घरफिचर्सदेड गल्ली एक टपोरी बाजार

देड गल्ली एक टपोरी बाजार

Subscribe

नावातच टपोरीपणा दिसतो ना? खरंय देड गल्ली हे मार्केट खरंच मुंबईच्या टपोरींचे मार्केट आहे. जे मार्केट भल्या पहाटे म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर सुरू होते आणि मुंबईत चहलपहल सुरू झाली की बंद होते ते मार्केट टपोरींचेच असू शकते ना? कामाठीपुरात, अलेक्झांडर सिनेमाच्या मागील गल्लीत हा बाजार भरतो. हे मार्केट किती सालापासून भरते याचा इतिहास नाही; पण काहीजण सांगतात, हे मार्केट 1956 सालापासून भरते. तर काहीजणांच्या मते ते 1972 सालापासून अस्तित्वात आले. खरं, खोटं कोणालाही माहीत नाही. त्यामुळे टपोरींचे हे मार्केट तितकंच गुमनाम आहे.

या बाजाराला इतिहास काहीच नाही. पण दंतकथा भरपूर आहेत. कामाठीपुरा हा रेडलाईट एरिया. येथे रात्री रंगरलिया करण्यासाठी लोक येतात. साधारणतः सकाळी 3 वाजेपर्यंत येथे रेलचेल असते, त्यानंतर हळूहळू सर्व झोपी जातात. त्यामुळे साडेतीन वाजता येथे बाजार भरायचा, म्हणजे येथील वारांगना, त्याची गिर्‍हाईक हे सकाळी खरेदी करून झोपायला निघून जातील, अशा हेतूने हा बाजार सुरू झाला ही पहिली दंतकथा आहे. दुसरे म्हणजे मुंबईतील भुरट्या चोरांना चोरीचा माल विकायला कुठे सुरक्षित जागा नव्हती. भल्या पहाटे, जेव्हा पोलिसही पेंगलेले असतात, तेव्हा वर्दळ असलेला हा एकमेव मुंबईतील भाग होता, त्यामुळे त्यांनी येथे आपला चोरीचा माल विकायला सुरुवात केली आणि देड गल्ली हे मार्केट तयार झाले. अशा अनेक दंतकथा आता सांगितल्या जातात. मी 1988 साली पहिल्यांदा या बाजारात गेलो.

गिरगावमध्ये राहणार्‍या माझ्या एका कॉलेज मित्राने कामाठीपुरात सकाळी साडेतीन वाजता एक बाजार भरतो आणि सकाळी 6 वाजता तो उठतो अशी माहिती दिली होती. या बाजारात बूट, सँडल, घड्याळ स्वस्त मिळतात, असेही सांगितले होते. त्यामुळे आम्ही या बाजारात जाणे निश्चित केले. पण अडचणी खूप होत्या. सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे कामाठीपुरासारखा बदनाम एरिया. त्या काळात कामाठीपुरात जायचे म्हटल्यावरच धडकी भरायची. त्यातही आम्ही कामाठीपुर्‍यात गेलो होतो हे घरच्यांना कळले तर काही खैर नव्हती. दुसरे म्हणजे सकाळी साडेतीन वाजता तेथे जाण्यासाठी घरी काय सांगणार? वाहन कुठून आणणार? एक नाही अनेक समस्या. पण निदान हा बाजार बघण्यासाठी तरी तेथे जायचे हे निश्चित झाले.

- Advertisement -

गिरगावमधील मित्राच्या घरचे एक दिवस गावाला गेल्यावर आम्ही पाच मित्रांनी रात्री त्याच्या घरी राहायचे आणि पहाटे तेथे जायचे असे ठरले. सकाळी अडीच वाजता आम्ही त्याच्या घरातून निघालो. चालतच, कोणी बघत नाहीना याची काळजी घेत कामाठीपुरात शिरलो. सकाळी ठीक साडेतीन वाजता रस्त्यावर फेरीवाले बसू लागले. मोठमोठया गोणीतून चप्पल, सँडल, बूट ओतले जाऊ लागले. सगळा ब्रॅण्डेड माल, त्यावेळी बाटा, पुमा, रेड टेप अशा ब्रॅण्डचे शूज, फक्त शंभर रुपये. एचएमटी, कॅसिओ अशा बँडची घड्याळे अक्षरशः तेथे ओतली होती. त्यावेळी आम्हाला खरेदी करायची आणि मार्केटमध्ये थांबायचे नाही, लगेच निघून जायचे असा दम तेथील विक्रेत्याने भरला होता. कारण पोलिसांची धाड पडण्याची शक्यता होती, त्यामुळे आम्ही प्रथम सर्व मार्केट अगोदर फिरून घेतले. सर्वात शेवटी शूज खरेदी करून मग तेथून अक्षरशः पळ काढला होता. पण त्या दिवसानंतर मात्र देड गल्ली नेहमीची झाली. तिथे विक्री करणारे, सांगलीचे बाबू काका तर आमचे फेव्हरेट होते. त्या टपोरी बाजारातही आम्हाला ते उधारीवर माल द्यायचे. तर असा हा देड गल्ली बाजार, आता खूपच वधारला आहे, पूर्वी दक्षिण मुंबईत राहणारे, त्यातही गरीब लोक या बाजारात यायचे.

आता मुंबई उपनगर, ठाणे, पालघर येथून तरुण या बाजारात येतात, आता या बाजारात पोलिसांची धाड पडत नाही. तर या बाजारात शूज, चप्पल, सँडल मिळतात. इंपोर्टेड ब्रॅण्डचे, तेही खूप स्वस्तात. अर्थात काही वापरलेले, काही ब्रँड न्यू, आपले नशीब असेल तसे. हा टपोरी बाजार आहे, येथे काहीच खरे नसते, म्हणजे तुम्ही ब्रॅण्डेड शूज विकत घेतले आणि तेथून बाहेर पडल्यावर ते डुप्लिकेट आहेत आणि तुमचा पैसा पाण्यात गेला असेही अनेकदा होते. येथे अर्थातच भाव होतो. तो तुम्हाला करता यावा लागतो, थोडक्यात काय तर तुम्ही स्वतः टपोरी असलात तर या बाजारात तुम्हाला, तुमच्या किमतीत खूप चांगली वस्तू मिळू शकते. अर्थात हा टपोरीपणा तुमच्या अंगात जन्मजात नसतो. तुम्ही वारंवार या बाजारात गेलात की तो आपोआप येतो. आता तर या बाजारात जाण्यासाठी सकाळी भायखळा स्टेशनहून शेअर टॅक्सीही मिळते, 10 रुपये सीट. मुंबईतील या टपोरी मार्केटला कधीतरी नक्की भेट द्या.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -