घरफिचर्सजावडेकर तुम्हीही!

जावडेकर तुम्हीही!

Subscribe

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसलेल्या फटक्याचं चिंतन भाजपने एकहाती सुरू केलं आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी वास्तव सोडून केलेल्या टीकेचा परिणाम म्हणून दिल्लीत पक्षाला पराभव पत्करावा लागल्याची कबुली शहा यांनी दिली. शहा यांच्या या कबुलीनंतर भाजपचे नेते असले आरोप करायचे सोडत नाहीत. भाजपच्या देशातील एकूणएक नेत्यांच्या वायफळ टीकेने भाजपचं नुकसान झालं, हे उघड होऊनही कोणी थांबायचं नाव घेत नाही. देशातल्या या नेत्यांमध्ये आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पक्षाची पडती बाजू इभ्रत राखून सावरणारे म्हणून जावडेकर यांची ओळख होती. आेंगळवाण्या प्रचारापासून दूर राहत आणि अतिरंजीतपणा टाळून पक्षाची बाजू लावून धरणार्‍या काही मोजक्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये जावडेकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली तेव्हा त्यांचं कौतुक सार्‍या महाराष्ट्राने केलं. मंत्रिमंडळात बढती मिळाली तेव्हाही त्यांना शाबासकी देण्यात आली. यात त्यांच्या पक्षातले नेते कार्यकर्त्यांबरोबरच त्यांच्या विरोधकांचाही समावेश होता. पक्षाची संस्कृती जपण्यासाठी आवश्यक प्रयत्नांची पराकाष्टा त्यांनी जरूर केली. परंपरा जपण्याच्या प्रयत्नाचं बक्षीस त्यांना मिळालं, पण अनेक व्यक्ती अशा असतात, सत्तेची हवा यथावकाश त्यांच्या डोक्यात शिरते. जावडेकरही आजकाल त्याच पठडीत बसू लागले आहेत. संस्कृती जपण्याचा ठेका जणू आपल्याकडेच आहे, असं त्यांना आता सतत वाटू लागलं आहे. केंद्रात सत्ता आल्यापासून भाजप आणि संघ परिवारातील अनेक नेत्यांना आभाळ ठेंगणं झालं आहे. इतकं की आपण काय बोलतो हे त्यांचे त्यांना कळत नाही. बरं ते बोलतात म्हणून कोणी त्यांच्या मुसक्याही आवळत नाहीत. यामुळे ते सुटल्यागत बोलत असतात. हा केवळ बोलण्यातला दोष असता तर ठिक, पण यामागे दुष्ट हेतू आणि पूर्वग्रहदूषितपणा असल्याने त्यांच्या या वर्तणुकीची गंभीर दखल घेणं आवश्यकच आहे.
नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभेत भाजप नेत्यांची निवडणूक प्रचारातील वक्तव्यं पाहिली की त्यांच्या वर्तवणुकीचा आलेख स्पष्ट दिसतो. असली वादग्रस्त वक्तव्यं करण्यात आजवर संभित पात्रा नामक पक्षाचे प्रवक्ते आघाडीवर असायचे. आजकाल या प्रमुख प्रवक्त्याच्या शेजारी बसण्याचा आगाऊपणा इतर नेतेही करू लागले आहेत. यात जावडेकरांसारखेही नेते येतात याचं आश्चर्य आहे. जावडेकर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दहशतवादी असल्याचे पुरावे आमच्याजवळ असल्याचं विधान केलं. आरोप करताना भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती पातळी गाठतात हे यावरून लक्षात येतं. सर्वाधिक वादग्रस्त वक्तव्यं कोण करतो, याचीच जणू त्या पक्ष नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचं हे द्योतक म्हणता येईल. खरं तर यामुळे आपल्या पक्षाची इभ्रत रस्त्यावर येत असल्याचं त्यांना काहीच वाटत नाही. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचा उघड अवमान करणार्‍या भाजप नेत्यांचा माज इतक्या पराकोटीला गेला आहे, की असे आरोप केले की आपण हिरो ठरतो, असं त्यांना वाटू लागलंय. ब्रिटिशांच्या राजवटीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशव्यापी आंदोलन उभारणारे महात्मा गांधी त्यांना ढोंगी वाटतात यावरून त्यांच्यातला खोटेपणा काय ते सांगून जातो. अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या महात्मा गांधी यांचं आंदोलन म्हणजे नाटक होतं, ढोंग होतं, असं वक्तव्यं करणारे कुठल्या कुळातील असावेत? अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा, गिरीराजसिंह, प्रकाश