शुध्द निषाद!

आज श्रीकांत ठाकरेंचा विषय निघण्याचं कारण असं की, ते जर आज असते तर काल बावीस जूनला त्यांचा वाढदिवस असता. त्यानिमित्ताने त्यांची आणि त्यांच्या संगीताची आठवण माझ्यासारख्या त्यांच्या रसिकांना नक्कीच झाली असती. मराठी भावगीतांमध्ये त्यांनी नक्कीच त्यांची स्वत:ची दुनिया निर्माण केली होती. ‘शोधिसी मानवा राऊळी मंदिरी’ हे गाणं हा त्याचा त्या काळातला भलेभक्कम पुरावा.

Mumbai

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. चिमुरड्यांसाठीच्या एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये आठ-दहा वर्षांची एक मुलगी अगदी जीव लावून गाणं गात होती. गाणं होतं – ‘उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या.’ तिच्या निरागस वयात ते अवघड वाटवळणाचं गाणं तिने तिच्या गळ्यात छान पेललं. नंतर त्या शोमधल्या चष्मेधारी, फेटेधारी परीक्षकाने त्या छोटीच्या त्या निरागस गाण्याचं कौतुक करण्याचा खूप गोबरागोजिरवाणा अभिनय केला.

हे सगळं करताना त्याने त्या गाण्याच्या मूळ गायिका शोभा गुर्टू यांच्या त्या गाण्यातल्या गायकीबद्दल भरभरून सांगितलं. मी वाट पहात होतो की हा फेटेधारी परीक्षक त्या गाण्याच्या संगीतकाराचं नाव कधी घेतो! पण शेवटपर्यंत त्या फेटेधार्‍याने संगीतकाराचं नाव घेतलंच नाही. मला काहीसा त्याचा रागच आला. कारण ‘उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या’ हे गाणं ज्या नक्षीदारपणे शोभा गुर्टूंनी पेश केलं आहे, त्याचं श्रेय त्यांना जेवढं जातं तेवढंच श्रेय हे या गाण्यातली अणकुचीदार कलाकुसर ज्या श्रीकांत ठाकरेंनी केली आहे त्यांनाही जातं. ती संपूर्ण संगीतरचना श्रीकांत ठाकरेंच्या कलाकल्पनेतून अवतरलेली होती. त्यामुळे त्या गाण्याबद्दल बोलायचंच तर शोभा गुर्टूंबरोबरच श्रीकांत ठाकरेंचं नाव घेणंही आवश्यक होतं. पण आजचे चॅनेलचंपू असल्या गफलती करत असतात हे मी समजून घेतलं आणि तो विषय तिथेच सोडून दिला.

आज श्रीकांत ठाकरेंचा विषय निघण्याचं कारण असं की, ते जर आज असते तर काल बावीस जूनला त्यांचा वाढदिवस असता. त्यानिमित्ताने त्यांची आणि त्यांच्या संगीताची आठवण माझ्यासारख्या त्यांच्या रसिकांना नक्कीच झाली असती. मराठी भावगीतांमध्ये त्यांनी नक्कीच त्यांची स्वत:ची दुनिया निर्माण केली होती. ‘शोधिसी मानवा राऊळी मंदिरी’ हे गाणं हा त्याचा त्या काळातला भलेभक्कम पुरावा. त्या एका काळात हे गाणं लोकप्रियतेच्या शिखरावर होतं. केवळ मराठी नव्हे तर अमराठी लोकांनाही या गाण्याच्या चालीतला गोडवा अतिशय भावला होता, इतकं ते गाणं आपल्याकडे सर्वदूर पसरलं होतं. दिदार सिंग नावाच्या पंजाबी गायकाच्या ऑर्केस्ट्रात तर लोक या गाण्याची नुसती फर्माईश करायचे नाहीत तर हट्ट करायचे आणि दिदार सिंग लोकांचा तो हट्ट आनंदाने पुरवायचे.

खरं तर श्रीकांत ठाकरेंकडे ते मूळ गाणं गायलं होतं महंमद रफींनी. श्रीकांत ठाकरेंनी ती संगीतरचना केल्यानंतर महंमद रफी त्यांना म्हणाले होते, ‘देखिए, मालकंस के मेरे सभी गाने हीट हो चुके हैं, ये भी हीट हो जायेगा!’…आणि रफींचं ते भाकित खरं ठरलं होतं. लोकांनी ते गाणं डोक्यावर घेतलं होतं, त्याच्यासाठी जीव ओवाळला होता. या गाण्याबद्दल श्रीकांत ठाकरे एक गोष्ट नेहमी आवर्जून सांगायचे की, हे भक्तीगीत आहे आणि यात बासरीसारखा जो सूर मध्ये वाजला आहे तो सॅक्सोफोनचा कलात्मक वापर करून काढलेला आहे. पण सर्वसामान्य रसिकाला तो खरंच सॅक्सोफोनचा सूर वाटायचा नाही. पण ती संपूर्ण करामत संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरेंची होती. त्यांच्या गाण्यांचा आणखी एक वेगळा पैलू असा होता की ते स्वत:च्या गाण्यांचं अ‍ॅरेंजिंग स्वत:च करायचे.

रफींसोबत श्रीकांत ठाकरे जेव्हा गाणं करायचे तेव्हा तो जणू एक सोहळा असायचा. कागदावर उजवीकडून सुरू होणार्‍या उर्दू भाषेत स्वत: श्रीकांत ठाकरे रफींना मराठी गाणं लिहून द्यायचे. हो, श्रीकांत ठाकरेंना उर्दू भाषा छान अवगत होती. ‘हा छंद जीवाला लावी पिसे,’ ‘अगं पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी,’ ‘हसा मुलांनो हसा’ यासारखी रफींनी गायलेली मराठी गाणी श्रीकांत ठाकरेंनी त्यांना आधी उर्दूत लिहून दिली होती. दस्तुरखुद्द रफी श्रीकांत ठाकरेंबाबत म्हणायचे की मराठी गाने के लिए मेरी और श्रीकांतजी की लाईफलाँग पार्टनरशीप हैं.

‘मी एकटीच माझी असते कधी कधी, गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी’, या शब्दातली गझल त्यांच्या वाचनात आली तेव्हाची गोष्ट तर फारच अजब होती. त्या गझलेतला आपल्याच कोषात हरवून पडलेल्या स्त्रीचा दर्द श्रीकांत ठाकरेंनी अचूक ओळखला आणि तिला त्यांनी तशीच दर्ददिवाणी हुरहुरती चाल लावली. पण त्यासाठी त्यांना नेहमीचे घिसेपिटे आवाज नको होते. तो दर्द हुबेहूब व्यक्त करणारा आवाज हवा होता. त्यासाठी त्यांना निर्मलादेवींचा (अभिनेता गोविंदाच्या आई) आवाज योग्य वाटला; पण निर्मलादेवींचा ठावठिकाणा तर त्यांना माहीत नव्हता. मग कुणाकडून तरी कळलं की त्या वसई-विरार भागात, पण तेही दुर्गम ठिकाणी राहतात.

मग अशाच एके दिवशी सकाळी सकाळी श्रीकांत ठाकरे वसई-विरारला पोहोचले. वसई-विरार भागातल्या रानोमाळातल्या वाटा धुंडाळत, निर्मलादेवी नावाच्या गायिकेच्या नावाचा संदर्भ देत, त्याबद्दल माहिती विचारत विचारत काट्याकुट्यांच्या वाटेवरून चालत निर्मलादेवींच्या घराचा शोध घेत ते निघाले. का तर आपण केलेल्या गझलच्या एका चालीला तोच आवाज न्याय देऊ शकतो म्हणून? शेवटी भगिरथ प्रयत्नानंतर श्रीकांत ठाकरेंना खरोखरच निर्मलादेवींचं घर मिळालं आणि त्यांच्यापुढे त्यांनी आपण केलेली ती गझल गाण्याचा प्रस्ताव ठेवला. यथावकाश ‘मी एकटीच माझी असते कधी कधी..’ ही गझल रेकॉर्ड झाली. रेडिओवरून प्रसारित झाल्यानंतर बर्‍याच जणांना ती अंतर्मुख करून गेली. याचं कारण श्रीकांत ठाकरेंनी त्या गाण्यात निर्माण केलेलं स्त्रीच्या एकटेपणाला साजेसं वातावरण.

श्रीकांत ठाकरेंच्या संगीतरचनेतला परमोच्चबिंदू ठरावं असं गाणं आहे ते ‘आज तुजसाठी ह्या पावलांना रे पंख फुटले, झनक झनझन झनक झनझन, अधीर मन झाले.’ शुरा मी वंदिले या सिनेमातलं. आशा भोसलेंनी गायलेलं. स्वरांचे मधूर कण न् कण जोडत केलेलं हे गाणं तसं दुर्लक्षित राहिलं असलं तरी श्रीकांत ठाकरेंचं हे गाणं म्हणजे स्वरांची कमालीची नक्षी त्यात विणलेली होती. पण काही काही गाणी फुटकं नशीब घेऊन जन्माला येतात तसंच काहीसं त्या गाण्याचं झालं.

आज सुरेश वाडकरांचं नाव गाण्यामध्ये खूप मोठं आहे; पण या सुरेश वाडकरांचं त्यांच्या आयुष्यात प्रथमच रेकॉर्ड झालेलं गाणं आहे ते श्रीकांत ठाकरेंच्या संगीतात. अबोली भावनांचे गीत हे उमलून आले, कळीचे फूल झाले, हे ते गाणं. त्यानंतर ‘प्रीतीचा फुलबाग सुमनांनी बहरून आला’, ‘तुझेच रूप सखे पाहुनिया फसलो गं’, ‘रातभर तो चंद्र आपला थाट का दावितसे’ अशी गाणी सुरेश वाडकर श्रीकांत ठाकरेंकडे गायले आणि त्यानंतर हळूहळू सुरेश वाडकर हे नाव लोकांसमोर येऊ लागलं.

श्रीकांत ठाकरेंची आणखी एक आठवण सांगायची म्हणजे ते मार्मिक साप्ताहिकातून चित्रपटपरीक्षण करायचे आणि त्यासाठी ‘शुध्द निषाद’ हे टोपणनाव वापरायचे. त्यांचं ते तिरकस शैलीतलं लेखन वाचणं हेसुध्दा मार्मिकचं वैशिष्ठ्य असायचं. पण अशी तिरकस शैली आणि व्यंगचित्रातली उपरोधिक शैली असलेले श्रीकांत ठाकरे हे संगीतकार म्हणून वेगळं व्यक्तिमत्व असायचं हे या ठिकाणी सांगायलाच हवं!