दहा रुपयांत थाळी विथ राजकीय पोळी

Mumbai

सकाळपासून साहेब नुसते किचनकडे घिरट्या घालत होते.स्वयंपाकीण बाई देखील थोड्या चक्रावल्या होत्या.कायम बाहेर असणारे साहेब आता चक्क स्वयंपाकघरात का? याचेच तिला आश्चर्य वाटत होतं. राज्यात आणि अगदी राज्याबाहेर फिरणारे साहेब आता चक्क स्वयंपाक घरात स्थिरावले होते. निवडणुका जस जशा जवळ येत होत्या तस तशी साहेबांची चिंता वाढत होती.गेल्या पाच वर्षांपासून साहेब सत्तेत असले तरी त्यांना कारल्याच्या भाजीइतकेच दुय्यम स्थान होते. त्यामुळे सत्तेची चव चाखायची असेल तर आपल्याला फक्कड अशी रेसिपी आणि तिही कमी बजेटमध्ये बनवावीच लागेल, याचे सायबांसमोर मोठं चॅलेंज होतं.अगदी मास्टर शेफच्या स्पर्धकांहूनही साहेबांसमोर आव्हान होतं. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून साहेब नेमकं काय कराव? याच विचारात गढून गेले होते. साहेबांनी अख्खं किचन धुंडाळलं होतं, पण नेमका फॉर्म्युला त्यांना सापडत नव्हता.स्वत:च्या किचननुसार प्रयोग करायचा तर केलेल्या पदार्थांचं बजेट वाढत होतं, त्यामुळे जनतेला हे काही परवडणारं नाही याची सायबांना पुरेपूर कल्पना होती. नेमकी कोणती रेसिपी बनवायची याची त्यांना चिंता लागली होती.वडापाव बनवून आणि त्याचे स्टॉल उभारून आता कित्येक वर्षे झाली होती. त्यामुळे त्यावर काही आता गुजराण होणारी नव्हती. काहीतरी नवीन आणि जनतेचे डोळे चमकवणारे जनतेच्या ताटात टाकल्यास मतांची उत्तम टीप आपल्याला मिळेल असं काहीतरी सायबांना करायंच होतं. सायबांनी आपल्या खास सल्लागारांची मिटींग बोलावली.सर्व जण रेसिपी बनवण्यात (आणि बिघडवण्यातही) माहीर होते. मिटींगला सुरुवात झाली. बोला,तुम्हाला काही सुचलंय का एवढ्या दिवसात? साहेबांनी सल्लागारांना प्रश्न विचारला. नाही साहेब,मी काय म्हणतो, आपण या सर्वांपेक्षा फ्री-वाय फाय दिलं तर, सायबांचे स्वीय सचिव म्हणाले. अहो,आता इंटरनेट ही मूलभूत गरज असली तरी सर्वजणच फ्री देतायंत? त्यात काय नवीन? त्यावर आपल्याला कोण मतं देईल का? दुसरं काहीतरी सुचवा. साहेब,ते….आपण वीज मोफत दिली तर? साहेबांचे राईट हॅण्ड संजय म्हणाले. अहो,आपल्याला झेपेल तेवढे बोलूया, कशाला जनतेच्या रोषाला सामोरे जायचे आणि अजून काहीजण त्याच मुद्द्यावर निवडणूक लढतायत ना? मग आपण पण तोच मुद्दा का घ्यायचा? जरा दुसरं काहीतरी सुचवा. साहेबांनी त्यांना दरडावलं.जवळपास दोन तास मिटींग चालली, परंतु नेमकं काय आणि कसं बनवायंच हेच सुचत नव्हतं.साहेबांनी भवनातून खाली नजर टाकली. सिग्नलला एक भिकारी वडापाव खात बसला होता. साहेबांच्या डोक्यात प्रकाश पेटला. साहेबांनी सर्वांना खिडकीपाशी नेलं,तो भिकारी दिसतोय,सर्वांनी एका स्वरात हो म्हटलं. त्याच्याकडे बघा, दिवसभर पैसे कमावून त्याला साध्या वडापावसाठी 15 रुपये मोजावे लागतात, त्यात त्याचं पोटही अर्धवट राहत असेल ना? यावेळी आपण फक्त 10 रुपयांत पोटभर जेवण द्यायचं, ठरलं, फिक्स. सायबांनी निर्णय फायनल केला,पण…साहेब? आपले मतदार तर याकडे आकर्षित होतील ना? सर्वांनी प्रश्न उपस्थित केला.अरे बाबांनो,गेल्या 70 वर्षांत परिस्थिती बदललीय कुठे? खिसा आणि पोट यांचं गणित आपण साधलं तर आपलं राजकारण हे बेरजेचंच होणार,साहेबांनी सर्वांना उपदेश केला, पण….साहेब? सर्वांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला. आता काय? साहेब म्हणाले.अहो..पण ते आपले वडापाववाले त्यांचं तर नुकसान होईल ना? ते बोंबा मारतील, सर्व जण एका सुरात म्हणाले.अरे,त्यांचं टेन्शन नको घेऊ,आता ते कुठे गरीब राहिलेत? सायबांनी प्रश्नातच उत्तर सांगितलं. सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी सायबांना नामी रेसिपी सापडली होती.
(2020 पर्यंत महासत्ता होवू पाहणार्‍या आपल्या देशात अजूनही पोटं आणि खिसे रिकामे आहेत आणि त्यांनी मतपेट्या भरता येतात याची सायबांना जाण होती.)