जावडेकर, आशिष शेलार असे एकावर एक नेते जिभेवर टीकेचा खडा घेऊन फिरत आहेत. कोण उद्धव ठाकरेंचा बाप काढतो तर कोणी केजरीवाल यांना अतिरेकी ठरवून टाकतो. या सर्वांना लाज आणेल असा आणखी एक नेता म्हणजे कर्नाटकमधील खासदार, माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे होत. महात्मा गांधी यांच्या पासंगाजवळ जाण्याची ज्यांची लायकी नाही, असा नेता महात्मा गांधींवर नको ते आरोप करतो, तेव्हा त्याने आपलं तोंड आरशात पाहिलं पाहिजे. एकीकडे महात्मा गांधी यांचा प्रात:स्मरणीय व्यक्ती म्हणून गौरव करायचा आणि त्याच संघ परिवाराचा भाग असलेल्या भाजपच्या नेत्याने राष्ट्रपित्याचा अवमान करायचा, याला वेडेपणा नाही तर काय म्हणायचं? महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिश सत्ताधीशांशी केलेली तडजोड होती, असे अनंतकुमार हेगडे बरळले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी कोणताही त्याग केला नाही त्यांनीच उपोषण, सत्याग्रह यामुळे स्वातंत्र्य मिळाले यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले आणि ते महात्मा झाले, असे अनंतकुमार बडबडले! महात्मा गांधी यांचा सत्याग्रह म्हणजे ढोंग होते, नाटक होते, असे संतापजनक वक्तव्य या महाभागाने केले आहे. आता हेगडे यांना भारतीय जनता पक्षाने माफी मागण्यास सांगितले आहे. पक्षाच्या कारवाईचा बडगा टाळण्यासाठी हेगडे माफीही मागतील, पण भाजपचा एकही नेता माफीच्या लायकीचा नाही. आधी काहीही बरळायचं आणि संकट आलं की माफी मागायची, हा खेळ त्यांनी कायम खेळला. महात्माजींविरोधात वाटेल तसे केलेल्या आरोपाचे घाव कोणत्याही माफीने भरून निघू शकत नाहीत.
आपलं राज्य तर भाजपच्या असल्या बोलघेवड्या नेत्यांमुळे केव्हाच बदनाम झालं आहे. सैनिक सीमेवर असताना त्यांच्या पत्नींना मुलं होतातच कशी, असला विनोद करणारा प्रशांत परिचारक हा याच पक्षाचा आमदार. दारूच्या बाटलीवर बाईची छबी चिकटवण्याची अक्कल देण्याचा पराक्रम भाजप सरकारमधल्या एका मंत्र्याने केला होता. दारूचे ब्रँड विकत नसतील तर त्याला महिलांचे नाव द्या. त्यामुळे दारूचा खप वाढेल, असे म्हणत संपूर्ण स्त्री वर्गाचा या मंत्र्याने अपमान केला होता. श्रीपाद छिंदम नावाच्या आणखी एका आचरट नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असंच वक्तव्यं केलं होतं. या सगळ्या नेत्यांविरोधात राज्यात प्रचंड संताप व्यक्त होऊनही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. पार्टी विथ डिफरन्सचा बोलबाला करणार्‍या भाजपचा मुखडा या नेत्यांनी टराटरा फाडून टाकला आहे. आता यात प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या मंत्र्याची भर पडली आहे. केजरीवाल यांना अतिरेकी म्हणून संबोधणार्‍या जावडेकरांकडे अतिरेकी असल्याचे पुरावे होते म्हणे. निवडणुकीच्या प्रचारात हे होतच असतं, असं म्हणणार्‍या भाजपच्या नेत्यांना असले आरोप करण्याची लागलेली लूथ काही कमी झालेली नाही.निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या घातक वक्तव्यांचा मारा त्यांनी दिल्लीतील निवडणूक संपूनही करायचं सोडलेलं नाही. सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमात याच भाजप नेत्यांची विखारी वक्तव्ये, महापुरुषांचा अपमान करणारी विधाने, सामाजिक धु्रवीकरणाला वेग देणारी आहेत. दिल्लीतल्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा पराभव हा बेताल आरोपांमुळे झाल्याचा साक्षात्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना झाला आहे. शहा यांचा स्वभाव चूक मान्य करणारा नाही. आज ते चुकीची कबुली देतात. यावरून तरी नेत्यांनी शहाणं व्हावं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -