घरफिचर्सपावसात सुकलेले लाल थेंब...

पावसात सुकलेले लाल थेंब…

Subscribe

मुंबई शहर कुणालाच उपाशी झोपू देत नाही. ही मुंबई नगरी हरेकाच्या भाकरीची सोय करते, असं म्हटलं जातं. पश्चिमेकडे पालघरपासून विरारपर्यंत राहणारे देह रोजच्या रोज मुंबई नगरीत आपापल्या हिश्शाची भाकरी मिळवण्यासाठी येतात. तर मध्य रेल्वेतल्या कल्याणपुढची माणसं ठाण्याच्या पुढे आल्यावर हळूहळू यांत्रिकी हालचाली करू लागतात.

 

मुंबई शहर कुणालाच उपाशी झोपू देत नाही. ही मुंबई नगरी हरेकाच्या भाकरीची सोय करते, असं म्हटलं जातं. पश्चिमेकडे पालघरपासून विरारपर्यंत राहणारे देह रोजच्या रोज मुंबई नगरीत आपापल्या हिश्शाची भाकरी मिळवण्यासाठी येतात. तर मध्य रेल्वेतल्या कल्याणपुढची माणसं ठाण्याच्या पुढे आल्यावर हळूहळू यांत्रिकी हालचाली करू लागतात. मुंबईतली गर्दी अशा यंत्रमानवांची असते. इथं कुणी कुणाला ओळखत नसतं. वेग हाच इथला नियम असतो. सकाळी लोकलमध्ये स्वतःला कोंबून घेतलेली घरातून निघालेली माणसं मुंबईत येऊन यंत्र बनत असतात आणि संध्याकाळी रात्री लोकलमधून घरचं स्टेशन जसजसं जवळ येतं तशी ही दिवसभराच्या कामामुळे तापलेली ही यंत्रे हळूहळू निरव होत पूर्ण माणूस बनून ठाणे, पालघरमधल्या आपापल्या नगरीत दाखल होतात. मुंबईत नोकरी करणार्‍यांचं महिन्याचं बजेट ठरलेलं असतं. घर, गाडीचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी, घरखर्च याचा हिशेब गाडीतच लावला जातो. हे झालं कनिष्ठ मध्यमवर्गातलं. पण यातही एक गट असतो ज्याला घरातली रोजची चूल पेटवण्यातच दिवस मार्गी लावावा लागतो.

- Advertisement -

ही माणसं बहुतेक लगेजच्या डब्यात असतात. या माणसांना थकण्याचा अधिकार नसतो. मोठ्या आकाराची बोजी उचलून लगेजच्या डब्यात घुसण्याचं कौशल्य त्यांना अंगभूत असतं. चुकून कधी ही माणसं पॅसेंजर डब्यात शिरलीच तर त्यांना इधर कायको आताय..लगेज में घूस असं दरडावलं जातं. गाडी रिकामी असली तरी ही माणसं सीटवर बसत नाहीत. ती दरवाज्याजवळच अंग चोरून बसलेली असतात. मुंबईतल्या गर्दीत त्यांची संख्या मोठी असते. उल्हासनगरातल्या झोपडीवजा घरातल्या कारखान्यातून भांडी, बाटल्या, पक्षांचे पिंजरे, शोभेचे मासे भरलेल्या पाणी असलेल्या पिशव्या, भाजीपाला, कपड्यांचे गठ्ठे मुंबईतल्या मार्केटमध्ये नेण्याची कामं हे देह करत असतात. मुंबईत कुर्ल्यातूनही ठाणे, नवी मुंबईकडे रोजच्या रोज मिळेल तो बोजा उचलून दिलेल्या पत्त्यावर नेणार्‍यांची संख्याही मोठी आहे. कुर्ला स्टेशनात झळाळणारे चकचकीत लोखंडाचे धारेदार पत्रे हाताळणार्‍या त्या मजुराचं वय ५५ असावं. कुर्ला स्टेशनात हे धारेदार पत्रे उचलून गाडीच्या मालडब्यातून घेऊन जायचं त्याचं काम होतं. त्याचे दोन मालक होते. त्यांनी एकावर एक रचलेले जडच्या जड पत्रे बांधण्यासाठी त्याला एक दोरी दिली होती. ती कमी पडत होती. पत्रे उचलताना गुळगुळीत असल्याने त्याच्या हातातून सटकून जात होते. तर ए च्यु…. इधर ठिकसे पकड बोलून ते त्याचा उद्धार करत होते.

तोही निर्विकार चेहर्‍याने मान हलवून हो बोलत होता. पत्रे उचलताना त्याची धार त्याच्या बोटाला कापत होती. त्यामुळे जड पत्रे हातातून सटकत होते. अचानक हाताला धार लागली. चकाकत्या पांढर्‍या पत्र्यांवर लाल थेंब पडले. स्टेशनाच्या भिंतीकडेची माती, गुटखा थुंकून लालेलाल झाली होती. त्यातली दोनचार बोटात येईल इतकी माती त्यानं उचलली आणि कापलेल्या जखमेवर टाकली. दुसर्‍यानं पुन्हा च्यु… म्हणत त्याचा उद्धार केला. जा बँडेड ला, म्हणत दुसर्‍याला दुकानात पिटाळलं. तोपर्यंत यानं रेल्वे ट्रॅकवर पडलेली चिंधी उचलून बोटाला बांधली. तरी रक्त त्यात आेंघळतच होतं…चिंधीही भिजली. एका प्रवाशानं त्याला गँगरीन होईल असं सांगितलं. त्यानं पुन्हा तसाच लाल झालेल्या डोळ्यांचा निर्विकार चेहरा हलवून बोलणं कळल्यासारखा होकार दिला. आता पाऊस सुरू झाला. आता त्यानं दोन्ही हाताला चिंध्या बांधल्या. हाडांच्या कमानी झालेल्या छातीत जमेल तेवढी हवा भरून मोठा श्वास घेण्याचा आव आणत त्यानं पत्र्यांचा गठ्ठा खांद्यावरून डोक्यावर थरथरणार्‍या हातानं उचलला आणि आलेल्या डोंबिवली गाडीच्या मालडब्यात गर्दीत घुसला.
त्याच्या दोन्ही मालकातल्या एकानं मागून धारेदार पत्र्याला हात लावून जोर दिला. तर दुसरा म्हणाला…भाई कटेगा..संभालके…तोपर्यंत मोटरमनची घंटी वाजली, गाडी सुटली. त्याचा भाई नसलेला तो दुसरा मजूर लोकल डब्याच्या गर्दीत मिसळून गेला.. एव्हाना पाऊस सुरू झाला होता. मात्र प्लॅटफार्मवर पडलेल्या त्याच्या रक्ताचे लाल काळे थेंब कधीचेच सुकले होते…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -