पित्तशमनासाठी द्राक्षे, डाळिंब, अंजीर !

Mumbai
promegranates
डाळिंब

वर्षा ऋतूनंतर आगमन होते ते शरद ऋतूचे! आकाश निरभ्र होऊन रात्री शरदाचे चांदणे पसरु लागते. हा शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हीट किंवा पित्तप्रकोपाचा काळ ! म्हणून या ऋतूत पित्तशमन करणार्‍या दूध, तूप, लोणी, साखर यांचा आहारात समावेश करावा. फळांमधे गोड व ताजी द्राक्षे, डाळिंब,अंजीर खावेत. पित्तशमनासाठी गुलकंद किंवा मोरावळा यांचा वापर करावा.

मागील लेखात आपण वसंत व ग्रीष्म ऋतूचर्येबद्दलची माहिती घेतली. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत आल्हाददायी अशा वर्षाऋतू व अन्य ऋतूचर्येची माहिती !

हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे !असे निसर्गाचे मनोहर रूप असणा-या वर्षाऋतूत शरीर व मन उल्हसित झालेले असते. या ऋतूत शरीराची पचनशक्ती मंदावते. पचनशक्ती मंदावल्याने मऊ भात व तूप, मूगाची खिचडी, भाज्यांचे गरम सूप असा पचण्यास हलका आहार घ्यावा. शक्यतो जेवण गरम घ्यावे. आहारात जुने तांदूळ, गहू, जव, उडीद यापासून तयार केलेले पदार्थ यांचा समावेश करावा. मुगाचे कढण, चिकन सूप, मटण सूप, भरपूर तूप घालून व सुंठ, जिरे, लसूण, सैंधव, कोकम यासारखी पाचक द्रव्ये घालून सेवन करावीत. वर्षा ऋतूतील शीतलतेने वात दोषाचा प्रकोप होतो. यासाठी वात दोष शमनार्थ विशेषत: आंबट व खारट रसाच्या पदार्थांचा व स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश करावा. गोड पदार्थांपैकी मधाचा वापर या ऋतूत श्रेयस्कर ठरतो. या ऋतूतील गढूळ पाणी विविध आजारांना निमंत्रण देते. यासाठी पाणी उकळून प्यावे. स्नानापूर्वी अंग रगडून कोमट तेलात भिजवलेले उटणे सर्व शरीराला चोळावे. त्यानंतर गरम पाण्याने स्नान करावे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शरीररुपी यंत्राचे नियमन करणार्‍या वात दोषाचा प्रकोप रोखण्यासाठी वातशमन करणार्‍या तेलाचा विशेषत: तीळतेलाचा बस्ति (गुदमार्गाने एनिमा) वैद्यांच्या मार्गदर्शनाने घ्यावा.पावसात भिजणे, गारव्यात घराबाहेर फिरणे, अधिक श्रम करणे, दिवसा झोपणे या गोष्टी वर्षा ऋतूत कटाक्षाने टाळाव्यात. अशा प्रकारे वर्षा ऋतूचर्येचे पालन केल्यास या ऋतूत उद्भवणा-या सर्दी, खोकला, दमा, संधिवात, अपचन, गॅसेस इ. तक्रारींपासून शरीराचे रक्षण होते.

वर्षा ऋतूनंतर आगमन होते ते शरद ऋतूचे! आकाश निरभ्र होऊन रात्री शरदाचे चांदणे पसरु लागते. हा शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हीट किंवा पित्तप्रकोपाचा काळ ! म्हणून या ऋतूत पित्तशमन करणार्‍या दूध, तूप, लोणी, साखर यांचा आहारात समावेश करावा. फळांमधे गोड व ताजी द्राक्षे,डाळिंब,अंजीर खावेत.पित्तशमनासाठी गुलकंद किंवा मोरावळा यांचा वापर करावा. साठेसाळीचा भात, तांदूळाचे धिरडे, गव्हाचे सत्व, गव्हाच्या रव्याचा गोड शिरा व खीर, मुगाचे वेलची -साजूक तूप- पिठीसाखर -बेदाणे घालून तयार केलेले लाडू, मुगाचा शिरा, दुधीची खीर, दुधी हलवा यासारखे पदार्थ खावेत. भाज्यांमध्ये विशेषत: दुधी व पडवळ या भाज्या खाव्यात. कोकम सरबत, आवळ्याचे सरबत, वाळा सरबत घ्यावे. मांसाहारी व्यक्तींनी चिकन सूप, मटण सूप घ्यावे. मात्र त्याला जिरेपूड, धणेपूड व सुंठ यांची तूपातील फोडणी द्यावी.

शरद ऋतूतील पित्ताचा दाह कमी करण्यासाठी शीत जलाने स्नान करावे. तलम, सुती, मुख्यत: पांढर्‍या रंगाची वस्त्रे परिधान करावीत. या ऋतूत दुष्ट रक्त व पित्तप्रधान आजारांपासून प्रतिबंध करण्यासाठी विरेचन (रेचक औषधांच्या सहाय्याने जुलाब करविणे )व रक्तमोक्षण (दूषित झालेले रक्त शरीराबाहेर काढून टाकणे) हे पंचकर्मांपैकी उपक्रम वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करुन घेणे उपयुक्त ठरते. या ऋतूतील अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला रात्री गच्चीत बसून आटवलेले दूध पिण्याची प्रथा आहे. शास्त्राने पित्तशमनासाठी केलेली ही उत्तम उपाययोजनाच म्हणावी लागेल. या ऋतूत उन्हात काम करणे, व्यायाम करणे, दिवसा झोपणे, दही खाणे, आंबट- तिखट-खारट व उष्ण पदार्थ खाणे वर्ज्य करावे. अशाप्रकारच्या परिचर्येचे पालन केल्यास ‘जीवेत् शरद: शतम्।’ साध्य होणे कठीण नाही.

शरद ऋतूनंतर येणार्‍या हेमंत व शिशिर ऋतूतील हवामान साधारणत: सारखे असल्याने या दोन्ही ऋतूूंमधील चर्येची माहिती आपण एकत्रच पाहू.

हेमंत ऋतूत पचनशक्ती उत्तम असल्याने दूध, लोणी, तूप, श्रीखंड-बासुंदी-खरवस यासारखे दुग्धजन्य पदार्थ, उडदाचे पदार्थ यासारखे पचण्यास जड पदार्थ खावेत. शीत गुणाच्या वायुचा प्रकोप टाळण्यासाठी मधूर, आंबट, खारट रसाच्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. नवीन तांदळाचे पदार्थ, गुळापासून तयार केलेले पिष्टमय पदार्थ यांचा अधिक वापर करावा. गरम पाणी पिण्यात ठेवावे. मांसाहारी व्यक्तींनी मासे, खेकड्याचे मांस खावे. पौष महिन्यात येणार्‍या मकरसंक्रांतीला तीळ व गूळापासून तयार केलेले तिळगूळ, तीळ, खसखस, गूळ यापासून तयार केलेली गूळपोळी खाल्ल्यामुळे प्रकुपित वाताचे शमन होण्यास मदत होते. संस्कृती व शास्त्र यांचा अनोखा संगम दाखविणारे हे उत्तम उदाहरण आहे.

हेमंत व शिशिर ऋतूत मनुष्याचे शरीरबल स्वभावत:च उत्तम असल्याने, अर्धशक्ती व्यायाम करावा. व्यायामानंतर सर्वांगास सुगंधी उटणे लावून सोसवेल इतक्या गरम पाण्याने स्नान करावे. उबदार वस्त्रे परिधान करावीत. रोज किंचित कोमट तेलाने मालिश करावे.

हेमंत ऋतूत विशेषत: वातवर्धक अन्नपान, कमी मात्रेत भोजन करणे या गोष्टी वर्ज्य कराव्यात. तर शिशिर ऋतूत काळीमिरी, लाल मिरची, गरम मसाला यासारखे तिखट पदार्थ, वातवर्धक पदार्थ, शीत पेये कटाक्षाने टाळावीत.
अशारीतीने अविरतपणे सुरू असणा-या शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत अशा सहा ऋतूंच्या निसर्गचक्रात आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतूचर्येचे जास्तीत जास्त पालन करण्याचा प्रयत्न केल्यास आरोग्यरक्षण करणे कठीण नाही.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख
-ए. व्ही. पी. पीएच्. डी. (आयुर्वेद)
-संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here