घरफिचर्समहाभरती ! लक्ष्य सबका विकास

महाभरती ! लक्ष्य सबका विकास

Subscribe

कोणी आहे का रे तिकडे, पक्षप्रमुख साहेबांनी हुकूम सोडला. साहेब,मी…मी आहे,बाहेरचा सिक्युरिटी गार्ड घाबरत आत आला. अरे,तू नाही रे,अजून पक्षप्रवेशाचा कोण बाकी आहे का विचारलं, साहेब म्हणाले. नाही साहेब, एकजण होता,पण त्याला थोड्या वेळाने त्याला तो स्वत:च एका पक्षाचा संस्थापक आहे, हे उमगले आणि तो माघारी गेला. अरे कशाला गेला ? केला असता त्याचा पक्ष विलीन आपल्यात… साहेब आश्वासकपणे म्हणाले. गेल्या दोन महिन्यांपासून साहेबांनी आपल्या ‘सबका विकास’ पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर मेगाभरतीचा पोस्टर टांगून ठेवला होता. आलेल्याला आत घेणे त्याच्या गळ्यात पक्षाचा पट्टा लटकवणे, जाताना त्याला एक वॉशिंग पावडरचे पॅकेट भेट म्हणून देणे (त्यावर पक्षाचा लोगो देखील छापण्याची नामी कल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली होती.) आणि या सर्वांच्या बदल्यात फक्त ‘मते आणा’अशी माफक अट ठेवण्यात आली होती.

गेल्या दोन महिन्यांच्या मेगाभरतीत साहेबांनी अनेकांना हादरा दिला होता. गेमच तसा ‘पॉवर’फुल्ल केला होता. मेगाभरतीचा बोर्ड वाचून अनेकजण त्यांच्या पक्ष कार्यालयाकडे चुंबकासारखे खेचले जात होते.आधीची निवडणूक जोशात गेल्याने साहेब आता थांबणारे नव्हते. येईल त्याला घ्या, पण फौज मजबूत करा. हाच त्यांचा आता नारा होता. कोणत्याही परिस्थितीत खुर्ची आपल्यातच आली पाहिजे, हे पक्षाचं उद्दिष्ट होतं. त्यांच्याकडे सर्वात महत्वाची म्हणजे खुर्चीची ताकद होती. त्या खुर्चीमागे अनेक राजे-महाराजे साहेबांच्या गोटात येऊन बसले होते. विरोधकांचे अनेक दिग्गज साहेबांनी खेचले होते. कुठे धोका दिसला की तिथला नेता उचल, हाच पक्षाचा दिनक्रम होता.

- Advertisement -

मेगाभरतीच्या कार्यक्रमाची तयारी देखील जय्यत असायची. दोन-तीन दिवस आधी माध्यमांत बातमी पेरायची आणि त्यानंतर दोन दिवस ‘न्यूज’ मध्ये राहून लगोलग प्रवेशाचा कार्यक्रम उरकायचा. आता तर कोणाच्या घरी कोणी हरवले तर पक्ष कार्यालयाकडे विचारणा केली जात असे, एवढा फिवर साहेब आणि त्यांच्या पक्षाने तयार केला होता. आयारामांच्या सभेत बोलताना देखील,विरोधी पक्षावर टीका करताना,‘माझ्या मागे बसलेले सोडून… असा खास उल्लेख करावा लागायचा, ती तसदी साहेबांनी घेतली होती. ‘पक्षाचे पट्टे, बॅनर, बँड यांची मागणीच मागणी होती.

कार्यालयात आता खुर्च्या देखील कमी पडायला लागल्या होत्या. इनकमिंग जोरात झाल्यावर साहेबांना आता आऊटगोईंगची चिंताच नव्हती मुळी, काही दगाफटका झालाच तर छोटी मलमपट्टी लावून ठीक करता येईल, याची खात्री त्यांना होती. एका खुर्चीकडे एवढ्या जणांना खेचण्यात साहेबांचा पक्ष यशस्वी झाला होता. शेवटी सर्वांना ‘सबका विकास’ करून घ्यायचा होता….हे सर्व त्यानुसारच सुरू होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -