घरफिचर्सझोपडपट्ट्या-चाळींमध्ये आरोग्य जागृती अधिक सोपी

झोपडपट्ट्या-चाळींमध्ये आरोग्य जागृती अधिक सोपी

Subscribe

पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते. सर्वसाधारणपणे हे आजार अन्य वेळीही सक्रिय असतात. पण या काळात वातावरणात होणार्‍या बदलामुळे त्यांचे प्रमाण अधिक दिसून येते. यामध्ये प्रामुख्याने मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, डेंगी, कॉलरा, गॅस्ट्रो यासारखे आजार बळावतात. या आजारांची कारणे, त्यांचा प्रतिबंध आणि उपचार याबाबत मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी ‘आपलं महानगर’शी साधलेला संवाद.

साथीचे आजार म्हणजे काय?

एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग झाल्याने होणार्‍या आजाराला आपण साथीचे आजार म्हणतो. या आजारांना पसरण्यासाठी बहुतेक वेळा विशिष्ट माध्यमाची गरज असते. पाणी, अन्न, हवा व डासांद्वारे साथीचे आजार पसरतात. डासांद्वारे पसरणार्‍या साथीच्या आजारांमध्ये मलेरिया, डेंगी व चिकनगुनिया तर पाण्याद्वारे पसरणार्‍या आजारांत कॉलरा, गॅस्ट्रो, काविळ यांची नावे घेता येतील. हवेतून स्वाईन फ्लूचे विषाणू तर अन्नाद्वारे टायफॉईड व हेपेटायटिस हे आजार पसरतात. लेप्टोस्पायरोसिससारखा आजार हा पाणी व मातीच्या माध्यमातून पसरतो.

साथीच्या रोगांचा प्रसार कसा होतो?

मलेरिया हा अ‍ॅनाफिलिस या डासांमुळे तर डेंगी हा इजिप्ती एडीस या डासांमुळे पसरतो. या डासांची पैदास अस्वच्छ पाण्याऐवजी स्वच्छ पाण्यात मोठ्या प्रमाणात होते. मलेरियाच्या डासाची पैदास ही घरातील पाण्याच्या टाक्या, इमारतींना पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाक्या, तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साठवण्यात येणार्‍या पाण्याच्या ठिकाणी होते. तर डेंगीची पैदास ही छोटे-मोठे ड्रम, घरात ठेवण्यात येणारी झाडे, देवासमोरील तांब्यातील पाणी, एसीचे पाणी, फ्लॉवर पॉट, फ्रिजमधील ट्रे, सफाई न केलेला फिशटँक यामध्ये मोठ्या प्रमाणात होते. घरातील किंवा बाहेरील टँकचे झाकणही बंद असणे गरजेचे आहे. १.६ एमएमपेक्षा जास्त असलेल्या गॅपमधून हे डास टँकमध्ये प्रवेश करून तेथे अंडी घालतात. अनेकदा आपण टाकीचे झाकण व्यवस्थित बंद करतो. पण टाकीचा ओव्हर फ्लो पाईप उघडा असतो. त्यातून डास आतमध्ये जाऊन तेथे सहज अंडी घालतात. लेप्टोस्पायरोसिसमध्ये त्वचेच्या जखमांमधून प्रवेश होतो. चार पायांच्या जनावरांचे मलमूत्र पाण्यात मिसळलेले असेल व ते जर एखाद्या त्वचेला इजा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले तर त्याला लेप्टो होऊ शकतो.

- Advertisement -

डासांची वाढ कशी होते?

मलेरियाचा अ‍ॅनाफिलिस व डेंगीचा एडिस इजिप्ती या डासांची पैदास स्वच्छ पाण्यातच होते. या दोन्ही डासांनी स्वच्छ पाण्यात अंडी घातल्यानंतर सात ते आठ दिवसांत हा डास मोठा होतो. ही अंडी आपल्याला सहज डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यामुळे सात दिवसांपेक्षा जास्त काळ स्वच्छ पाणीसुद्धा राहिल्यास त्यामध्ये डासांची सहज वाढ होते. त्यामुळे दोन-तीन दिवसांत पाणी बदलणे गरजेचे आहे.

आजार रोखण्यासाठी पालिकेकडून कोणते प्रयत्न करण्यात येतात?

महापालिकेच्या किटकनाशक विभागातर्फे शहरात विविध ठिकाणी पेस्ट कंट्रोल करण्याबरोबरच अनेक सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करण्यात येते. त्यातून डासांची पैदास रोखणे सोपे होते. सार्वजनिक ठिकाणी डासांची पैदास रोखण्याचे आम्ही पुरेपुर प्रयत्न करतो. पैदास होणारी ठिकाणे शोधून ती नष्ट करतो. परंतु घराघरांमध्ये जाऊन डासांची पैदास रोखणे आम्हाला अशक्य आहे. घरामध्ये औषध फवारणी करता येत नाही. त्याचबरोबर अनेक घरांमध्ये पाण्याच्या टाकीची तपासणी करता येत नाही. अनेक घरांमध्ये उघड्या असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये डासांची पैदास होते. ही पैदास होऊ नये यासाठी प्रत्येकाने स्वत: काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पाणी साचणार्‍या ठिकाणी आमची टीम पाठवण्यात येते. या परिसरात पाण्यात जास्त काळ राहिलेल्या व्यक्तींना औषध दिले जाते. त्यामुळे सध्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. आमचे कर्मचारीही पाण्यात सतत काम करत असतात. त्यामुळे त्यांनाही औषधे दिली आहेत.

- Advertisement -

नागरिकांनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?

नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाकीचे झाकण व्यवस्थित बंद ठेवावे, त्यामध्ये १.६एमएम किंवा त्याहून जास्त गॅप असता कामा नये. जर हे सर्व नीट तपासले तर साथीचे आजार पसरण्याचे प्रमाण बर्‍यापैकी कमी होऊ शकते. झोपताना पूर्ण बाह्यांचे कपडे घातल्यास डासांकडून होणारे आजारांचे संक्रमण रोखता येते. मच्छरदानीचा वापर करावा. घरातील पाण्याचा साठा कमी करावा, ड्रम उघडे ठेऊ नये, ड्रम भरताना तो पूर्णपणे रिकामा करावा. जेणेकरून तळाला असलेली अंडी नष्ट होतील. टेरेसवर कोठे पाणी साठले आहे का? ताडपत्रीवर पाणी जमा झाले आहे का हे पाहावे. कारण चमचाभर पाण्यातही मोठ्या प्रमाणात डास अंडी घालतात. त्यामुळे घरात पाणी साचणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. घराबरोबरच आपल्या आसपासच्या परिसरातही पाणी साचणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी. कारण घराबाहेर नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकचे डबे, पिशव्या व टायर यामध्ये साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये साचलेले पाणी काढून ती उपडी करून ठेवल्यास डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. पावसाळ्यात तुंबणार्‍या पाण्यात मुलांनी पोहायला किंवा नाचायला जाऊ नये. पाण्यातून जाण्याची वेळ आल्यास घरी आल्यानंतर तातडीने पाय स्वच्छ धुवावेत. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ पाण्यात थांबल्यास औषध घ्यावे.

बांधकाम साईटवरील मजुरांकडून आजाराचे संक्रमण होते का?

बाहेरील राज्यातून बांधकाम साईटवर काम करण्यासाठी येणार्‍या मजुरांकडून अनेकदा आजारांचे संक्रमण होते. हे मजूर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीच राहत असल्याने त्या ठिकाणी साठणार्र्‍या पाण्यात मलेरिया, डेंग्यूसारख्या डासांची पैदास होऊन या आजारांची लागण मजुरांना होते. त्यामुळे महापालिकेकडून बांधकामाच्या ठिकाणी काम करणार्‍या मजुरांची वेळोवेळी तपासणी करण्यात येते. बाहेरून येणार्‍या मजुरांमध्ये हे प्रमाण अधिक आढळून येते. त्यामुळे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणच्या सुरक्षा अधिकार्‍यांमार्फत मजुरांची तपासणी करण्यात येते. त्यांच्यात मलेरिया आढळल्यास त्यांच्यावर लगेच उपचार केले जातात. बांधकाम साईटवर कमी मजूर असल्यास ही तपासणी खासगी डॉक्टरांकडून केली जाते. तर अनेकदा डॉक्टरला साईटवर बोलवले जाते.

औषधोपचार काय करण्यात येतो?

डेंग्यूवर विशिष्ट उपचार नाहीत. त्यामुळे डेंग्यू झालेल्या व्यक्तीला पूर्णपणे आराम करणे गरजेचे आहे. पाणी खूप प्यावे. सोबतच पपई व फळे खाल्ल्यास आराम पडतो. तसेच सर्व रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज नसते. परंतु फारच अशक्तपणा वाटल्यास डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. मलेरियामध्येही रुग्णाने पूर्ण उपचार घेणे गरजेचे असते. त्याने पूर्ण उपचार घेतल्यास त्याच्या शरीरात मलेरियाचे जंतू राहणार नाहीत व दुसर्‍याला त्याचा संसर्ग होणार नाही. संसर्ग झालेल्या प्राण्यांना त्याचा फारसा त्रास होत नाही. पण मनुष्याला याचा त्रास होतो. लेप्टोवर औषधांचा परिणाम लगेचच होतो. त्यामुळे लगेचच उपचार करावा. रुग्णांनी घरच्याघरी अजिबात उपचार करू नयेत.

लेप्टोला रोखण्यासाठी विशेष काय करण्यात येते?

लेप्टोस्पायरोसिसला रोखण्यासाठी कुत्रे, मांजरी पाळणार्‍या मालकांना त्यांच्या प्राण्यांना व्हॅक्सिन देण्याची विनंती पालिकेकडून केली जाते. व्हॅक्सिन दिल्याने आजार पसरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. व्हॅक्सिनमुळे लेप्टोचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच सहा महिन्यांत दोन लाख उंदीर मारण्यात आले आहेत. आपण घरात खाद्य मोठ्या प्रमाणात उघड्यावर ठेवतो. ते कमी केले पाहिजे. सोसायटीच्या पाईपला रॅटगार्ड लावावी. झाडे इमारतीला लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. जेणेकरून झाडांवरून ते इमारतीमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत.

अडचणी येतात का?

आम्ही जनजागृती करत असतो. पण प्रत्येकाच्या ते लक्षात येतेच असे नाही. कारण आरोग्य हा प्रत्येकाचा प्राधान्यक्रम नसतो.सिगारेटच्या पाकिटावर सूचना देऊनही लोक सिगारेट ओढतात. त्याचप्रमाणे बॅनर, पोस्टर लावलेले असतानाही लोक ड्रम उघडे ठेवतात. घराला टाळे लावतील; पण पाण्याची बादली उघडी ठेवतील. त्यामुळे डास आत जातात. डासांची पैदास वाढते. नागरिकांकडून आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हाच साथीचे आजार रोखण्यातला मोठा अडथळा आहे. तसेच उच्चवर्गीय सोसायट्यांमध्ये प्रवेश ही सुद्धा मोठी समस्या आहे.

उच्चवर्गीय सोसायट्यांमधून प्रतिसाद मिळतो का?

उच्चवर्गीय सोसायट्यांमध्ये जाताना आमच्या कर्मचार्‍यांना खरंच त्रास होतो. ते ओळखपत्र घेऊन जातात. तेथील सेक्रेटरीशी बोलतात. पण तिथले रहिवासी फारसा प्रतिसाद देत नाहीत. तसेच प्रवेशही सहज मिळत नाही. सोसायटीत प्रत्येक घरात जावे लागते. सर्वच ऐकतात आणि वेळ देतात असे नाही. या तुलनेत झोपडपट्टी, चाळी या परिसरातून चांगला प्रतिसाद मिळतो. येथील रहिवाशांना एकत्र आणून त्यांच्याशी संवाद साधता येतो. तसेच ते चांगल्या पद्धतीने समजूनही घेतात. त्यामुळे सोसायटीपेक्षा झोपडपट्टी व चाळींमध्ये जनजागृती करताना फारशा अडचणी येत नाहीत असे म्हणावे लागेल.

तुम्ही जनजागृती नेमकी कशी करता?

प्रिंट मीडियामधून, खासगी डॉक्टरांसाठी पॅम्पलेट वितरित करणे, पोस्टर, हँडबिले, होर्डिंग्जरेल्वे किंवा बसस्टॉप-बसेसवर लावणे. शिवाय २२०थिएटर्समध्ये चित्रपटापूर्वी व मध्यंतरावेळी जनजागृतीची खास चित्रफित दाखवली जाते. टीव्ही, पेपर जाहिरात देतो, प्रभागात माईकींग करतो, सोशल मीडियावर फिल्म दाखवतो. यामुळे हव्या त्या लोकांपर्यंत संदेश पोचतो. लोकांपर्यंत संदेश आम्ही पोचवतो; पण त्याची अंमलबजावणी लोकांच्या हातात असते. स्टाफ व खासगी डॉक्टरांना ट्रेनिंग देण्यात येते.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -