घरफिचर्सविनाकारण कर्ज काढू नका!!

विनाकारण कर्ज काढू नका!!

Subscribe

देनेवाला देता है ,तब छप्पर फाडके देता है ! हे आपण अनेकदा अनेक ठिकाणी ऐकलेले आहे. पण आपल्याला सतत येणारे बँकांच्या प्रतिनिधींचे त्रस्त करणारे फोन जसे की, आप को दस लाख रुपये का पर्सनल लोन हमारी बँक देना चाहती है , आप प्लीज लिजिये ! गेल्या काही वर्षात सर्वच बँकांनी अशी काही रिटेल साधने लोकप्रिय केलीत. त्यात कार्ड घराण्यातील-क्रेडीट, डेबिट आणि एटीएम या भावंडांच्याबरोबरीने ‘पर्सनल लोन’ म्हणजेच व्यक्तिगत कर्ज हा प्रकार जनमानसात खूप प्रमाणात रुजवला. कारण त्याआधी कोणतीही बँक तारण घेतल्याविना कर्ज देत नव्हती.

फक्त तोलामोलाचे श्रीमंत आणि भारी पत असलेल्यांना कर्जे देण्यात बँकांना स्वारस्य होते.गरीब-मध्यमवर्गीय त्यांच्या नकाशातही नव्हते. हल्लीच्या भाषेत रडारवरही नव्हते! पुढे मध्यम वर्गाकडे म्हणजे पगारदार मंडळींकडे खेळता पैसा आलेला आहे. हे पाहून विदेशी बँकांनी पर्सनल लोन हे प्रोडक्ट आणले आणि यथावकाश गळी उतरवले.गरजा वाढत होत्या, त्याचा पुरेपूर अभ्यास करून बँक-ग्राहकांना जणू या प्रोडक्टची गोडी लावली.आजकाल तर काय बँका आपल्या तिजोरीत पैसा जास्त झाल्याप्रमाणे लोकांना अशी कर्जे देण्याच्या स्पर्धेत असल्यागत आपल्या मागे लागत आहेत. अशावेळी आपल्याला मिळतेय लोन तर घेऊया असा मोह होणे. हे स्वाभाविक आहे. त्याबाबत तुलना करणे. आपली गरज किती महत्वाची आहे ? आणि हे कर्ज रास्त व्याजाचे आहे की महागडे? की इतर छुपे चार्जेस घेतले जातात का? याबाबत विचार केला पाहिजे. आजच्या लेखात पर्सनल लोनची चांगली आणि वाईट बाजू पाहूया. म्हणजे यापुढे असे कर्ज घेताना आपल्याला काही निकषांची मदत होऊ शकेल. एकूणच चटकन मिळणार्‍या लोन्सबद्दल आर्थिक साक्षरता वाढेल.

पर्सनल लोन -वैशिष्ठ्ये
लोन रक्कम – अगदी रु.20,000 पासून ते रु.10 ते 15 लाख इतके मिळू शकते. पगारदारांना त्यांचे मासिक उत्पन्न हे साधारण रु 20,000/- असावे, अशी काही बँक्सची किमान उत्पन्नाची अट असते. निकष – पगारदार व व्यावसायिकांना अधिक रक्कम तर त्या तुलनेत स्वयंरोजगार व्यक्तीला थोडी कमी रक्कम.

- Advertisement -

कोणतीही बँक या कर्ज प्रकारासाठी काही तारण घेत नाही
मुदत- 12 महिने म्हणजे 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत याबाबतीत पगारदार,व्यावसायिक आणि प्रोप्रायटरीसाठी वेगळी मुदत
संमतीसाठी लागणारा वेळ – कर्जाचा अर्ज मंजुरीसाठी सहसा वेळ लागत नाही, जास्त दस्तावेज नसल्याने जलद संमती मिळू शकते, मात्र सिबील रेटिंग किंवा अर्जदाराचे उत्पन्न याबाबतची माहिती आणि शहानिशा करण्यास अवधी लागू शकतो.
व्याज-दर – प्रत्येक बँकेचे वेगळे तरी साधारण 10.75% ते 15% काही कंपन्या किंवा संस्थाना त्यांच्या कर्मचारी/सदस्य यांच्यासाठी विशिष्ट लोन दिली जातात. तेव्हा त्यांना स्वस्त व्याज-दर दिला जातो. जो त्यांच्यासाठीच असतो कारण अधिक कर्जदार मिळाले तर तशी सवलत मिळू शकते. जेव्हा बँक एखादे तारण घेऊन कर्ज देते तेव्हा कर्ज-व्याज हे पर्सनल लोनपेक्षा अधिक असते. कारण हे कर्ज तारण-विरहीत असते, हल्लीच्या भाषेत पेपरलेस -लोन असते.

बँकेत खाते असण्याची अट नाही. परंतु तुमचे खाते असेल आणि बँक अशा लोनकरिता व्याज-दरात काही प्रमाणात सवलत देत असेल तर ग्राहक म्हणून फायदा जरूर घ्यावा. शिवाय परिचित असल्याने सेवा सुकरता, केवळ पगारासाठी खाते उघडलेले असल्यास तिथेही लोनसाठी सवलत-सुविधा असल्यास लाभ होऊ शकतो.

- Advertisement -

परत-फेड – ई.एम.आय./दर महिन्याच्या निश्चित केलेल्या तारखेला – चेक किंवा रोखीने किंवा खात्यातून ट्रान्स्फर
सिबील रेटिंग -सिबील ही एक अशी स्वतंत्र संस्था आहे. जी तुम्हा आम्हा कर्ज घेऊ इच्छिणार्‍या संभाव्य कर्जदारांची पात्रता ठरवते. कारण अनेकदा कर्जे काढणे आणि बुडवत राहणे ! असा उद्योग करणारी काही खोडसाळ मंडळी असतात. तर काही खरोखरच कर्जबाजारी होऊन फसतात. असे काही होऊ नये म्हणून आणि एकूणच कर्ज काढू पाहणार्‍या व्यक्तीचे ‘आर्थिक आरोग्य’ तपासण्यासाठी आणि आर्थिक कुवत सांगण्याचे काम सिबीलसारख्या संस्था पद्धतशीरपणे करत असतात. परदेशात असे क्रेडीट रेटिंग तपासून घेणे. हे अनिवार्यच असते. आपल्याकडेदेखील आता हे हळूहळू मागितले जाईल. अशी अपेक्षा आहे. कारण एखाद्याच्या कर्ज घेण्याच्या, वापरण्याच्या प्रवृत्तीचा अमुक कालावधीचा लेखाजोखा तपशीलवार मिळू शकतो. एखाद्याने अनेक ठिकाणाहून कर्जे घेतली असल्यास ती परतफेड करण्याची व्यवस्था, त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत अशी अद्ययावत माहिती-डेटा उपलब्ध होतो. कर्ज देणार्‍या बँक किंवा वित्त संस्थेला अशा प्रमाणित माहितीचा मोलाच्या उपयोग होतो. आपली आर्थिक कमाई, कर्जे घेण्याची आणि परत करण्याची कुवत जोखण्यासाठी असा दर्जा -मार्गदर्शक ठरू शकतो. अशा व्यक्तीला आपण कर्ज द्यायचे की नाही? याबाबत निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. कोणताही असा जोखमीचा निर्णय ‘व्यावसायिक ‘पद्धतीने – शास्त्रोक्त माहितीच्या आधारे घेणे ही आजची गरज आहे. माहितीसाठी- 17 जानेवारी 2019 च्या आकडेवारीनुसार सिबीलकडे रु 273,923 कोटी मूल्य इतके पर्सनल लोनचे अर्ज आलेले होते.

ठळक फायदे –
आपल्या ऐन अडचणीला त्वरेने पैसे मिळू शकतात.
अनधिकृत मार्गाने कर्ज घेण्यापेक्षा अधिकृत मार्ग हा केव्हाही सुरक्षित.
इतर कोणत्याही कर्ज प्रकाराच्या मंजुरीला वेळ लागतो,कागदपत्रे अधिक लागतात.
तारण म्हणून किंवा गहाण ठेवण्यासाठी मालमत्ता लागत नाही ज्याच्याकडे मालमत्ता नसते,त्याला हे खूपच सोयीचे आहे
क्रेडीट कार्डावर पैसे काढण्यापेक्षा असे कर्ज हे स्वस्त आणि रास्त व्याजाचे असते, कारण क्रेडीट कार्डने मिळणारे पैसे हे झटकन मिळतात, पण व्याजदर महाग असतो.
पती/पत्नी एकत्र अर्ज करून मोठ्या रकमेचे संयुक्त कर्ज काढू शकतात.
बँक खाते असण्याची गरज नाही. मात्र स्वतःचे बँक खाते असलेल्या बँकेकडून लोन घेणे सोयीचे असते.
असे कर्ज दुसर्‍या बँकेकडे हस्तांतरित करता येते, अर्थात तसे करण्या आधी पहिल्या बँकेचे लोन पूर्णतः फेडावे लागते, होम-लोनमध्ये तुमचे उरलेले कर्ज दुसर्‍या बँकेत हस्तांतरित होऊ शकते. हा फरक आहे. सर्वसाधारणपणे स्वस्त व्याजदर आणि सुलभ अटी-शर्तींसाठी कर्ज हस्तांतरण केले जाते.
अशा प्रकारे लोन देणार्‍या बँका अनेक आहेत, शिवाय काही वित्त-संस्था आहेत. ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध आहेत, त्यातून आपल्याला सोयीस्कर असा पर्याय निवडता येतो.
केवळ खर्चासाठी नव्हे तर गुंतवणूक म्हणून देखील लोनचे पैसे वापरले जातात. मात्र असा वापर फायदेशीर व्हावा
फक्त चैनीच्या खरेदीसाठी लोन रकमेचा वापर करू नये. सतत खर्च करण्याची ज्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते किंवा ज्यांचा उधळपट्टीचा स्वभाव असतो,त्यांना आवर घालणे हे कसोटीचे असते.

ठळक तोटे-
व्याजदर अधिक असतो
प्री-पेमेंट परवडत नाही, चार्जेस लागतात. शून्य ते अगदी पाच टक्के
काही ठिकाणी अ‍ॅप्लिकेशन प्रोसेसिंग फी किंवा अन्य फी द्यावी लागते.
परत-फेड वेळेवर करू न शकल्यास त्रास होऊ शकतो.
एकेकाळी कर्ज घेणे हे वाईट मानले जायचे, तशी मानसिकता आता राहिलेली आही. किंबहुना काही वेळा कर्ज काढणे हे गरजेचे होते. स्कुटर,चांगला मोबाईल,असे काही घेण्यासाठी पर्सनल लोन हे नक्कीच फायद्याचे असते. मात्र जास्तीत जास्त लोन्स काढत राहणे हे अव्यवहार्य आहे. कर्ज-सापळ्यात गुरफटून कर्जबाजारी होण्याची पूर्ण शक्यता असते. म्हणून प्रत्येकाने सावध असावे. अशावेळी प्रत्येकाने गरज आणि परतफेड याबरोबरीने व्याज-दर आणि इतर अटींची जरूर तुलना करावी. म्हणजे पुढे मनस्ताप होणार नाही. देणारे देत आहेत, बँका म्हणून घेणार्‍याने कर्जदार घेत रहावे असे थोडेच आहे!!. व्यवसाय म्हणून बँका कर्जे ऑफर करणारच !,तुम्ही आम्ही निश्चित विचार करून पर्सनल लोन काढा. मात्र कर्जाऊ पैसा हे केवळ देणेच असते ही खूणगाठ आपण कर्जदारांनी मनाशी बांधली तर ‘ठेव-कर्ज’ हे ‘व्यवसाय-चक्र’अव्याहतपणे चालू राहू शकेल. आणि जेव्हा आपली पुंजी कमी पडत असेल आणि गरज तीव्र असेल, तेव्हा पर्सनल लोन घेणे हे आर्थिक ओझे न वाटता उपकारच वाटेल !

-राजीव जोशी (लेखक बँकिंग आणि अर्थ-अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -