संपादकीय : धरणफुटीनंतरचे खेकडापुराण!

Mumbai
संपादकीय

कोकणातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा तर्क जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केल्यानंतर या वक्तव्याविरोधात सोशल मीडियावर एकच रान पेटले. कुणी सावंतांच्या निवासस्थानी खेकडे सोडले, तर कुणी ते पोलिसांच्या हवाली केले. संपूर्ण आठवडाच या खेकडापुराणाने गाजला. त्यात चोहोबाजूने सावंतांची खिल्ली उडवली गेली. घटनेच्या मुळाशी डोकावले असता लक्षात येते की, तिवरे धरणात गेल्या काही वर्षांपासून गळती वाढली होती. स्थानिक रहिवाशांनी केलेल्या या तक्रारीची शासनाने दखल न घेतल्याने हे धरण फुटल्याचे काही दिवसांत स्पष्ट झाले. धरणफुटीचे शास्त्रीयदृष्ठ्या कारण जाणून घेतले असता मातीची धरणे बांधताना त्याचा ‘हर्टिंग झोन’ म्हणजेच गाभा हा काळ्या मातीने भरायचा असतो. कारण काळी माती ही चिवट असते. तिची पकड मजबूत असते. परंतु कोकणात काळी माती मिळत नाही. असे असतानाही काळी माती असल्याचे दाखवून धरण बांधले गेलेे. त्यातून ही धरणफुटीची घटना घडल्याचा संशय इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी)चे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे तिवरे धरण हे खेकड्यांमुळे फुटले नाही हे स्पष्टच होते. मात्र, शासनावर आलेले बालंट खेकड्यांवर ढकलून सावंतांनी कातडी बचाव भूमिका घेतली. त्यात ते पूर्णत:अपयशी ठरले हेदेखील तितकेच खरे. या संपूर्ण प्रकारातून शासन आणि खेकडा यांच्यातील साम्यही ठळकपणे पुढे आले. खेकड्याची शरीररचना लक्षात घेता त्याला कणा, मान आणि डोकेही नसते. शासनाचेही काहीसे तसेच आहे. आलेल्या परिस्थितीसमोर यातील मंत्री, अधिकारी अशा बेमालूम पद्धतीने झुकतात की त्यांना कणा आहे की नाही याबाबत शंका येते. ‘खेकड्यामुळे तिवरे फुटले’, असे बालिश विधाने करत ही मंडळी स्वत:च्या पदाची नेहमीच ‘मान’हानी करत असतात. त्यातून खेकड्यांप्रमाणेच या मंडळींनाही डोके नसल्याचे स्पष्ट होते. अर्थात, खेकड्यांची पुढार्‍यांशी बरोबरी केल्याने समस्त खेकडा समाजाची मानहानी होण्याचा गंभीर धोकाही संभवतो, ही बाब अलहिदा. पण म्हणून धरणे खेकड्यांमुळे फुटतच नाही असा निष्कर्ष काढणेदेखील संयुक्तिक ठरणार नाही. दुर्घटना घडल्यानंतर त्याची कारणमीमांसा करताना काही असे मुद्दे पुढे येतात की, त्यांचा प्रत्यक्ष त्या घटनेशी संबंध नसू शकतो. पण भविष्यातील धोक्याची घंटा म्हणून या मुद्यांकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास दुर्घटना टळूही शकतात. खेकडापुराणाकडेही त्याच दृष्टीकोनातून बघितले जावे. विजय पांढरे यांचा जलसंपदा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेत त्यांच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवेल. ‘खेकड्यांची बिळं फारशी खोलवर जात नाहीत’, हे पांढरेंना ठाऊक असल्याने त्या आधारे ते धरणफुटीत खेकड्यांना दोषी मानत नाहीत. पांढरे यांच्या मताशी मेरीचे निवृत्त महासंचालक डी. एम. मोरे यांचेदेखील मत मिळते-जुळते आहे. पण या दोघांच्या कर्मभूमीत अर्थात मेरीतच मृद यांत्रिकी विभाग कार्यरत आहे. या विभागात माती आणि मुरूम यांच्यावर संशोधने केली जातात. याच विभागात वैज्ञानिक संशोधन अधिकारी म्हणून निवृत्त झालेले नामदेव पठाडे यांच्यासह त्यांच्या टीमने २००१ ते २००४ या काळात धरणांच्या गळतीवर संशोधन केले. हे संशोधन अभ्यासले असता पांढरे आणि मोरे यांचा दावा सहजपणे खोडला जातो. तिवरे घटनेच्या पार्श्वभूमीवर हे जुने संशोधन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नाशिक जिल्ह्यातील वाघेरे आणि रायगड जिल्ह्यातील कुंडलिका डावा तट कालव्याचे निरीक्षण करून या संशोधनाला मूर्त रूप दिले होते. यात लक्षात आले की, धरण मातीचे असो वा दगडाचे, ते पोखरण्यात खेकड्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या संशोधनात खेकड्यांचा प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजनादेखील सुचवण्यात आल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी केल्यानंतर संबंधित धरण परिसरातील खेकडे मेले आणि त्यामुळे मुरूम आणि भिंतींना छिद्रे पडण्याचे प्रमाण थांबले. परिणामी गळती थांबली. हे संशोधन केवळ कागदी घोडे नाचवून केलेले नाही. त्यासाठी तीन जणांची टीम कार्यरत होती. ‘पर्मनंट रिमेडीयल मेजर्स सजेशन फॉर स्टॉपिंग परक्युलेशन टू डाऊनस्ट्रिम ऑफ वाघेरे डॅम, कुंडलिका डॅम’ असा या संशोधन अहवालाचा विषय होता. यात सर्वाधिक महत्त्वाची बाब निदर्शनास आली ती म्हणजे धरणातील खेकडे हे केवळ मातीच पोखरत नाहीत तर ते मुरूमही पोखरतात. मुरुमाला किंवा भिंतीला पोखरुन अक्षरश: छिद्रे पाडतात. अशा छिद्रांची संख्या वाढल्यानंतर पाण्याच्या दाबाने संबंधित भिंत पडण्याची किंवा तिला भगदाड पडण्याची दाट शक्यता असते. तिथून धरण फुटू शकते किंवा गळती वाढू शकते. या संपूर्ण संशोधनाला शास्त्रीय आधार असल्याने त्याला पांढरे वा मोरेदेखील ही बाब नाकारू शकत नाहीत. दुर्दैवाने हे संशोधन केवळ दोनच प्रकल्पांपुरते मर्यादित राहिले. त्यानंतर असंख्य धरणांच्या परिसरांत खेकड्यांनी उच्छाद मांडला. विशेषत: कोकणातील धरणांना खेकड्यांनी लक्ष्य केले. त्यातून पाण्याची गळतीही मोठ्या प्रमाणात वाढली. परंतु मेरीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनांचा उपयोग ही गळती रोखण्यासाठी झाला नाही, ही शोकांतिका आहे. या संशोधनांसाठी शासनानेच निधी खर्च केला आणि काही काळात संशोधन अहवाल बासनात गुंडाळून तो विस्मृतीच्या पटलावर टाकून दिला. संशोधनांकडे पाहण्याच्या अशा उदासीन दृष्टीकोनाने आजवर कोट्यवधी लिटर पाण्याची गळती झाली. उन्हाळ्यात जेव्हा गावेच्या गावे कोरडी पडतात, त्यावेळी गळतीचे महत्त्व अधोरेखित होते. तिवरे धरणफुटी जरी खेकड्यांमुळे झाली नसली तरी धरण सुरक्षिततेच्या मुद्यांमध्ये खेकड्यांना अग्रस्थानी ठेवणे क्रमप्राप्त आहे. अर्थात त्यासाठी कोट्यवधींच्या निधीची आवश्यकता नाही. म्हणूनच कदाचित अशा स्वस्तातील उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले गेले असावे!