घरफिचर्सलोकशाही आणि डोंबाऱ्याचा खेळ!

लोकशाही आणि डोंबाऱ्याचा खेळ!

Subscribe

गावात डोंबारी येतो...सोबत त्याचे माकड असते. पार बिर बघून, चार लोक निवांत बसलेली आणि पोरं टोरं खेळत असलेली ओळखून डोंबारी खेळ सुरू करतो... त्याचा डमरू वाजू लागतो. बच्चे लोग तालिया बजाव! आमचा बाबुराव आता बाजाराला जातो, पिशवी भरून सामान आणतो, डोक्यावर टोपी खालून सभेला जातो... बघा,बघा... बजाव ताली! बाबूराव : दादा, मामा, ताई, अक्का, सोनू, मोनूला सलाम कर! आणि बाबुराव कडक सॅल्युट मारतो... हो रे मेरे गब्बरू! शाबास... मेरे भाई लोग बाबूराव के वास्ते तालिया बजाव... पाच, दहा रुपये आणि सुपभर धान्य घेऊन डोंबारी पुढच्या गावाला निघतो. हाच खेळ पुन्हा दाखवण्यासाठी! प्रचंड संघर्ष करून मिळवलेल्या भारताची संसदीय लोकशाहीचाही आज असाच राजकारण्यांनी डोबार्‍यांचा खेळ केलाय आणि मतदारांना दर पाच वर्षांनी फसवले जात आहेत. चला तर हा खेळ पाहू आणि टाळ्या वाजवू...

लाल किल्ला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण – चार वर्षांत अवकाशात तिरंगा. नवा भारत घडवण्यासाठी देह आणि आत्म्याचे ऐक्य आम्ही साधले आहे. गगनयानमधून स्वबळावर पहिला अंतराळवीर अवकाशात उडेल, असे स्वप्न दाखवून मोदींनी ८० मिनिटांच्या भाषणात आयुष्यमान भारत, तिहेरी तलाक रोखणार ते काश्मीरमध्ये गोली आणि गालीने नव्हे तर बंधूभावाने पुढचे पाऊल टाकणार, असा अटलबिहारी वाजपेयी यांचा आदर्श ठेवत शांतीचा सूर लावला. सोबत गेल्या चार वर्षांतील एनडीए सरकारच्या योजनांचा पाढा वाचला….

लाल किल्यावरून १५० कोटी लोकांना हा आशेचा खेळ दाखवत मोदींनी २०१९ च्या निवडणुकांचा डमरू वाजवला. तो सुद्धा डोक्यावर भगवा फेटा बांधून! निवडणुकांत पुन्हा एकदा ‘हिंदू’ म्हणून मतदारांना साद घालण्याचा हा प्रकार आहे. पुण्यात सुरू झालेले ‘पगडी’चे राजकारण आता लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले आहे. काँग्रेसने साठ वर्षांत काहीच केले नाही व २०१३ पर्यंत विकासाचा वेग साफ मंदावला होता, अशी टीका पंतप्रधानांनी केली. मात्र नोटाबंदीचे परिणाम आणि परराष्ट्र धोरण याविषयी ते मूग गिळून गप्प बसले. जनता आता प्रामाणिकपणे कर भरतेय व त्यांच्यामुळेच देशाच्या योजना चालतात हे बरोबर आहे, पण जनतेने प्रामाणिकपणे भरलेल्या करांची लूट करून नीरव मोदीसारखे उद्योगपती पळून गेले ही देशाची लूट आहे. याच प्रामाणिक करदात्यांच्या पैशांतून पंतप्रधान परदेश दौरे करतात व चार हजार कोटीवर भाजपच्या जाहिरातबाजीवर खर्च झाले. जनतेच्या योजनांचाच पैसा त्यात उडाला. दोन वर्षांपूर्वी ते ‘नोटाबंदी’वर बोलले होते. नोटाबंदीमुळे कश्मीरातील दहशतवाद व बनावट नोटा छापण्याचे प्रकार बंद झाले असे ते दणकून म्हणाले होते, पण उलटेच घडले. ‘नोटाबंदी’चा परिणाम असा की, कश्मीरात आतंकवाद वाढला…हे पंतप्रधानांचे भाषण होते की मग्न तळ्याकाठी बसून म्हटलेले स्वागत होते… काय बुवा कळत नाही. नजरेचा सारा खेळ! वाजवा टाळ्या!!
…..
मंत्रालय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे १५ ऑगस्टचे भाषण – शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्राची देशात प्रथम कामगिरी. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत १६ हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून येत्या काही दिवसांमध्ये एकूण २५ हजार गावे पाण्याने सुजलाम सुफलाम होतील. गेल्या दोन वर्षांत देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी ४२ ते ४७ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून ८ लाख इतके देशातील सर्वाधिक रोजगार राज्यात निर्माण झाले आहेत. हा नजरबंदीचा खेळ करत पुरोगामी वारसा जपू या, असे आवाहन करत फुले,शाहू, आंबेडकर यांची आठवण काढत जात, धर्माच्या पलीकडे महाराष्ट्र नेऊ…असे भावनिक आवाहन. चारावर एक फ्री! वाजवा टाळ्या.

- Advertisement -

फडणवीस यांची जलयुक्त शिवार योजना उत्तम, पण तिचे अपेक्षित परिणाम दिसलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. या योजनेवर सरकारी छाप बसल्याने कागदोपत्री आकड्यांचे खेळ झाले. उलट आमिर खानच्या वॉटर कप स्पर्धेत चांगले परिणाम दिसले. तीच गोष्ट रोजगाराची. मॅग्नेटिक महाराष्ट्र मधून करार झाले खरे; पण त्यापैकी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती किती झाली हा खरा प्रश्न आहे. उद्योगमंत्री यांचे खाते वेगळे आकडे दाखवतात आणि फडणवीस यांच्या तोंडून गारुड करणारे वेगळे आकडे बाहेर पडतात… हे आकडे पाहून राज्यातील बेकारी संपली पाहिजे होती. पण तसे झालेले नाही आणि शेतीवरील बोजा काही कमी होण्याचे नाव घेत नाही. आणि हा सारा भुल भुलैयाचा खेळ कमी म्हणून की काय आता निवडणुकीला काही महिने बाकी असताना अचानक फडणवीसांच्या अंगात शरद पवार आल्यासारखे दिसले. शाहू, फुले, आंबेडकर यांची आठवण करून देत त्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचा काळी चारचा सूर लावला… वाजवा टाळ्या! दाभोलकर आणि पानसरे या आयुष्यभर महाराष्ट्र पुरोगामी राहावा म्हणून एकहाती लढा देणार्‍या समाज सुधारकांची हत्या होऊन वर्षे उलटून जातात आणि गृहमंत्री फडणवीस यांच्या पोलिसांना मारेकरी सापडत नाहीत… किती हा भंपकपणा! पत्रकार गौरी लंकेश यांचे संशयित मारेकरी सापडतात आणि दाभोलकर, पानसरे यांचे हत्यारे या जगातून गायब होतात… हा कुठला बोगसपणा! या सरकारची तशी इच्छा नाही, हे खरे वास्तव आहे. न्यायालयाने याच भंपकपणावर बोट ठेवत सरकारचे वाभाडे काढले. स्फोटके घरी ठेवून राज्यात अस्थिर वातावरण करू पाहणार्‍या वैभव राऊतसह तीन संशयितांना अटक होते आणि या तिघांचा गौरी लंकेश यांच्या हत्येशी काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी कर्नाटक एटीएसने अधिकारी मुंबईत येतात. मात्र त्याचवेळी फडणवीस यांचे गृहखाते उद्ध्वस्त धर्मशाळा होऊन युगांत उलटून गेल्यासारखे शांत बसते… अशा सरकारने शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेऊ नयेत. बाकी न झालेल्या विकासाच्या गप्पा कराव्यात… वाजवा टाळ्या!

मुंबई मराठी पत्रकार संघ : आचार्य अत्रे पुरस्कार सोहळा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव आणि भाषण… पत्रकार आणि त्यांच्यावरील अघोषित आणीबाणी यावर उद्धव यांनी मोदी सरकारची पिसे काढली. उदाहरणांसकट. उद्धव यांचे एक उत्तम भाषण ऐकायला मिळाले आणि ते सुद्धा बर्‍याच वर्षांनी. पण, इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीविरोधात सारा देश पेटून उठलेला असताना बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला दिलेला पाठिंबा उद्धव विसरले असले तरी देश विसरलेला नाही… वाजवा टाळ्या!

- Advertisement -

केंद्र आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत असून नसल्यासारखे वागायचे ही उद्धव यांची भूमिका, ही डोंबार्‍याच्या खेळालाही लाजवणारी आहे… निवडणुकांमध्ये भाजपचे वस्त्रहरण करून आणि दिवस उजडताच मोदी आणि फडणवीस सरकारच्या नावाने मोठ्याने शंख वाजवण्यापलीकडे सेनेचे काय चालले आहे, हे एकदा उद्धव यांनी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला सांगावे, म्हणजे येणार्‍या निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये जोरात टाळ्या वाजवता येतील… मोदींच्या नावाने कडकडा बोटे मोडायची आणि अमित शहा यांच्या सोबत बंद दाराआड चर्चा करायची… कसल्या या चर्चा? समजू दे तरी लोकांना. का जनता मूर्ख आहे असे समजून जाहीरपणे भाजपच्या सात पिढ्यांचा उद्धार करायचा आणि राज्यसभा सभापतींच्या निवडणुकीत निमूट एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, हे म्हणजे ‘मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली’सारखा प्रकार झाला… तो मी नव्हेच, या सेनेच्या नाटकाला वाजवा जोरात टाळ्या!

…..

पुणे : वॉटर कप स्पर्धेचा बक्षीस समारंभ- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलीत सिंचनावरून आधीच्या अजित पवार आणि आताच्या फडणवीस सरकारची पिसे काढली. अगदी दोघांच्या साक्षीने… जोरदार टाळ्या वाजल्या. न सांगता. तशा त्या नेहमीच वाजतात… एकपात्री कार्यक्रमाला वाजतात, तशा! भरपूर करमणूक. पण घरी परतताना हाती काही लागत नाही. सगळे गारुड! मेंदू बंदीचा खेळ. अजित पवार यांनी राज यांचा हा खेळ उधळून लावताना : काही करायचे नाही, फक्त बोलायचे… बोलघेवड्यासारखे! असा लोकांच्या मनातील मार्मिक टोला मारला.

२००६ साली मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून आता एक तप उलटत असताना पहिल्या फटक्यात मुंबई महापालिकेत २३ नगरसेवक, विधानसभेत १३ आमदार आणि नाशिक महापालिकेत एकहाती सत्ता देऊन मनसेने काय मोठा चमत्कार केला, हे एकदा लोकांना नीट समजले तर आता भाषणाला मिळणार्‍या टाळ्यांपेक्षा आणखी जोरात टाळ्या पडतील…!
आणि शेवटी या देशातील महान पक्ष काँग्रेससाठी सर्वात जोरदार टाळ्या वाजवा… २०१९  साठी देशात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार येणार, या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मारलेल्या षटकारासाठी! कोणाचे काय, तर यांचे भलतेच! सत्ता जाऊन चार वर्षे उलटून गेली तरी अजून सत्ताधारी असल्याच्या मानसिककतेमधून बाहेर न आलेल्या आणि वरवर विरोध करून निवडणुका जिंकण्याची स्वप्ने बघणार्‍या काँग्रेसने आधी भाजपविरोधाचा नीट प्लॅन बनवावा आणि नंतर दिवसा सत्तेची स्वप्ने बघावी… वाजवा रे वाजवा!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -