घरफिचर्सआपण चुकीचं चॅनल लावलंय का ?

आपण चुकीचं चॅनल लावलंय का ?

Subscribe

मुल्ला एवढ्या मोठ्या आवाजात का ओरडतोय, तुझा खुदा बहिरा आहे का, असा रोकडा सवाल कबीर करतात. एवढ्या गगनभेदी आवाजातील संगीतासह आपण नाचत असतो तेव्हा आपण नक्की काय करत असतो? मग गणपती असो की शिवाजी महाराजांची जयंती किंवा बाबासाहेबांची जयंती, दरवेळी अशी मिरवणूक आणि प्रचंड आवाजात सुरू असणा-या सेलिब्रेशनने आपण काय साध्य करत असतो? सेलिब्रेशन करायलाचं हवं सणासुदीचं असो वा जयंत्या-मयंत्यांचं, पण त्याचा अर्थच हरवला तर काय मजा.

ती झिंगाट झालेली आहे आणि माझ्याकडे पहात असल्याने मला आमदार झाल्याची जाणीव होते आहे. स्वाभाविकच बाईंना वाड्यावर येण्याचं आग्रहाचं आमंत्रण दिलं गेलंय. लवकरच बाबुराव येतील, अशी शक्यता आहे. नव्या पोपटाविषयी उत्सुकता वाढलेली आहे. रिक्षाचालक प्रतीक्षा करतोय. खरं तर विलंब होतो आहे. त्यामुळेच अधूनमधून डॉन असल्याची आयडेन्टीटी मला सांगावी लागत आहे आणि मला नाचू द्या, तो माझा मूलभूत अधिकार आहे, हे बोलावे लागते आहे.

डीजेची ध्वनीपातळी वाढव अन्यथा मातोश्रींची शपथ आहे, अशी प्रेमळ विनंती सुरू आहे. तोवर ती झंडूबाम झाल्याची वार्ता येतेय. कलुळाचं पाणी ढवळलं गेल्याने नागाचं पिलूही खवळलंय. यो यो झिंगाट सुरुय आणि काका म्हणतायेत, घालीन लोटांगण वंदीन चरण. गणराया भयचकित होऊन म्हणतोय, कभी कभी लगताय आपुनच बुध्दी का भगवान है! अशा सगळ्या वातावरणात आमचे एक शेजारी म्हणायचे, ‘इतकं नका ओरडू, अरे गणपतीला बहिरेपण येईल रे.’ मला एकदम कबीर आठवला-

- Advertisement -

‘कांकर पाथर जोरि कै मस्जिद लई बनाय
ता चढि मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय’

मुल्ला एवढ्या मोठ्या आवाजात का ओरडतोय, तुझा खुदा बहिरा आहे का, असा रोकडा सवाल कबीर करतात. एवढ्या गगनभेदी आवाजातील संगीतासह आपण नाचत असतो तेव्हा आपण नक्की काय करत असतो? मग गणपती असो की शिवाजी महाराजांची जयंती किंवा बाबासाहेबांची जयंती, दरवेळी अशी मिरवणूक आणि प्रचंड आवाजात सुरू असणा-या सेलिब्रेशनने आपण काय साध्य करत असतो? सेलिब्रेशन करायलाचं हवं सणासुदीचं असो वा जयंत्या-मयंत्यांचं, पण त्याचा अर्थच हरवला तर काय मजा. प्रचंड कलकलाटात मूळ मुद्दाच निसटून जावा, असं काहीसं. भव्य भगभगीत झगमगाटात शांतपणे प्रकाशमान होणा-या पणतीचं कवित्व विरत जाण्यासारखं..

- Advertisement -

मी असलं काहीतरी सांगत होतो तर मित्र म्हणाला, बेभान व्हायला असं कायतरी लागतं यार. द्राक्षासवाचा ३०-६०-९० चा काटकोनी त्रिकोण तरी हवा किंवा ठेक्यावर नाचता येईल, अशी गाणी तरी हवीत, नशा आली पाहिजे. मित्र म्हणाला ते खरंच, पण असं बेभान होण्यासाठी किंवा नशेसाठी अशा गोष्टींचीच आवश्यकता असते का? आपली पॅशन किंवा एखाद्या कामामुळे झपाटून जाण्यातून असं बेभान होता येत नाही का ? आतला आवाज ऐकायची वेळच येऊ नये म्हणून कर्णकर्कश्श संगीत आपण सुरू केलं आहे का? बाहेरचे आवाज आपण ऐकू शकतोच, पण आतून येणारे आवाज आपल्याला ऐकता आले तर इतका सुंदर रेझोनन्स साधता येऊ शकतो की बस्स! हा आतून येणारा आवाज अधिक प्रामाणिक असतो. त्याला इतर कशाचीच पर्वा नसते. इतर लोक काय म्हणतील त्यापेक्षा ख-या अर्थाने काय केलं पाहिजे, असं सांगणारा हा आवाज. तो गांधीबाबा हाच ‘आतला आवाज’ सांगत होता. हा आतला आवाज आणि बाहेरचा आवाज जिथे मिळतो तिथेच तर रेझोनन्स होतो आणि जगण्याचा गुरुत्वमध्य हाती लागू शकतो. सत्यापर्यंत पोहोचण्याचा हा आतला आवाज म्हणजे प्रत्येकाचा सिग्नेचर मार्क. हा आतला आवाज ‘पोलिटिकल करेक्ट’ होण्याच्या धांदलीत बनचुका झाला तर आपण आपलं असणंच हरवणं बसू.

सत्व आणि स्वत्व टिकवण्याचा ध्यास या आतल्या आवाजातूनच मिळतो. आधार नंबरच्या युनिक असण्याहून आपल्या आतल्या आवाजाचं एकमेवाद्वितीय असणं कितीतरी महत्त्वाचं आहे, पण आपण स्वतःशी संवाद तरी साधायला हवा. ‘कभी खुद को कॉल लगा के देखा है, सभी लाइने व्यस्त है’ अशी सारी अवस्था असल्यामुळे आपण डॉल्बीतल्या गाण्यावर नाचत असतो. पण कार्डियाक मेलडी काही आगळंवेगळं सांगत असते. ती थेट ऐकू येत नाही. शोधावी लागते. जगण्यातला सूर हरवत असताना ती लुप्त झालेली लय पकडता यायला हवी. नाहीतर रॅप ऐकू येईल, आयटम सॉन्ग कानी पडेल, पण त्याच्या पल्याडचं कळणारच नाही. अंतः स्वर शोधणारं गुगल व्हाइसवर मिळत नाही. आर्टिफिशियल इंटलिजन्स कितीही पुढं गेलं तरी भावनिक बुद्धिमत्तेच्या मर्यादा दिसतातच. या मर्यादा अनेक पातळ्यांवर आहेत. आपल्याला ‘माह्या भीमानं’ गाणा-या कडूबाई खरात यांच्या डोळ्यातही पाहता आलं पाहिजे आणि त्यांच्या आवाजतली कातरताही कळायला हवी अन्यथा प्राण्यांच्या संवेदनेच्या समकक्ष असणा-या आपल्या मानवी संवेदनेला काय अर्थ आहे ! निदा फाजली यांनी म्हटलं आहे-

मुंह की बात सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन
आवाजों के बाजारों में खामोशी पहचाने कौन

आजूबाजूला प्रचंड आवाजात घोषणाबाजी सुरु आहे. भाषणं सुरु आहेत. उन्मादी स्वर टीपेला चालले आहेत, अशा वेळी ही ‘खामोशी’ कशी समजून घेणार, हा खरा प्रश्न आहे. सगळं कसं शांत आहे, असं म्हणून आपल्याला परिस्थितीपासून पळता येणार नाही. मूक असणं म्हणते शांतता नव्हे. आजूबाजूची शांतता ‘डिकोड’ करता यायला हवी. ज्यांचा आवाज उमटतच नाही इथे, तो सत्तेच्या सिंहासनापर्यंत कसा पोहोचवणर? आपल्याला हवी ती दिल की बात आपण करत राहिलो, पण दर्द की बातचा आवाज आपण केव्हा ऐकणार? मंदीचं सावट असो वा दंडुक्याचा धाक, ते पाहून अनेक आवाज लुप्त होत आहेत. रस्त्यावर उतरुन आंदोलन करणा-यांचे आवाज दाबले जात आहेत. हाँगकाँगपासून ते जंतरमंतरपर्यंत, सगळीकडं लोकांना ‘म्युट’ केलं जातंय. ‘आवाज वाढव डीजे’ म्हणायला हवं पण कोणता आवाज, हे ठरवायला हवं कारण जो आवाज वाढायला हवा, पोहोचवायला हवा तो मंदावतो आहे आणि नको त्या आवाजाने दणाणून सोडलंय. आपण चुकीचं चॅनल लावलंय का?

-श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -