किराणा घराण्याचे वारसदार – सवाई गंधर्व

ज्यांच्या नावाने पुण्याचा संगीत महोत्सव भारतातच नव्हे तर देशभर गाजतो आहे ते सवाई गंधर्व उर्फ रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांचा आज स्मृतिदिन.

Mumbai
sawai gandharva ramchandra kundgolkar
सवाई गंधर्व

ज्यांच्या नावाने पुण्याचा संगीत महोत्सव भारतातच नव्हे तर देशभर गाजतो आहे ते सवाई गंधर्व उर्फ रामचंद्र गणेश कुंदगोळकर यांचा आज स्मृतिदिन. १९ जानेवारी १८८६ रोजी हुबळी जवळच्या कुंदगोळ या गावी सवाई गंधर्वांचा जन्म. उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे ते शिष्य. आपल्या गायिकीतील कर्तृत्वाने त्यांनी आपल्या गुरुंचे तसेच किराणा घराण्याचे नाव उज्ज्वल केले. भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे ते गुरु. उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब यांनी जवळ जवळ ८ वर्षे गाण्याची तालीम देऊन सवाई गंधर्वांना घडवले. साधारण १९०८ पासून सवाई गंधर्व रामभाऊ रंगभूमीकडे वळले. ह.ना.आपटे यांच्या ‘संत सखू’ नाटकातील भूमिकेमुळे रामचंद्र कुंदगोळकर प्रसिद्धीझोतात आले. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस भूमिका गाजवल्या. यामध्ये ‘सुभद्रा’, ‘सखूबाई’, ‘तारा’, ‘द्रौपदी’,‘कृष्ण’, ‘मीरा’ इत्यादी भूमिका त्यांनी अजरामर केल्या. रंगभूमीवर त्यांनी अजरामर केलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. यामध्ये ‘सौभद्र’ नाटकातील त्यांच्या सुभद्रेच्या भूमिकेने अमरावतीकरांना भुरळ पाडली. त्यावेळी ‘सौभद्र’च्या एका प्रयोगाला शिर्डीच्या साईबाबांचे भक्त असलेल्या दादासाहेब खापर्डे हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी रामचंद्र कुंदगोळकर यांना ‘सवाई गंधर्व’ या बिरुदावलीने सन्मानित केले. पुढे रामचंद्र कुंदगोळकर हे ‘सवाई गंधर्व’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. १९२८ साली गोविंदराव टेंबे यांच्या ‘तुलसीदास’ या नाटकातील ‘रामरंगी मन रंगले’ हे पद सवाई गंधर्वांनी गाजवले. आपल्या बैठकीतून ख्यालाबरोबरच ठुमरी भजन नाट्यसंगीत सवाई गंधर्व आवर्जून म्हणत. १९४० ते ४५ दरम्यान त्यांच्या शंकरा, भैरवी, देसकार, मियाँमल्हार, सूरमल्हार, अडाणा, तिलंग, पूरियाधनाश्री या रागांच्या ध्वनिमुद्रिका खूप लोकप्रिय झाल्या.
पुण्याचे आबासाहेब मुजुमदार यांच्या घरी त्याचप्रमाणे गिरगाव, हैद्राबाद मिरजेच्या दर्ग्यासमोर त्यांच्या गाण्याच्या अनेक बैठका गाजल्या. पं. रामकृष्णबुवा वझे, केशवराव भोसले, फैयाज खाँ यांसारख्या दिग्गजांनी सवाई गंधर्वांच्या गायनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. त्यांनी गायलेली तोडी आणि अनेक विविध रागामधील बंदिशी सर्वश्रुत आहेत. १९५३ पासून सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ पुण्यात महोत्सवाचे आयोजन करण्यास सुरुवात झाली. ५ नोव्हेंबर १९५३ रोजी पुण्यात पहिला सवाई गंधर्व महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आताही या महोत्सवाला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. १३ डिसेंबर १९८० रोजी सवाई गंधर्व यांचा तानपुरा पुण्यातील राज केळकर संग्रहालयाला गानहीरा हिराबाईंच्या हस्ते भेट देण्यात आला. सवाई गंधर्वांनी आयुष्यभर गायन कलेची सेवा केली. आयुष्यात विविध मानसन्मान मिळून यशाच्या कीर्तीवर पोहोचूनदेखील सवाई गंधर्व अहंपणापासून नेहमीच दूर राहिले. एवढेच नाही तर आपल्याकडील गानविद्येचे धडे शिष्यांना देत त्यांनी पुढची पिढी तयार केली. पंडीत भीमसेन जोशी, पंडीत फिरोज दस्तूर, पंडीत संगमेश्वर गुरव इत्यादी मान्यवर शिष्यवर्ग त्यांच्या शिकवणीतूनच नावरूपास आला. गुरू रामचंद्र कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्याप्रमाणेच त्यांच्या शिष्यांनीदेखील गायन कलेची सेवा करत किराणा घराण्याची पताका जगावर फडकवत ठेवली. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये पक्षाघाताने विकलांग होऊनसुद्धा त्यांच्या डोक्यात गाणं पक्क राहिलं. त्यामुळे पक्षाघात होऊनदेखील त्यांनी आपल्या शिष्यांकडे दुर्लक्ष केलं नाही. शिष्यांना मार्गदर्शन करणं त्यांनी सोडलं नाही. त्यांच्या शिष्यांसह त्यांचे जावई नानासाहेब देशपांडे यांनी त्यांच्या गाण्याचा वारसा पुढे चालवला. १२ सप्टेंबर १९५२ रोजी थोर गायक सवाई गंधर्व यांनी जगाचा निरोप घेतला.