कोकणचा शाश्वत विकास करून दाखवा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आव्हान स्वीकारा...

Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता कोकणचा शाश्वत विकास करून दाखवण्याचे मोठे आव्हान आहे. शाश्वत, यासाठी की जैवविविधतेने नटलेल्या या भागाचा आहे तसाच विकास झाला पाहिजे आणि तीच या भागाची खरी ताकद आहे. पर्यटन, फळ बागायती, मत्सशेती विकास आणि त्यावर आधारित प्रकल्प अशा फक्त चार गोष्टींवर लक्ष्य केंद्रित केल्यास कोकणात रोजगाराला मोठी चालना मिळेल. आणखी काही करण्याची गरजच भासणार नाही. निसर्गाने जे काही दिले आहे ते पुढे न्या… बस, बाकी काही या भागाचा आडवा तिडवा आणि खोटा विकास करण्याची गरज नाही. जैतापूर अणुऊर्जा आणि नाणार रिफायनरी प्रकल्प हे या लाल मातीचे कधीच भले करू शकणार नाहीत. हिरव्या कोकणचे भकास कोकण करून कोकणी जनतेला देशोधडीला लावण्याचे पाप आपल्या माथी घेऊ नका.

अरे, नाखवा हो, नाखवा (इति रे)

गोमू माहेरला जाते (होशे)

गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा
हो, तिच्या घोवाला कोकण दाखवा
दावा कोकणची निळी-निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी-हिरवी झाडी
भगवा आबोलीच्या फुलांचा ताटवा
हो, तिच्या घोवाला कोकण दाखवा
गोमू माहेरला जाते हो नाखवा
हो, तिच्या घोवाला कोकण दाखवा
कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
त्यांच्या काळजात भरली शहाळी

उंची माडांची जवळून मापवा
उंची माडांची या जवळूनी मापवा
हो, तिच्या घोवाला कोकण दाखवा
गोमू माहेरला जाते हो

‘वैशाख वणवा’ सिनेमातील हे गीत गदिमांनी लिहिले आहे. भास्कर चंदावरकर यांनी संगीत दिलेले हे गीत बुवांच्या म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात ऐकताना एका अद्भुत सफारीवर आपण निघालेलो असतो. बुवांचा आवाज खरेतर भक्तीसंगीताच्या अंगाने जाणारा, पण या गीतात चंदावरकरांनी बुवांच्या आवाजाचा अप्रतिम वापर करत त्याला लोकसंगीतात असेच काही गुंफले आहे की आपण थक्क होऊन जातो… या सिनेमातील अभिनेता रमेश देव हा कोकणचा जावई असून लग्नानंतर तो प्रथमच आपल्या बायकोच्या जयश्री गडकरच्या गावी जात असताना नाखवा त्यांना कोकणच्या जादुई सौंदर्याची महती पटवून देत असतात आणि समुद्र, खाडी, हिरव्या झाडीचे निळे अवकाश पाहताना रमेश देवचे जसे डोळे दिपून जातात तसे आजही कोणी नवा माणूस कोकणात येतो तेव्हा त्याचेही डोळे विस्फारून गेल्याशिवाय राहत नाहीत. तो या देवभूमीच्या प्रेमात पडतो. देवाने जे जे काही सुंदर बनवले आहे ते या भूमीला अर्पण केले आहे. पण, सौंदर्याला शाप असतो तसे या देवलोकाचे झाले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाल्यानंतर आजही प्रचंड क्षमता असूनही हा भाग विकसित झालेला नाही. साथी मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या भगीरथ प्रयत्नांनी कोकण रेल्वे आली. गेल्या तीन दशकातील या भागातील हे एक मोठे काम वगळता आजही कोकण जैसे थे आहे. कोकण रेल्वेमधून प्रवास करताना एका ट्रॅकमुळे सिग्नलवर बराच वेळ गाडी थांबते तेव्हा कुडाळचे बाबी वराडकर दोन ट्रॅक व्हये व्हते, बरा झाला असता असे सांगतात तेव्हा खूप गंमत वाटते. आपले डोळे उघडे असताना कोकणात रेल्वे धावली हे आपले नशीब नाही तर नाना ( दंडवते) आणि जॉर्ज यांनी कोकणच्या मातीचे फेडलेले हे ऋण आहेत. केंद्र सरकारमध्ये एकाच वेळी नाना अर्थमंत्री आणि जॉर्ज रेल्वेमंत्री असल्याने हे शक्य झाले. म्हणूनच ही देवासारखी माणसे आज या जगात नसताना कुडाळ रेल्वे स्थानकावर मी जेव्हा उतरतो तेव्हा प्रथम नानांच्या फोटासमोर एक मिनिट उभा राहतो, तेव्हा या दृष्ठ्या लोकप्रतिनिधीला वाहिलेली ती आदरांजली असते… वर्षोनुवर्षं सत्ता भोगून जे काँग्रेसला जमले नाही ते या दोघांनी करून दाखवलेले असते… म्हणूनच ‘करून दाखवले’ असे सांगणार्‍या शिवसेनेसमोर आणि या पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता कोकणचा शाश्वत विकास करून दाखवण्याचे मोठे आव्हान आहे.

शाश्वत, यासाठी की जैवविविधतेने नटलेल्या या भागाचा आहे तसाच विकास झाला पाहिजे आणि तीच या भागाची खरी ताकद आहे. पर्यटन, फळ बागायती, मत्सशेती विकास आणि त्यावर आधारित प्रकल्प अशा फक्त चार गोष्टींवर लक्ष्य केंद्रित केल्यास कोकणात रोजगाराला मोठी चालना मिळेल. आणखी काही करण्याची गरजच भासणार नाही. निसर्गाने जे काही दिले आहे ते पुढे न्या… बस, बाकी काही या भागाचा आडवा तिडवा आणि खोटा विकास करण्याची गरज नाही. जैतापूर अणुऊर्जा आणि नाणार रिफायनरी प्रकल्प हे या लाल मातीचे कधीच भले करू शकणार नाहीत. हिरव्या कोकणचे भकास कोकण करून कोकणी जनतेला देशोधडीला लावण्याचे पाप आपल्या माथी घेऊ नका.

प्रत्येक भागाची त्याची एक स्वतंत्र ओळख असते. देशाच्या पश्चिम भागातून जाणारी जैवविविधता ही कोकणात आज सर्वात समृद्ध आहे. हे आपण नाही, जगातले शास्त्रज्ञ सांगतात. करोडो डॉलर्स खर्च करूनही याची निर्मिती होणार नाही. जे आहे ते आपण जपून ते जगाला आणखी स्वच्छपणे दाखवूनच कोकण सक्षम होईल. त्याला अणुऊर्जा आणि रिफायनरीचे सलाईन लावण्याची गरज नाही. जे निर्सगाने आपल्याला दिले आहे ते नष्ट करण्याची त्या विधात्याने तुम्हाला परवनगी दिलेली नाही. आणि जो देतो तो काढूनही घेऊ शकतो. एका तडाख्यात हा निसर्ग होत्याचे नव्हते करून टाकेल. त्याच्या जीवाशी खेळलात तर तो तुम्हाला आधी संपवल्यावाचून राहणार नाही. जगाचे वाढते तापमान आणि त्याचा बसत असलेला फटका हेच तर ओरडून सांगत आहे. निसर्गाशी खेळणे आता कोणालाच परवडणार नाही…

शिवसेनेच्या चांगल्या आणि पडत्या काळातही कोकण कायम ‘मातोश्री’च्या मागे राहिला आहे. कोकणातील माणसांनीच शिवसेना रुजवली, फुलवली. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही गोष्ट मोठ्या मनाने सांगितली आहे. स्वतः उद्धव ठाकरेही हे मान्य करतात. मग, आता वेळ आली आहे. या मातीला शिवसेनेने काही तरी पायाभूत देण्याचे. जे कधीच संपणार नाही. काळाच्या कसोटीवर टिकून राहील. भाजपचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आज मुंबई गोवा रस्त्याचे चौपदरीकरण होत आहे. काम संथ सुरु आहे, पण ते होत आहे, हे महत्वाचे. जे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला कधी जमले नाही ते गडकरी यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर करून दाखवले. कोकणची अवघड वळणाची वाट त्यांनी चार मार्गावर आणली. ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, कंत्राटदार असे अनेक अडथळे पार करत मृत्यूचा महामार्ग म्हणून बदनाम असलेला हा रस्ता आता जीवन वाहिनीच्या दिशेने जात आहे. कोकणचे एक पाऊल पडत आहे. ते आता पुढचे पाऊल करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव यांनी कोकण विकासाची भूमिका स्पष्ट करून आशा जागवल्या आहेत. मात्र हा विकास राजकारणात हरवता काम नये, ही माफक अपेक्षा आहे.

लवकरच कोकण किनारपट्टीवरच्या ‘मरीन लाइफ’ म्हणजेच ‘पाण्याखालचे जग’ पाणबुडीतून पाहण्याची संधी मिळणार आहे. कोकणात पर्यटकांचा ओघ वाढावा आणि येणार्‍या मंडळींना पर्यटनाचाही अनोखा अनुभव मिळावा म्हणून राज्य सरकार पाणबुडीच्या माध्यमातून त्यांना पाण्याखालच्या या अद्भुत जगाचे दर्शन करून देण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या परुळे चिपी विमानतळावर काम सुरू असून 1 मे रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला 60 वर्षे पूर्ण होत असून या दिवशी हे विमानतळ कार्यन्वित करण्यात येईल. सध्या मालवणमध्ये अंडरवॉटर ड्रायव्हिंगची सोय उपलब्ध आहे. तारकर्लीमधल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अ‍ॅण्ड स्पोर्ट्स’मध्ये पर्यटकांना स्कुबा डायविंग करता येते. याचबरोबर एलिफंटा, खांदेरी-उंदेरी, जंजिरा येथे जलदुर्गांची शृंखला पर्यटकांसाठी पर्यटनाला उपलब्ध करून देण्यात येईल. तिलारी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कॉन्झर्वेशन रिझर्व्ह स्थापन करणे प्रस्तावित आहे. यामुळे निसर्ग आणि वन्य प्राण्यांचे संवर्धन होईलच आणि त्याच वेळेला त्या भागांमध्ये येणार्‍या पर्यटकांचा ओघसुद्धा वाढेल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोकण विकासाची जणू श्वेतपत्रिका मांडली.

कोकणातलं निसर्गसौंदर्य जपलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचे नाव न घेता सांगितलं. मी हेलिकॉप्टरमधून बघतानासुद्धा मला समुद्राचा तळ दिसत होता, कारण तिथलं पाणी स्वच्छ होतं. कृत्रिम प्रकल्पांना आपण विकास म्हणणार असू तर त्यापेक्षा अधिक वैचारिक दारिद्य्र आणि अन्याय कशामध्येही नाही. हे आपलं वैभव आहे आणि ते जपायला हवं, असं ते विधानसभेत सांगतात तेव्हा आशेचा मोठा किरण निर्माण होतो.

मी स्वतः कोकण उभा आडवा पिंजून काढला आहे. या भागात त्या सृर्ष्टीकर्त्याने विकासाचे माप त्याच्या पदरी आधीच टाकले आहे. मालवण, देवबाग, तारकर्ली, भोगवे, निवती, वेंगुर्ले, आरवली, शिरोडा हा सिंधुदुर्गचा पश्चिम किनारपट्टा ज्या वेगाने काही वर्षात विकसित झाला तो स्थानिक लोकांच्या प्रयत्नांमुळे. मला आठवते सागर कुलकर्णी हा नामंकित स्कुबा डायव्हर काही वर्षांपूर्वी मालवणात आला होता आणि त्याने तेथील भूमिपुत्रांना अवघे काही महिने मार्गदर्शन केले. त्या जोरावर आज तळकोकणातील हे युवक पाण्यातल्या खेळांच्या जोरावर मोठ्या संख्येने अर्थिकदृष्ठ्या भक्कमपणे आपल्या पायावर उभे आहेत. गोव्यापेक्षा चांगली सेवा पर्यटकांना देत आहे. कोकणी माणूस म्हणजे तुसडा, आळशी स्वभाव हा पूर्वग्रह या मुलांनी मोडून काढला आहे. देवबागला घरोघरी कमी शिकलेल्या मुलामुलींनी आपापल्या घरात पर्यटकांना उत्तम राहण्याची आणि अप्रतिम जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. एक उदाहरण देतो : देवबागच्या समुद्र किनार्‍याजवळ महापुरुष मंदिराच्या पुढे कांचन केळुस्कर नावाची एक पस्तीशीची महिला एक गृह पर्यटन चालवते.

फाईव्ह स्टार एवढ्या सुविधा तिच्या घरात नाहीत, पण पुरेशा आहेत. कांचनने केलेले बांगड्यांचे तिखले, सौंदाळे माशाचे सार, तव्यावर भाजलेले खरपूस पापलेट, तांदळाची भाकरी, गरम भात, सोबत जवल्याची चटणी आणि वर कोकम कडी… हा हा हा! अजूनही हे जेवण आणि तिच्या हाताची चव रेंगाळते आहे. एका हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या मुलामुलींनाही मागे टाकेल अशी तिची पर्यटकांच्या प्रति असलेली आपुलकी पुन्हा देवबागला आपले पाऊल पडले की, ते कांचनच्या घराच्या दिशेने पडणार याची साक्ष देणारी असते. या कांचनची एक गोष्ट अशी. एका आजारात तिच्या नवर्‍याचा हात कापावा लागला. कर्ता नवरा घरी बसला म्हणून कांचन रडत बसली नाही. जेमेतेम पाचवी शिकलेल्या कांचनने अख्या घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सासू सासरे, दीर, चुलती असे सर्वांना सोबत घेऊन आणि दिवसभर मेहनत करून ती पर्यटकांना आनंदित करते, ती लगबग कोकणच्या पर्यटनाची पहाट करणारी असते… ‘भाऊ, पुन्हा या’, असा निरोप देताना कांचनचा फुललेला चेहरा जणू आपल्या घरातील माणसांना न विसरता परत या… असाच सांगणारा असतो.

जी गोष्ट कांचनची तीच देवबागवरून निवतीपर्यंत आपल्या होडीत फिरवून आणणार्‍या राजन शिरोडकरची. कर्ली नदी अरबी समुद्राला भेटायला ज्या वेगाने जाते त्या वेगाशी स्पर्धा करत राजन आपल्या होडीने दोन एक तास जी काही सफारी घडवून आणतो त्या स्वर्ग सुखाशी कशाचीच तुलना करता येणार नाही… डॉल्फिन कुठे दिसणार हे त्याला बरोबर माहीत असते. हे देवमासे जणू पर्यटकांना ‘येवा कोकण आपलोच आसा’ असे सांगत असतात. निवती रॉकला सलामी देत होडी चालली असताना निळाशार समुद्र देवबाग हे जागतिक पर्यटनाच्या जवळ आल्याची साक्ष देणारे असते. राजन मग त्सुनामी बेटावर घेऊन जातो. तेथे परुळ्याचा उत्तम परुळेकर तुमची वाट बघत असतो. ‘येवा गाववाल्यानो… घावणे चटणी, मोदक काय देव सांगा आणि तो तुम्हाला आग्रह करून जणू भरवतोच. मग, आता जरा समुदात खेळ करा म्हणून कयाकिंग, स्कुटर आणि रायडींगला नेतो. आपली सहल सार्थकी लागलेली असते.

कांचन, राजन, उत्तम करत असलेल्या धडपडीला आता फक्त सरकारने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सरकार पाठी उभे राहो अथवा न राहो… आपला मार्ग या तरुणांनी आखला आहे. खरी गरज आहे ती उद्धव ठाकरे यांनी या छोट्या कोकण विकासाचे अवकाश विस्तारण्याची!