घरफिचर्स...और सारा आलम सो जाये!

…और सारा आलम सो जाये!

Subscribe

राजेंद्र आणि नीना मेहता या जोडप्यामधल्या राजेंद्र मेहतांचं नुकतंच निधन झालं, त्यानिमित्ताने कृष्णधवल जमान्यातल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. राजेंद्र आणि नीना मेहता हे जोडपं आज सगळ्यांना माहीत असेल, असा दावा अजिबात करता येणार नाही. जगजीत सिंग- चित्रा सिंग हे नाव जसं सर्वदूर पोहोचलेलं होतं तसं राजेंद्र आणि नीना मेहता या जोडप्याचं नव्हतं.

काळ्या आणि पांढर्‍या अशा फक्त दोन रंगांतला तो टीव्ही. सभ्यसंभावित लोक त्या टीव्हीला कृष्णधवल वगैरे म्हणायचे. त्या कृष्णधवल काळात आतासारखं चॅनेल्सचं जंजाळ अवतरलेलं नव्हतं. त्या काळातल्या त्या सुस्तावलेल्या जीवनासारखं टीव्हीवरही एकच एक सुस्तावलेलं चॅनेल लागायचं…आणि अशा त्या शांत आणि संथ काळातल्या टीव्हीवर एक जोडपं आपली गझल पेश करायचं. गझल ही तशी मुळातली शांत आणि संथच. आडगावातली एखादी नदी जशी शांत आणि संथ वहावी अगदी तशी. ऐकता ऐकता जगण्यात नशा आणणारी. एकेका शब्दातून जगण्याचं कोडं उलगडून दाखवणारी. त्या जोडप्याची ती गझल तंतोतंत तशी असायची. राजेंद्र आणि नीना मेहता हे ते जोडपं.

या जोडप्याची ती गझल तेव्हा तशी उशिराच टीव्हीवर पेश व्हायची. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर प्राइम टाइमचा तोरा संपल्यानंतर. पण त्यातही एक गोष्ट अशी होती की राजेंद्र आणि नीना मेहतासाठी ती वेळ खरोखरच साजेशी वाटायची. त्याचं कारण असं की राजेंद्र आणि नीना मेहता यांच्या त्या गझलांचं एकूण रूपरंग असं असायचं की त्यासाठी तो प्रहर गझलच्या चाहत्यांना अतिशय योग्य वाटायचा. कारण राजेंद्र आणि नीना मेहतांची ती गझल घाईघाईत ऐकण्यासारखी नसायचीच मुळी. त्यामुळे प्राइम टाइमसारखी घायकुतीची वेळ गझलच्या चाहत्यांनाच मंजूर नसायची आणि खुद्द राजेंद्र आणि नीना मेहतांनाही त्या वेळेबद्दल तक्रार नसायची.

- Advertisement -

…आज राजेंद्र आणि नीना मेहता या जोडप्यामधल्या राजेंद्र मेहतांचं नुकतंच निधन झालं, त्यानिमित्ताने कृष्णधवल जमान्यातल्या या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. राजेंद्र आणि नीना मेहता हे जोडपं आज सगळ्यांना माहीत असेल, असा दावा अजिबात करता येणार नाही. जगजीत सिंग- चित्रा सिंग हे नाव जसं सर्वदूर पोहोचलेलं होतं तसं राजेंद्र आणि नीना मेहता या जोडप्याचं नव्हतं. खरं तर जगजीत सिंग-चित्रा सिंग यांनी जेव्हा गझलगायनाचे कार्यक्रम एकत्रितपणे पेश करायला सुरूवात केली त्याच्याही आधी राजेंद्र-नीना मेहतांनी आपल्या गझलगायनाला सुरूवात केली होती. पण तरीही राजेंद्र-नीना मेहता हे नाव आजच्या कशाला, कालच्याही काही सर्वसाधारण लोकांना माहीत असण्याची शक्यता नाही.
गंमत पहा, संगीतावर प्रेम करणार्‍यांना गझल माहीत असते, पण फक्त गझलसाठी आपलं आयुष्य वेचलेल्या राजेंद्र-नीना मेहतांचं नाव माहीत नसतं. पण याच मंडळींना राजेंद्र-नीना मेहतांनी गायलेल्या गझलांचे शब्द सांगितले की त्यांच्या भुवया उंचावतात आणि तोंडाचा चंबू होतो.

राजेंद्र-नीना मेहतांच्या त्या प्रसिध्द गझलचे शब्द असतात –
जब आंचल रात का लहराए
और सारा आलम सो जाये.
तुम मुझ से मिल ने शमा जला
कर ताज महल में आ जाना.

- Advertisement -

कृष्णधवल टीव्हीच्या त्या काळात राजेंद्र-नीना मेहता ही गझल पेश करायचे तेव्हा शेजारपाजारच्या सगळ्यांच्या टीव्हीवर ही एकच गझल ऐकू यायची आणि मग त्या सगळ्याच टीव्हींमधून सामूहिकपणे ती गझल ऐकताना गझलमधला तो दर्द रात्रीच्या त्या घनगर्द वातावरणात अंगावर यायचा.

त्या कुंद रात्रीचा पदर जेव्हा लहरेल…आणि आलम दुनिया जेव्हा गाढ झोपेत बुडालेली असेल तेव्हा तीच वेळ साधून तू तेवत असणारा दिवा हातात घेऊन मला भेटायला ताजमहालात ये!…त्या शब्दांत एक अनोखा अर्थ होता…आणि त्या अर्थात एक अनोखं दृश्य होतं. राजेंद्र-नीना मेहता ही गझल गायचे तेव्हा नेमकं काय व्हायचं असं कुणी विचारलं तर आज इतकंच सांगता येईल की ते दोघं ती गझल गाताना त्यांच्या त्या सुरांतून ते दृश्य चितारून जायचे. ‘जब आंचल रात का लहराए’ म्हणताना त्यांच्या सुरांचा पदर लहरायचा आणि ते लहरणं नंतर मनभर पसरून राहायचं. ती गझल गाताना राजेंद्र-नीना मेहतांच्याही आणि ती गझल ऐकणार्‍यांच्याही.

राजेंद्र-नीना मेहता, विशेषत: राजेंद्र मेहता फक्त गझल गायचे, गझलबद्दल तेवढ्यापुरते बोलायचे, पण तेवढ्यापुरतेच. त्या पलिकडे ते एकही शब्द उद्गारायचे नाहीत. त्यांना स्वत:बद्दल बोलण्यात काही रस नसायचा. मार्केटिंग, लॉबिंग तर त्यांना अजिबात मंजूर नसायचं. ते त्यांच्या तत्वाविरूध्द तर होतंच, पण ते त्यांच्या स्वभावातही नव्हतं. प्रसिध्दीच्या झोतापासून त्यांनी कायम अंतरच ठेवलं. त्यांच्या निकटच्या मंडळींनी, काही चाहत्यांनी, त्यांनी प्रसिध्दीच्या झोतात यावं म्हणून जरा कष्ट घ्यावेत असं त्यांना सुचवून पाहिलं, पण राजेंद्र मेहतांनी ते कधीच मनावर घेतलं नाही. आपल्या गझलांचा ऐवज जर नजाकतदार असेल तर आपल्याला त्यातूनच लोकांचं प्रेम मिळावं असं त्यांचं म्हणणं होतं.

…आणि त्यांचं ते म्हणणं खरंही होतं. त्यांच्या एका गझलचे शब्द होते -एक प्यारा सा गांव, जिस में पिपल की छाँव, छाँव में आशिया था, एक छोटा मकां था, छोड कर गांव को हम, उस घनी छाँव को हम, छोड कर गांव को, उस घनी छाँव को, शहर के हो गये हैं, भीड में खो गये हैं…ही गझलसुध्दा राजेंद्र मेहतांची गझलगायक म्हणून जान-पेहचान होती. ती गाताना त्यांच्या स्वरांत एक निरागसता दाटायची आणि गाताना त्यांच्या चेहर्‍यावरही ती निरागसता दिसायची.

त्यांच्या आणखी एका गझलचे शब्द होते – हम ने शराब ले के हवा में उछाल दी, फिर जिंदगी की तमन्ना किसी में मिसाल दी…या गझलमध्ये त्यांचा स्वरांमधला खेळकरपणाही मनाला भावायचा. राजेंद्र मेहतांची गझल तशी उपेक्षित राहिली असेल, पण तिचा शोध घेतला की ती उपेक्षित का असा प्रश्न पडायचा.

असो, राजेंद्र मेहता नावाचा तो गझलगायक आज राहिला नाही. पंकज उधास, जगजीत सिंग, तलत अझीझ यांच्या तोडीस तोड असलेला हा गझलगायक कायम प्रसिध्दीच्या झोताआड राहिला. त्याने कधी पुरस्काराच्या अपेक्षा बाळगल्या नाहीत, त्यांनी कधी स्वत:चा ब्रॅन्ड बनवण्याचा प्रयत्न केला नाही. तो फक्त दर्जेदार गझल शोधत राहिला, शब्दांमधलं सौंदर्य धुंडाळत राहिला…आणि अखेरपर्यंत त्याने त्याचा हा वसा सोडला नाही…स्वत:च्या गझलच्या नादात राहणार्‍या आणि रसिकांना रमवणार्‍या राजेंद्र मेहतांना श्रध्दांजली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -