घरफिचर्सएकेका गाण्याचं नशीब!

एकेका गाण्याचं नशीब!

Subscribe

‘इन्कार’मधलं ‘तू मुंगडा मुंगडा, मैं गुड की डली’ हे गाणं लोकांच्या आजही लक्षात आहे. हेलनने त्या गाण्यावर केलेलं ते नृत्य गाण्याच्या त्या चालीच्या आणि त्या चित्रपटातील कथानकाच्या मागणीप्रमाणे उत्तान आणि उथळ होतं. तशाच उथळ पब्लिकने त्या गाण्यावर रसरसून शिट्ट्या फुंकल्या असल्या तरी ते गाणं लिहिताना गीतकार मजरूह सुलतानपुरींना मात्र आपलं ते लिखाण अजिबात आवडलं नव्हतं, पण कुठल्या गाण्याचं नशीब कसं फळफळेल हे काही सांगता येत नाही.

सी. रामचंद्र म्हणायचे, ‘एखादं पोर त्याच्या चेहर्‍यावरून आपल्याला बावळट वाटतं, पण त्याच पोराला जग मात्र विद्वान म्हणून मान्यता देतं.’ असं म्हणताना सी. रामचंद्र संदर्भ द्यायचे ते संगीतकाराने केलेल्या तशाच एखाद्या गाण्याचा. त्यांचं म्हणणं असायचं की एखादं गाणं संगीतकार आपलं सर्वस्व पणाला लावून करतो, त्याला वाटतं की हे गाणं लोकांच्या तुफान पसंतीला उतरणार, पण नेमकं तेच गाणं लोकांच्या नजरेतून साफ पडतं, पण तेच एखादं डाव्या हाताने केलेलं गाणं संगीतकाराच्या खिजगणतीतही नसतं, पण तेच गाणं लोक डोक्यावर घेऊन नाचतात.

सी. रामचंद्रंच्या या म्हणण्याला पुरावे म्हणून संगीताच्या त्या सुवर्णकाळातल्या कित्येक गाण्यांचे दाखले देता येतील. ‘सुजाता’मधल्या ‘जलते हैं जिस के लिए…’ या गाण्याचंच उदाहरण घ्या. संगीतकार एस.डी. बर्मननी ते गाणं जरा जास्तच वेळ घेऊन, जरा जास्तच तन-मन लावून केलं होतं. गायक तलत मेहमुदकडून ते गाऊन घेतानाही त्यांनी तलत मेहमुदनाही जरा जास्तच सूचना देऊन लक्षपूर्वक गाऊन घेतलं होतं. जणू एस.डी. बर्मनना ते गाणं म्हणजे त्या वर्षातली सर्वश्रेष्ठ कलाकृती वाटत होती. त्यांनी ते गाणंही सगळ्यांकडून तशाच काटेकोर पध्दतीने रेकॉर्ड करून घेतलं होतं…आणि गाणंही त्यांच्या पध्दतीने छान अमलात आलं होतं, पण सुजाता हा संपूर्ण सिनेमा शूट झाला तेव्हा एस.डी. बर्मनदांचं मत बदललं. आपण इतकं जीव ओतून केलेल्या त्या गाण्याची सिनेमाचे दिग्दर्शक बिमलदांनी अतिशय सुमार टेकिंग करून साफ वाट लावली आहे असं त्यांचं म्हणणं त्यांनी जवळ जवळ सगळ्यांना ऐकवलं. आता हे गाणं कुणाच्या पसंतीला उतरणार नाही असा त्यांचा ग्रह झाला. त्यामुळे एस.डी. बर्मन त्या सिनेमाच्या प्रीमियर शोलासुध्दा रागाने गेले नाहीत. त्यांनी प्रीमियर शोवर बहिष्कार टाकला, पण बर्मनदांचं ते म्हणणं काळाने खोटं ठरवलं. तेच गाणं लोकांनी बेहद्द पसंत केलं, मास्टरपीस ठरवलं. बर्मनदा त्यावर काहीच प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत.

- Advertisement -

‘इन्कार’मधलं ‘तू मुंगडा मुंगडा, मैं गुड की डली’ हे गाणं लोकांच्या आजही लक्षात आहे. हेलनने त्या गाण्यावर केलेलं ते नृत्य गाण्याच्या त्या चालीच्या आणि त्या चित्रपटातील कथानकाच्या मागणीप्रमाणे उत्तान आणि उथळ होतं. तशाच उथळ पब्लिकने त्या गाण्यावर रसरसून शिट्ट्या फुंकल्या असल्या तरी ते गाणं लिहिताना गीतकार मजरूह सुलतानपुरींना मात्र आपलं ते लिखाण अजिबात आवडलं नव्हतं. आपल्या आयुष्यात सगळंच काही मनाजोगतं मिळत नसतं, आपल्या तत्वांशी कधीतरी काहीतरी अपरिहार्य तडजोड करावी लागते अशी स्वत:च स्वत:शी समजूत काढून ते गाणं लिहिण्यासाठी मजरूह सुलतानपुरी तयार झाले होते. दारूच्या अड्ड्यावर नाचणार्‍या एका बाईसाठी हे ठेक्यावरचं गाणं आहे अशी आणि एवढीच सूचना मिळाल्यावर ‘तू मुंगडा मुंगडा, मैं गुड की डली…’ असा मुखडा त्यांना सुचला…आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘पुढे जे जे मला सुचत गेलं ते मी लिहीत गेलो, जे जे सुचत गेलं ते कसंतरी शब्दांत मांडून मी गाणं एकदाचं पूर्ण केलं.’ ते गाणं मजरूह सुलतानपुरींनीच लिहिलं होतं, पण मजरूहजींनाच मजरूहजींचं ते गाणं आवडलं नव्हतं. ते गाणं शंभर टक्के पडणार, लोक त्या गाण्याची किंचितही दखल घेणार नाहीत असं त्यांनी आपलंच आपल्याशी भाकीत वर्तवलं, पण ‘इन्कार’ नावाचा तो सिनेमा पडद्यावर आला. त्या सिनेमातलं ते गाणं आणि त्या गाण्यावर हेलनचं ते मुंगडा नृत्य सुरू झालं आणि लोकांनी त्या गाण्याला तुफान दाद दिली. केवळ त्या गाण्यासाठी लोक पुन्हा पुन्हा तो सिनेमा पाहू लागले. बिचार्‍या मजरूहजींचं त्या गाण्याबद्दलचं भाकीत तमाम पब्लिकने खोटं ठरवलं. आपण डाव्या हाताने लिहिलेल्या त्या गाण्याला लोकांनी जो छप्पर फाडून प्रतिसाद दिला ते पाहून मजरूह सुलतानपुरींवर कपाळावर हात मारून घ्यायची पाळी आली.

‘डॉन’ मधल्या ‘खय के पान बनारस वाला’ या गाण्याचीही अशीच गमतीदार गोष्ट सांगितली जाते. किशोरकुमारना जेव्हा या गाण्याची चाल ऐकवण्यात आली तेव्हा किशोरकुमारना ती चाल तितकीशी पसंत पडली नव्हती, पण सिनेमातली गाणी गाण्याच्या पेशात आपल्याला सगळंच आपल्या पसंतीचं कसं मिळणार असं ठरवून ते गाणं गायचं किशोरदांनी मान्य केलं, पण प्रत्यक्षात मात्र आपल्यातल्या सगळ्या ऊर्जेचा वापर करून, आपल्या गायनातला सगळा नखरा गाण्यात आणून किशोरदांनी ते गाणं गायलं, पण तरीही हे गाणं काही लोकांच्या पचनी पडणार नाही, लोक त्याची फारशी दखल घेणार नाहीत असाच त्यांचा त्या गाण्याबद्दल होरा होता. तो काही ते गाणं गायल्यावरही बदलला नाही. पण ‘डॉन’ रूपेरी पडद्यावर आला आणि ‘खय के पान बनारस वाला’ हे गाणं सुपरडुपर हीट झालं. या गाण्याने त्या संपूर्ण सिनेमाचा भार आपल्या खांद्यावर वाहून नेला तेव्हा किशोरकुमारनाही कपाळावर हात मारून घेण्यावाचून दुसरा पर्याय राहिला नाही.

- Advertisement -

याच किशोरकुमारनी ‘नया दिन, नयी रात‘ या सिनेमासाठी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे एक गाणं गायलं होतं. गाण्याचे शब्द होते- कृष्णा कृष्णा, बोलो कृष्णा, राधे राधे, कृष्णा कृष्णा. खरंतर ते भजन होतं आणि ते लोकांना नक्की आवडेल असं किशोरकुमारचं मत होतं. त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी किशोरकुमार तसं स्टुडिओतल्या सगळ्यांना सांगत होते आणि त्याप्रमाणे किशोरकुमारनीही ते गाणं जीव तोडून गायलं, पण प्रत्यक्षात तो सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा लोकांनी त्या सिनेमाकडे तर पाठ फिरवलीच, पण ते गाणंही फ्लॉप गेलं.

राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’मध्ये मन्ना डेंनी गायलेल्या गाण्याचे शब्द होते ‘ए भाई, जरा देख के चलो, आगे ही नही, पीछे भी, दाये ही नही, बाये भी, उपर ही नही, नीचे भी.’ राज कपूरसारख्या प्रतिभावंत कलाकाराकडे मन्ना डेंना हे गाणं गायचं होतं. त्यातून राज कपूर हे काही ऐरेगैरे सिनेमा दिग्दर्शक नव्हते तर काव्य, संगीत यातले जातिवंत दर्दी होते. साहजिकच त्यांच्याकडे काम करायला मिळणं हे त्या काळी भाग्य समजलं जायचं. त्यामुळे मन्ना डेही राज कपूरकडे गेले आणि ते गाणं मनापासून गायले, पण खरी गंमत पुढे घडली. या गाण्याला चक्क त्या वर्षीचा फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळाला तेव्हा मन्ना डेंना साफ आश्चर्य वाटलं. कारण मन्ना डे यांच्या गाण्याचा बाज तसा शास्त्रीय संगीताचा होता आणि त्यांच्याकडे आलेल्या या गाण्यात तसं आव्हानात्मक असं काहीच नव्हतं आणि तरीही त्याला एखादं अ‍ॅवॉर्ड मिळणं हे त्यांच्या मते कमालीचं आश्चर्यकारक होतं. हा अ‍ॅवॉर्ड जाहीर झाल्यावर मन्ना डेंचं म्हणणं होतं, आगे ही नही, पीछे भी, दाये ही नही, बाये भी, उपर ही नही, नीचे भी, ऐसे शब्द जिस गाने में होते है उस गाने को भी अ‍ॅवॉर्ड मिल जाता हैं?थोडक्यात काय तर, सी. रामचंद्र म्हणतात त्याप्रमाणे, ‘एखादं पोर त्याच्या चेहर्‍यावरून आपल्याला बावळट वाटतं, पण त्याच पोराला जग मात्र विद्वान म्हणून मान्यता देतं.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -