घरफिचर्ससंपादकीय : कर्नाटकी कुनिथ्यात गोव्याचो शिमगो!

संपादकीय : कर्नाटकी कुनिथ्यात गोव्याचो शिमगो!

Subscribe

सत्ता ही शुचिर्भूततेचे साधन नाही. सत्ता मिळवण्यासाठी लांडीलबाडी ही करावीच लागते. कोणीही, कितीही शुचिर्भूततेचा आव आणला तरी छक्केपंजे खेळल्याशिवाय सत्ता मिळत नाहीत, हे सर्वसामान्यांच्या मनात इतके रुजले आहे की, आता त्यांनाही त्यात फारसे काही वाटेनासे झाले आहे. फरक फक्त इतका असतो की, अशा मार्गाने सत्ता मिळवणार्‍यांना हे सर्व पवित्र वाटत असते आणि ज्याची सत्ता जाते त्याला अपवित्र. बाकी लोकशाहीच्या नावाखाली असे वेगवेगळे पवित्रे अवलंबिले जातात आणि त्यामार्गाने सत्ता मिळवली जाते. काँग्रेस जेव्हा अशी लांडीलबाडी करून सत्ता मिळवत होती, तेव्हा भारतीय जनता पक्षाला नितिमत्तेचे डोहाळे लागले होते आणि आता भाजपने सत्ता मिळवण्यासाठी त्याच मार्गांचा अवलंब केल्यावर काँग्रेसला आंबट खावेसे वाटत आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दलाची (सेक्युलर) सत्ता डावाला लागली असताना भाजपने गोव्यात काँग्रेसचा अक्षरश: गेम केला. काँग्रेसचे सर्व नेते कर्नाटकातील आपली सत्ता टिकवण्याच्या चिंतेत असताना गोव्यात भाजपने काँग्रेसचे चक्क १० आमदार फोडले. विरोधी पक्ष नेते कवळेकर यांच्यासह १० काँग्रेसच्या आमदारांनी वेगळा गट करत तेथील विधान सभा अध्यक्षांना गोवा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपल्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, असे पत्रही देऊन टाकले. या सर्व आमदारांनी गुरुवारी दिल्लीत जाऊन भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये इतका मोठा भूकंप हा सहजासहजी झालेला नाही. त्यामागे अर्थातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांची चाणक्य निती दिसून येते. ब्रिजचा खेळ आपले पत्ते प्रतिस्पर्ध्यांना कळणार नाहीत पण प्रतिस्पर्ध्यांच्या हातात कोणते पत्ते आहे याचा अंदाज बांधून डाव खेळावा लागतो, तसेच राजकारणात आहे. राजकारण म्हणजे फक्त आरोप, प्रत्यारोप नाहीत. तर आवश्यक ती तयारी करून संधीची वाट पाहत दबा धरून बसणे आणि संधी मिळताच योग्य तो पत्ता टाकून प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करणे याला राजकारण म्हणतात. त्यासाठी आपल्याकडील पत्त्यांचा योग्य तो वापर करावा लागतो. तो वापर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला. त्यामुळे आज गोव्यात भाजपला मोठे यश प्राप्त झाले आहे. त्यासाठी अमित शहा यांनी गोव्यातील आपला हुकुमी एक्का विश्वजीत राणे यांचा चांगला वापर केल्याचे दिसून येते. गोव्यात चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या प्रतापराव राणे यांचा विश्वजीत राणे हा मुलगा. मध्यंतरी ते विधानसभेचे सभापती होते आणि मनोहर पर्रीकर गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री. तेव्हा दोघांच्या सहमतीने विश्वजीत विरोधी पक्षाचा असूनही त्याला एका सरकारी उपक्रमाचे मुख्य नेमण्यात आले होते. दोनदा काँग्रेस आमदार म्हणून निवडून आलेला हा आमदार, दीड वर्षांपूर्वी गोव्यात काँग्रेसला मोठा पक्ष होण्याची संधी मिळताच सरकार स्थापनेचे गणित जुळवून दिल्लीला राहुल गांधींच्या भेटीला पोहोचला होता. कारण पक्षाचे गोव्यातील प्रभारी दिग्विजय सिंह मौजमजा करीत बसलेले होते. तर दिल्लीत कोणी या नेत्याला राहुल गांधींना भेटूही दिले नाही. दोन दिवस चरफडत गेल्यावर तो माघारी गोव्याला परतला व त्याने नव्याने निवडून आलेल्या जागेचाही राजीनामा देऊन टाकला. दिग्विजयच नव्हेतर राहुलच्याही नावाचा त्याने उद्धार केला आणि भाजपा सरकार बनवण्यास उघडपणे हातभार लावला. तेवढ्यावर न थांबता भाजपचा उमेदवार होऊन पुन्हा तीच जागा जिंकली. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री पद सोडून माघारी गोव्यात आले आणि विश्वजीत मंत्रीही झाला. मध्यंतरी पर्रीकर यांची प्रकृती गंभीर होती तेव्हा पुन्हा काँग्रेसने मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना सुरुवात केली होती. इतक्यात विश्वजीतने नवा चमत्कार घडवून आणला. सोळापैकी दोन आमदार फोडून त्याने काँग्रेस आणखी दुबळी केली आहे. आमदारकीचा राजीनामा देणारे दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर असे ते दोन आमदार होते. आपणच हे काम केलेले असून गोव्यातून काँग्रेस नामशेष करण्याचा विडा उचलला असल्याचे विश्वजीतने त्यानंतर सांगितले. इतक्या टोकाला काँग्रेसचा हा तरुण नेता कशामुळे गेला? राहुल गांधींनी मोक्याच्या क्षणी त्याला भेट नाकारली वा दिली नाही, इतकीच गोष्ट आहे ना? मग तेच राहुल गांधी सामान्य माणसाला अडल्यानडल्या प्रसंगी भेटणार म्हणजे नेमके काय?अशीच परिस्थिती २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होऊन गेल्यावर आसामचे तात्कालीन काँग्रेस मंत्री हेमंतो विश्वशर्मा यांची झाली होती. लगेच सावरले नाही तर ईशान्येकडील मोठे राज्य असलेल्या आसाममधून पक्षाचे नाव पुसले जाईल, असे सांगायला हेमंतो राहुल गांधींकडे पोहोचले होते. त्यांच्यासोबत तिथले काँग्रेसचे काही आमदारही होते. हे शिष्टमंडळ आपले गार्‍हाणे पक्षाच्या उपाध्यक्षासमोर मांडत होते, पण उपाध्यक्ष असलेल्या राहुल गांधींचे तिकडे लक्षही नव्हते. कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे दुखणे समजून घेण्यापेक्षा राहुल आपल्या लाडक्या कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालण्यात इतके गर्क होते, की शिष्टमंडळाला दिलेला वेळ संपून गेला. मग हेमंतो यांच्या लक्षात आले, की आपल्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्ता नेत्यापेक्षा काँग्रेसला लाडक्या कुत्र्यांची गरज आहे. माघारी आसामला जाताच त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी विश्वजीत राणेंसारखीच काँग्रेसला नामशेष करण्याची शपथ घेतली. हेमंतो विश्वशर्मा यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी पक्ष प्रवेशाची चर्चा केली, तेव्हा त्यांनी भविष्यात सत्ता भाजपला मिळाल्यास आपले मंत्रीपद कायम ठेवावे किंवा आपल्यालाच मुख्यमंत्री करावे, अशी कुठलीही अट घातली नाही. त्यांनी अतिशय विचित्र अट घातली आणि शहांनी ती आनंदाने तत्काळ मान्य करून टाकली. ती अट अशी होती, की ईशान्य भारतात भाजपचा विस्तार वाढवण्याची जबाबदारी हेमंतोवर टाकावी आणि त्यातून काँग्रेस पुरती नामशेष करण्याच्या कार्याला आशीर्वाद द्यावे. हेमंतो यांनी भाजपमध्ये जाऊन त्याची मांडणी केली. त्यांनी नंतरच्या तीन वर्षात आपला संकल्प पूर्ण केला. आधी आसाम राज्यातली सत्ता भाजपला मिळवून देण्यासाठी हेमंतो राबला आणि नंतर इशान्येकडील अनेक लहानमोठ्या राज्यातले स्थानिक प्रादेशिक पक्ष भाजपच्या गोटात दाखल झाले. त्रिपुरासारख्या राज्यातली सत्ताही भाजपकडे आली. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षांनी आपल्याकडील हेमंतो, विश्वजीत राणे असे मोहरे गमावले. ते अमित शहा यांनी आपसुक मिळवले. त्यांना पाठिंबा दिला, त्यांच्या मागे कायम उभे राहिले. बहुसंख्य ईशान्य भारत भाजपच्या पंखाखाली आला असताना आज गोव्यातून काँग्रेस नामशेष होत आहे. राहुल गांधी यांच्या वागण्यामुळे दुखावलेल्या विश्वजीत राणेंनी गोव्यातून काँग्रेस नामशेष करण्याची प्रतिज्ञा करून शेंडीला गाठ मारली. ती आता पूर्ण झाली आहे. गोव्यात आता काँग्रेस नावालाही उरलेली नाही. कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेसवर कुनिथा नृत्य करण्याची वेळ आली असताना गोव्यात काँग्रेसचो शिमगो झालो हा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -