‘फिरसे दिल्ली दूर’च !

लोकसभेचे नाशिक व दिंडोरी मतदारसंघ राखण्यासाठी अनुक्रमे शिवसेना व भाजप पक्षांमध्ये गणिते जुळवली जात आहेत. तथापि, दोन्ही ठिकाणी प्रतिनिधीत्व करणार्‍या हेमंत गोडसे व हरिश्चंद्र चव्हाणांना ‘फिरसे दिल्ली दूर है’ च्या प्रमेयाला सामोरे जावे लागण्याची शक्यता गडद झाली आहे. त्यामागे पक्षांतर्गत यादवी, कार्यकाळात दुरावलेले स्वकीय, जनभावनांच्या अपेक्षेनुरूप न झालेली कामगिरी, श्रेष्ठींची नाक मुरडणी आदी कारणे आहेत. शिवाय, गोडसेंनी पाच आणि चव्हाणांनी पंधरा वर्षांत काय कार्यकर्तृत्व गाजवले, याचा हिशेब मतदारराजाला द्यावा लागणार आहे. अर्थात, दोन्ही ठिकाणी प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही विजयासाठी मोठ्या प्रमाणात घाम गाळावा लागणार आहे. कारण सत्ताधार्‍यांच्या दुर्लक्षाने दुखावलेली जनता केवळ मोदी-फडणवीसांना शिव्या देऊन आत्मानंदाच्या गुदगुल्या अनुभवणार्‍या विरोधकांना सहानुभूती म्हणून मतांचा जोगवा बहाल करतील, एवढी सोपी स्थिती सध्या नाही..

Nashik
parliament

मिलिंद सजगुरे, नाशिक

सतराव्या लोकसभा निवडणूकांची लगीनघाई सर्वत्र सुरू आहे. केंद्रातील एनडीए प्रणित नरेंद्र मोदी सरकारला येनकेन प्रकारे पुन: सत्ताप्राप्ती करायचीय, तर महाआघाडीची वज्रमूठ तयार करून मोदींना पदच्युत करण्याची ‘आण’ देशातील तमाम विरोधकांनी घेतली आहे. या निवडणूकीचे पडघम राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणार्‍या नाशिक जिल्ह्यात न उमटल्यास नवलच. जिल्ह्याचा विचार करता सध्या इथे भाजप-शिवसेना या नावाला असलेल्या युतीचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बर्‍यापैकी तग धरून आहे, तर काँग्रेस, मनसे या पक्षांची अवस्था बिकट आहे. कळवण-सुरगाणा विधानसभा क्षेत्रांत जे.पी. गावितांमुळे लाल बावटा अस्तित्व राखून आहे. अर्थात, विद्यमान सत्तापदांची मिळकत सरासरी पाच वर्षांची असल्याने तिची उद्याच्या लोकसभा निवडणूकीतील विजयाशी सांगड घालणे दूरदृष्टी आणि व्यावहारिकतेला छेद दिल्याप्रमाणे ठरेल.

लोकसभा क्षेत्रांचा विचार करता जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघ अस्तित्वात आहेत. पैकी धुळे मतदारसंघात जिल्ह्यातील केवळ तीन विधानसभा क्षेत्र मोडतात. नाशिकचा विचार केल्यास तीन ठिकाणी कमळाचे, दोन ठिकाणी धनुष्यबाणाचे तर एका क्षेत्रात पंजाचे अस्तित्व आहे. सध्या येथील सुभेदारी शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांच्याकडे आहे. स्वाभाविकच आताच्या निवडणुकीला गोडसेंची उमेदवारी पक्की समजण्यात येते. गतवेळी राष्ट्रवादीचे बाहुबली नेते छगन भुजबळ यांना धूळ चारण्याची किमया साधून ‘जायंट किलर’ ठरलेल्या गोडसेंना टक्कर द्यायला यंदा माजी खासदार समीर भुजबळ यांचे नाव अग्रभागी आहे. दुसर्‍यांदा विजयरथावर स्वार होऊन नाशकात इतिहास घडवण्याबाबत गोडसे यांचा आत्मविश्वास अगदी शिखरस्थानी पोहचल्याचे सांगण्यात येते. पाच वर्षांपूर्वी निवडणूक काळात भुजबळ आणि कंपनीला विशिष्ट खुशमस्कर्‍या कंपूने घेरत त्यांची दिशाभूल केली होती. परिणामी, वस्तुस्थितीपासून दूर ठेवणार्‍या कंपूमुळे बेसावध राहिलेल्या भुजबळांसारख्या मुरब्बी नेत्याला मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला. यावेळी तसाच गराडा गोडसे यांच्याभोवती जमलेला दिसतो. म्हणूनच अजून कशात काही नसताना ते ‘समोर कुणीही असो, आपला विजय पक्का आहे’ अशी खात्री देत असल्याचे सांगण्यात येते. मुळात, कोणत्याही लढाईत योध्द्यासोबत आधी घरातील मंडळी मनोमन सोबत असावी लागते. गोडसे ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करताहेत, तिथे त्यांच्या उमेदवारीबाबत एकमत आहे का, याचा ठाव बहुधा त्यांनी घेतला नसावा. अगदी ‘मातोश्री’चे मध्यस्थही त्यांच्याबाबत सकारात्मक नसल्याचे सांगण्यात येते. मग केवळ समोर समीर भुजबळ आहेत, म्हणून मनात विजयाचे मनोरे रचण्याची भाषा गोडसे करीत असतील, तर ते वस्तुस्थिती पडद्यामागे टाकताहेत, अशी खुद्द त्यांच्याच पक्षात चर्चा आहे.

भुजबळ काका-पुतणे तुरूंगवास भोगून आले आहेत. त्यांच्या तुरूंगवारीमागील कारणांबाबतही वाद-प्रवाद आहेत. तथापि, बाहेर आल्यानंतर त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचे जाणवले नाही. उलट गतकाळातील चुका सुधारत, खुशमस्कर्‍यांना बाजूला सारत त्यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. अगदी पक्षांतर्गत विरोधकांपासून ते विरोधी पक्षातील मंडळीपर्यंत सार्वत्रिक साखरपेरणी करण्यात ते व्यस्त आहेत, जे राजकीय परिपक्वतेचे एक लक्षण मानले जाते. आजची मशागत त्यांना उद्याच्या निवडणूकीत कामी आल्यास नवल नाही. या सगळ्या मुद्द्यांवर गोडसे अंतर्मुख झाल्यास त्यांच्यात ‘फिरसे दिल्ली बहोत दूर है’ चीं किमान भावना निर्माण होईल आणि त्यांचे विमान जमीनीवर येईल. अर्थात, गोडसे काय अथवा भुजबळ, लढाई आपल्यासाठी सोपी नाही, याचे दोहोंनी भान राखणे सध्या तरी इष्ट ठरणार आहे.

हरिश्चंद्रांचीही वाटचाल बिकट…

नाशिकलगतचा दिंडोरी मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. इथे भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण सलग तीन टर्मपासून कमळ फुलवण्यात यशस्वी झाले आहेत. अर्थात, या मतदारसंघात भाजपचे अस्तित्व नगण्य असूनही केवळ वैयक्तिक संबंधांमुळे त्यांना ही मजल मारता आली. या मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस तर प्रत्येकी एकात शिवसेना, माकप व भाजपचा झेंडा फडकतो आहे. यंदा हरिश्चंद्र चव्हाणांना उमेदवारी मिळवण्यापासून संघर्ष करावा लागतो आहे, विजयाचे गणित तर दूरच. पक्षक्षेष्ठी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हिसाब-किताब मागत आहेत. पक्ष किती वाढवला, केंद्र-राज्य सरकारच्या निर्णयांना जनतेपर्यंत कितपत पोहचवले अशा प्रश्नांच्या सरबत्तीला त्यांना मुंबई दरबारी सामोरे जावे लागल्याने त्यांना सूचक इशारा प्राप्त झाला आहे. स्वाभाविक ते पक्षाची पसंती असतील की नाही, याबाबत शंका आहे. ऐनवेळी इथे वेगळा चेहरा कमळावर स्वार होण्याची चिन्हे आहेत.

भाजपप्रमाणेच वरवर प्रबळ वाटणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सारे आलबेल नाही. पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष तथा गतवेळप्रमाणेच यंदाही उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार म्हणून गणल्या जाणार्‍या डॉ. भारती पवार यांना ‘गृहकलहा’चा सामना करावा लागतोय. पक्षातील यादवी पराकोटीला पोहचल्याच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांच्या मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्यात येऊन डॉ. पवार यांच्या उमेदवारी अनिश्चिततेत आणखी अंतर निर्माण झाले आहे. महालेंच्या पक्षप्रवेशामागे नेमके कोण आहे, याचीही खमंग चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकदही लक्षणीय आहे. तथापि, त्यांच्यातील ऐक्य आणि युतीची भावना या दोन मुद्द्यांवर भाजप उमेदवाराच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.