घरफिचर्सफ्रँक काप्राविना चित्रपट इतिहास अपूर्ण

फ्रँक काप्राविना चित्रपट इतिहास अपूर्ण

Subscribe

फ्रँक काप्राने अनेक चित्रपट बनवले आणि त्यामुळे त्याला चांगली मागणी होती. पैसाही चांगला मिळत होता. दीर्घकाळ त्याने कोलंबियासाठी निर्मिती केली आणि नंतर इतर कंपन्यांसाठीही काम केले. खरे तर ‘इट हॅपन्ड वन नाइट’ नंतर ‘गॉन विथ द विंड’ करण्याची संधी मिळावी यासाठी त्याने प्रयत्न केले होते. पण त्यात त्याला यश मिळाले नाही.

दिल हैं के मानता नहीं, आठवतो ना? तोच आमिर खान आणि पूजा भटचा. महेश भट यांनी तो चित्रपट तयार केला होता, एका इंग्रजी चित्रपटावरून. म्हणजे अगदी फ्रेम टू फ्रेम म्हणतात तशा प्रकारे. त्यामुळेच तो चांगला झाला होता हेही तितकेच खरे. (शिवाय भरीला गाणी होतीच.) तो मूळचा इंग्रजी चित्रपट होता ‘इट हॅपन्ड वन नाइट’ आणि कोलंबियासाठी तो बनवला होता फ्रँक काप्राने. दिग्दर्शकही तोच होता. सॅम्युअल हॉपकिन्स अ‍ॅडम्स या लेखकाच्या ‘नाइट बस’ या कथेवरून रॉबर्ट रिस्किनने पटकथा संवाद लिहिले होते. या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते, इतकेच नाही तर 1934 सालच्या या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम लेखक, सर्वोत्तम अभिनेता (क्लार्क गेबल) आणि सर्वोत्तम अभिनेत्री (क्लॉडेट कोल्बर्ट) असे पाच ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. (यामुळेच कोलंबियाने 1950 साली याला म्युझिकल म्हणजे संगीतमय करून ‘यू कान्ट रन अवे फ्रॉम इट’ असे नाव देऊन तो पुन्हा बनवला होता.) याच चित्रपटाने काप्राला चांगली प्रसिद्धी तर मिळालीच; पण त्याची गणना थोर दिग्दर्शकांत करण्यात येऊ लागली.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला इटलीमध्ये जन्मलेल्या काप्राने सहाव्या वर्षीच कुटुंबाबरोबर अमेरिका गाठली आणि अखेरपर्यंत तो तेथेच राहिला आणि त्याची निष्ठाही त्याच देशाशी राहिली. इतकी की त्याला खराखुरा अमेरिकन म्हणत आणि अमेरिकन ड्रीम साकार करून दाखवणारा दिग्दर्शक अशीही त्याची ओळख बनली होती. मूक चित्रपटांपासूनच वयाच्या अठराव्या वर्षी त्याची चित्रपट कारकीर्द सुरू झाली होती आणि चित्रपटांनंतर दूरचित्रवाणीसाठी काम करत वयाच्या 89 व्या वर्षापर्यंत तो या व्यवसायाशी जोडलेलाच राहिला होता.

- Advertisement -

काप्राचा स्वभाव विचित्र होता. तो अनेक गोष्टी रंगवून सांगायचा. स्वतःबाबतही बरेच काही बोलायचा; पण अनेकदा त्याची शहानिशा करायला गेले, तर मात्र त्याने सांगितल्यापैकी फारसं काही खरे नाही असे आढळत असे. त्यामुळेच तो आपण केमिकल इंजिनिअर आहोत असे सांगत असला, तरी प्रत्यक्षात मात्र त्याने ती पदवी घेतली नव्हती. अर्थात त्यात त्याला गती होती. कारण ते सारे तो शिकला होता. एक गोष्ट मात्र खरी होती की त्याला खगोलशास्त्रज्ञ बनायचे होते; पण काही कारणाने त्याला चित्रपटांचीच कास धरावी लागली होती. अर्थात शालेय जीवनापासूनच त्याचे कलांशी नाते होते आणि त्यात त्याची खूपच प्रगती झाली होती. इतरांच्या मानाने त्याला कित्येक गोष्टी अधिक येत असत. चित्रपटांसाठीही त्याने अनेक चित्रपटांच्या वेळी पटकथा लेखकाला मदत केली. त्याने ज्याच्याबरोबर जास्तीत जास्त काम केले तो रिस्किन म्हणतो की, मला आश्चर्य वाटायचे की हे सारे त्याला कसे काय येते म्हणजे निर्मितीच्या अनेक अंगांची त्याला माहिती होती. कधी कधी वाटते की तो नसता तर मी कुठवर पुढे गेलो असतो?

फ्रँक काप्राने अनेक चित्रपट बनवले आणि त्यामुळे त्याला चांगली मागणी होती. पैसाही चांगला मिळत होता. दीर्घकाळ त्याने कोलंबियासाठी निर्मिती केली आणि नंतर इतर कंपन्यांसाठीही काम केले. खरे तर ‘इट हॅपन्ड वन नाइट’ नंतर ‘गॉन विथ द विंड’ करण्याची संधी मिळावी यासाठी त्याने प्रयत्न केले होते; पण त्यात त्याला यश मिळाले नाही. चित्रपटसृष्टीत त्याने 1915 मध्येच पाऊल टाकले होते आणि 1928 मध्ये चित्रपटांना आवाज मिळेपर्यंत अनेक मूकपट केले होते त्यात दोन रिळांच्या विनोदी प्रसंगांपासून अनेक लहान चित्रपटांचा समावेश होता. खरोखरच त्याने दोन रिळांचे अनेक छोटे चित्रपट आणि मूकपट तयार केले होते. त्यांवर त्याचा प्रभाव सहजपणे दिसून येत असे. चित्रपटाला आवाज मिळाल्यानंतर त्याला प्रथमच संधी मिळाली. ‘सबमरीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याच्याकडे आले तेव्हा निर्माता आयविंन विलाट दिग्दर्शन करत होता. पण त्याने स्वतःऐवजी काप्रावर ती जबाबदारी सोपवली. काप्राने विलाटने केलेले सारे चित्रीकरण रद्द केले आणि प्रथमपासूनच तो सुरू केला.

- Advertisement -

नंतर ‘यंगर जनरेशन’, ‘डोनोव्हन अफेअर’, ‘फ्लाइट’, ‘लेडीज ऑफ लीझर’ हे चित्रपट केले. 1930 च्या ‘रेन ऑर शाइन’ आणि ‘मिरॅकल वूमन’ या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या उत्कर्षाला सुरुवात झाली ‘प्लॅटिनम ब्लाँड’ या चित्रपटाने. तेथून पुढे त्याचा लौकिक वाढतच गेला. आणि 1934 मध्ये आला ‘इट हॅपन्ड वन नाइट’. अविस्मरणीय असेच त्याचे वर्णन करावे लागते, अगदी आजही. श्रीमंतांविरुद्धची एक सूक्ष्म अढी त्याच्या कलाकृतींमधून दिसते आणि त्याच्या काही नायकांचे तर तेच वैशिष्ठ्य आहे. त्याचे कारण होते केवळ दिखावूपणा, डामडौल आणि भरीला नाटकीपणाचे वागणे, अशा प्रकारांचा त्याला राग येत असे. खूप चांगल्या प्रकारे राहण्यासारखी त्याची परिस्थिती होती तरी त्याची स्वतःची राहणी अगदी साधी, खरे तर गबाळा वाटावा अशी होती. त्याबाबत त्याला काहीच फिकीर नव्हती. त्याच्या दृष्टीने काम कसे होते आहे ते महत्त्वाचे. महत्त्व कलेच्या निर्मितीला आहे, कलाकाराच्या राहणीला नाही, असे त्याचे मत होते. त्याच्या कपड्यांची रंगसंगतीही कधीच योग्य प्रकारची नसे. कोणत्याही रंगाचे वेगवेगळे शर्ट पॅन्ट, कोट, रुमाल तो मिरवत असे. डोक्यावर हॅट मात्र असे. त्याचा चेहरा जरासा मोठा वाटावा असा आणि त्याच त्याच्या राहणीमुळे तो जरासा उग्र दिसायचा. तरुणपणाच्या फोटोंमध्ये मात्र तो देखणा वाटतो (काही प्रमाणात पीट सँप्रस आणि त्याच्यात साम्य वाटते).

काप्राचा नंतरचा चित्रपट होता ‘मिस्टर डीडस गोज टू टाऊन’. त्यात प्रमुख भूमिका गॅरी कूपरची होती. जेम्स स्टुअर्ट आणि जीन आर्थरला घेऊन त्याने ‘यू कान्ट टेक इट विथ यू’, तर जेम्स स्टुअर्टलाच घेऊन ‘मिस्टर स्मिथ गोज टु वॉशिंग्टन’ हा गाजलेला चित्रपट बनवला. त्यातला स्मिथ हा सिनेटर बनून वॉशिंग्टनला जातो. नंतर गॅरी कूपर, बार्बरा स्टॅनविकला घेऊन त्याने ‘मीट मिस्टर डो’, तर कॅरी ग्रँटला घेऊन ‘आर्सेनिक अ‍ॅन्ड ओल्ड लेस’ बनवला होता. तो चित्रपट त्याला पूर्ण झाल्यानंतर पुन्हा थोडा नव्याने चित्रीत करायचा होता; पण युद्धकाळात तो सैन्यात भरती होण्यासाठी गेल्याने तो तसाच राहिला. (या चित्रपटासाठी त्याने ग्रँटला स्वतःपेक्षाही जास्त पैसे दिले होते. 1,60,000डॉलर. मात्र ग्रँटने त्यातील एक लाख डॉलर देणगी म्हणून संस्थांना दिले.) नंतर अमेरिकन लष्करासाठी अनेक लहान मोठे चित्रपट आणि माहितीपट त्याने तयार केले.

युद्धसमाप्तीनंतरचा त्याचा पहिला चित्रपट होता, ‘इट्स अ वंडरफुल लाईफ’. त्यातही जेम्स स्टुअर्टची प्रमुख भूमिका होती. 1948 मध्ये स्पेन्सर ट्रेसी आणि कॅथरन हेपबर्न या प्रख्यात जोडीला घेऊन ‘स्टेट ऑफ द युनियन’ हा चित्रपट तयार केला. 1951 ते 59 या कालखंडामध्ये काप्राने अनेक शैक्षणिक माहितीपट तयार केले. त्यानंतर एडवर्ड जी. रॉबिन्सन आणि एलेनॉर पार्कर यांना घेऊन त्याने ‘होल इन द हेड’ हा चित्रपट बनवला. पाठोपाठ ‘पॉकेटफुल ऑफ मिरॅकल्स’ हा ग्लेन फोर्ड, बेटी डेव्हिस, अ‍ॅन मार्गारेटचा चित्रपट तयार केला. त्यानंतर मात्र त्याने बहुतांश दूरचित्रवाणी आणि माहितीपटांसाठी काम केले. त्याच्यावर आणि त्याला घेऊनही अनेक खास दूरचित्रवाणीसाठी चित्रपट तयार करण्यात आले होते आणि त्यातील काहींमध्ये त्याने काम केले, मुलाखती दिल्या.

असा हा अवलिया म्हणावा असा कलाकार. अवलिया का तर त्याच्या खगोलशास्त्र सोडून चित्रपटांत येण्याच्या निर्णयाला साठ वर्षे झाल्यानंतर त्याने दिलेल्या मुलाखतीवरून कळते. ती पुढीलप्रमाणे :-

आपला निर्णय बरोबर होता असे तुला वाटते का? खास करून नाही.विज्ञानक्षेत्रातच तू अधिक आनंदी असतास असं तुला वाटतं का? हो!का? मी बरंच काही जास्त करू शकलो असतो.
तू कोठपर्यंत पोहोचला असतास असं तुला वाटतं? एडविन (हबलपर्यंत) खगोलशास्त्रज्ञ म्हणून. मी ग्रह आणि नक्षत्रे यांचा कायम अभ्यास करत राहिलो असतो. कारण मला कायमच का? ‘का’चे उत्तर हवे असायचे.
तर मग तू तेच का केलं नाहीस? तुझं मन कशामुळं बदललं? चित्रपटांनी माझं मन बदलवलं. मी दीर्घकाळ चित्रपटसृष्टीत आहे, पण आता कॅलटेकला जातो तेव्हा मला अनेक ठाऊक नसलेल्या गोष्टी तेथे दिसतात. कृष्णविवरे, बापरे! मला तर वेडा झाल्यासारखं वाटतं. मी त्यावेळी ते कसं नाकारलं, कशामुळं नाकारलं का.. का…
म्हणजे तुला वाटत की शास्त्रज्ञांना सिनेकलावंतांपेक्षा अधिक आदरभाव मिळतो? अगदी आजही चित्रपट दिग्दर्शक हा खगोलशास्त्रज्ञाएवढा महत्त्वाचा नाही.
पण ते काही फारसे प्रसिद्ध नाहीत! त्यांच्या जमातीत ते सर्वांना माहीत असतात.
म्हणजे तू प्रसिद्धी डोळ्यापुढं ठेवून निर्णय घेतला होतास का? हो. मला कुणीतरी व्हायचं होतं.

तरीही तुला खंत आहे… होय. पण असं दिसतं की चित्रपटांची माझ्यावर जबरदस्त पकड आहे. म्हणजे नक्की ते काय आहे, ते मला सांगता येणार नाही, कारण मलाही ते ठाऊक नाही, पण मला वाटतं की त्याचं कारण प्रेक्षक आहेत. त्यांनीच मला तेथे ठेवलंय. मी काहीतरी बनवलं आणि लोकांना दाखवलं आणि त्यांना ते आवडलं. त्यांनी अनेकदा दादही दिली, टाळ्या दिल्या वा इतर प्रकारे उत्तेजन दिले. त्यामुळेच मला वाटतं मी तिथंच टिकून राहिलो, त्यामुळेच मी ते सारं सोडून दिलं नाही. तरी अनेकदा मला तसं वाटायचं खरं…

(संदर्भ :- फ्रँक काप्रा :- द कॅटॅस्ट्रोफ ऑफ सक्सेस.
लेखकः जोसेफ मॅकब्राइड; प्रकाशक :- टचस्टोन )

– आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -