घरफिचर्सडॉक्टरांचे ऑपरेशन

डॉक्टरांचे ऑपरेशन

Subscribe

समाजात डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप समजले जाते. रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत जोपासण्याची ही संधी अगदी थोड्या लोकांना प्राप्त होत असते. आरोग्यसेवेचा हा वसा हाती घेण्यापूर्वी डॉक्टर पदवी देणार्‍या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षांत सोहळा नुकताच पार पडला. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात डॉक्टरांचेच ‘ऑपरेशन’ केले. आरोग्यसेवा ही राष्ट्रहित जोपासण्यासाठी उपयोगी ठरली पाहिजे. परंतु, आर्थिक वृद्धीच्या हेतूने ‘कट प्रॅक्टिस’ मोठ्या प्रमाणात होताना दिसते. हजार लोकांमागे एका डॉक्टरची आवश्यकता आहे. परंतु, ग्रामीण भागात डॉक्टर काम करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतात. आदिवासी भागात तर कुपोषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. येथे आजही महिला घरीच प्रसूत होतात.

दवाखान्यात प्रसूती होणे त्यांना माहीतच नाही. किंबहुना परवडणोदेखील नसल्याने त्याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली जाते. शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूती करण्याची संख्या वाढलेली दिसत असली तरी, येथील अनास्था दूर झालेली नाही. समाज डॉक्टरांना देवासमान मानत असला तरी, अलीकडे त्यांचे ध्येय बदलत असल्याने त्यांची प्रतिष्ठा कमी होताना दिसते. ‘यम तो सिर्फ जान ले जाता है, डॉक्टर तो जान और धन दोनो ले जाता है’, अशा शब्दांत राज्यपालांनी डॉक्टरांचे कान टोचले. एका अर्थाने ते योग्यच म्हणावे लागेल. डॉक्टरांना आदराचे स्थान असताना संपत्तीच्या हव्यासापोटी काही डॉक्टर अनेकदा गैरकृत्य करताना आढळून येतात. औषधनिर्माण कंपन्यांच्या आकर्षक पॅकेजला बळी पडत अनेक डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळल्याची उदाहरणे या समाजाने बघितली. पुण्यात अशाच स्वरूपाचे एक स्टिंग ऑपरेशन झाल्यानंतर येथील डॉक्टरांना नेमके काय अपेक्षित आहे, याचा पदार्फाश झाला होता.

- Advertisement -

अर्थात, समाजातील सर्वच डॉक्टर ‘असे’ आहेत, असे कदापि म्हणू शकत नाही. डॉक्टर बाबा आमटे, प्रकाश आमटे यांची उदाहरणे वैद्यकीय क्षेत्राचा निश्चितच नावलौकीक वाढवतात. समाजात असे अनेक बाबा आमटे कार्यरत आहेत. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक त्यांना आशीर्वाद देत असतील. ग्रामीण भागात आजही 40 ते 50 रुपयांमध्ये उपचार केले जातात. तात्पुरत्या इलाजावर दिवस ढकलण्याची मानसिकता येथे मोठ्या प्रमाणात रुजली आहे. मोठे ऑपरेशन करायचे म्हटले तर, आवश्यक सुविधा आणि पुरेसा पैसा नसल्यामुळे अनेकांचे जीव फुकटात जातात. शहरात मोठी हॉस्पिटल्स ही फक्त उच्चभ्रू व्यक्तींसाठी साकारल्याचे दिसून येते. हॉस्पिटल्स अत्यावश्यक आहेतच; परंतु, ज्या समाजातून आपण आलो, त्या समाजाप्रती आपण काही देणे लागतो, याची जाणीव ठेवून डॉक्टरांनी आपला धर्म निभावला पाहिजे, अशी रास्त अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

डॉक्टरांचे हस्ताक्षर हादेखील सर्वसामान्य व्यक्तींच्या कुतुहलाचा विषय ठरतो. त्यांचे हस्ताक्षर फक्त औषध विक्रेत्याला समजते. मग इंग्रजीचा आग्रह कशासाठी? रुग्णांना मराठीत प्रिस्क्रिप्शन द्या! त्यामुळे मातृभाषेचा गौरव होईल, असा सल्ला देत राज्यपालांनी डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर ताशेरे ओढले. रुग्णाची नाडी तपासून त्याच्या आरोग्याची स्थिती सांगणारे डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राने आता कमालीची प्रगती साधली आहे. वेगवेगळ्या उपचारपध्दतींमुळे म्हतारपणीदेखील मनुष्य युवकांप्रमाणे तरुण दिसू शकेल. त्याचे वयोमान वाढेल यादृष्टीने संशोधन होत आहे. विज्ञान क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असताना त्याचे स्वरूपही कमालीचे बदलत चालले आहे. सर्वसामान्य व्यक्तींशी नाळ जोडून डॉक्टरांनी ही प्रगती साधली तर, समाजाला त्याचा उपयोग होईल.

- Advertisement -

रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना डॉक्टरांची संख्या मर्यादित असल्याने आरोग्य व्यवस्थेवर याचा ताण पडतो. खासगी डॉक्टरांना जाब विचारणारे कोणी नाही; परंतु, शासकीय सेवेतील डॉक्टरांना याचे उत्तर द्यावे लागते. तेव्हा डॉक्टरांच्या यश-अपयशाचे गणित उलगडते. डॉक्टरांची संख्या वाढल्यास आरोग्य सेवेवर पडणारा अतिरिक्त भार हलका होईल. समाज अधिक सदृढ होण्यास हातभार लागेल. हुशार डॉक्टर देशातील रुग्णांची सेवा करतील, अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. त्यांना भयमुक्त वातावरणात सेवा बजावण्याची संधी देण्याचे कार्य शासकीय पातळीवरून व्हायला हवे. एखादा रुग्ण दगावल्यास आजही डॉक्टरांना दोषी ठरवण्याची मानसिकता समाजात दिसून येते. त्याला काहीअंशी डॉक्टर देखील जबाबदार असू शकतात. मात्र, प्रत्येक वेळी डॉक्टरांना दोष देणे चालणार नाही.

शेवटी तो देव नसून प्रयत्न करणारा मनुष्य आहे. आपले पेशंट दगावले पाहिजे, असे कोणत्याही डॉक्टरला वाटणार नाही. परंतु, दुर्दैवाने अशा स्वरूपाचे वातावरण नातेवाईकांच्या मनात निर्माण होते. यातूनच तेढ निर्माण होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याचे आपण बघितले आहे. डॉक्टर म्हणून पाऊल ठेवण्यापूर्वी विद्यार्थीदशेतच उत्तमप्रकारे प्रशिक्षण दिले पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून न बघता समाजिक कार्य म्हणून बघण्याचा दृष्टीकोन रुजवण्याची गरज आहे. स्पर्धात्मक युगात धावताना फक्त गुणांना महत्त्व दिले जाते. परंतु, विद्यार्थ्यांच्या मनाचाही विचार व्हायला हवा. तणावमुक्त वातावरणात ही स्पर्धा झाली पहिजे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या यंदाच्या दीक्षांत सोहळ्याचे वैशिष्ठ्य म्हणजे मुंबईच्या यश शर्मा या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने तब्बल 14 सुवर्ण पदके पटकावली. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीच्या दहा हजार रुपयांच्या रोख पारितोषिकाचाही तो मानकरी ठरला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा अभ्यासक्रम म्हटले की, तो कमालीचा कठीण मानला जातो. मान-पाठ एक करून विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. त्यातून यश पदरी पडते. ज्याने अतिपरिश्रम घेतले त्याच्या पदरी एखाद-दुसरे सुवर्णपदक पडते, पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मुंबईच्या जी. एस. मेडिकल महाविद्यालयातील यश सतीश शर्मा याने विद्यापीठाचे रेकॉर्ड ब्रेक केले. मेडिसीनमध्ये त्याला डॉक्टरेट करायचे आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारे असे सुवर्ण योग विद्यापीठाच्या इतिहासात दुर्मीळच! समाजात काहीतरी चांगले घडते, त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे, असे सातत्याने म्हटले जाते. डॉक्टरांच्या परिश्रमातून समाजाला काहीतरी सकारात्मक मिळेल, एवढीच अपेक्षा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -