घरफिचर्समेंदीच्या पानावरमन अजून झुलते गं...

मेंदीच्या पानावरमन अजून झुलते गं…

Subscribe

एखाद्या देखण्या युवतीने डोळ्यांत तेवढंच काजळ घालावं, कानात तेवढेच डूल घालावे, चेहर्‍याला तेवढीच लालगुलाबी पावडर लावावी, ओठ तेवढेच लालचुटूक करावे आणि इतकं सगळं तेवढ्यास तेवढं केल्यावरही ती अतिशय देखणी, लावण्यवती दिसावी तसं ‘मेंदीच्या पानावर’ ह्या गाण्याचं आहे.

काही तशाच जाणकार लोकांनी गाण्याची केलेली एक व्याख्या आहे. गुणगुणावंसं वाटतं ते गाणं असतंच, पण जे गाणं ऐकल्यावर आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, पण तरीही जे लक्षात राहतं ते खरं गाणं.

- Advertisement -

गाणं हे खरंच असं असतं. जे कधी कधी ऐकलं की आपल्या मनातच रेंगाळत राहतं, मग आपण कोणत्याही गंभीर कामात गुंतलो तरी ते आपला पिच्छा सोडत नाही. रात्री झोपेपर्यंत मनाच्या कोपर्‍यात दरवळत राहतं. एकच नव्हे, कित्येक गाणी अशी असतात.

‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं…’ हे गाणं पहिल्यांदाच जेव्हा ऐकलं तेव्हा असंच झालं होतं. हृदयनाथ मंगेशकरांचं त्यांच्या बहराच्या काळातलं ते दृष्ट लागण्यासारखं संगीत, लता मंगेशकरांच्या आवाजातली त्या गाण्याला लाभलेली ती कोवळीक आणि सुरेश भटांच्या नाजूकसाजूक शब्दांचा साज असा त्या गाण्यातला तिन्ही बाजूंनी झालेला अलौकिक मिलाफ खरेखरच दैवदुर्मीळ होता. त्यातला तो मेलडीशी अचूकपणे समांतर वाजणारा आणि मन वेधूून घेणारा ठेका ऐकतानाच मन खुलवणारा होता आणि गाणं संपल्यानंतरही मनात तसाच रवंथ करत राहणारा होता. त्यातल्या अंतर्‍यातली दूरवर साद घालत पोहोचणारी ती ‘झुळझुळतो अंगणा तोच गार वारा गं…’ ही ओळ ऐकताना तर लतादीदींचा तो सूर आपलं बोट धरून आपल्याला कुठेतरी एकांतवासात तर नेत नाही ना, असा भास व्हायचा. खरंतर ‘झुळझुळतो अंगणा तोच गार वारा गं…’ ह्या ओळीत आणखी एक सूक्ष्म गंमत आहे ती अशी की त्यातल्या शेवटच्या ‘गं’ ह्या अक्षराला लतादीदींच्या आवाजाने अंधुक, अस्पष्ट आणि अलगद स्पर्श केलेला आहे. तो नीट ऐकताना ती विशिष्ट ओळ आपल्या कानामनाला एक मोरपिशी स्पर्श करून जाते.

- Advertisement -

एखाद्या देखण्या युवतीने डोळ्यांत तेवढंच काजळ घालावं, कानात तेवढेच डूल घालावे, चेहर्‍याला तेवढीच लालगुलाबी पावडर लावावी, ओठ तेवढेच लालचुटूक करावे आणि इतकं सगळं तेवढ्यास तेवढं केल्यावरही ती अतिशय देखणी, लावण्यवती दिसावी तसं ‘मेंदीच्या पानावर’ ह्या गाण्याचं आहे. ह्या गाण्यातली मेलडी, र्‍हिदम, लय, नाद सगळं तेवढ्यास तेवढं आहे. त्यामुळे त्या गाण्यातलं सौंदर्य सुटसुटीत आहे, ते गाण्याच्या एखाद्या ठिकाणी, एखाद्या वळणावरही किंचितही बटबटीत झालेलं नाही. म्हणूनच हे गाणं कोणत्याही मनस्थितीत, कोणत्याही परिस्थितीत ऐकताना मन प्रसन्न करतं, ताजंतवानं करतं.

हे गाणं जन्माला आल्यापासून नव्या-जुन्या पिढीतल्या सगळ्यांना भुरळ घालत आलं आहे इतकं हे सदाबहार, चिरतरूण गाणं आहे. ह्या गाण्याची ज्यांना भुरळ पडली त्यातलं एक नाव आहे सलील चौधरी. हिंदी सिनेमासृष्टीतलं हे त्यावेळचं संगीतकार म्हणून एक सुप्रसिध्द बंगाली नाव. मधुमती, माया, छोटीसी बात ह्यासारख्या कितीतरी सिनेमांचं संगीत त्यांच्या नावावर नोंदवलं गेलं होतं आणि ते लोकांना छान पसंत पडलं होतं. त्यात सलील चौधरी हे कविमनाचे संगीतकार म्हणूनही ओळखले जात होते. तर अशा ह्या भावगर्भ संगीतकाराने ‘मेंदीच्या पानावर’ हे गाणं ऐकलं तेव्हा त्या गाण्याच्या ते प्रेमातच पडले. पुन्हा पुन्हा ते अवीट गोडीचं गाणं ऐकल्यावर हे गाणं बंगाली रसिकांसाठी आपल्या बंगाली भाषेत नेण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. अखेर हृदयनाथ मंगेशकरांशी त्या गाण्याच्या एकूण रचनेबाबत तपशीलवार बोलून त्यांनी हे गाणं बंगालीत नेलं. त्याला बंगाली शब्दालंकार चढवले आणि ते गाणं ‘ए दिन तो जाबे ना, माना तुमी जॉतॉय कॉरो’ अशा शब्दांत साकार झालं. हे गाणं बंगालीतसुध्दा त्यांनी लतादीदींकडूनच गाऊन घेतलं आणि बंगालीतसुध्दा हे गाणं सर्वदूर पोहोचलं. आजही हे गाणं जुनेजाणते बंगाली संगीतरसिक आपल्या मनाच्या कप्प्यात जपून आहेत.

लता मंगेशकर हे नाव भारतवर्षात, जगभरात संगीतातल्या एका चमत्काराचं नाव म्हणून ओळखलं जातं. ह्या नावाचे भारतवर्षात, जगभरात आजही कोट्यवधी चाहते आहेत. त्यातले काही जातिवंत चाहते स्वत:च्या भाषेतल्या गाण्यांसह लतादीदींनी गायलेल्या इतर भाषेतल्या गाण्यांचीही तपशीलवार नोंद ठेवून असतात. अशा बहुसंख्य चाहत्यांकडे ‘मेंदीच्या पानावर’ ह्या गाण्याची नोंद आहे, हा ह्या गाण्याच्या लोकप्रियतेचा सज्जड पुरावा आहे. अनेक गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली संगीतरसिकांना ‘मेंदीच्या पानावर’ हे मराठी गाणं माहीत आहे हे ह्या गाण्याचं मोठं यश आहे.

आज साडेचार ते पाच दशकं ह्या गाण्याला झाली आहेत. पण आजही हे गाणं इतर कोणत्याही गाण्यांप्रमाणे मोडीत काढलं गेलेलं नाही किंवा रद्दीत जमा झालेलं नाही. आजच्या तरूण पिढीच्या एकदाच नव्हे तर बर्‍याच वेळा हे गाणं कानावर पडत असतं आणि त्यातून त्यांचं लक्ष ह्या गाण्याकडे जात असतं. ते जाताना हे गाणं त्यांच्या लक्षातही राहत असतं. नव्या पिढीची कितीतरी नवनवी गाणी आज बाजारात येत असतात आणि बाजारातून हद्दपार होत असतात. त्यातली काही गाणी नव्या पिढीच्या लक्षात राहतात तर काही गाणी दखल न घेतली जाताही अशीच अदृश्य होतात. हे असं चित्र असतानाही ‘मेंदीच्या पानावर’ हे गाणं जुन्या आणि नव्या अशा दोन्ही पिढ्यांच्या लक्षात आहे, त्यांना ते गाणं आजही भावतं आहे, हीच ह्या गाण्याची मोठ्यात मोठी पोचपावती आहे.

ह्या गाण्याच्या निमित्ताने एक आठवण सांगावीच लागेल…काही वर्षापूर्वी घाटकोपरच्या एका म्युनिसिपल शाळेत दिवाळीच्या निमित्ताने एक रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्यात एका चित्रकाराने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचं चित्र आपल्या रांगोळीतून रेखाटलं होतं. लता मंगेशकरांचं चित्र आणि त्याबरोबर कोपर्‍यात एक छोटंसं पिंपळपानही रेखाटण्याची कलात्मकता त्या चित्रकाराने दाखवली होती…आणि त्या रांगोळीच्या खाली एक ओळ लिहिली होती ती फारच लक्षवेधी होती. ती ओळ होती – ‘झाले जुनेपुराणे तरी फूल वेलीवर डुलते गं, मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं.’

लतादीदींच्या त्या चित्राखाली ज्याने कुणी ती ओळ लिहिली ती खरंच मार्मिक होती. लता मंगेशकर हे नाव आज जुनंपुराणं झालं असेल, पण त्यांची गाणी आजही मनात डुलताहेत, जणू मेंदीच्या पानावर आजही मन झुलावं. पण हे सर्व सांगताना त्याने कोणत्या गाण्याचा आधार घेतला तर तो ‘मेंदीच्या पानावर’ ह्या गाण्याचा. ‘मेंदीच्या पानावर’ म्हणूनच चिरतरूण आहे!…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -