण्यात अरुणकुमार वैद्य यांच्या ईस्टर्न कमांडला यश आलं. सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुखपदही अरुणकुमार वैद्य यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. १९७१ साली पुन्हा पाकिस्तानच्या सैन्याशी अरुणकुमार वैद्य यांचा सामना झाला. यावेळी वसंतार नदीवर पाकिस्तानच्या सैन्याशी झालेल्या लढाईत सोळाव्या सशस्त्र तुकडीचे प्रमुख अरुणकुमार वैद्य यांनी अतुलनीय लढत दिली. १९८३ मध्ये भारताचे सरसेनानी होईपर्यंत सोपवण्यात आलेली प्रत्येक कामगिरी अरुणकुमार वैद्य यांनी चातुर्याने पार पाडली. त्यांच्या कामगिरीची दखल घेत १ ऑगस्ट १९८३ रोजी अरुणकुमार वैद्य यांना भारताचे सरसेनानी म्हणून नियुक्त करण्यात आलं. जनरल अरुणकुमार वैद्य यांनी केलेली प्रत्येक कामगिरी वाखाणण्यासारखीच होती. अशीच एक कामगिरी त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर पार पाडली. ती म्हणजे, २० हजार फुटांवर सियाचीन प्रदेशात लढाईस तयार करण्यात आलेली हिंदी सेना होय. याशिवाय रशियन बनावटीचा टी-७२ बरोबरीचा अर्जुन रणगाडा त्यांनी तयार केला. १ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६ पर्यंत ते जनरल या हुद्यावर भारतीय लष्करप्रमुख म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचं यशही अरुणकुमार वैद्या यांच्या नेतृत्वाखाली प्राप्त झालं. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वात खलिस्तानवाद्यांनी मांडलेला उद्रेक मुळापासून नष्ट करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारची घोषणा केली. या मोहिमेची जबाबदारी त्यांनी अरुणकुमार वैद्य यांच्याकडे सोपवली. वैद्य यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी केले. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे सूत्र खुद्द जनरल अरुणकुमार वैद्य यांनी आखून दिले होते. त्यानंतर पुण्यात आरोही बंगला बांधून पत्नी आणि मुलींसह ते पुण्यात रहायला आले. जनरल अरुणकुमार वैद्य यांना वाचनाबरोबर संगीत ऐकणे आणि रोज घोड्यावरून रपेट मारण्याचा छंद होता. या काळात ऑपरेशन ब्ल्यू स्टारमधील कामगिरीमुळे त्यांना धमकीवजा पत्रे येत होती. त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने एक अंगरक्षक तैनात केला होता, पण १० ऑगस्ट १९८६ रोजी दोन शिख तरूणांनी जनरल अरुणकुमार यांची त्यांच्याच गाडीत हत्या केली. याआधी इंदिराजींची हत्या ३१ आक्टोरबर १९८४ रोजी करण्यात आली. सैन्यातील अतुलनीय कामगिरीमुळे जनरल अरुणकुमार वैद्य यांना २ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक या सन्मानाने गौरविण्यात आले. सैन्यातील बहुमानाची पदके मिळविणारे जनरल अरुणकुमार वैद्य एकमेव मराठी लष्करी अधिकारी ठरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -