घरफिचर्सजीवनवादी लेखक - विष्णू सखाराम खांडेकर

जीवनवादी लेखक – विष्णू सखाराम खांडेकर

Subscribe

कोटिबाजपणा, वास्तववादी, व्यामिश्र आणि प्रयोगशील अशी लेखनाची वैशिष्ठ्ये असलेल्या श्रेष्ठ कादंबरीकार, लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांचा आज स्मृतिदिन. १९७४ साली साहित्यातील ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. साहित्यातील कारकीर्द लक्षात घेऊन भारत सरकारनेदेखील त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरवले.

कोटिबाजपणा, वास्तववादी, व्यामिश्र आणि प्रयोगशील अशी लेखनाची वैशिष्ठ्ये असलेल्या श्रेष्ठ कादंबरीकार, लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांचा आज स्मृतिदिन. ११ जानेवारी १८९८ रोजी सांगली येथे त्यांचा जन्म झाला. गणेश आत्माराम खांडेकर हे त्यांचे मूळ नाव. त्यांचे वडील आत्माराम बळवंतराव खांडेकर यांचे १९११ रोजी निधन झाले. आत्माराम खांडेकर यांचे चुलत भाऊ सखाराम खांडेकर यांनी गणेश आत्माराम खांडेकर यांना दत्तक घेतले. त्यानंतर ते विष्णू सखाराम खांडेकर या नावाने ओळखले जाऊ लागले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांनी आठवा क्रमांक पटकावला. मॅट्रिकमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. येथे फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. या काळात त्यांचा परिचय बालकवी, गणपतराव बोडस, अच्युतराव कोल्हटकर इत्यादी साहित्यिकांशी झाला. याच काळात त्यांनी लेखनालासुद्धा सुरुवात केली. ‘रमणीरत्न’ हे पहिले नाटक त्यांनी लिहिले. पण बिकट परिस्थितीमुळे इंटरच्या वर्गातच त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. महाविद्यालय सोडल्यावर सावंतवाडीत राहणार्‍या आपल्या बहिणीकडे ते राहू लागले. इ. स. १९२० मध्ये सिंधुदुर्गातील शिरोडे या गावी त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. इ. स. १९३८ पर्यंत त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. शिरोड्यातील ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी करत असतानाच लवकरच ते मुख्याध्यापक सुद्धा झाले. शिरोड्याचा त्यांचा काळ उमेदीचा होता. या १९१९ नंतर शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी विपुल लेखन केले. कादंबरी, लेख, विनोदी साहित्य, काव्य असे सर्वच साहित्य प्रकारात त्यांनी उत्कृष्ट लिखाण केले. १९३८ नंतर ते कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले. ‘उल्का’, ‘दोन ध्रुव’, ‘कांचनमृग’, ‘हृदयाची हाक’, ‘दोन मने’, ‘हिरवा चाफा’, ‘पांढरे ढग’, ‘पहिले प्रेम’, ‘रिकामा देव्हारा,’ ‘अश्रू’, ‘क्रोंचवध’, ‘जळलेला मोहोर’, ‘ययाती’, ‘अमृतवेल’, या त्यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध कादंबर्‍या होत. याशिवाय त्यांनी लिहिलेले ‘वायूलहरी’, ‘सायंकाळ’, ‘मंदाकिनी’, ‘अविनाश’, ‘चांदण्या’ यासारखे तीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘वनभोजन’, ‘फुल आणि काटे’, ‘गोकर्णीची फुले’, ‘धुंर्धुमास’, ‘गोफ आणि गोफण’ या लेखांबरोबरच आगरकर आणि गडकरी यांच्या चरित्रांबरोबर वाडमयाचे संग्रह प्रकाशित झाले आहेत. वि. स. खांडेकर यांनी चित्रपटांसाठीही लेखन केले. ‘माझं बाळ’, ‘लग्नं पहावं करून’, ‘सरकारी पाहुणा’, ‘ज्वाला’, ‘सुखाचा शोध’ या चित्रपटांच्या कथांप्रमाणेच चित्रपटांमधील संवाद गीत लेखनसुद्धा त्यांनी केले. तल्लख कल्पनाशक्तीच्या आधारे तेजस्वी लिखाण करत मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणं हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. त्यांच्या लेखनातून माणुसकी तसेच माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. खांडेकरांच्या कथांमधून होणारे जीवनदर्शन आणि ध्येयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात. त्यामुळेच वि. स. खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय भाषांमध्ये तसेच विदेशी भाषांमध्येदेखील अनुवाद झाले. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटकं, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि अनेक टीका टिपण्या त्यांनी लिहिल्या आहेत. १९७४ साली साहित्यातील ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. साहित्यातील कारकीर्द लक्षात घेऊन भारत सरकारनेदेखील त्यांना ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरवले. ‘ययाती’ या कादंबरीसाठी त्यांना १९६० साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही पदवी बहाल केली. सोलापूरमध्ये १९४१ रोजी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. २ सप्टेंबर १९७६ रोजी या ज्येष्ठ साहित्यिकाचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -